जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवा...

जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता या दोन्ही बाबी पीक उत्पादन वाढीसाठी उपयुक्त आहेत. जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी माती परीक्षण करून,पीक नियोजन आणि सेंद्रिय खतांचा वापर शिफारशी प्रमाणे करावा.
जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवा...
Organic CarbonAgrowon

डॉ. दीपाली कांबळे

जमिनीचे आरोग्य हे जमिनीतील सुपीकता आणि जमिनीची उत्पादन क्षमता (Soil Production Capacity), जमिनीत असणारे घटक आणि जमिनीचे गुणधर्म यावर अवलंबून असते. जमिनीमध्ये असणारी खनिजद्रव्ये, सेंद्रिय पदार्थ (Organic Material), जल आणि वायू हे चारही घटक पिकांच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण म्हणजेच जमिनीचे आरोग्य चांगले असते. जमिनीमध्ये भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म असतात. जमिनीचा सजीवपणा प्रामुख्याने जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण आणि गुणवत्तेवर अवलंबून असतो.

पीक उत्पादनामध्ये (Crop Production) जमीन हा एक अत्यंत महत्त्वाचा नैसर्गिक घटक आहे.जमिनीची सुपीकता व उत्पादकता या दोन्ही बाबी पीक उत्पादन वाढीसाठी उपयुक्त ठरतात. पीक उत्पादन वाढीसाठी रासायनिक खते आणि पाण्याचा अमर्याद वापर झाल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी झाली. त्यामुळे पिकांचे उत्पादन घटले.

संकरित आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड केल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांच्या मोठ्या प्रमाणात वापर झाला. दुसऱ्याबाजुला जमिनीमध्ये अन्नद्रव्यांच्या समतोल पुरवठा केला जात नाही. मुख्य, दुय्यम, आणि सूक्ष्म अशा १७ अन्नद्रव्यांचा पुरवठा करणाऱ्या सेंद्रिय खतांचा पुरवठा पुरेसा केला जात नाही. पाण्याच्या अतिवापरामुळे जमीन क्षारयुक्त व चिबड बनत आहेत. बांधबंदिस्ती नसल्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीच्या वरच्या थरातील अन्नद्रव्य आणि सुपीक माती वाहून जाते. त्यामुळे जमिनीची धूप होते, जमीन नापिक होतात.

जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय अवशेषातील कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव कार्यरत होतात. जमिनीमध्ये कार्बन आणि नत्र यांचे गुणोत्तर योग्य ठेवले जाते. सेंद्रिय खते व पिकांच्या अवशेषातील कर्ब-नत्र गुणोत्तर प्रमाण महत्त्वाचे असते. हे गुणोत्तर जेवढे जास्त तेवढा वेळ सेंद्रिय पदार्थ कुजण्यास लागतो. हे गुणोत्तर सर्वसाधारण सेंद्रिय खतात १२:१ ते २०:१ या दरम्यान असल्यास अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने उपयुक्त असते.

जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे वर्गीकरण ः

सेंद्रिय कर्ब ---अत्यंत कमी ---कमी ---मध्यम ---थोडे जास्त ---जास्त ---अत्यंत जास्त (%)

०.२० पेक्षा कमी ---०.२१ -०.४० ---०.४१ – ०.६०---०.६१ -०.८० ---०.८१ -१.० ---१.० पेक्षा

सेंद्रिय कर्बाचे फायदे ः

१) चोपण जमिनीचा घट्टपणा कमी होऊन मातीच्या कणाकणांतील पोकळी वाढते. जमिनीमध्ये हवा खेळती राहते.

२)हलक्या जमिनीचा पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. काळ्या जमिनीत अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होतो.

३) मातीची धूप कमी होते.मातीची जडणघडण सुधारते.रासायनिक द्रव्यांची उपलब्धता वाढते.

४) स्फुरद स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते. स्फुरदाची उपलब्धता वाढते.

५) जमिनीचा सामू उदासीन (६.५ ते ७.५ ) ठेवण्यास मदत होते.

६) चुनखडीयुक्त जमिनीत अन्नद्रव्यांची स्थिरता कमी होते.

७) जमिनीमध्ये सूक्ष्मजीव व जीवाणूंच्या जननक्रियेस गती प्राप्त होते. जैविक संख्येत वाढ होते.

८) जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जिवाणूंना सेंद्रिय कर्बाद्वारे ऊर्जा पुरवली जाते. जिवाणूंची कार्यक्षमता वाढून अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.

९) सेंद्रिय कर्बामुळे विकारांचे प्रमाण वाढून अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेनुसार चांगला परिमाण होतो.

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी उपाय ः

१) पीक फेरपालट करताना कडधान्य पिकांची लागवड करावी.

२) दरवर्षी सेंद्रिय खत शेवटच्या कुळवाच्या पाळीआधी जमिनीत मिसळावे.

३) क्षारपड जमिनीत धैंचा किंवा ताग जमिनीत पेरून दीड महिन्यात गाडावा.

४) पीक अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर करावा.

५) चोपण जमिनीत सेंद्रिय व रासायनिक भूसुधारकांचा (उदा. प्रेसमड, जिप्सम ) वापर करावा. आम्ल जमिनीत चुन्याचा वापर करावा.

६) बांध बंदिस्ती करून जमिनीची धूप कमी करावी.

७) जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. जीवाणूसंवर्धक शेणखतात मिसळून योग्य प्रमाणात वापरावे.

८) ठिबक सिंचनाद्वारे किंवा तुषार सूक्ष्म सिंचनाद्वारे खतांचे नियोजन करावे.

संपर्क ः

डॉ. दीपाली कांबळे, (विषय विशेषज्ञ (कृषिविद्या) कृषी विज्ञान केंद्र,बदनापूर,जि.जालना)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com