Integrated Health Day : एकात्मिक आरोग्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्नाची गरज

आज जगभर साजऱ्या होणाऱ्या एकात्मिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने संभाव्य संकटांचा मुकाबला करण्यासाठी परस्पर सहकार्य, सामंजस्याचे एक पाऊल पुढे टाकावे लागेल.
Integrated Health Day
Integrated Health Day Agrowon

डॉ. विकास वासकर, डॉ. राहुल कोल्हे, डॉ. चंद्रकांत भोंग

आज जगभर साजऱ्या होणाऱ्या एकात्मिक आरोग्य दिनाच्या (Integrated Health Day) निमित्ताने संभाव्य संकटांचा मुकाबला करण्यासाठी परस्पर सहकार्य, सामंजस्याचे एक पाऊल पुढे टाकावे लागेल. एकात्मिक आरोग्याची संकल्पना (Integrated Health Concept) राबविण्यासाठी जगातील अनेक संस्था, वैज्ञानिक, तज्ज्ञ सहभागी होत असले तरी यात महत्त्वाचा पुढाकार सर्वसामान्यांचा असणे अत्यावश्यक आहे.

पृथ्वीवर वास्तव्य करणाऱ्या एकपेशीय जिवाणू-विषाणूंपासून महाकाय हत्ती-देवमाशांसारख्या अनेक प्रत्येक सजीवांना अन्न, पाणी आणि हवा या तीन मूलभूत गोष्टी जगण्यासाठी आवश्यक आहेत. त्यांच्याशिवाय जीवसृष्टी तग धरू शकत नाही. काही सजीवांना हे घटक निसर्गातून सहजासहजी उपलब्ध होतात. ‘जीवो जीवनस्य जीवनम’ या उक्तीनुसार काही सजीवांना या बाबी मिळविण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागतो.

Integrated Health Day
Indian : स्वतः भारतीय म्हणून शाबूत राहू !

याच घटकांचा वापर करून वनस्पती वाढतात, धान्य उगवते. त्यांच्यावर तृणजीवी पशू-पक्षी अवलंबून असतात. या तृणजीवाचा आहारात समावेश करून मांसभक्षी पशू-पक्षी आपली उपजीविका करतात. वनस्पती तसेच मृतदेहांच्या अवशेषांचे विघटन मातीतील सूक्ष्मजीवांमुळे होते. पृथ्वीवरील जीवसृष्टी वन्य तसेच पाळीव पशू-पक्षी, जलचर, उभयचर, झाडेझुडपे या सर्व घटकांनी बनलेली असल्याने हे सर्व सहचर आहेत. त्यातील प्रत्येकाचा मनुष्याएवढाच या जीवसृष्टीवर हक्क आहे.

Integrated Health Day
Crop Damage : पंचनाम्यासाठी पैसे मागितल्याप्रकरणी कृषी सहायक, ग्रामसेवक निलंबित

पर्यावरणाचा समतोल महत्त्वाचा ः

१) निसर्गाच्या व्याख्येप्रमाणे मनुष्य हा सुद्धा या पृथ्वीवरील एक प्राणी आहे. या सृष्टीचा केवळ एक छोटासा भाग आहे, हेच नेमकं आपण विसरत चाललो आहोत. मानव सोडून आकाशात, जमिनीवर तसेच पाण्यात वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक जीवाचे वैशिष्ट्य असे, की हे जीव आपल्या गरजांपुरतेच निसर्गातून घेतात आणि शक्य तितके निसर्गाला परत देण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर आपल्या शारीरिक क्रियांमुळे किंवा भौतिक हालचालींमुळे निसर्गाचा समतोल राखला जाईल याची पुरेपूर काळजी घेतात. निसर्ग पुनः पुन्हा सांगत असताना देखील मनुष्य मात्र आपल्या गरजेपेक्षा कितीतरी जास्त पटीत ओरबाडून घेत आहे. परत येथेच न थांबता दात्या निसर्गावरच घाव घालून त्याचा ऱ्हास सुद्धा करत आहोत.

२) वास्तविक पाहता पृथ्वीवरील सर्व सजीवांना पुरेल इतकी साधनसंपत्ती निसर्गाने उपलब्ध करून दिली आहे आणि तो देतही आहे. पण सगळं काही आपल्यालाच मिळाले पाहिजे या हव्यासापोटी आपण या गोष्टींच्या वापराचा अतिरेक करत आहोत. अमेरिका-युरोप खंडांतील देशामध्ये दिसणारी सुबत्ता आणि त्याचबरोबर आशिया-आफ्रिका खंडांतील मागासलेपणा ही एकाच पृथ्वीवर दिसणारी दोन विदारक दृश्ये आहेत.

३) निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक बाबीचा एकमेकांशी कार्यकारणभाव असतो, हेच मुळी मानवाच्या खिजगणतीत नाही. त्यामुळे निसर्गचक्राशी तादात्म्य न पावणाऱ्या गोष्टींच्या आहारी जात निसर्गाचा पर्यायाने स्वतःचा विनाश ओढवून घेतला आहे. मनुष्य स्वयंपूर्ण किंवा स्वयंभू नसून मानवी जीवन निसर्गातील अनेक छोट्या-मोठ्या घटकांवर अवलंबून आहे. म्हणूनच चराचरातील जीवसृष्टीचा तसेच निसर्गाचा समतोल ढळू न देता निसर्गाशी तादात्म्य पावत जीवनशैली विकसित करणे हा ‘एकात्मिक आरोग्य’ संकल्पनेचा मूळ उद्देश आहे.

४) निसर्गाचा समतोल बिघडला तर जीवसृष्टीचा पर्यायाने मानवाचा विनाश अटळ आहे, हे वास्तव स्वीकारूनच मार्गक्रमण करणे क्रमप्राप्त आहे. लौकिकार्थाने मानवाचे आरोग्य हे त्याच्या हातात नसून पृथ्वीवरच्या सर्व चेतन घटकांशी, म्हणजे पशू-पक्षी, वृक्षवल्ली, जलचर आणि त्याचबरोबर अचेतन भौतिक घटकांशी म्हणजे हवा, पाणी, माती, पाऊस यांच्याशी जोडलेले आहे.

५) मनुष्य-जीवसृष्टी-पर्यावरण यांच्यातील व्यामिश्र व गुंतागुंतीचे संबंध पाहता मानवाने विविध क्षेत्रांत केलेल्या भौतिक प्रगतीबरोबरच निसर्गातील अधिक्षेपामुळे उद्‌भवणाऱ्या तत्कालीन तसेच भविष्यातील संकटांचा आणि जोखमीचा मुकाबला करण्यासाठी आंतरदेशीय-

आंतरखंडीय सहकार्याबरोबरच विविध सेवाक्षेत्रांच्या व्यावहारिक पातळ्यांच्या पलीकडे जाऊन परस्पर सौहार्दाची संकल्पना अमलात आणणे अत्यावश्यक आहे.

संक्रमित आजारांचा प्रसार ः

१) मानवाला होणारे बरेचशे आजार हे पशू-संक्रमित आहेत हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. मानवाचे पशू-पक्ष्यांशी असलेले सहचर्य, शेतीकामासाठी पशुधनाचा होणारा वापर, प्राणिजन्य अन्नपदार्थांचा आहारातील समावेश. या बाबींमुळे काही आजार पशू-पक्ष्यांकडून मानवांना संक्रमित होतात.

२) मानवाच्या जंगलातील सहली, रस्ते-धरणे बांधण्यासाठी वृक्षतोड यामुळे होणारे अतिक्रमण तसेच अपारंपरिक पशू-पक्ष्यांचा आहारातील समावेश या घटकांमुळे नैसर्गिकरीत्या वन्य पशू-पक्ष्यांमध्ये संक्रमित होणारे आजार माणसांना होतात. अनेक विषाणू-जिवाणूजन्य आजारांचा उद्‌भव अशा प्रकारे झाल्याची अनेक उदाहरणे देता येतील.

३) अन्न उत्पादन व अन्न सुरक्षा, पाण्याचे व्यवस्थापन, हवामानाची गुणवत्ता, पर्यावरणीय संस्थांचे आरोग्य, प्रतिजैविकरोधकता, तापमानवाढ अशा अनेक बाबींवर लक्ष देणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल राखणे ही सामूहिक जबाबदारी आहे.

४) वैद्यकशास्त्र, पशुवैद्यकशास्त्र, कृषी, पर्यावरण, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण, सार्वजनिक आरोग्य, अभियांत्रिकी अशा विविध विभागांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.

एकात्मिक आरोग्य संयुक्त कृती योजना ः

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेल्या व्याख्येप्रमाणे एकात्मिक आरोग्य म्हणजे स्थानिक, क्षेत्रीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर एकमेकांच्या सहकार्याने तसेच एकमेकांना पूरक ठरतील असे सहयोगी, बहुक्षेत्रीय तथा बहुशाखीय दृष्टिकोन बाळगत निसर्गाचा समतोल राखणे. मानव, पशुपक्षी, वृक्षवल्ली आणि त्यांच्यामध्ये सामाईक असलेले पर्यावरण यांच्यातील व्यामिश्र संबंध मानवी जीवन समृद्ध करण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न.

१) जीवन समृद्ध करण्याचे प्रयत्न स्थानिक, राज्य, देश तसेच जागतिक पातळीवर होणे ही नितांत आवश्यक आहे. समाधानाची बाब म्हणजे जागतिक पातळीवर कार्यरत, संयुक्त राष्ट्रांची अन्न व कृषी संघटना (FAO), संयुक्त राष्ट्रांचा पर्यावरण कार्यक्रम (UNEP), जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि जागतिक पशू आरोग्य संघटना (WOAH) या चार संस्थांनी एकत्र येत ‘एकात्मिक आरोग्य संयुक्त कृती योजना’ कार्यान्वित केली आहे. मानव-पशुपक्षी-वृक्षवल्ली-पर्यावरण या चारी जीवसृष्टीच्या संबंधित पातळ्यांवर संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य देशांमध्ये परस्पर सहकार्य, संपर्क, क्षमता निर्माण आणि समन्वय साधत सर्वसमावेशक आराखडा आखला आहे.

२) प्रस्तावित २०२२-२०२६ साठीच्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत (१) आरोग्य यंत्रणांमार्फत एकात्मिक आरोग्य क्षमता निर्माण, (२) जगाच्या वेगवेगळ्या भागांत स्थिरावलेले पशुसंक्रमित आजार, (३) संभाव्य आणि उदयोन्मुख पशुसंक्रमित आजार, (४) उष्णकटिबंधीय दुर्लक्षित कीटकजन्य आजार, (५) अन्न सुरक्षा (६) प्रतिजैविके प्रतिरोध क्षमता या सहा उद्दिष्टांनुसार जीवसृष्टीचा समतोल साधण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे, आणि त्यादृष्टीने एकात्मिक आरोग्याची संकल्पनेच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.

३) कोरोनापेक्षा अधिक विध्वंसक्षमता असलेले इबोला, निपाह सारखे आजार, जागतिक तापमानवाढ, अनियमित व अनियंत्रित पाऊस, जंगलातील वणवे, हिमनगांचे वितळणे, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ अशी अनेक संकटे समोर उभी आहेत. कोरोना नैसर्गिक आपत्ती की मानवनिर्मित आघात या वादात न पडता या जगाला हादरवून टाकणाऱ्या समस्यांतून आपण काय शिकलो आणि त्यादृष्टीने जीवसृष्टीचा ऱ्हास थांबविण्यासाठी काय प्रयत्न केले हे महत्त्वाचे ठरते.

संपर्क ः डॉ. विकास वासकर, ९४०३१८४५४१

(पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com