Organic Farming : शेतामध्ये सेंद्रिय घटकांचे व्यवस्थापन कसे करणार?

कार्यक्षम पाणी वापरासाठी सेंद्रिय खत व्यवस्थापन व विना नांगरणीचे महत्त्व यावर शेतकऱ्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. कार्यक्षम पाणी वापरात जमिनीची जलधारण शक्ती वाढविणे तसेच अतिरिक्त पाणी जलद निचरून जाण्यासाठी निचराशक्ती वाढविणे, बाष्पीभवन रोखण्याच्या उपायांवर अभ्यास करावा.
organic Farming
organic FarmingAgrowon

आजपर्यंत आपण तणनियंत्रण करण्यासाठी भरपूर पैसे खर्च केले. आता तणाचा उपयोग करून घेण्यास शिकले पाहिजे. याला तण व्यवस्थापन (Weed Management) असे म्हणतात. पूर्वी तणमुक्त शेतीचा आग्रह होता. आता तण आले पाहिजे, मोठे झाले पाहिजे आणि त्यानंतर त्याचे तणनाशकाने नियंत्रण केले पाहिजे असा विचार आवश्यक आहे.

आता तणनाशकाने नियंत्रण करण्याऐवजी गरजेप्रमाणे ब्रश कटरने तण कापून तेथेच कुजविले पाहिजे, अशी नवीन सुधारणा करावी लागणार आहे. या पद्धतीने आपण तणांकडून सेंद्रिय खत मिळवू शकतो. त्याचबरोबर त्याचे इतर अनेक फायदे आहेत.

फळबागेत अगर लांब अंतरावरील पिकात मिश्र पिकाऐवजी तण व्यवस्थापन करावे. ज्या पिकात तणे वाढविण्यास वाव नाही तेथे पिकाच्या काही ओळींनंतर तणाचे पट्टे ठेवावेत.

एखादा हंगाम फक्त तणे वाढविणे आणि जिरवणे असा काही मार्ग उपलब्ध करणे गरजेचे आहे. मुख्य पीक माझे आणि मिश्रपिक म्हणजे तणे, अशी जमिनीचे अशी वाटणी झाल्यासच जमिनीला पुरेसे सेंद्रिय खत मिळेल.

हिरवळीची खते ः

ताग, धैंचा ही द्विदल कडधान्यवर्गीय जलद वाढणारी व थोड्या कालावधीत भरपूर जैवभार निर्माण करणारी माणसासाठी अखाद्य पिके. त्याचबरोबर हवेतील नत्र स्थिर करणारी.

जुन्या काळात ज्या वेळी नत्रयुक्त खते माहीत नव्हती त्या काळात विकसित झालेले तंत्र द्विदल कडधान्य वर्गीय पिकाचे काडात नत्राची टक्केवारी जास्त असल्याने ते काड लवकर कुजते. तयार खतही लवकर संपून जाते.

नवीन संशोधनाप्रमाणे द्विदल कडधान्यापेक्षा एकदलाचे हिरवळीचे खत जास्त चांगले असते. या नवीन शोधामागील विज्ञान समजून घेऊन त्याचा अभ्यासक्रमात समावेश करणे गरजेचे वाटते.

organic Farming
Organic Farming : राज्यात २५ लाख हेक्टरमध्ये सेंद्रिय शेती अभियान राबविणार

गांडूळ खत ः

हा नवीन प्रकार वैज्ञानिक निकष लावून अभ्यास करणे गरजेचे वाटते. केवळ गांडुळावरील प्रेमापोटी हे नवीन तंत्र शेतकऱ्यांवर लादणे योग्य होणार नाही.

रासायनिक खत वापर ः

हरितक्रांतीनंतर रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. सुरुवातीला थोड्याशा खतावर भरपूर उत्पादन मिळत होते. आता भरपूर खत जमिनीत मिसळूनही उत्पादन मिळत नाही. या मागील विज्ञान शेतकऱ्यांपुढे आणले जात नाही.

रासायनिक खतातील अन्नघटक जसेच्या तसे पीक घेत नाही. खत दिल्यावर प्रथम त्याचे पाण्यात न विरघळणाऱ्या अवस्थेत रूपांतर होणे गरजेचे असते. पुढे त्याच वेळी पिकाच्या गरजेनुसार तितकाच भाग सूक्ष्मजीवांकरवी पाण्यात विरघळणाऱ्या अवस्थेत रूपांतर करून पिकाला मिळतो.

याला स्थिरीकरण व उपलब्धीकरणातून अन्नद्रव्य व्यवस्थापन असे म्हणतात. ही संकल्पना प्रचलित शास्त्रात मान्य केलेली नाही.

बाल, फुटीची, वाढीची व पक्वावस्थेप्रमाणे पिकाच्या गरजा बदलत असतात. एकाच पिकाच्या दोन जातींच्या गरजा वेगवेगळ्या असतात. वरील तंत्राने गरजेप्रमाणे पिकाचे सूक्ष्मजीवांच्या मध्यस्थीने पोषण मिळते. बाकी साठा अविद्राव्य अवस्थेत जमिनीत सुरक्षित राहतो.

हे काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीची काय तयारी केली पाहिजे याची माहिती शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. रसायनशास्त्राच्या अभ्यासाने ही माहिती पुढे येऊ शकत नाही. या कामासाठी सेंद्रिय कर्बाची गरज असते.

विद्राव्य खते ः

ही खते पिकाने प्रत्यक्ष खाण्याच्या अवस्थेत (उपलब्ध) असतात. याचा वापर करण्यापूर्वी वापरण्याच्या काळात पिकाची गरज नेमकी माहिती पाहिजे. तसा अभ्यास भारतात झालेला नाही. सर्व अंदाजाने वापर होत आहे. ही खते प्रामुख्याने कृत्रिम माध्यमात वापरली जातात. आपण माती माध्यमात त्याचा वापर करीत असता येणाऱ्या मर्यादांचा अभ्यास शेतकऱ्यांपुढे येणे गरजेचे आहे.

रासायनिक खते प्रामुख्याने आपण आयात करतो. त्याचा कार्यक्षम वापर होणे गरजेचे आहे. यासाठी फक्त किती वापरावे हे न सांगता, दिल्यानंतर पिकापर्यंत त्यातील जास्तीत जास्त भाग पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करणे गरजेचे आहे याचा अभ्यास व प्रबोधन व्हावे. माती परीक्षण हे यावर उत्तर नाही.

कमीतकमी मनुष्यबळात शेती ः

शेतीमध्ये सर्वात ज्वलंत प्रश्‍न मनुष्यबळ टंचाई हा असणार आहे. या परिस्थितीत संशोधनाची दिशा ही प्रत्येक काम कमीत कमी मनुष्यबळात कसे करता येईल यावर केंद्रित करणे गरजेचे आहे.

आजच्या संशोधनातील निकषाचे हा मध्य धरून मूल्यमापन होणे गरजेचे वाटते. शून्य मशागत, तणनाशकांचा योग्य वापर व तण व्यवस्थापन हे मुद्दे यादृष्टीने महत्त्वाचे ठरतात.

कार्यक्षम पाणी वापर, जमीन सुपीकता ः

कार्यक्षम पाणी वापरासाठी सेंद्रिय खत व्यवस्थापन व विना नांगरणीचे महत्त्व यावर शेतकऱ्यांचे प्रबोधन होणे गरजेचे वाटते.

कार्यक्षम पाणी वापरात जमिनीची जलधारण शक्ती वाढविणे, तसेच अतिरिक्त पाणी जलद निचरून जाण्यासाठी निचराशक्ती वाढविणे, तसेच बाष्पीभवन रोखणे वगैरे उपायावर अभ्यास होणे गरजेचे आहे. शून्य मशागत व तण व्यवस्थापनाने हे सहज फुकटात साध्य होते.

organic Farming
Organic Carbon : जमिनीतील सेंद्रिय कर्ब कसा वाढवायचा?

कोरडवाहू शेतीत पाणी व्यवस्थापन ः

१) महाराष्ट्रात ८२ टक्के कोरडवाहू, तर केवळ १८ टक्के बागायत जमीन आहे. कोरडवाहू क्षेत्रात पावसाचे दिवस कमी, कमी वेळात जास्त पाऊस व दोन पावसाच्या सत्रांत मोठे अंतर पडते. तसेच पीक निसविण्याचे वेळी व दाणे अगर शेंगा, पात्या, कैऱ्या भरण्याच्या काळातच पाऊस गेल्यास मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते.

२) वरील तंत्रात थोडा फरक करून पीक घेणे तसेच पिकाला शेवटपर्यंत गरजेइतके पाणी उपलब्ध करून देण्याचे काम शेतकऱ्यावर किंवा सरकारवर एकही पैशाचा बोजा न टाकता झाले तरच या शेतीमध्ये शाश्‍वतता येऊ शकेल.

कापूस अगर तूर या लांब अंतरावरील पिकांत १५० सेंमी ओळीत अंतर ठेवून ६० सेंमीमध्ये पीक व त्यामध्ये मिश्रपिक घेण्या ऐवजी तणाचा पट्टा वाढवावा.

शून्य मशागत, पिकाच्या ओळीपुरत्या रेघा यंत्राने पाडणे आणि टोकण पद्धतीने अगर स्वयंचलित टोकण यंत्राने बियाणे टोकण करावे. पिकाचा पट्टा तणमुक्त ठेवणे व मधल्या पट्ट्यात तणे वाढविणे, मोठी करणे, जून झाल्यानंतर ब्रश कटरने कापून टाकावीत.

३) या तंत्राने वापर केल्याने जमिनीची धूप बंद होते. आडवे पाणी वाहत नाही. मूलस्थानी जलसंवर्धन होते. दोन पावसाच्या सत्रांत मोठे अंतर पडले तर, अगर पाऊस लवकर गेल्यास मधल्या तणाच्या पट्ट्यातील जमिनीखालील वाढलेल्या मुळांचे जाळ्यात इतके पाणी साठविले जाते, की पाऊस गेल्यानंतर पिकाची दोन महिन्यांपर्यंत ओलाव्याची गरज भागविली जाते.

शेवटपर्यंत ओलावा मिळाल्याने पिकाच्या आनुवंशिक उत्पादन क्षमतेइतके उत्पादन मिळू शकते. हे झाले लांब अंतरावरील पिकासाठी, जवळ अंतरावरील पिके घेत असता एका वर्षी पावसाळ्यात तणे वाढवून मारणे आणि रब्बी पिक घेणे (उदा. ज्वारी) अगर खरीप पीक घेऊन रब्बी हंगाम जमीन पड टाकावी.

४) दुसरा पर्याय म्हणजे २ ते ३ वर्षातून एकदा खरीपात पड टाकून तणे वाढवून मारून जमिनीत वाढली तशी मुरविणे आणि पुढील १,२ वर्षे पूर्ण पीक घेणे. कोरडवाहू क्षेत्रात जमीन धारणा मोठी असते. जमिनीला सेंद्रिय कर्ब कधीच दिला जात नाही.

यामुळे उत्पादकता अतिश्‍य कमी असते. इथे फक्त पीक घेणे असे न करता जमिनीला मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्रतीचा सेंद्रिय कर्ब उपलब्ध करून दिल्यास कोरडवाहू शेती शाश्‍वत होऊ शकते.

पिकाचा पट्टा व तणाचा पट्टा आलटून पालटून वापरावा किंवा पीक व पड अशी विभागणी करून हे काम फुकटात करून घेणे शक्‍य आहे. अगदी दुष्काळ पडून नापिकी झाल्यास मर्यादित खर्चामुळे नुकसान देखील मर्यादित रहाते.

संपर्क ः प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८ (लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com