Indian Agriculture : शेतजमिनी जिवंत करूया...

सेंद्रिय खत आणि उपयुक्त जिवाणूंनी समृद्ध जमीन हा तिचा श्‍वास आहे. जमिनीखालील वाहते पाणी हे रक्त, तर उभी पिके ही हृदयाच्या ठोक्यांचे काम करतात.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

डॉ.नागेश टेकाळे

Climate Change : वातावरण बदलाचे अभ्यासक आणि हवामान तज्ज्ञ शेतकऱ्यांना अलीकडे एक गंभीर इशारा देऊ लागले आहेत. ते म्हणतात, ‘‘यापुढे तुम्ही पावसास गृहित धरू नका, कारण त्याने त्याचे वेळापत्रक बदलले आहे. त्यास आपणच कारणीभूत आहोत.

धरतीमातेवर होणाऱ्या अमृतजलाच्या वर्षावाला वाहून जाऊ देऊ नका. शक्य तितका भूमातेच्या उदरात मुरू द्या. तिच्या पोटामधील जलसाठा वाढवा.

पावसाचे हेच साठवलेले जल उद्याच्या वाढत्या उष्णतामानास सामोरे जाण्यासाठी मजबूत ढालीप्रमाणे उपयोगात येईल. तुमच्या शेतीलाही जिवंत ठेवेल.’’

आपण म्हणाल ‘जिवंत शेत’ म्हणजे काय?

माणूस जिवंत असल्याची लक्षणे कोणती, तर त्याचे धडधडणारे हृदय, लयीमध्ये चालणारा श्‍वास आणि शरीरातील धमन्यातून वाहणारे रक्त. तशाच आपल्या शेत जमिनीही जिवंत असल्याची काही लक्षणे आहेत.

सेंद्रिय खत आणि उपयुक्त जिवाणूंनी समृद्ध जमीन हा तिचा श्‍वास आहे. जमिनीखालील वाहते पाणी हे रक्त, तर उभी पिके ही हृदयाच्या ठोक्यांचे काम करतात. कष्टाने लावलेल्या पिकास जरा काही नुकसान झाले तरी शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो तो याचमुळे.

म्हणूनच मनुष्य देहाप्रमाणे आपल्या शेतजमिनीची काळजी घेतली पाहिजे. ती फक्त जिवंत ठेवून चालणार नाही, तर सुदृढही ठेवावी लागेल. त्यासाठी तिच्या श्‍वासासाठी कार्यरत सेंद्रिय कर्ब आणि उपयुक्त जिवाणू आणि हृदयासाठी भूगर्भातील पाणी साठवून ते भूगर्भातच वाहते करावयास हवे.

Indian Agriculture
Agriculture Land : सोळा कर्जदार शेतकऱ्यांना मिळाली शेतजमीन परत

जमिनीमध्ये एखादे बोअर घेतले आणि त्याला मिळणारे पाणी हे रक्तदानाप्रमाणे समजले पाहिजे. दानातून मिळालेले रक्त जसे अत्यंत तातडीच्या वेळी वापरतो तसे ते केवळ संरक्षित एक किंवा दोन पाण्यासाठी वापरले पाहिजे.

उगीच एकाच वावरात ३ ते ४ अतिखोल बोअर म्हणजे सलाईनवर असलेला किंवा बाहेरून घेतलेल्या रक्तावर जगणारा रुग्ण होय. अशी शेती जिवंत आहे असे कसे म्हणता येईल? आपली शेतजमीन तिच्या तीन मुख्य अवयवासह जिवंत, सुदृढ ठेवणे हे ती कसणाऱ्या शेतकऱ्यांच्याच हातात आहे.

त्यासाठी आपल्या वावरावर बरसणाऱ्या पावसाचे, मॉन्सूनचे महत्त्व जाणून तो जास्तीत जास्त मुरवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

पावसाचे व्यवस्थापन आपल्याला नवीन नाही. ती पूर्वापार अगदी पाषाणकाळापासून चालत आलेली पारंपरिक पद्धती आहे. या वर्षाजलाच्या तीन कड्या एकमेकांत अडकलेल्या आहेत.

पहिली कडी म्हणजे भूपृष्ठावर पडताच त्याचे होणारे बाष्पीभवन, दुसरी कडी म्हणजे मुसळधार पावसात वाहून जाणारी माती व गाळ आणि सर्वांत महत्त्वाची तिसरी कडी म्हणजे वर्षाजलाचे असलेले अल्पायुष्य.

या तीनही कड्या एकमेकांत गुंफलेल्या असतात, हे खरे असले तरी त्यांची सोडवणूक फार अवघड आहे असे नाही.

वर्षाजल शेतजमिनीवर पडताच त्याचा प्रत्येक थेंब अमृत समजून त्यास भूगर्भात मुरवणे यालाच तर ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ असे म्हणतात. असे अमृत थेंब जमिनीत मुरल्यावर मोती का नाही उगवणार? ज्या जमिनीत सेंद्रिय कर्ब जास्त असते, ती त्यातील जिवाणूंमुळे उबदार, तहानलेली आणि कायम श्‍वास घेत असते.

त्यावर पडलेल्या वर्षाजलाची वाफ होत नाही. म्हणजे पहिली कडी सुटली. अशा जमिनीवरून पावसाचे पाणी वाहण्यापेक्षा अधिक मुरते. संततधार पाऊस असेल तर वावरात साठून राहते. म्हणजेच वेगाने वाहणाऱ्या पाण्यासोबत गाळ वाहून जाण्याचा प्रकार येथे होत नाही.

म्हणजे दुसरी कडीसुद्धा सुटली. आता तिसरी महत्त्वाची कडी म्हणजे पावसाचे अल्पायुष्य. हे खरे आहे की पाऊस काळ हा मर्यादितच आहे. त्याला साठवले किंवा जपले म्हणजे तो दीर्घायुषी होऊ शकतो.

भूगर्भामधील पाषाणात साठलेले हे पाणी निसर्गानेच दीर्घायू केले आहे. पडलेल्या पावसातील काही अंश या पाषाणात जायला हवा. त्या उलट आपण भूगर्भामधील पाषाण फोडून या दीर्घायू पाण्यास अल्पायुषी करतो. यानेच पाणी व्यवस्थापन फसते.

गाळाने भरणारी धरणे हा इशारा...

व्यवस्थापनाचा दुसरा पर्याय म्हणजे जलसंधारण योजना. यामध्येही पावसाचे पडणारे पाणी विविध मार्गाने अडवून भूगर्भात मुरविले जाते. त्यातून भूजल साठा वाढतो. शेततलाव, गावतलाव सिंचन तलाव, पाझर तलाव, वेगवेगळ्या प्रकारचे बंधारे, डोंगर उतारावरील चरी, पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेली धरणे तसेच वीज निर्मितीसाठी बांधलेली मोठमोठी धरणे यांचा यात समावेश होतो.

मॉन्सूनमध्ये पाऊस सुरू झाला की धरणांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागते. अनेक वेळा धरणे ओसंडून वाहू लागतात, त्यांचे दरवाजे उघडून जास्तीच्या पाण्याचा विसर्ग करावा लागतो. धरणे ओसंडून का वाहतात? पाण्यामुळे की आत साठलेल्या सुपीक गाळामुळे? हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या धरणांचे आयुष्य शंभर वर्षाच्या पुढेच असते.

मात्र जेमतेम ३० ते ४० वर्षांतच धरणे गाळाने फुगून जात आहेत. ४-५ मुसळधार पावसातच ती ओसंडून वाहू लागतात. त्यात साठलेल्या गाळामुळे पाणीसाठाही कमी राहतो. अशा भासमान भरलेली धरणे फेब्रुवारीपासूनच खाली होऊ लागतात.

Indian Agriculture
Land Survey : शेतजमीन मोजणीपासून सात गावे वंचित

मे महिन्यात मृत पाणीसाठा म्हणजे तळ दिसू लागतो. धरणामध्ये इतक्या वेगाने गाळ येतोय म्हणजे आपले पाणी व्यवस्थापन फसलेले आहे. डोंगर उतारावरून वाहणाऱ्या नद्या पूर्वी एक दोन पुरापर्यंत गढूळ पाणी दाखवत.

आम्ही वृक्षतोड करून, गवत जाळून डोंगरांना उघडे बोडके केले. मग येथून वाहणाऱ्या नद्या गाळ का घेऊन येणार नाहीत? धरण परिसरात विपुल वृक्षसंपदा असावी. त्या पलीकडे सेंद्रिय शेती असावी असे निकष असले तरी त्याचे पालन कोण करणार? तिथली वृक्षतोड तर सुरूच आहे, पण पाण्याची वर्षभर उपलब्ध झाल्यामुळे उसाची रासायनिक शेती फोफावली आहे.

म्हणजेच धरणात येणारे पाणी व गाळ परिसरामधील रासायनिक अंशही घेऊन येणार. त्यावर नद्या आणि धरणामध्ये जलपर्णी अशीच फोफावत जाणार.

घरांचे रेन वॉटर हार्वेस्टिंग

आजही मला माझे बालपण आठवते. १९६० च्या काळात पावसाळ्यातील पाऊस माळवदाच्या मातीच्या खणावरून पन्हाळ्यावाटे अंगणात कोसळत असे. पडणारे ते पाणी बादल्या, रांजणामध्ये, पिंपामध्ये साठवण्यासाठी आम्ही बहीण भावंडे पावसात भिजत धावपळ करत असू, घरातील आड झाकलेला असे.

फक्त फारच गरज पडली तर पिण्याच्या पाण्यासाठी पोहरा आत जात असे. वर्षाजलाचे व्यवस्थापन माझ्या आईने आम्हाला शिकविले. पावसाच्या पाण्याने लहान मोठी भांडी भरून घेतली जायची. ती संपेपर्यंत आडाच्या वाटेला कोणी जायचे नाही.

जन्मदाती म्हणून आई सन्मान करणारे आपण तिने केलेले असे मोलाचे संस्कार मात्र सहजपणे विसरून जातो.

अंदमान निकोबारमध्ये प्रतिवर्षी मुसळधार पाऊस पडतो तरीही तेथील नागरिक त्याला धरून ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडे मोठमोठे पिंप, मातीची भांडे घराजवळच जमिनीत तोंडापर्यंत गाडलेली असतात. त्यात हे पाणी साठवले जाते. त्याला मातीचीच झाकणे असतात.

त्यात साठवलेले पाणी वर्षभर पुरवून वापरले जाते. हे वर्षाजल व्यवस्थापन परंपरागत, पूर्वजांकडून आलेले आहे. अंदमानमधील एका घरात या पाण्याची चव घेण्याचा योग आला. ग्लासभर पाण्याने मिळालेल्या तृप्तीचे रहस्य त्या स्थानिकाला विचारले.

सांगण्यास आढेवेढे घेत त्याने ते पाणी एक वर्षापूर्वीच्या पावसाचे असल्याचे सांगितले. मला तर आश्‍चर्याचा धक्काच बसला. इथे आपण एक दिवस झालेले पाणी शिळे म्हणून दुसऱ्या दिवशी मोरीत भडाभडा ओतून देणारी अनेक घरे पाहतो.

अमृताचा अव्हेर करण्याच्या वृत्तीमुळेच आता आपल्याला पाणीही विकत घ्यावे लागत आहे. अंदमान निकोबारमधील स्थानिक आजही पावसाच्या पाण्याला औषध समजतात. ते अत्यंत जवळच्या व्यक्तीलाच देतात.

या घरातील रेन वॉटर हार्वेस्टिंगप्रमाणेच शेतीत पडणारा पाऊस मातीत जिरविणे होय. या जिरवलेल्या पाण्याचा मुख्य फायदा खरीप आणि रब्बीच्या पारंपरिक शेतीसाठी होतो. हा वर्षाजल व्यवस्थापनाचा नैसर्गिक आणि शून्य खर्चाचा राजमार्ग आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com