
शेतकरी ः उन्मेष ओमप्रकाश शिंदे
गाव ः सहाजापूर ता. जि.औरंगाबाद
एकूण शेती ः २७ एकर
केसर आंबा लागवड ः १० एकर
एकूण झाडे ः ६३००
औ रंगाबाद जिल्ह्यातील सहाजापूर येथील उन्मेष ओमप्रकाश शिंदे यांची वडिलोपार्जित २७ एकर शेती. त्यापैकी २ एकर जमिनीचे राज्य महामार्गासाठी भूसंपादन (Land Acquisition) करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या त्यांच्याकडे २५ एकर जमीन शिल्लक राहिली आहे. त्यापैकी १० एकरांवर केसर आंबा (Kesar Mango), तर १० एकरांवर चिंच लागवड आहे.
कोरोनापूर्वी मजुरांच्या मदतीने शेतीतील सर्व कामांचे नियोजन केले जात असे. मात्र कोरोनापासून उन्मेष शिंदे यांनी स्वतः शेतीमध्ये लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. लागवडीपासून कीड-रोग व्यवस्थापन, खत- सिंचन व्यवस्थापन, विक्री नियोजन इत्यादी सर्व कामे कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने ते स्वतः करतात. संपूर्ण लागवडीतील केसर आंब्याची महामार्गाच्या बाजूला स्टॉल लावून थेट विक्री केली जाते.
फळबाग दृष्टिक्षेपात..
साधारणपणे २० वर्षांपूर्वी केसर आंबा लागवड केली. लागवडीनंतर ५ वर्षांनी बागेतून उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली.
बागेमध्ये १० एकरांमध्ये केसर आंब्याची सुमारे ६३०० झाडे आहेत. लागवडीमध्ये विविधता जपत विभिन्न अंतरावर लागवड केली आहे. अलीकडेच घन पद्धतीने साडेचार हजार झाडे लावली आहे.
आंबा बागेमध्ये मागील काही वर्षांपासून आले पिकाची आंतरपीक म्हणून लागवड करण्यास सुरुवात केली आहे.
याशिवाय १० एकरावर ३३ बाय ३० फूट अंतरावर चिंचेची ३८४ झाडे आहे. त्यामध्येच दोन वर्षांपूर्वी १ हजार चंदन रोपांची लागवड केली आहे.
लागवडीत जपली विविधता
उन्मेष शिंदे यांनी केसर आंबा साधारणतः तीन वेगवेगळ्या अंतर पद्धतीने केली आहे. त्यात पहिली लागवड ३० बाय ३० फूट अंतरावर ३०० झाडे, दुसरी १५ बाय १५ फुटांवर १५०० झाडांची लागवड केली आहे. अलीकडेच त्यांनी १५ बाय ५ फूट अंतरावर ४५०० झाडांची घन पद्धतीने लागवड केली आहे. उत्पादनक्षम बागेतून प्रतिझाड साधारण २५० ते २८० आंबा फळांचे उत्पादन मिळते.
खत व्यवस्थापन
बागेमध्ये रासायनिक खतांसह जैविक खतांच्या वापरावर अधिक भर दिला जातो. प्रति झाड साधारण १५ ते २० किलो प्रमाणे शेणखत वर्षातून २ वेळा दिले जाते. ही मात्रा जून महिन्यात एकदा आणि त्यानंतर सहा महिन्यांनी पुन्हा दिली जाते.
ठिबकद्वारे झिंक, सल्फेट, बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा दिल्या जातात.
रासायनिक आणि सेंद्रिय खतांच्या मात्रा देण्याची कार्यवाही डिसेंबर अखेरपर्यंत संपविली जाते. त्यानंतर झाडांना कोणतीही खते दिली जात नाहीत.
सिंचन व्यवस्थापन
बागेत सिंचनासाठी तिसगाव धरणातून पाइपद्वारे पाणी आणून दिले जाते. याशिवाय शेतामध्ये २ विहिरी, २ बोअरवेल आहेत. पाणी उपशासाठी सोलारपंप बसविले आहेत. सिंचनासाठी संपूर्ण आंबा लागवडीमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. झाडांना साधारणत: ५ टक्के मोहर लगडल्यानंतर बागेला सिंचन करण्यास सुरुवात केली जाते. त्यानंतर वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन फळ काढणीपर्यंत पाणी दिले जात असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
व्यवस्थापनातील बाबी
दरवर्षी झाडांवर साधारणतः डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान मोहोर येण्यास सुरुवात व्हायची. तो आंबा मार्च महिन्याच्या अखेरीस ते एप्रिलमध्ये काढणीस येतो. मात्र या वर्षी प्रथमच बागेत पॅक्लोब्युट्राझोलचा वापर केला आहे. साधारण १५ जून च्या दरम्यान पॅक्लोब्युट्राझोल या वाढरोधकांचा वापर शिफारशीप्रमाणे केला. त्यामुळे ऑक्टोबर अखेरीपासूनच झाडांवर मोहोर येण्यास सुरुवात झाली आहे. यंदा नेहमीपेक्षा महिनाभर आधीच आंबा बाग चांगलीच मोहरली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकर आंबा काढणीस येईल, असे उन्मेषरावांनी सांगितले.
सध्या बागेस १५ दिवसांतून एक वेळ सिंचन केले जाते. जमिनीतील ओलावा आणि झाडांची पाण्याची गरज पाहून सिंचनाचे नियोजन केले जाते.
झाडांवरील मोहोरावर बदलत्या वातावरणामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी बागेचे सातत्याने निरीक्षण केले जाईल. आवश्यकतेनुसार तज्ज्ञांच्या सल्ल्याने शिफारशीप्रमाणे फवारणी १ ते २ फवारण्या घेतल्या जातील.
उत्पादन
दरवर्षी बागेतून साधारण ७ ते ८ टन केसर आंबा उत्पादन मिळते. थेट विक्रीवर अधिक भर दिला जातो. त्यानुसार महामार्गाच्या बाजूला स्टॉल लावून संपूर्ण विक्री होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.