भाजीपाला पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन

पिकास वाढीच्या संवेदनशील अवस्थेत पोषक घटकांचा पुरवठा योग्य प्रमाणात न झाल्याने उत्पादनात घट येते. त्यासाठी पीक तणविरहित ठेवणे आवश्यक आहे.
Weed Management
Weed ManagementAgrowon

भाजीपाला पिकांत तणांच्या प्रादुर्भावामुळे मुख्य पीक आणि तण यांच्या विविध पोषक घटकांसाठी स्पर्धा होते. पिकास वाढीच्या संवेदनशील अवस्थेत पोषक घटकांचा पुरवठा योग्य प्रमाणात न झाल्याने उत्पादनात घट येते. त्यासाठी पीक तणविरहित ठेवणे आवश्यक आहे. खरीप हंगामात विविध भाजीपाला पिकांची (Vegetable Cultivation) लागवड केली जाते. कमी कालावधीत आणि कमी जागेत भाजीपाला पिकांपासून चांगले उत्पादन मिळते.

भाजीपाला पिकांना अधिक प्रमाणात निविष्ठांची गरज असते. भाजीपाला पिकांच्या लागवडीमध्ये सिंचन, सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर अधिक होतो. त्यामुळे तणांच्या वाढीस पोषक वातावरण उपलब्ध होते. लागवडीनंतर पीकवाढीच्या सुरुवातीचा एक तृतीयांश काळ हा अतिसंवेदनशील मानला जातो.

या काळात अन्नद्रव्ये, पाणी, सूर्यप्रकाश इत्यादी बाबींसाठी पीक आणि तणांची मोठी स्पर्धा होते. या काळात पीक तणविरहित न ठेवल्यास भाजीपाला उत्पादनात सुमारे ९० टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता असते. त्यामुळे भाजीपाला लागवडीमध्ये एकात्मिक तणनियंत्रण पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. मिरची, पालक, आंबट चुका, कोथिंबीर या कमी कालावधीच्या भाजीपाला पिकांत प्रतिबंधात्मक उपाय अत्यंत फायद्याचे ठरतात.

भाजीपाला पिकांत आढळणारी तणे ः

१) खरीप हंगाम ः

तांदुळजा, रेशीमकाटा, नागरमोथा, केना, कोंबडा, हराळी, माका, सावन, जंगली राई, आणि हजारदाणी व इत्यादी.

२) रब्बी हंगाम ः

रानकांदा, चंदनबटवा, हराळी, नागरमोथा, दुधी, रानवांगी इ.

भाजीपाला पिकांचा संवेदनशील काळ आणि तणांमुळे उत्पादनात येणारी घट ः

पिके---संवेदनशील काळ (लागवडीनंतर दिवस)---उत्पन्नातील घट (टक्के)

१) कांदा---३० ते ४०---५० ते ७०

२) लसूण---३० ते ६०---५० ते ७०

३) कोबी---३० ते ४५---३५ ते ६०

४) फुलकोबी---२५ ते ३०---५० ते ६०

५) भेंडी---१५ ते ३०---४० ते ५०

६) टोमॅटो---३० ते ४५---४० ते ७०

७) मिरची---३० ते ४५---६० ते ७०

८) बटाटा---२० ते ४०---६ ते ८२

९) वाटाणा---३० ते ४५---२५ ते ३५

१०) वांगी---२० ते ६०---७० ते ८०

११) गाजर---१५ ते २०---७० ते ८०

कीड-रोगांसाठी तणे ठरतात पर्यायी यजमान ः

भाजीपाला पिकांसोबत वाढणारी बरीच तणे ही कीड-रोगांसाठी यजमान असतात. या तणांमुळे कीड-रोग मुख्य पिकांकडे आकर्षित होतात. उदा. रानवांगी हे तण वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळीला आकर्षित करते. चंदनबटवा हे मावा किडीचे पोषण करते. तर घाणेरी हे तण पांढरी माशी या किडीला भेंडीच्या पानांवरील पिवळ्या शिरा (मोझॅक) या विषाणूजन्य रोगास बळी पडण्यास मदत करते.

एकात्मिक तणनियंत्रण पद्धती ः

१) प्रतिबंधात्मक उपाय ः

 • - शेतामध्ये पूर्ण कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावे.

 • - पीक पेरणीपूर्वी शेतात उगवलेली तणे काढून टाकावीत.

 • - पेरणीसाठी तणविरहित बियाणे वापरावे.

 • - शेतात तणांची कमीत कमी उगवण होईल याकडे लक्ष देणे. त्यामुळे कीड-रोगांच्या पुढील प्रसारास आळा बसेल.

 • - पाण्याचे पाट, शेतातील बांध, कंपोस्ट खड्डे इत्यादी जवळ तण

 • उगवणार नाही याची काळजी घ्यावी. उगवल्यास फुलोऱ्यावर येण्यापूर्वी उपटून टाकावे.

 • - शक्य असल्यास आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

२) निवारणात्मक उपाय ः

अ) मशागतीय पद्धत ः

योग्य मशागत, वेळेवर व योग्य अंतरावर पेरणी, योग्य पद्धतीने खतांची मात्रा देणे, रोपांची एकरी योग्य संख्या राखणे, आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब, आंतरपीक पद्धती आणि कीड व रोगनियंत्रण यांचा समावेश मशागतीय पद्धतीत होतो.

ब) कायिक/ यांत्रिक पद्धत ः

या पद्धतीमध्ये मानवी, पशुधन किंवा यांत्रिक शक्तीचा वापर करून तणे शेतातून काढली जातात. यासाठी प्रामुख्याने खुरपणी, कोळपणीचा समावेश होतो. तसेच खांदणी, तण उपटणे, छाटणे किंवा जाळणे इत्यादींचा वापर केला जातो.

क) जैविक पद्धती ः

कीटक, जिवाणू, बुरशी, वनस्पती यांचा वापर करूनही तण नियंत्रण करता येते. उदा. गाजर गवताचे नियंत्रण करण्यासाठी ‘मेक्सिकन भुंगे’ वापरता येतात. किंवा तरोटा, स्टायलो हेमाटा या गवताच्या माध्यमातून अनावश्यक तणांच्या वाढीवर नैसर्गिकरीत्या नियंत्रण ठेवता येते.

ड) रासायनिक पद्धत ः

रासायनिक पद्धतीमध्ये निवडक आणि बिननिवडक तणनाशकांचा शिफारशीप्रमाणे वापर केला जातो. योग्य तणनाशकांच्या वापरामुळे तणांचे प्रभावी नियंत्रण करता येते.

तणनाशके वापरताना घ्यावयाची काळजी ः

 • - विविध पिकांसाठी शिफारस केलेली तणनाशके योग्य प्रमाणात वापरावीत.

 • - तणनाशके खरेदी करताना अंतिम वापराची मुदत तपासावी. मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत.

 • - तणनाशकांच्या फवारणीसाठी स्वतंत्र व पाठीवरचा पंप वापरावा.

 • - रासायनिक तणनाशकांचा वापर हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.

 • - तणनाशके फवारताना जमीन ढेकळेरहित, भुसभुशीत असावी. जमिनीमध्ये ओल असावी.

 • - तणनाशकांची फवारणी करण्यापूर्वी वाऱ्याचा वेग, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पाऊस येण्याची शक्यता या बाबी विचारात घ्याव्यात.

 • - फवारणीवेळी फवारा मारणाऱ्या व्यक्तीने मागे सरकत जावे. जेणेकरून तणनाशके फवारलेल्या जागी पावले पडणार नाहीत.

 • - ग्लायफोसेटसारखे बिन निवडक तणनाशक फवारल्यानंतर कमीत कमी २१ दिवस शेतात कोणतीही मशागत करू नये.

 • - तणनाशकांची फवारणी सर्व ठिकाणी एकसमान दाबाखाली करावी. फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावेत.

 • - उभ्या पिकांमध्ये फवारणी करताना द्रावण मुख्य पिकांवर किंवा इतर पिकांवर जाणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी हूडचा वापर करावा.

 • - तणनाशकांचा आवश्यकतेनुसार शिफारशीत प्रमाणात वापर करावा. तणनाशकांचा वारंवार आणि अतिरेकी वापर करणे टाळावे.

 • - तणनाशके वापरलेल्या जमिनीत दरवर्षी शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खताचा वापर करावा.

एकात्मिक तणनियंत्रण पद्धत ः

 • - पेरणीनंतर लगेच ५० ते ७५ टक्के शिफारशीत तणनाशकाची फवारणी + पेरणीनंतर २५ दिवसांनी १ ते २ कोळपण्या कराव्यात.

 • - पेरणीनंतर १५ ते २० दिवसांत एक खुरपणी + त्यानंतर १५ ते २० दिवसांनी उगवलेल्या तणांवर तणनाशकाची फवारणी करावी.

 • - पेरणीनंतर लगेच ५० ते ७५ टक्के शिफारशीत तणनाशकाची फवारणी + त्यानंतर ३० ते ३५ दिवसांनी उगवलेल्या तणांवर तणनाशकाची फवारणी करावी.

- डॉ. राजीव साठे, ९४२३७२१८९४

(शिक्षण सहयोगी, कृषीविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, बदनापूर)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com