प्रमुख कार्प मत्स्यबीजांची निर्मिती तंत्र

जेवढे चांगले मत्स्यबीज तेवढे चांगले मत्स्योत्पादन व उत्पन्न मिळते. निकृष्ट दर्जाचे बियाणे, जे मत्स्यपालनाच्या विस्तारासाठी एक प्रमुख अडथळा म्हणून ओळखले जाते.
प्रमुख कार्प मत्स्यबीजांची निर्मिती तंत्र
Fish FarmingAgrowon

किरण वाघमारे, डॉ. एच. एस. मोगलेकर

गुणवत्तापूर्ण मत्स्यबीज उपलब्धता ही मत्स्यपालन प्रकल्पाच्या यशाची किल्ली आहे. जेवढे चांगले मत्स्यबीज तेवढे चांगले मत्स्योत्पादन व उत्पन्न मिळते. निकृष्ट दर्जाचे बियाणे, जे मत्स्यपालनाच्या विस्तारासाठी एक प्रमुख अडथळा म्हणून ओळखले जाते, ते थांबविण्याकरिता स्वत:च्या शेत तलावात मत्स्यबीज (Fish seed) निर्मिती करता येऊ शकते.

भारतात कटला, रोहू आणि मृगळ या प्रमुख कार्प जातींचा वापर मत्स्य शेतीसाठी केला जातो. त्याचप्रमाणे विदेशातील काही मासळींच्या जातींचे गुणधर्म लक्षात घेऊन सायप्रिनस, चंदेरा आणि गवत्या या तीन चायनीज कार्पचा वापरसुद्धा मत्स्य शेतीसाठी भारतात मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात मत्स्य तलाव, शेत तलाव, बायोफ्लॉक, पिंजरा संवर्धन मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत. यासाठी मत्स्यबीजांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात मत्स्य व्यवसाय विभाग आणि खासगी मत्स्यबीज केंद्राकडून मत्स्यबीज तयार करण्यात येते. परंतु मत्स्यबीज केंद्राच्या क्षमतेपेक्षा मत्स्यबीजांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे मत्स्यबीज निर्मितीमध्ये चांगला रोजगार तयार होणार आहे. तसेच परराज्यांतून मत्स्यबीज खरेदीमध्ये होणारी फसवणूक टाळणे शक्य आहे.

प्रमुख कार्प मत्स्यबीज निर्मितीः

१. प्रजननक्षम मासे वापरून ठरावीक संरचनेमध्ये मत्स्यबीज निर्मिती केली जाते. (उदा. चायनीज/सरक्युलर कार्प हॅचरी)

२. मत्स्यबीज निर्मिती केंद्रामध्ये निर्मित झालेले मत्स्य जिऱ्यापासून मत्स्य बोटुकली बनविणे.

प्रजननक्षम मासे वापरून ठराविक संरचनेमध्ये मत्स्यबीज निर्मिती प्रकारात मोठी जागा, मजूर, पाणी, व्यवस्थापन, मोठ्या आर्थिक गुंतवणुकीची आवश्यकता असते. परंतु मत्स्य जिऱ्यापासून मत्स्य बोटुकली निर्मितीसाठी कमी खर्च व व्यवस्थापन लागते.

मत्स्य तलावात, शेत-तलावात मत्स्यबीज निर्मितीः

- मत्स्यपालनाकरिता वापरण्यात येणारे मत्स्यतलाव, शेत-तलावात हंगामपूर्व तयारी झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यातील जवळच्या मत्स्यबीज निर्मिती केंद्रावर आपल्या शेत-तलाव/मत्स्य तलावांस आवश्यक मत्स्य जिरे मागणी नोंदवावी.

- मत्स्यबीज संचयनावेळी सदर तलावात फक्त २ ते ३ फूट पाणी असू द्यावे. तलावात मत्स्य जिरे संचयन करावे. सदर संचयन केलेल्या मत्स्य जिऱ्यापासून सुरवातीच्या २ ते ३ महिन्यांच्या कालावधीत मत्स्य बोटुकली निर्मिती करावी.

- मत्स्य बोटुकली निर्मितीनंतर आपल्या तलावाच्या इष्टतम संचयन क्षमतेनुसार आवश्यक मत्स्य बोटुकली संख्या मत्स्य तलाव, शेत-तलावाकरिता ठेवून उर्वरित मत्स्य बोटुकली मोठे तलाव, जलाशय धारक किंवा इतर मत्स्यतलाव, शेत तलावधारकांस विक्री करता येते. खालील प्रमाणे मत्स्यबीज निर्मितीचे नियोजन करता येईल

अ) मत्स्यबीज संवर्धन करण्याकरिता आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या बाबी (विना प्लॅस्टिक आच्छादन तलाव):

१) शेत तलावाचा आकार हा ०.५ ते १ एकर असावा. एक मीटर खोली ही मत्स्य जिरेनिर्मितीसाठी योग्य आहे. तसेच मोठ्या सिमेंट ५०-१०० मीटर वर्ग टाक्यांची एक मीटर खोलीची नर्सरी मोठ्या प्रमाणात मत्स्य जिरे संवर्धनाकरिता प्राधान्याने वापरले जाते.

२) उन्हाळ्यात फेब्रुवारी - मे दरम्यान हंगामी शेततळी, तलाव हे पूर्णपणे कोरडे होतात. अशा शेततळ्यामध्ये किंवा तलावात ३० ते ४० सेंमी पाणी भरून १००० ते १२०० किलो शेणखताचा वापर करावा दोन दिवसांनंतर पाण्याची पातळी वाढून ०.८ ते १ मीटर झाल्याचे दिसून येईल.

३) बारमाही तलावांच्या बाबतीत प्रथमत: तळ्यातील तण, वनस्पतीचे निर्मूलन करणे गरजेचे असते.

३. शेततळी/तलावातील पाणवनस्पती हाताने, जाळी लावून किंवा काटेरी तार पाण्यात तळापासून फिरवून सर्व वनस्पती काढून टाकाव्यात.

ब) संहारक व निकृष्ट जातीच्या माशांचे निर्मूलनः

१. संहारक व निकृष्ट स्थानिक मासे शेततळे, तलावात पावसाच्या पाण्याबरोबर येऊ शकतात. हे मासे मत्स्यबीजांसाठी धोकादायक असून, मत्स्यबीज सोडण्यापूर्वी हे मासे नष्ट करणे आवश्यक आहे. याचबरोबरीने तलावात जागेसाठी, वनस्पती, प्राणी-प्लंवग आणि प्राणवायूसाठी स्पर्धा होते.

चौकट ः संहारक व निकृष्ट जातीच्या माशांचे निर्मूलन

अ.क्र---तपशील--- मात्रा साधारणपणे प्रति एकर प्रति एक मीटर पाण्याच्या खोलीकरिता

१---मोहाची ढेप---१०००-१२०० किलो

२---ब्लिचिंग पावडर---(२०% क्लोरिन) प्रति २००-२५० किलो

३---डेरिस रूट पावडर---१००० भाग पाण्यात ८ ते १० भाग मिसळून पाण्यात शिंपडावे.

टीप ः वरील सर्व बाबींचा/विषाचा परिणाम १० ते १५ दिवसांपर्यंत राहतो. म्हणून संहारक व निकृष्ट जातीच्या माशांचे निर्मूलन मत्स्यबीज सोडण्याच्या १५ ते २० दिवस अगोदर करावे.

क) तळ्यात चुना मिसळणे/शिंपणेः

- कार्प माशांच्या मत्स्यबीज संवर्धनाकरिता साधारणपणे पाण्याचा सामू हा ७.५ ते ८.५ राखावा.

- जेव्हा पाण्याचा सामू जर ७ च्या खाली असेल तर ८० किलो चुनखडी प्रति एकर पाण्यात मिसळून संपूर्ण तलावात शिंपडावे.

- चुनखडी / चुन्यामुळे पाण्याचा सामू वाढविण्यास आणि योग्य प्रमाणात राखण्यास मदत होते.

- पाण्यात असणारे अतिरिक्त जैविक घटक चुन्यामुळे मोकळे झाल्यामुळे वनस्पती व प्राणी प्लवंगाची वाढ मुबलक प्रमाणात होते. मत्स्यबीजाला रोग होण्याची शक्यता कमी असते.

ड) खते आणि खाद्य व्यवस्थापनः

- मत्स्यबीज संवर्धनामध्ये खते व खाद्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. तलावातील मत्स्यबीजाकरिता नैसर्गिक खाद्यनिर्मितीसाठी एकरी ३०० ते ५०० किलो शेंगदाणा ढेप, ८० ते १०० किलो ताजे शेण आणि २० ते ४० किलो सिंगल सुपर फॉस्फेट एकत्र मिश्रण ३ भागांत विभागून द्यावे.

- मत्स्यबीज सोडण्यापूर्वी तलावात योग्य प्रमाणात प्लवंगनिर्मिती होणे आवश्यक असते. वरील विभागलेल्या मिश्रणाच्या एका भागाची आदल्या दिवशी जाड पेस्ट बनेल इतके पाणी मिसळून मिश्रण ठेवून द्यावे. सदर मिश्रण मत्स्यबीज सोडण्याच्या दोन दिवसांपूर्वी संपूर्ण तलावात टाकावे. उर्वरित दोन भागांचे मिश्रण मत्स्यबीज सोडल्यानंतर तलावात प्लवंगाचे उपलब्धतेचे प्रमाण ओळखून किंवा साधारणपणे ६ व्या व १२ व्या दिवशी वरील प्रमाणे तलावात टाकावे.

इ) पाण्यात आढळणारे व मत्सयबीजास घातक/ अनावश्यक कीटकांचे नियंत्रणः

- मत्स्यबीज सोडण्यापूर्वी १४ ते १८ तास अगोदर अनावश्यक पाणकीटक उदा. (पाण ठेकूण, पाणविंचू, पाण नावाडी, भिंगरी इ.) फ्राय नेट / मच्छरदाणी सारख्या जाळीने ३ ते ४ वेळेस पुन्हा पुन्हा जाळे मारून गोळा करावेत.

- पकडलेले कीटक बादली किंवा मोठ्या टबमध्ये अर्धे पाणी घेऊन त्यात २० मिलि केरोसीन मिसळून त्यात जमा केलेले कीटक टाकावेत. ५ ते १० मिनिटांत सर्व घातक कीटक पूर्णपणे मरतात.

मत्स्यबीज/मत्स्य जिरे संचयन :

- साधारणपणे मत्स्यबीज एकरी २० लक्ष (जमिनीत तयार केलेल्या नर्सरीमध्ये) संचयन केले जातात.

- योग्य व्यवस्थापनेद्वारे सिमेंट नर्सरी टाक्यांमध्ये संचयनाचे प्रमाण २ ते ३ पटीने वाढवू शकतो.

पूरक आहारः

- साधारणपणे मत्स्यबीज / मत्स्य जिरे संचयन केल्यानंतर पहिल्या दिवशी कोणत्याही प्रकारचे खाद्य देऊ नये. दुसऱ्या दिवसापासून मत्स्य जिऱ्यास पूरक खाद्य देण्यास सुरुवात करावी.

- पूरक खाद्यामध्ये शेंगदाणा ठेपेची बारीक पावडर, भाताचे धानाचे कुकुस (१:१) वजनाच्या प्रमाणात मिसळून ४०० ते ५०० ग्रॅम प्रति लाख मत्स्यबीजास द्यावे.

- खाद्याचे प्रमाण दरदिवशी ८० ते १०० ग्रॅम प्रति लाख मत्स्यबीजास वाढवून देण्यात यावे.

- खाद्याचे प्रमाण २-३ भागांत विभागून सकाळी व सांयकाळी वेळ निश्‍चित ठेवावी.

- बाजारामध्ये तयार खाद्य (प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ यांचे योग्य प्रमाण) माशांना पुरविले जाऊ शकते. असे खाद्य (०.५ ते ५ मिमी आकार) विविध घटक मिश्रित असते.

मत्स्य तलाव, शेत तलावात मत्स्यबीज निर्मितीचे (मत्स्य जिरे ते मत्स्य बोटुकली) अर्थकारण

(कालावधी २ ते ३ महिने)

अ.क्र---विवरण---रक्कम

I---खर्च

अ.---खेळते भांडवल

१.---तलावाची डागडुजी---१०,००० रुपये

२.---ब्लिचिंग पावडर (१० पी.पी.एम क्लोराईड)---५,००० रुपये

३.---सेंद्रिय व असेंद्रिय खते--- ५,००० रुपये

४.---२० लक्ष मत्स्य जिरे संचयन (शासकीय दरानुसार ५०० रु. प्रति लक्ष)---१०,००० रुपये

५.---पूरक खाद्य ---१२५००० रुपये

६.---कामगार---१०००० रुपये

७.---किरकोळ खर्च---१०००० रुपये

----- एकूण खर्च----१७५००० रुपये

भारतीय प्रमुख कार्प बीजः

प्रकार --- आकार

मत्स्य जिरे --- ८ मिमी पर्यंत

मत्स्यबीजाची पूर्वावस्था ---- ९ ते २५ मिमी

मत्स्यबीज --- २६- ५० मिमी

सुधारित मत्स्यबीज --- ५१ ते १०० मिमी

मत्स्य बोटुकली ---- ११ मिमी पेक्षा जास्त.

१) वरील प्रमाणे मत्स्य बोटुकली उत्पादनातून एक एकर तलावाकरिता आवश्यक १०,००० ते १५,००० मत्स्य बोटुकली मत्स्यपालनाकरिता ठेवून तलावातील पाणीपातळी १.५ ते २ मीटर ठेवावी. पुढील ८ ते १० महिन्यांकरिता योग्य खाद्य व इतर व्यवस्थापन केल्यास साधारण ८,००० किलो किंवा त्यापेक्षा जास्त मत्स्योत्पादन घेऊ शकतो.

२) प्लॅस्टिक आच्छादन वापरण्यात आलेल्या तलावात पाणीपातळी वरील प्रमाणे सारखी ठेवावी. मत्स्य जिरे संचयन करून त्यांना योग्य प्रमाणात पूरक खाद्य द्यावे.

बायोफ्लॉक पद्धतीत मत्स्यबीज निर्मिती :

- या पद्धतीत संपूर्ण नियंत्रणात मत्स्यसंवर्धन केले जाते. सदर पद्धतीत वापरण्यात येणाऱ्या टाक्यात २ ते ३ महिन्यांच्या कालावधीकरिता मत्स्य जिरे संचयन करून आवश्यक खाद्य आणि पाणी व्यवस्थापन केल्यास चांगल्या प्रकारे मत्स्य बोटुकलीचे उत्पादन घेऊ शकतो.

- साधारण ४ मीटर व्यास व १.५ मीटर उंची असलेल्या टाकीत आपण एक लाख मत्स्य जिरे संचयनापासून ५,००० ते ८,००० हजार मत्स्य बोटुकली मिळविणे शक्य आहे.

पिंजरा पद्धतीत मत्स्यबीज निर्मिती :

- या पद्धतीत प्रकल्पधारकांकडून गिफट, मोनोसेक्स तिलापिया आणि पंगस मासे संवर्धन करता येते. या माशांचे मोठ्या आकाराचे बीज संचयन केले जाते.

- प्रकल्पाचे पिंजरे रिकामे राहत असल्यास सदर पिंजऱ्यात हापा बांधून भारतीय प्रमुख कार्प जातीचे मत्स्य जिरे संचयन करून आवश्यक खाद्य व्यवस्थापन केल्यास चांगल्या प्रकारे मत्स्य बोटुकली निर्मिती करता येऊ शकते.

- तयार मत्स्य बोटुकलीची मोठे तलाव/जलाशय ठेकेदार संस्था किंवा इतर तलावधारक यांना विक्री केल्यास आपल्या उत्पन्नात भर पडते.

- साधारण ६ × ४ × ४ मीटर आकार असलेल्या पिंजऱ्यात एक लाख मत्स्य जिरे संचयनापासून ५,००० ते ८,००० हजार मत्स्य बोटुकली मिळविणे शक्य आहे.

संपर्कः किरण वाघमारे, ९८८१६००९५१

(किरण वाघमारे हे पुणे येथे सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आहेत. डॉ. मोगलेकर हे मत्स्य महाविद्यालय, डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठ, ढोली, मुजफ्फरपूर, बिहार येथे सहायक प्राध्यापक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com