Toilet Papers : कागज के फूल

आशियायी देशांवर पाणी बरबाद करण्याचा आरोप करणाऱ्या पाश्‍चिमात्यांनी आपल्या पार्श्‍वभागाबरोबरच निसर्गालाही पाने पुसली आहेत. त्यांची कागद वापरायाची ही पद्धत जेवढी अनारोग्यदायी तेवढीच पर्यावरणविरोधी देखील आहे.
Toilet Paper
Toilet Paper Agrowon

आशियायी (Asian Country) देशांवर पाणी बरबाद करण्याचा आरोप करणाऱ्या पाश्‍चिमात्यांनी आपल्या पार्श्‍वभागाबरोबरच निसर्गालाही पाने पुसली आहेत. त्यांची कागद वापरायाची ही पद्धत जेवढी अनारोग्यदायी तेवढीच पर्यावरणविरोधी देखील आहे. एक पाश्‍चिमात्य माणूस टॉयलेट पेपरचे (Toilet Papers) दिवसभरात साधारणतः ३५ तुकडे वापरतो. एक पोर्तुगीज माणूस आयुष्यभरात साडेसहाशे मैल लांब कागदाचा संडासात चुराडा करतो. अमेरिकेच्या बाबतीत सांगायचं झाल्यास एक अमेरिकन वर्षभरात १४१ भेंडोळी संपवतो. यूकेमध्ये एक माणूस १२७ भेंडोळी वर्षभरात वापरतो.

जेव्हा मी पहिल्यांदा भारताबाहेर गेलो तेव्हा एका गोष्टीने माझी गोची केली होती, आणि ते म्हणजे तिथल्या संडासात नसलेले पाण्याचे जेट फ्लॅश. विमानतळ, हॉटेल, सार्वजनिक संडास अगदी सगळीकडे बिनपाण्याचा कार्यक्रम होता. पाण्याची जागा घेत टॉयलेट पेपरचा रोल प्रत्येक ठिकाणी लटकत होता. ही लोकं असं उष्ट्या अंगाने दिवसभर कशी राहत असतील, याचं किळसदृश्य आश्‍चर्य मला वाटायचं.

Toilet Paper
Crop Insurance : नुकसानीच्या ५२ हजार पूर्वसूचना नाकारल्या

माझ्या मित्रांना यासंबंधी विचारल्यावर ‘ये बाबूराव का स्टाईल है’ या चालीवर ‘ही पाश्‍चिमात्यांची पद्धत आहे’ असं सांगितलं जायचं. या कामासाठी पाणी बरबाद करणारे तुम्ही भारतीय मागास आहेत, अशा अप्रत्यक्ष कोपरखळ्या देखील मिळायच्या. थोड्या फार फरकाने हीच मानसिकता पाश्‍चिमात्य आणि त्यांच्या विचारांचा पगडा असलेल्या देशांत दिसते. पाश्‍चिमात्यांची नक्कल राहण्याच्या आणि खाण्याच्या बाबतीतच नसून धुण्याच्या बाबतीत देखील केली जाते.

Toilet Paper
Cashew Crop Insurance : काजूसाठी विमा योजना

धुण्यापुसण्याची ही परंपरा कधीपासून सुरू आहे? प्राचीन काळातील लोक कोणत्या पद्धतीने निर्मळ होत असतील? अशा प्रश्‍नांच्या माश्‍या डोक्यात घोंघावू लागल्या. संदर्भ तपासताना मनोरंजक माहिती समोर आली. शु(शी)चिर्भूत होण्याची वेगवेगळ्या देशांत वेगवेगळी पद्धत होती. प्राचीन काळी या कामासाठी लाकडाची चिपाडं, गवत, दगड, मक्याचा भुट्टा, कपडा यांसारख्या गोष्टी वापरल्या जायच्या. या वस्तूदेखील औकातीनुसार वापरल्या जायच्या. श्रीमंत लोक रेशमी कापड, लोकर यांसारख्या उंची गोष्टी वापरायचे.

रोमन साम्राज्यात, काठीच्या टोकाला समुद्री स्पंज बांधून ती वापरायची पद्धत होती. त्यांच्या सार्वजनिक संडासात अशा स्पंजी काठ्या व्हिनेगार किंवा मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवलेल्या असायच्या. याच काळात खास पुसण्यासाठी बनवलेले गुळगुळीत गोटे देखील वापरले जायचे. एवढेच काय या गोट्यांवर दुश्मनांची नावं लिहिलेली असायची. शत्रूवरील खुन्नस काढायची पद्धत खरंच अनोखी होती. पण दुष्मनाच्या नावाचा, दोस्त किंवा जवळचा नातेवाईक असला, तर ते काय करत असतील याचे संदर्भ मात्र मला मिळू शकले नाहीत?

अश्मयुगातील पाश्‍चिमात्य पत्रयुगात कसे आले? हा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे. खरं सांगायचं तर संडासात कागद आणला तो चिन्यांनी. ज्ञात स्रोतानुसार ख्रिस्तपूर्व सहाव्या वर्षात म्हणजे, साधारणतः सव्वीसशे वर्षांपूर्वी चीनमध्ये कागद बनला आणि बावीसशे वर्षांपूर्वी त्याचा उपयोग संडासात केला गेला असा उल्लेख आहे.

आधुनिक टॉयलेट पेपरचा उपयोगदेखील चीनमध्ये दिसतो. १३९१ मध्ये चीनच्या राजासाठी हा कागद बनवला जायचा. एवढंच नाही तर सम्राटाच्या सुगंधी क्षणासाठी या कागदावर अत्तरदेखील शिंपडलं जायचं. पुढे ही कागदकला गोऱ्यांनी उचलली आणि त्यांच्याकडे पंधराव्या शतकात मोठ्या प्रमाणात कागदाची निर्मिती होऊ लागली.

जोसेफ गेयटे यांनी पहिला व्यावसायिक टॉयलेट पेपर १९५७ मध्ये बनवला. पण तो चौकोनी पत्रकाच्या स्वरूपात होता. एकावर एक असे चौकोनी कागद मांडून त्याचा गठ्ठा विकला जायचा. जोसेफचा पहिला टॉयलेट पेपर औषधी होता. कोरफडीच्या अर्काची प्रक्रिया त्यावर केलेली होती. त्याच्या दुर्दैवाने त्याचे संशोधन व्यावसायिकदृष्ट्या असफल झाले. मग १९७९ मध्ये अमेरिकेतील स्कॉट बंधूंनी या चौकोनी कागदाला रोलमध्ये गुंडाळत बाजाराला देखील गुंडाळले आणि टॉयलेट रोल घराघरात मुख्य रोल निभावू लागला. पुढे एकोणिसाव्या शतकात टॉयलेट पेपरचा वापर सगळीकडे सुरू झाला आणि पाश्‍चिमात्य जगात ती जीवनावश्यक वस्तू बनली.

पण आशियायी देशांवर पाणी बरबाद करण्याचा आरोप करणाऱ्या पाश्‍चिमात्यांनी आपल्या पार्श्‍वभागाबरोबरच निसर्गालाही पाने पुसली आहेत. त्यांची कागद वापरायाची ही पद्धत जेवढी अनारोग्यदायी तेवढीच पर्यावरणविरोधी देखील आहे. एक पाश्‍चिमात्य माणूस टॉयलेट पेपरचे दिवसभरात साधारणतः ३५ तुकडे वापरतो. एक पोर्तुगीज माणूस आयुष्यभरात साडेसहाशे मैल लांब कागदाचा संडासात चुराडा करतो. अमेरिकेच्या बाबतीत सांगायचं झाल्यास एक अमेरिकन वर्षभरात १४१ भेंडोळी संपवतो. यूकेमध्ये एक माणूस १२७ भेंडोळी वर्षभरात वापरतो.

आकड्यानुसार गेल्यास जगात सर्वांत जास्त टॉयलेट पेपर चीनमध्ये वापरला जातो. चीनने वापरलेला कागद जर पतंगाच्या मांज्यासारखा ओढत आकाशात नेला तर ते भेंडोळं पार प्लुटोपर्यंत पोहोचेल. वर्षाकाठी ५३३ कोटी किलोमीटर कागद चिनी मातीत धाराशाही होतो. दुसरा क्रमांक अमेरिकेचा लागतो. त्यांचं भेंडोळं मोजल्यास नेपच्युनपर्यंत जाईल. यूकेमध्ये वापरला जाणारा संडास कागद एका वर्षात मंगळापर्यंत जाऊन परत पृथ्वीवर परत येईल एवढा मोठा आहे. जपान आकाराच्या मानाने एवढासा देश; पण त्यांचं भेंडोळं देखील गुरू ग्रहापर्यंत पोहोचेल.

टॉयलेटसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदाचा निर्मिती-व्यवसाय निसर्गाची प्रचंड हानी करतो. त्यासाठी करोडो झाडं कापली जातात. जंगलं उध्वस्त होतात. या झाडांची शेतीदेखील केली जाते. या शेतीसाठी परत जैवविविधता संपवली जाते. २०२० मध्ये अमेरिकन लोकांनी २०० कोटी डॉलर्स या कागदावर खर्च केले. यासाठी एका वर्षात ३ कोटींपेक्षा जास्त झाडे कापली. थोडक्यात, अमेरिकेत दरवर्षी ७७.५ फुटबॉल मैदानाएवढी जंगले फक्त टॉयलेट पेपरसाठी कापली जातात. यूकेमध्ये दरवर्षी ५७ लाख झाडांचा टॉयलेट पेपर बनवण्यासाठी बळी दिला जातो.

एका झाडापासून साधारणतः १५०० कागदांची भेंडोळी बनतात. एक भेंडोळी बनवण्यासाठी १४० लिटर पाणी, १.३ किलोवॉट वीज आणि साधारणतः पाऊण किलो लाकूड वापरले जाते. म्हणजे ही वीज आणि लाकूड बनण्यासाठी अजून हजारो लिटर पाणी खर्ची पडते. एका वेळी फक्त अर्धापाऊण लिटर पाण्यात काम भागवण्याऐवजी हे लोकं टॉयलेट पेपर वापरून दररोज शेकडो लिटर पाणी खर्ची घालतात. याव्यतिरिक्त पेपर बनवण्यासाठी वापरले जाणारी घातक रसायने निसर्ग प्रदूषित करतात ते वेगळं.

रशिया हा संपूर्ण युरोपचा सर्वांत मोठा ‘टॉयलेट पेपर’ पुरवठादार आहे. पण युक्रेन युद्धाच्या पार्शवभूमीवर संपूर्ण युरोपभर रशियावर बंदी घालायची लहर दौडतेय. त्यांच्या प्रॉडक्ट्सवर, प्रवाशांवर युरोपमध्ये बंदी घातली जातेय. पाश्‍चिमात्यांनीच नव्हे तर जगातील इतर देशांनी देखील त्यांचं अनुकरण करावं अशी त्यांची अपेक्षा आहे. याचाच भाग म्हणून युरोपियन महासंघाच्या संसदेने रशियातून आयात होणाऱ्या टॉयलेट पेपरवर बंदी घालायची योजना बनवण्याचा घाट घातलाय. त्यांचे नेते योजना तर बनवताहेत, पण सामान्य युरोपियन माणूस चिंतेत आहे. कारण सध्या युरोपमध्ये टॉयलेट पेपर टंचाईचे संकट उभे आहे. त्याच्या किमती वाढल्या आहेत. लोकं टॉयलेट पेपरचा साठा करून ठेवताहेत. बहुतेक लोकांनी तर संडासात कागदाऐवजी भारतीयांप्रमाणे पाणी वापरायला सुरवात केली आहे. युरोपात शुचिर्भूत होण्याच्या सवयीत मोठा बदल घडतोय. गरज जशी शोधाची जननी असते, तशीच ‘जुळवून घेण्या’ची मावशीदेखील आहे. याच गरजेने पाश्‍चिमात्त्यांना पार्श्‍वभाग पुसण्याऐवजी धुण्यास भाग पडले आहे.

टॉयलेट पेपरवर बंदी घालण्याच्या निर्णयाची मात्र रशियाच्या मीडियामध्ये खिल्ली उडवली जातेय. युरोपियनांनी स्वतःच्या पायावर (?) दगड मारून घेतलाय असं म्हटलं जातंय. वसाहतवादात जगाला लुटणाऱ्या आणि दरवर्षी हजारो मैल जंगलं टॉयलेटमध्ये फ्लॅश करणाऱ्या युरोपचे ग्रह सध्या फिरलेत. कधी नव्हे तो त्यांच्याकडे दुष्काळ पडलाय. पावसाने पाठ फिरवल्याने नद्यानाले, धरणं आटताहेत. युरोने लोटांगण घातलंय. महागाई युरोपियन आकाशाला डोकं टेकवतेय. अन्नधान्याची टंचाई निर्माण झालीये. अर्थव्यवस्थेला पोलिओ झालाय. त्यात रशियाशी पंगा घेऊन त्यांनी ऊर्जाघात करून घेतलाय. रशियाने देखील नैसर्गिक गॅसचा पुरवठा बंद करून त्यांना गॅसवर ठेवलंय. अशा परिस्थितीत या हिवाळ्यात युरोपीय माणसाचे खाण्याचे आणि धुण्याचे देखील वांदे होतील यात शंका नाही. या हिवाळ्यात युरोपियन अभिमान गारठेल. खात्या हाताने जगाला लुटणाऱ्या युरोपला, धुत्या हाताने हे पाप फेडावे लागेल असं दिसतंय.

रशियाच्या टॉयलेट पेपर वर बंदी घालून पार अश्मयुगात जाण्याचा त्यांचा मानस दिसतोय. अमेरिकेच्या नादाला लागून युक्रेनचा राग रशियाच्या टॉयलेट पेपरवर काढणाऱ्या युरोपच्या नशिबी शेवटी दगडच येतील का? निसर्गाला इंग्रजीतील ‘फुल’ बनवत ‘कागज के फूल’ वापरणाऱ्या साहेबांवर भविष्यात ‘पत्थर के सनम’ बनायची पाळी येईल का?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com