World Soil Day 2022 : उत्पादनवाढीसाठी मातीची गुणवत्ता राखणे आवश्यक

जमिनीचं आरोग्य हे जमिनीत असणारे घटक आणि जमिनीचे गुणधर्म यावर अवलंबून असतं.
World Soil Day : 2022`
World Soil Day : 2022`Agrowon

- विकास धामापूरकर

जमिनीचं आरोग्य हे जमिनीत असणारे घटक आणि जमिनीचे गुणधर्म यावर अवलंबून असतं. जमिनीमध्ये असणारी खनिजद्रव्ये, सेंद्रिय पदार्थ, जल आणि वायू हे चारही घटक पिकांच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात असावीत. जमिनीचं आरोग्य (Soil Health) चांगलं असेल तरच ती चांगल्या प्रमाणात उत्पादन देते. चुकीची शेती पद्धती, रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) भरमसाठ वापर यामुळे जमिनीची सुपिकता घटत चालली आहे. आज ‘जागतिक मृदा दिवसाच्या निमित्ताने या वर्षीचे घोषवाक्य "माती : जेथे अन्न सुरू होते." असे आहे. या मोहिमेचा उद्देश जमिन व्यवस्थापनातील वाढत्या आव्हानांना संबोधीत करून जमिनीबद्दल जागरूकता वाढवणे हे आहे.

माती तयार होण्याची निसर्गातील क्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. मोठ्या कठीण खडकांवर तापमान, पाणी, सजिव, बर्फ, वनस्पती, याची क्रिया होऊन शेवटी माती तयार होते. साधारणत: १ इंच माती तयार होण्यासाठी ६५० वर्षे लागतात, ज्या जमिनीमध्ये २५ टक्के हवा, २५ टक्के पाणी, ४५ टक्के खनिजद्रव्ये आणि ५ टक्के सेंद्रिय घटक असतात, त्या जमिनीला आदर्श जमीन संबोधले जाते. ही जमीन पीक उत्पादनासाठी सर्वात योग्य असते. कारण या जमिनीतून पिकांना आवश्यक ती सर्व पोषकद्रव्ये, पाणी यांचा योग्य पुरवठा होत असतो. परंतु चुकीच्या शेती पद्धतीमुळे मातीचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याची कारणे पण वेगवेगळी आहेत. असंतुलित खतांचा वापर, सेंद्रिय घटकांचा कमी पुरवठा, बांध-बंदिस्ती न करणे, यामुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होऊन जमिनीचा वरचा थर वाहून जातो. एकाच जमिनीत दरवर्षी एकाच प्रकारचे पीक घेणे, पशूधनाच्या कमतरतेमुळे शेणखताचा पुरवठा कमी झालेला आहे. या सर्व बाबींचा परिणाम म्हणजे जमिनीतील सुक्ष्मजंतूचे प्रमाण कमी होत चालले आहे. सुक्ष्मजंतूच्या कार्यामुळे पिकाला पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा होत असतो त्यामुळे अन्नधान्याचे चांगले उत्पादन मिळते.

सेंद्रिय घटकयु्क्त जमिनीची आवश्यकता

जमिनीला आदर्श बनविण्याऱ्या घटकाचे प्रमाण जर कमी किंवा जास्त झाले तर त्याचा परिणाम संपूर्ण परिसंस्थेवर होत असतो. पाणी जास्त झाले तर सुक्ष्म जिवाणूंचा ऱ्हास होतो आणि हवेचे प्रमाण कमी होऊन त्याचा परिणाम जिवजंतूच्या कार्यावर होतो. सेंद्रिय घटकांचे प्रमाण कमी झाले तर सुक्ष्म जिवाणूंना अन्न पुरवठा कमी होतो. त्यामुळे पिकांचे पोषण पूर्ण होऊ शकत नाही. खनिजद्रव्य घटकांचे प्रमाण वाढून जमिनी टणक आणि कठीण होतील. ज्या जमिनी मध्ये सेंद्रिय घटकांचे प्रमाण जास्त असते अशा जमिनीमध्ये सूर्य प्रकाशाचे शोषण चांगले होते. जमिनीचे तापमान योग्य राखले जाते. त्यामुळे ह्या चार घटकांवर जमिनीची सुपिकता आणि उत्पादकता अवलंबून असते.

पीकवाढीसाठी अन्नद्रव्ये गरजेची

पीकवाढीसाठी १६ प्रकारच्या अन्नद्रव्याची आवश्यकता असते. ते घटक म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, गंधक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, बोरॉन, तांबे, जस्त, क्लोराईड, मँगेनिज व मॉलिबडेनम या मुख्य तसेच दुय्यम प्रकारच्या अन्नद्रव्याची गरज असते. यापैकी एका जरी अन्नद्रव्याचे प्रमाण कमी जास्त झाले तर त्याचा परिणाम पीक उत्पादनावर होत असतो. जमिनीत एकूण १०८ प्रकारची मूलद्रव्ये असतात. या १६ प्रकारच्या अन्नद्रव्यांचा पुरवठा या १०८ मूलद्रव्यांपासून होत असतो. या सर्व प्रक्रिया नियंत्रित करण्याचे काम ‘हुयमस’म्हणजेच सेंद्रिय घटका द्वारे होत असते. हुयमसमूळे पिकांना त्यांच्या गरजे एवढी अन्नद्रव्ये गरजेच्या वेळी उपलब्ध होत असतात. म्हणून जमिनी मध्ये हुयमसचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे. हुयमसचे प्रमाण जमिनीच्या वरील चार घटकांच्या प्रमाणावर अवलंबून असते. म्हणून येणाऱ्या काळात जमिनीमध्ये हुयमसचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे.

पाणी

पीक उत्पादनामध्ये पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला पाण्याची गरज आहे आणि माती अन्नघटकांबरोबर सजीवांना पाण्याचा पुरवठा करत असते. प्रत्येक सजीवाला त्याच्या गरजेनुसार पाणी उपलब्ध करून देण्याचे काम माती करत आहे. जमिनीमधील पाणी दोन प्रकारे काम करते. वरच्या थरातील पाणी सजीवांची गरज भागवते आणि खालच्या थरातील पाणी तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. माती अन्नघटकांबरोबर सजीवांना पाण्याचा पुरवठा करत असते. जमिनीमध्ये हवा, पाणी, सेंद्रिय पदार्थ, खनिज पदार्थ यांचे प्रमाण योग्य राहिले पाहिजे, यापैकी मुख्य घटक सेंद्रिय पदार्थ आहे.

विकास धामापूरकर, 9422435916

(कृषि विज्ञान केंद्र, सिंधुदुर्ग.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com