Glyphosate : ‘पीसीओ’ संकल्पना व्यावहारिक आहे का?

ग्लायफोसेट तणनाशकाचा वापर ‘पीसीओं’ च्या मार्फत करण्याची संकल्पना व्यावहारिक वाटत नाही. दुर्गम भागात तसेच अन्य ठिकाणीही ते वेळेवर पोचू शकतील का, सद्यःस्थितीचा विचार केल्यास त्यांच्या तणनाशक अनुभवाचे व तांत्रिक ज्ञानाचे काय अशा शंका प्रगतिशील शेतकऱ्यांनी उपस्थित केल्या आहेत. शेतकऱ्यांना पर्याय देताना त्यांचा उत्पादन खर्च वाढणार नाही व शेतीचे नुकसान होणार नाही अशा निर्णयांची गरज शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Glyphosate
GlyphosateAgrowon

ग्लायफोसेट तणनाशक (Glyphosate Weeedicide) आणि त्याची अमेरिका, युरोपातील वस्तुस्थिती याबाबत कालच्या भागात आपण माहिती घेतली. या तणनाशकाचा (Weedicide) वापर ‘पीसीओ’ (पेस्ट कंट्रोल ऑपरेटर) (Pest Control Operator) यांच्यामार्फतच करण्याचे आदेश केंद्रीय कृषीमंत्रालयाने (Union Ministry Of Agriculture) दिल्याने शेतकरी गोत्यात आले आहेत. राज्यातील निवडक व प्रातिनिधीक स्वरूपातील शेतकऱ्यांचे अनुभव त्यादृष्टीने जाणून घेणे गरजेचे आहे.

शून्य मशागत पद्धतीत वापर अनिवार्य

कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर अनेक वर्षांपासून शून्य मशागत (विना नांगरणी) पद्धतीने ऊस व भातशेती करतात. त्यामुळे ग्लासफोसेटचा वापर त्यांच्या शेती पद्धतीत अनिवार्य ठरला आहे. ते म्हणतात की उसाची खोडकी आम्ही ग्लायफोसेटचा वापर करून नियंत्रित करतो. त्यानंतर ती चांगल्या प्रकारे कुजतात. त्याचे जमिनीत नैसर्गिक खत तयार होते. त्यातून जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढतो. सतरा वर्षांपासून अशा पद्धतीने ग्लायफोसेटचा वापर करतो आहे. जमिनीची सुपीकता कमी झाल्याचे इतक्या वर्षांत कुठे जाणवलेले नाही. एकरी उत्पादन चांगले मिळते. आम्ही गूळ तयार करतो. त्याचा दर्जाही अप्रतिम असतो.

Glyphosate
Glyphosate : ग्लायफोसेट तणनाशक विक्रीबाबत संभ्रम

असे मिळताहेत फायदे

चिपळूणकर सांगतात की ग्लायफोसेटच्या वापरामुळे ऊस व फेरपालट व फेरपालट पीक ते ऊस असा विचार केल्यास एकरी किमान १२ हजार रुपयांची बचत होते. बाहेरून कोणता सेंद्रिय घटक आणून शेतीला द्यावा लागत नाही. कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठीही शून्य मशागत हे वरदान ठरणारे तंत्रज्ञान आहे. केवळ ऊस, भातापुरते मर्यादित न राहाता आम्ही राज्यातील विविध पिकांत त्याचे प्रयोग शेतकऱ्यांकडे घेतले आहेत. त्याचे परिणाम उत्साहवर्धक आहेत.

‘पीसीओ’ची गरज काय?

तणनाशक वापराचा आम्हा शेतकऱ्यांचा अनुभव वीस वर्षांहून अधिक काळचा आहे. त्यामुळे ‘पेस्ट कंट्रोल ऑपरेटर’चा वापर करण्याची तशी गरज भासणारी नाही. केवळ वापर कसा करायचा हे माहीत असून चालणार नाही, तर ग्लायफोसेटबाबत साऱ्या तांत्रिक ज्ञानाबाबतही माहीत असण्याची गरज आहे असेही चिपळूणकर सांगतात.

तीस वर्षांहून अधिक अनुभव

पुणे येथील प्रगतिशील व प्रयोगशील द्राक्ष व डाळिंब बागायतदार प्रकाश बाफना म्हणाले की सन १९९२ पासून म्हणजे तब्बल ३० वर्षांचा आम्हाला ग्लायफोसेट वापराचा तगडा अनुभव आहे. माझी निर्यातक्षम शेतमाल दर्जा असलेली शेती आहे. आमचे क्षेत्र मोठे आहे. मजुरांची समस्या एवढी गंभीर आहे व त्यांचा खर्च एवढा प्रमाणाबाहेर गेला आहे की फळबागांच्या बांधावर व मोकळ्या जागेत

Glyphosate
Glyphosate Ban : ग्लायफोसेट निर्बंधामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर

दरवर्षी या तणनाशकाचा वापर केल्याशिवाय पर्यायच नाही. पण हा वापर इतका दक्षतापूर्वक व कुशलतेने असतो की पिकाचे नुकसान झालेले अनुभवास आलेले नाही. आंतरप्रवाही असल्याने हे तणनाशक मुळांपर्यंत तणाचे नियंत्रण करते. मग ते चांगले कुजून त्याचे उत्तम नैसर्गिक खत तयार होते व सेंद्रिय कर्ब वाढतो असे अनुभव घेतले आहेत. विविध प्रयोग, संपूर्ण अभ्यास व प्रयोगशाळांमध्ये विश्‍लेषण केल्याशिवाय आम्ही कोणत्याही निविष्ठा वापरत नाही.

‘पीसीओ’ ची संकल्पना अव्यवहार्य

बाफना म्हणाले की ‘पीसीओं’ ची आम्हा शेतकऱ्यांना काय गरज आहे? अनेक वर्षांपासून आम्ही त्याचा वापर शास्त्रीय पद्धतीने करतोच आहे. एवढे ‘पीसीओ’ आज राज्यात उपलब्ध आहेत का? आम्हाला उद्याच तणनाशकाचा वापर करायचा आहे तर संबंधित ‘पीसीओ’ दिलेल्या वेळी बागेत येणार का? तो नाही आला तर बागेचे होणारे नुकसान कोण भरून देईल? ही संकल्पना व्यवहार्य वाटत नाही.

Glyphosate
Glyphosate : ग्लायफोसेट जगभरात चर्चेत राहिलेले तणनाशक

‘ब्लॅक मार्केट’ ची भीती

एखाद्या उत्पादनावर निर्बंध आणले की त्याचे पुढे ‘ब्लॅक मार्केट’ सुरू होण्याचा मोठा धोका असतो. त्याचा सर्वाधिक भुर्दंड शेतकऱ्यांनाच बसतो. मध्यंतरी एक कीटकनाशक ‘बॅन’ झाले पण ते आजही बाजारात चढ्या भावाने मिळत असल्याचे ऐकिवात आहे. असे ग्लायफोसेटच्या बाबत व्हायला नको.

आमचे महत्त्वाचे अस्त्र

भातपिकात ‘एसआरटी’ (सगुणा राइस टेक्निक) तंत्रज्ञान रूजवलेले नेरळ (जि. रायगड) येथील प्रयोगशील शेतकरी चंद्रशेखर भडसावळे म्हणाले की अन्नसुरक्षा व ‘ग्लोबल वॉर्मिंग’ या मुख्य समस्या पाहता शून्य मशागत तंत्राने शेती हाच महत्त्वाचा पर्याय आहे. त्या दृष्टीने ‘एसआरटी’ तंत्रज्ञान वापरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ग्लायफोसेट हे महत्त्वाचे अस्त्र आहे.

खरिपात भात लागवडीपूर्वी तसेच काढणीनंतर पुढील पीक घेण्याआधी मोकळ्या रानातील तण काढण्यासाठी त्याचा वापर होतो. भातकाढणीनंतर काही शेतकरी त्याचे अवशेष जाळून टाकतात. त्यानंतर पुढील पिकाचे नियोजन करतात. आम्ही तसे न करता ग्लायफोसेट वापरतो. या पद्धतीत सेंद्रिय कर्बाचे उत्तम स्थिरीकरण झाल्याचे अनुभवण्यास आले आहे. पुढील पीकही त्वरित घेता येते.

दुर्गम भागात ‘पीसीओ’ पोचणार कसे?

समजा गडचिरोली किंवा रायगड जिल्ह्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्याला तणनाशकाचा वापर करायचा आहे तर त्याच्यापर्यंत हे ‘पीसीओ’ कसे आणि वेळेत पोचणार का हा प्रश्‍न आहे. बरं, पंधरा वर्षांपासून शेतकरी त्याची फवारणी करीत असेल तर वापराबाबतचे त्याचे ज्ञान व अनुभव जमेत धरायचा नाही का? अधिसूचना मान्यच करायची तर ‘पीसीओ’ होण्याच्या दृष्टीने सरकारने तातडीने आम्हाला अपेक्षित प्रशिक्षण, परवाना या बाबी उपलब्ध करून द्याव्यात.

तणनाशकांचे प्रयोग

भडसावळे म्हणाले की ग्लायफोसेट व बाजारपेठेत पर्यायी बिनानिवडक तणनाशक अशा दोन्हींचा मोकळ्या रानात प्रयोग केला. दोन्ही तणनाशकांद्वारे सहा दिवसांच्या काळात तणे पिवळी पडली. फरक आहे तो फक्त किमतीचा. ग्लायफोसेट प्रति लिटर ६०० रुपये दराने यंदा मिळाले. मागील वर्षी त्याची किंमत ३०० रुपयेच होती. पर्यायी तणनाशकाची किंमत होती लिटरला ११०० रुपये. दरांमध्ये होणारी वाढ, सरकार घेत असलेले निर्णय आणि महागडे पर्याय असा सारासार विचार केल्यास शेतकऱ्याच्या खर्चावरच बोजा येत असल्याची परिस्थिती आहे.

मुख्यमंत्र्यांकडे निवेदन

भडसावळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यात केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट, होणारे नुकसान व व्यथा मांडल्या आहेत. ग्लायफोसेटचे फायदेही विशद केले आहेत. निवेदनातून मांडलेल्या मागण्या अशा.

१)ग्लायफोसेटच्या फवारणीबाबत शेतकऱ्यांचे १९७५ पासूनचे अधिकार अबाधित असून संसदेत त्याबाबत आवाज उठवावा.

२) जगभरात मान्यता मिळालेली शून्य मशागत पद्धती व ग्लायफोसेटचा वापर याबाबत

उच्चस्तरीय स्तरावर अभ्यास करण्यात यावा. इक्रिसॅट व राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये

त्याबाबत संशोधन सुरू व्हावे.

३)हवामान बदलाच्या अनुषंगाने जागतिक बॅक, पोकरा प्रकल्प व सगुणा फाउंडेशन (नेरळ) यांच्याकडे शून्य मशागत शेती पद्धती व ग्लायफोसेटचा वापर याबाबत प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात यावी.

खर्च वाढणार नाही याचा विचार हवा

महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे खजिनदार व प्रगतिशील शेतकरी सुनील पवार (माळेगाव खुर्द, ता. बारामती. जि. पुणे) म्हणाले की द्राक्ष बागेत पॅराक्वाट डायक्लोराईड या तणनाशकाची शिफारस आहे. उद्या कदाचित त्यावरही निर्बंध वा बंदी येईल. जगात एखाद्या रसायनावर बंदीबाबत एकमत असल्यास ते आम्ही समजू शकतो. पण ‘पीसीओं’च्या माध्यमातून केवळ निर्बंध आणायचे यातून निर्णयामागील पारदर्शकता समजत नाही.

सरकारने कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढणार नाही, त्याला आर्थिक दृष्ट्या परवडतील असे पर्याय उपलब्ध आहेत का याचा विचार करायला हवा. आज संपूर्ण जगात ‘सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी’ वापरून कमी खर्चात उत्पादन घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कृषी क्षेत्रात ‘पीसीओ’ यंत्रणाच उपलब्ध नसेल तर त्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसणार आहे.

सरकारने भारतीय कृषी संशोधन संस्था’ (आयसीएआर) अंतर्गत संस्था व शेतकरी यांच्याशी बोलून निर्णय घ्यायला हवेत. आज भारतीय द्राक्षांची चव व गुणवत्ता यांची दखल जगाने घेतली आहे. चिलीसारख्या स्पर्धक देशाची जागा आपण घेतली आहे. कोणत्याही पिकात असे चांगले काम होत असताना संबंधित शेतकरी अडचणीत येणार नाही हे सरकारने पाहायला हवे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com