उत्पादन वाढीकरिता द्रवरूप जिवाणू संवर्धने

उपयुक्त, जिवंत किंवा सुप्त अवस्थेतील जिवाणूंचे निर्जंतुक वाहकामध्ये केलेले मिश्रण होय. बीज व रोप प्रक्रियेसाठी आणि मातीतून वापरल्यास या जिवाणूंची संख्या वेगाने वाढते.
Fertilizer
FertilizerAgrowon

गणेश गायकवाड, डॉ. सय्यद इस्माईल

द्रवरूप जिवाणू खत म्हणजे काय?

उपयुक्त, जिवंत किंवा सुप्त अवस्थेतील जिवाणूंचे निर्जंतुक वाहकामध्ये केलेले मिश्रण होय. बीज व रोप प्रक्रियेसाठी (Seedling Process) आणि मातीतून वापरल्यास या जिवाणूंची (Bacteria) संख्या वेगाने वाढते. हे जिवाणू आपले नत्र स्थिरीकरण, स्फुरद (Phosphate) विरघळविणे, सेंद्रिय पदार्थाचे (Organic Properties) विघटन इ. क्रिया करतात. त्यामुळे संबंधित अन्नद्रव्यांचा (Nutrition Supply) पिकास पुरवठा वाढतो. उत्पादनात लक्षणीय वाढ होते.

जिवाणू खताचे मुख्य प्रकार

१) नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू

अ. सहजीवी जिवाणू (उदा. रायझोबिअम)

ब. असहजीवी जिवाणू (उदा. ॲझोटोबॅक्टर)

क. सहयोगी सहजीवी जिवाणू (उदा. ॲझोस्पिरिलम)

२) स्फुरद विरघळविणारे जिवाणू (फॉस्फेट सोल्युबलायझिंग जिवाणू)

उदा. बॅसिलस मेगॅटेरिअम ॲस्परजिलस अवमेरी, पेनिसिलीन डिजिटम इ.

३) पालाश हालचाल वाढवणारे जिवाणू

४) सूक्ष्म अन्नद्रव्ये विरघळविणारे व हालचाल वाढवणारे जिवाणू

अ) झिंक व गंधक विरघळविणारे जिवाणू (थायोबॅसिलस जाती)

ब) मँगेनीज विरघळविणारे जिवाणू (पेनिसिलियम सिट्रीनम)

नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जिवाणूंचे महत्त्व ः

रायझोबिअम : सहयोगी पद्धतीने नत्र स्थिर करते. हे रंगाने पांढरे असून, या शुद्ध द्रवरूप खताचा दुर्गंध येत नाही. याचा सामू ६.८ ते ७.५ असतो.

ॲझोटोबॅक्टर : असहयोगी पद्धतीने नत्र स्थिर करते. भात, कापूस व भाजीपाला वर्गीय पिकास नत्र स्थिर करून देतात.

ॲझोस्पिरीलम : हे मुख्यत्वे तृणधान्ये (भात, मका, बाजरी, ज्वारी इ.), तेलवर्गीय पिके, कपाशी पिकांकरिता उपयोगी आहे. ते भात पिकात २८ मिलिग्रॅम / ग्रॅम, ज्वारी व मका पिकात २० मिलिग्रॅम/ ग्रॅम इतके नत्र स्थिर करते.

ॲझोस्पिरिलम - द्रवरूप ॲझोस्पिरिलमचा रंग निळा किंवा पांढरा असतो. जीवनसत्त्वे, निकोटेनिक ॲसिड, इंडोल ॲसेटिक ॲसिड व जिबरेलिन्स या घटकांना एकत्र करून अंकुर व मुळांची वाढ जोमाने करते.

ॲसिटोबॅक्टर : शर्करायुक्त पिकांमध्ये (उदा. ऊस इ.) सर्वात जास्त क्षमतेने नत्र स्थिर करते.

बहुतांश शेतकऱ्यांनी जिवाणू खताविषयी ऐकलेले असते. तरीही त्यांच्यामध्ये जैविक खताच्या प्रत्यक्ष वापराचे प्रमाण अत्यंत कमी आहे. यामागील कारणांचा शोध घेतल्यास प्रथमदर्शनी दिसून येणारी कारणे ः

१) जिवाणू खताची उपलब्धता नसणे.

२) जिवाणू खताचे महत्त्व व उपयोगिताच माहीत नसणे.

३) पेरणीपूर्वी कमी वेळेत करावी लागणारी बीज प्रक्रिया.

४) जिवाणू खताची गुणवत्ता इ. प्राथमिक गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

उत्पादन पातळीवरील अडचणी -

१) जैविक खताच्या मागणीत अनियंत्रितपणा असणे.

२) जैविक खते फार काळ साठवून ठेवता येत नाही. त्यांचा उपयुक्तता कालावधी कमी असतो.

३) जमिनीच्या ओलावा, तापमान यावर जिवाणूंची वाढ अवलंबून असणे.

४) जिवाणू खते वापरल्यानंतर परिणाम सावकाश दिसतो.

५) स्थानिक पातळीवर वाहक पदार्थाची (कॅरिअर मटेरिअल) अनुपलब्धता.

६) जिवाणू खत तयार करण्यासाठी आवश्यक कुशल मजूर, सुविधा, आर्थिक पाठबळ इ.

७) जैविक खताची गुणवत्ता टिकवून ठेवण्याकरिता लागणारा जास्त कालावधी.

८) जिवाणूखत वाहतुकीतील अडचणी व खर्च.

Fertilizer
Fertilizer : विक्रेत्यांना मिळणार दुकान पोहोच खत

घनस्वरूपातील वाहक पदार्थामुळे जिवाणू खतावर अनेक मर्यादा पडतात. त्यामुळे द्रवरूप जिवाणू खते उपयुक्त ठरू शकतात. द्रवरूप जिवाणू खत म्हणजे उच्च प्रतीचे अधिक संख्येने उपयुक्त जिवाणू व अन्नद्रव्ये आणि त्यांचा बचाव करणाऱ्या पेशींनी युक्त असे द्रावण होय. यामुळे द्रवरूप जिवाणू खताचा उपयुक्तता कालावधीही अधिक दिवसांचा असतो.

जिवाणू खताची उच्चप्रत ही जिवाणू पेशींची संख्या व जिवाणू पेशींची कार्य करण्याची क्षमता (उदा. नत्र स्थिरीकरण किंवा स्फुरद विरघळविण्याची क्षमता इ.) या दोन बाबींवर अवलंबून असते. या बाबी पुढील घटकावर अवलंबून असतात.

१. योग्य व उपयुक्त आंबविण्याचे माध्यम.

२. आंबविण्यासाठीचे यंत्र

३. प्रकल्प उभारणी व स्वच्छ बंदिस्त यंत्रणा.

द्रवरूप जिवाणू खताचे घटक (टक्के वजनानुसार)

-योग्य जिवाणू ः १०-४० टक्के

-द्रावणाचे माध्यम / पाणी ः ३५-६० टक्के

-चिटकून ठेवणारा पदार्थ ः ३-८ टक्के

-प्रसरण पावणारा पदार्थ ः १-५ टक्के

-इतर तरंगणारे घटक ः १-३ टक्के

Fertilizer
Fertilizer Adulteration : भेसळयुक्त खते शोधण्यासाठी कृषी केंद्रे तपासणीचे आदेश

द्रवरूप जिवाणू खताचे महत्त्वाचे गुणधर्म ः

१. द्रवरूप जिवाणू खतांचा उपयुक्तता कालावधी कमाल १२ महिन्यांपर्यंत (म्हणजे प्रचलित जिवाणू खताच्या चार पट) असतो.

२. या खतांची साठवणुकीमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत गेले तरी जिवाणू तग धरू शकतात. काही प्रमाणात अतिनील किरणातही तग धरू शकतात.

३. यातील जिवाणू संख्या (१० चा ९ वा घात प्रति मिलि) ही १२ महिन्यांपर्यंत स्थिर राखली जाते.

४. व्हेंच्यूरी किंवा खत टाकीद्वारे ठिबक सिंचनातूनही ही खते पिकांना सहज देता येतात.

५. यात जिवाणूंच्या बचावासाठी उपयोगी पदार्थ असल्यामुळे जिवाणूंचे सुप्त बीजांकुर तयार होतात, वाढतात.

६. यात जिवाणूसाठी खास अन्नद्रव्ये असल्यामुळे जिवाणूंची कार्यक्षमता वाढते. बियांवर व जमिनीत विपरीत स्थितीमध्येही टिकून राहण्याची क्षमता वाढते

७. वापरणे व हाताळणी तुलनेने सोपी आहे.

८. यातील जिवाणूंची संख्या उत्पादन करतानाच स्थिर केल्यामुळे साठवणुकीनंतरही चांगली कार्यक्षमता मिळते.

९. प्रचलित घनस्वरूपातील जिवाणू खतापेक्षा द्रवरूप जिवाणू खतांची मात्रा कमी दिली तरी चालते. खताची बचत होते.

१०. या जिवाणू खताचा सामू योग्य राखला जातो. त्यातील विकरांची क्रिया जास्त राहते.

११. यातील जिवाणूंच्या एकत्रीकरणामुळे गाठी तयार होत नाहीत. पाण्यात सहज विरघळतात.

१२. यात ओलावा वाढवणारा घटक असल्यामुळे जिवाणूंची बियांवर किंवा विविध घटकांवर सहजरीत्या वाढ जोमाने होते.

१३. यांची शुद्धता विशिष्ट आंबविण्याच्या वासावरून ओळखता येते.

१६. प्रचलित घनरूप माध्यम जैविक खतनिर्मितीसाठी मनुष्यबळ अधिक लागते. तुलनेने द्रवरूप जिवाणू खत तयार करण्याची प्रक्रियेसाठी मनुष्यबळ व खर्च कमी येतो.

द्रवरूप जिवाणूखते वापरायच्या पद्धती

१. जिवाणू खताचे बियाण्यास अंतरक्षीकरण (बीज प्रक्रिया)

२. रोपावर जिवाणू खताचे अंतरक्षीकरण (रोपे प्रक्रिया)

३. जिवाणू संवर्धने मातीत मिसळून देणे.

१. जिवाणू खताचे बियाण्यास अंतरक्षीकरण

जिवाणू खताचे बियाण्यास अंतरक्षीकरण किंवा बीजप्रक्रिया करणे ही कमी खर्चिक पद्धती आहे. एका प्लॅस्टिक पिशवीमध्ये ५ किलोपर्यंतच्या बियाण्यांवर प्रक्रिया करता येते. २१ इंच बाय १० इंच इतक्या आकाराच्या प्लॅस्टिक पिशवीमध्ये २ किलो किंवा त्यापेक्षा जास्त बियाणे भरून, योग्य प्रमाणात द्रवरूप जिवाणू टाकून पिशवीतील बियाणे हळूवारपणे हलवावे. त्यामुळे सर्व बियांवर जैविक संवर्धनाचा समप्रमाणात लेप बसेल. हे बियाणे २० ते ३० मिनिटे सावलीत सुकवावे. बीज प्रक्रियेसाठी रायझोबिअम, ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम आणि सोबत स्फुरद विद्राव्य जिवाणूंचा वापर करावा. दोन किंवा जास्त जिवाणूंचा वापर करता येतो. अशा वेळी प्रथम रायझोबिअम, ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलम या जिवाणूंचा लेप द्यावा. त्यानंतर स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणूंचा लेप द्यावा.

२) रोपावर जिवाणू खतांचे अंतरक्षीकरण -

सर्वसाधारणपणे भात किंवा भाजीपाला पिकाच्या पुनर्लागवडीवेळी ॲझोस्पिरिलम व स्फुरद विद्राव्य जिवाणूंचा वापर केला जातो. ॲझोस्पिरिलम आणि स्फुरद विद्राव्य जिवाणूंची लागणारी मात्रा ५ ते १० लिटर पाण्यामध्ये मिसळून तयार केलेल्या द्रावणामध्ये पुनर्लागवडीपूर्वी अर्धा तास रोपाची मुळे बुडवून ठेवावीत.

३) मातीत मिसळून जिवाणू खते देणे -

एका एकरासाठी २०० मि.लि. (पीएसबी) स्फुरद विद्राव्य जिवाणू खत वापरावे. हे पीएसबी ४०० ते ६०० किलो शेणखत आणि उपलब्ध असेल तर १ ते २ बॅग रॉक फॉस्फेटमध्ये मिसळूनही देता येते. त्यासाठी त्याचे मिश्रण करून रात्रभर ठेवावे. ५० टक्के ओलावा झाल्यावर मातीत मिसळून द्यावे.

घन व द्रवरूप जिवाणू खताचे फायदे व तोटे

घन स्वरूप जिवाणू खत --- द्रवरूप जिवाणू खत

स्वस्त (सुमारे रु. ६० किलो) --- तुलनेने महाग पडते. (रु. ३०० ते ६०० रु. / लिटर)

तयार करण्यास सोपे व प्रकल्पाची गुंतवणूक कमी आहे. --- प्रकल्पासाठी अधिक गुंतवणूक व भागभांडवल आवश्यक.

उपयुक्त कालावधी कमी (फक्त ३ महिने ) --- उपयुक्त कालावधी अधिक. (१ वर्षापर्यंत)

खत प्रकल्पात पूर्ण यांत्रिकीकरण करणे अवघड आहे. --- तयार करण्याची पद्धत सोपी. यांत्रिकीकरण शक्य.

तापमान संवेदनशील असून, अधिक तापमानात जिवाणूंची संख्या कमी होते. --- जिवाणू जास्त तापमानातही तग धरून राहू शकतात.

खतात जिवाणू संख्या कमी कमी होत जाते. नियंत्रित ठेवणे शक्य नसते. --- जिवाणूंची संख्या उच्चतम असते. बऱ्यापैकी स्थिर राहते.

खत तयार करतेवेळी व पुढेही दूषित होण्याची शक्यता अधिक. --- शुद्धता राखणे तुलनेने सोपे.

कार्यक्षमता कमी होत शकते. --- प्रचलित घनरूप जैविक खतापेक्षा जास्त कार्यक्षम.

प्रा. गणेश गायकवाड (सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ), ९४२१०८३५४९

डॉ. सय्यद इस्माईल (प्रमुख शास्त्रज्ञ), ७५८८०८२०४५

(वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com