Food Inflation : पावसामुळे महागाई वाढण्याची शक्यता

मागच्या काही दिवसांपासून भारतात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे काढणीला (Crop Harvest) आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.
Food inflation
Food inflationagrowon

मागच्या काही दिवसांपासून भारतात मुसळधार पाऊस सुरू आहे.  या पावसामुळे काढणीला (Crop Harvest) आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. यात तांदूळ (Rice), सोयाबीन (Soybean) , कापूस (Cotton), कडधान्य आणि भाजीपाला यांसारखी मुख्य उन्हाळी पिकं आहेत. या नुकसानीमुळे अन्नधान्य महागाई (Food Inflation) वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जर अन्नधान्याच्या किमती वाढल्या तर केंद्र सरकार तांदूळ , गहू आणि साखर यांसारख्या खाद्यपदार्थांच्या निर्यातीवर अतिरिक्त निर्बंध लादू शकते. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आपल्या व्याजदरात वाढ करावी लागू शकते.

उत्तरप्रदेश मधील बाराबंकी येथील 36 वर्षीय शेतकरी नरेंद्र शुक्ला रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगतात की, "मागच्या एका आठवड्यात इतका पाऊस पडलाय की, काढणीला आलेल्या भाताच्या लोंब्यांमधून आता मोड यायला सुरुवात होईल." 

पंधरवड्यात काढणीला आलेला भात या मुसळधार पावसाने भुईसपाट झालाय. आता ऊन पडलं की, शुक्ला त्यांच्या शेतात बटाट्याचं पीक घेतील.  

उत्तरप्रदेश भारतातील दुसरं मोठं तांदूळ उत्पादक राज्य आहे. मात्र ऑक्टोबरमध्ये सामान्यपेक्षा 500% जास्त पाऊस झाल्याने पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

उत्तरप्रदेशचे शेजारी असलेल्या मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि राजस्थानमध्येही मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं व्यापाऱ्यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं.

यावर आयएलए कमोडिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक हरीश गॅलीपेल्ली सांगतात की, पावसाने एकतर उत्पादनात घट होईल किंवा मग हार्वेस्टिंगचा दर्जा घसरेल. कारण काही ठिकाणी पीक कापणीला आली होती तर काही ठिकाणी हार्वेस्टिंग पूर्ण झालं होतं.

भारतीय शेतकरी साधारणपणे जून-जुलैमध्ये उन्हाळी पेरणी करतात. आणि मान्सूनच्या पाऊस सुरू होण्याच्या टप्प्यात म्हणजे सप्टेंबरच्या मध्यापासून कापणी सुरू होते.

पण यावर्षी पावसाचं गणितच बिघडलं. यावेळी जून मध्ये पाऊस लांबला होता. आता पीक काढणीला आल्यावर मुसळधार पाऊस पडला. देशाच्या उत्तर-पश्चिम आणि पूर्व भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याने मुसळधार पाऊस पडला.  

या आठवड्याच्या पहिल्या तीन दिवसांत उत्तर आणि पूर्व भागात मुसळधार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे, तर आठवड्याच्या उत्तरार्धात दक्षिण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असं भारतीय हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रॉयटर्स य वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

आधीच जागतिक कारणांमुळे अन्नधान्याच्या किंमती वाढल्या आहेत. आणि अशात आता या पावसामुळे जे नुकसान झालं आहे त्यामुळेही अन्नधान्याच्या किंमती वाढण्याची शक्यता असल्याचं एका जागतिक व्यापारी कंपनीच्या मुंबईस्थित डीलरने रॉयटर्सशी बोलताना सांगितलं.

"महागाई नियंत्रणात ठेवावी म्हणून केंद्र सरकार सोबतच आरबीआयवरही दबाव आहे. पीक उत्पादनाच्या आकड्यांमध्ये घसरण म्हणजे निर्यातीवर दीर्घकाळासाठी अंकुश असा त्याचा अर्थ होतो." असंही त्या डीलरने सांगितलं. आरबीआयने या वर्षी आपला बेंचमार्क रेपो रेट 190 बेसिस पॉईंटने वाढवला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com