पिकासाठी त्रासदायक ठरणाऱ्या शंखी गोगलगायींचे व्यवस्थापन

मागील तीन आठवड्यांपसून महाराष्ट्रात प्रामुख्याने सोयाबीन पिकावर गोगलगायींचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसत आहे. विदर्भातील विशेषतः अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार आणि धामणगाव तालुक्यात संत्रा बागांसह पपई, केळी, वांगी, कपाशी, सोयाबीन, मिरची, टोमॅटो, कोबी, हळद या पिकांवरही मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
Snail
SnailAgrowon

डॉ. अनिल ठाकरे, डॉ. राजेंद्र वानखडे

---------------------------------------

मागील तीन आठवड्यांपसून महाराष्ट्रात प्रामुख्याने सोयाबीन (Soybean) पिकावर गोगलगायींचा प्रादुर्भाव (Snail Outbreak On Soybean) सर्वत्र दिसत आहे. विदर्भातील विशेषतः अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार आणि धामणगाव तालुक्यात संत्रा (Orange) बागांसह पपई, केळी, वांगी, कपाशी (Cotton), सोयाबीन, मिरची, टोमॅटो, कोबी, हळद या पिकांवरही मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. एक ते दीड महिन्यापासून सतत पाऊस, ढगाळ वातावरण आणि कमी सूर्यप्रकाश असलेले वातावरण गोगलगायींच्या प्रजोत्पादन व वाढीसाठी पोषक आहे. शंखी आणि शेंबडी या दोन्ही प्रकारांतील गोगलगायी या मृदूकाय वर्गात समाविष्ट आहेत. ही कीड सर्वसाधारणपणे दोन ते तीन फूट उंचीपर्यंत वाढणाऱ्या पिकांमध्ये जास्त हानिकारक ठरते.

Snail
Snail: शंखी गोगलगाईचा पिकांवर प्रादुर्भाव

गोगलगायीचा (आफ्रिकन जायंट स्नेल) इतिहास

१८०० - मॉरिशसमध्ये प्रथम ओळख झाली.

१८४७ - डब्ल्यू. एच. बेन्सान या इंग्रज अधिकाऱ्याने ती मॉरिशसमधून भारतात आणली.

१९४८ -ओडिशामध्ये प्रथम उद्रेक.

१९५५ - पर्यंत ही कीड पूर्ण देशभर पसरली.

१९७३ - महाराष्ट्रामध्ये औरंगाबादमध्ये प्रथम आढळली.

१९८९ - कोकण प्रांतात प्रसार.

१९९८ - सातेपूरमध्ये ३०० हेक्टर, निफाडमध्ये १५० हेक्टर, नाशिक जिल्ह्यात द्राक्षे, केळी, मिरची, बटाटे, कारले, दोडके, भात, ऊस इ. पिकावर उद्रेकीय स्वरूपात आढळला.

परिचय व नुकसान क्षमता

१) शंखी गोगलगाय (इंग्रजी नाव - आफ्रिकन जॉइंट स्नेल, शा. नाव - अचेटिना फुलिका)

२) तिचा रंग मुख्यतः गर्द करड्या, फिक्कट किंवा हिरव्या काळपट असून, पाठीवर एक ते दीड इंच (२ ते ४ सेंमी) लांबीचे गोलाकार कवच असते.

३) बहुभक्षी असून, निरनिराळ्या ५०० वनस्पतीवर उपजीविका करते. जमिनीवर पडलेली पिवळी पाने (त्यात कॅल्शिअम जास्त असतो), फुले, फळे, शेणखत, जनावराचे शेण, कागदाचे पुठ्ठे, कुजलेला कचराही त्या खातात.

४) गोगलगायी दिवसा सावलीमध्ये, पानाखाली लपून बसतात. रात्री पिकावर आक्रमण करतात.

५) वेगवेगळ्या आकारामध्ये दिसतात. पूर्ण वाढ झालेल्या शंखीची लांबी १५ ते १७.५ सेंमी असते.

६) तीन ते सहा वर्षे इतक्या आपल्या आयुष्यकाळामध्ये सुमारे १००० अंडी घालते. पिकाच्या खोडाशेजारी मुळाजवळ किंवा बांधावर तीन ते पाच सेंमी खोलीचे छिद्र करून भुसभुशीत केलेल्या मातीमध्ये तीन ते चार दिवसांत १०० ते ४०० अंडी घातली जाते. अंडी देण्यासाठी मिलनाची आवश्यकता नसते. फलदायी अंडी देण्यासाठी योग्य साथीदाराशी सहा ते आठ दिवस मिलन करतात. सर्वसाधारणपणे १७ दिवसांपर्यंत अंड्यातून पिले बाहेर येतात. आठ महिने ते एक वर्षामध्ये त्यांची पूर्ण वाढ होते. पिले व प्रौढ पिकाचे अतोनात नुकसान करतात.

Snail
snails: गोगलगायींचे हवे एकात्मिक अन् सामूहिक नियंत्रण

वातावरणाचा परिणाम ः

-पावसाळ्यातील ढगाळ वातावरण, कमी सूर्यप्रकाश, जास्त पाऊस, जास्त आर्द्रता, कमी तापमान (२० ते ३२ अंश) या किडीला पोषक आहे. उन्हाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त व सापेक्ष आर्द्रता ८० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास शंखी तोंड बंद करून सुप्तावस्थेत जातात. हिवाळ्यात तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी व सापेक्ष आर्द्रता ६५ टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास सुप्तावस्थेत जातात. ५० मिमी पाऊस पडल्यास पायाने शंखाचे दार उघडून परत आपले काम सुरू करतात.

प्रसार :

- अवजारे, बैलगाडी, यंत्र सामग्री, ट्रॅक्टर ट्रॉली, व अन्य साधनासोबत.

- एका शेतातून दुसऱ्या शेतात नेले जाणारे प्लॅस्टिक ट्रे, शेणखत, विटा, माती, वाळू, कुत्रा, कलम, रोपे, बेणे, ऊस इ.

- शंखी अन्नपाण्याशिवाय चार ते सहा महिने जिवंत राहू शकते. शंख तुटला तरी चालू शकतात. मोठ्या झाडावर १० ते १५ मीटर उंचीपर्यंत आढळल्या आहेत.

व्यवस्थापन :

१) शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत.

२) गोगलगायीच्या लपण्याच्या जागा शोधून त्या स्वच्छ व सपाट ठेवाव्यात.

३) संध्याकाळी आणि सूर्योदयापूर्वी बाहेर आलेल्या आणि दिवसा झाडावर लपलेल्या गोगलगायी हाताने गोळा कराव्यात. साबण (१५ टक्के) किंवा मीठ (२० %) किंवा केरोसीनच्या (१० %) द्रावणात बुडवून माराव्यात. मृत गोगलगायी जमिनीत खड्ड्यात पुरून टाकाव्यात.

४) गोगलगायींची पांढरट, पिवळसर, रंगाची साबुदाण्याच्या आकाराची अंडी मातीमध्ये खोडाशेजारी तसेच गवताच्या ढिगाखाली १०० ते २०० च्या पुंजक्याने घातलेली असतात. ती शोधून नष्ट करावीत.

५) गोणपाट किंवा गवताचे ढीग गुळाच्या पाण्याच्या द्रावणात बुडवून संध्याकाळी शेतात ठिकठिकाणी ठेवावीत. सकाळी सूर्योदयानंतर त्याखाली जमा होणाऱ्या गोगलगायी नष्ट कराव्यात.

६) गोगलगायीचे वास्तव्य मुख्यत्वेकरून बांधावर, गवतामध्ये असते. त्यांना मुख्य पिकांमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी चुन्याची भुकटी किंवा तंबाखूच्या भुकटीचा चार इंची पट्टा बांधाशेजारी चारी बाजूंनी टाकावा. या पट्ट्याच्या संपर्कात आलेल्या गोगलगायी मरून पडतात. मात्र पाऊस किंवा जमीन ओली असल्यास याचा फारसा उपयोग होत नाही.

७) जमीन ओली किंवा पाऊस असल्यास गूळ व यीस्ट आणि मिथोमिल* यांच्या द्रावणात मिसळून भाताचे किंवा गवताचे काड तुकडे बांधाशेजारी चार इंच पट्टा टाकावा.

८) मेटॅल्डीहाइड १.२५ किलो अधिक गूळ १ किलो प्रति १०० लिटर पाणी असे द्रावण तयार करावे. या द्रावणामध्ये गव्हाचा कोंडा किंवा पशुखाद्य २५ किलो भिजवून घेऊन, त्याचे आमिष तयार करावे. हे आमिष शेतात ठिकठिकाणी केळी किंवा पपईचे पानावर ठेवावे. शंखी गोगलगायी प्रकर्षाने पपईचे रोपे, झेंडूच्या झाडाकडे आकर्षित होतात.

९) मेटॅल्डिहाईड (पाच टक्के भुकटी) रोपावर, झाडावर धुरळणी करावी.

१०) पीकरहित भागांमध्ये छोट्या गोगलगायींच्या नियंत्रणासाठी मिठाची (२० % द्रावण) फवारणीही उपयुक्त ठरते. मात्र, ही फवारणी पिकात करू नये.

११) शंखी गोगलगायींमध्ये ल्युकोडर्मा या रोगाचा प्रादुर्भाव होतो. अशा रोगग्रस्त गोगलगायींचा अर्क अन्य सुदृढ गोगलगायींवर फवारला असता त्यांनाही रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि त्या मरतात.

१२) परभक्षक वाणी (Millipede Orthomorpha spp.) हा आपल्या स्टिक ग्रंथीमधून हेड्रोसायनिक आम्ल शंखी गोगलगायींवर टाकतो. या रसायनामुळे निष्क्रिय झाल्यानंतर तो त्यांना खाऊन टाकतो.

१३) शेतातून जमा केलेल्या गोगलगायी प्लॅस्टिक किंवा सिमेंटच्या रिकाम्या पोत्यात भराव्यात. त्यात चुना पावडर किंवा कोरडे मीठ टाकून पोते धाग्याने शिवून टाकावे. आतल्या आत त्या मरून जातात.

१४) कीटकनाशकापासून विषारी आमिषाचे (छोटे गोळे) तयार करून संध्याकाळी शेतात कडेकडेने जागोजागी टाकल्यास शंखीचा हमखास नायनाट होतो.

तयार करण्याची पद्धत ः

एका ड्रममध्ये १०० लिटर पाणी घेऊन, त्यात ५०० ग्रॅम गूळ अधिक २.५ ग्रॅम यीस्ट अधिक १२.५ ग्रॅम मिथोमिल* (४० टक्के पा. मी.) मिसळावे. त्यामध्ये २५ किलो गव्हाचा कोंडा किंवा कोणतेही पशुखाद्य बुडवून ताबडतोब काढावे. त्याचे गोळे बनवून शेताच्या कडेकडेने सायंकाळी ठिकठिकाणी टाकावे.

टीप : मिथोमिल* हे अत्यंत विषारी कीटकनाशक असून, ते वापरताना हातामध्ये प्लॅस्टिकचे हातमोजे आणि फेसमास्क वापरण्यासह योग्य ती काळजी घ्यावी. कुत्रे, पाळीव प्राण्यांसाठीही हे घातक असल्याने पुढील किमान ६ ते ७ दिवस या शेत परिसरात येणार नाही, याची काळजी घ्यावे. सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या काळजी घेणे शक्य असेल तरच या कीडनाशकाचा वापर करावा.

आयर्न फॉस्फेटचे आमिष

गोगलगायींच्या नियंत्रणासाठी आयर्न फॉस्फेट या घटकाचा वापर करता येतो. त्याच्या शक्यतो वड्या मिळतात. वड्या नसल्यास आयर्न फॉस्फेट (१ %) अधिक गहू पीठ किंवा पपई पाने किंवा कोबीची पाने किंवा केळीची पिवळी पाने किंवा झेंडूच्या पाने (९९ टक्के) मिसळून आमिष तयार करावे. त्यामध्ये असलेल्या आमिषाकडे आकर्षित होऊन गोगलगायींनी खाताच पचनसंस्थेत आयर्न फॉस्फेटची कॅल्शिअमसोबत प्रक्रिया होते. पुढे गोगलगायी खाणे थांबवतात. त्यानंतर ३ ते ६ दिवसांत मरतात.

सुरक्षितता ः

आयर्न फॉस्फेटच्या वाफा होत नाहीत, तसेच सहजपणे पाण्यातही विरघळत नाही. टाकलेल्या जागेपेक्षा अधिक पसरत नाही. आयर्न फॉस्फेट हे पाळीव प्राणी, मानव, मासे, पक्षी, मित्रकीटकांसाठी सुरक्षित आहे. विशेषतः जमिनीतील गांडुळासारख्या जिवांसाठीही अपायकारक ठरत नाही.

परिणामकारकता ः

मेटाल्डिहाइड आधारित रासायनिक उत्पादनांपेक्षा आयर्न फॉस्फेट अधिक प्रभावशाली ठरते. कारण मेटाल्डिहाइड पाऊस आल्यानंतर किंवा ओलाव्यामध्ये प्रभावी ठरत नाही. अशा स्थितीतही आयर्न फॉस्फेट दोन आठवड्यांपर्यंत क्रियाशील राहते.

अर्थात, ही फॉस्फेटयुक्त उत्पादने मेटाल्डिहाइडपेक्षा महाग आहेत. मात्र हे सावकाश काम करणारे, जास्त क्रियाशील, आणि अधिक सुरक्षित असल्यामुळे अंतिमतः किफायतशीर ठरते.

प्रदीर्घ काळाकरिता नियंत्रणासाठी

गोगलगायीला अंडी घालण्यापासूनच रोखणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी सर्वांत चांगली वेळ म्हणजे हिवाळ्याच्या सुरुवातीला दमट वातावरणात संपूर्ण बागेमध्ये दाणेदार आयर्न फॉस्फेटचे आमिष सरळ पसरून द्यावे. जमीन पूर्ण कोरडी असल्यास आमिष वापरण्यापूर्वी ओलसर करून घ्यावी. मात्र फार पाणी साचू देऊ नये. त्यामुळे वसंत ऋतूमध्ये फारशी अंडी घातली जाणार नाहीत. अशीच दुसरी उपाययोजना हिवाळ्यात उशिरा किंवा वसंत ऋतूच्या सुरुवातीला करावी. त्यानंतर तिसरी उपाययोजना एक महिन्यानंतर करावी. वर्षातून तीन वेळा उपाययोजना केल्यास हमखास नियंत्रण मिळते. हे आमिष खाल्यानंतर दूर अंतरावर जाऊन गोगलगायी मरतात. त्यामुळे शेतामध्ये त्या मृत स्वरूपात आढळत नाहीत, हे लक्षात घ्यावे.

टीप -

१) शंखी गोगलगायींचे परभक्षक मोठ्या प्रमाणात असल्यास आयर्न फॉस्फेटचा वापर करू नये.

२) हे आमिष सेंद्रिय असले तरी तयार करतेवेळी व वापरताना किमान हातमोजे व फेस मास्कचा वापर आवर्जून करावा.

३) सामुदायिक पद्धतीने उपाययोजना केल्यास चांगले नियंत्रण मिळू शकते.

---------------------------

डॉ. अनिल ठाकरे, ९४२०४०९९६०

(सहयोगी प्राध्यापक -वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ व गट प्रमुख, संत्रा फळगळ मिशन, कृषी संशोधन केंद्र, अचलपूर)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com