शेततळ्यातील मत्स्यपालनाचे व्यवस्थापन

जलद वाढ व मोठा आकार होणाऱ्या पाण्याच्या विविध थरांतील अन्नाचा वापर करू शकणाऱ्या कटला, रोहू, मृगळ या जाती मत्स्यपालनासाठी मुख्यतः वापरतात. याचबरोबरीने सायप्रिनस, चंदेरा (सिल्व्हर कार्प), गवत्या (ग्रास कार्प), पंगस (पंकज), गिफ्ट तिलापिया, गोड्या पाण्यातील झिंगेदेखील मत्स्यशेतीसाठी विशिष्ट प्रकारच्या तळ्यात व विशिष्ट परिस्थितीत योग्य ठरतात.
शेततळ्यातील मत्स्यपालनाचे व्यवस्थापन
AquacultureAgrowon

किरण वाघमारे, बालाजी पवार

लहान-मोठे तलाव गावतळ्यात मत्स्य शेती करता येते. तळ्याचा जलविस्तार ०.४ हेक्‍टर (४००० चौ.मी.) पासून २ हेक्टरपर्यंत चालतो. परंतु ०.४० ते ०.५० हेक्‍टरपर्यंतचे तळे अधिक सोईस्कर पडते. पाण्याच्या पातळीवरील मोजमापाप्रमाणे लांबी रुंदीचे प्रमाण शक्यतो २:१ असावे. बांधावर हिरवळ लावून किंवा झाडे लावून बांधाची मजबुती वाढविता येईल. या तळ्यांच्या शेजारी किंवा त्या तळ्यांच्या पात्रामध्ये मत्स्यबीजाचे संगोपन करण्याकरिता एक लहान संगोपन तळे बांधावे. या संगोपन तळ्याचे जलक्षेत्र मत्स्यशेतीकरिता बांधलेल्या तळ्याच्या तुलनेत २ टक्के असावे.

प्लॅस्टिक लायनरचा वापरः

- या प्रकारात मातीचे तलाव खोदकामापर्यंत सर्व बाबींसारख्या असतात. परंतु ज्या ठिकाणांची जागा खडकाळ, मुरमाड असते, मत्स्यपालनास योग्य नाही किंवा पाणी धरून ठेवण्याची क्षमता नाही, अशा मत्स्यतलावात पाणी पाझराचे प्रमाण कमी करण्यासाठी सिमेंट, दगड, विटांचे अस्तर किंवा प्लॅस्टिक फिल्मचा वापर केला जातो.

- प्लॅस्टिक पेपर जाडी साधारणतः ५०० ते ६५० जीएसएमपर्यंत वापरली जाते. सदर तलावात पाणी काढणे आणि भरणे तसेच मासे पकडण्यास सोपे असते.

- या प्रकारात जमिनीचा संपर्क नसल्यामुळे नैसर्गिकरीत्या होणाऱ्या जैविक, रासायनिक विघटन प्रक्रिया इत्यादी होत नाहीत.

- या प्रकारात मासळीला आवश्यक प्रमाणात पूरक खाद्य वेळोवेळी द्यावे लागते. सदर खाद्याचे सेवन करून मासळीची तलावात विष्ठा वाढते. त्यामुळे पाण्यातील अमोनिया इत्यादी घटक वाढतात. पाण्याची प्रत लवकर खराब होते.

- पाण्याचे व्यवस्थापन वेळेत न झाल्यास मासळीस विविध आजार जडण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. या प्रकारात वेळोवेळी पाणी बदलणे आवश्यक असते. पाणी व्यवस्थापनात विशेष लक्ष असणे गरजेचे असते.

मत्स्यपालनासाठी योग्य जातींची निवडः

- जलद वाढ व मोठा आकार होणाऱ्या पाण्याच्या विविध थरांतील अन्नाचा वापर करू शकणाऱ्या कटला, रोहू, मृगळ या (भारतीय प्रमुख कार्प या नावाने एकत्रितपणे ओळखल्या जाणाऱ्या) जाती मत्स्यपालनासाठी मुख्यतः वापरतात.

- सायप्रिनस ही परदेशी जातही आपणाकडे योग्य आढळली आहे. या जाती व्यतिरिक्त चंदेरा (सिल्व्हर कार्प), गवत्या (ग्रास कार्प), पंगस (पंकज), गिफ्ट तिलापिया, देशी मांगूर इत्यादी जातीचे मासे तसेच गोड्या पाण्यातील झिंगे (मॅक्रोबँकियम रोझेनबर्गी) मत्स्यशेतीसाठी विशिष्ट प्रकारच्या तळ्यात व विशिष्ट परिस्थितीत योग्य ठरतात.

मत्स्यशेतीकरिता तळ्याची पूर्वतयारीः

- तरंगत्या पाणवनस्पती, तळ्याच्या तळात मुळे असणाऱ्या वनस्पती, कंद असणाऱ्या पाणवनस्पती मत्स्यशेतीत अडथळा आणतात. त्यांचे प्रथम निर्मूलन करावयास हवे. त्यासाठी मुख्यतः मनुष्यबळाचा वापर करावा लागतो.

- तळ्यात बुडालेल्या हायड्रिला, नाजास, सरॅटोफायलम वगैरे पाणवनस्पतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गवत्या (ग्रास कार्प) व काही प्रमाणात सायप्रिनस या जातीचे मासे उपयोगी पडतात. तळ्यात गवत्या मासे पुरेशा प्रमाणात सोडणे शक्य झाले तर ते अशा वनस्पती लवकर खातात.

- संहारक व निकृष्ट जातीच्या माशांचे निर्मूलन करण्यासाठी शक्‍यतो तळे उन्हाळ्यात कोरडे करणे फायदेशीर ठरते. पण ते शक्‍य नसेल तर उन्हाळ्यात पाणी कमी असताना मत्स्यविषाचा वापर करावा. सर्वांत सोयीचे मत्स्यविष म्हणजे मोहाची पेंड. ही पेड वापरण्याचे प्रमाण दर हेक्‍टरी जलविस्ताराला दर मीटर खोलीसाठी (म्हणजे दर १०००० घन मीटरसाठी) २५०० किलो असे आहे. तसेच ब्लिचिंग पावडर देखिल संहारक मासे व कीटक निर्मूलनासाठी उपयुक्त आहे.

ही पेंड पाण्यात कालवून तळ्यात सर्वत्र टाकावी. हिच्या प्रभावाने मासे बेचैन होतात आणि काही तासांतच तरंगू लागतात. त्यामुळे त्यांना जाळ्याने सहज पकडता येते. हे मासे विषारी नसल्यामुळे खाण्यास हरकत नसते. तळ्याच्या पाण्यात मोहाच्या पेंडीचे विषारी गुण १५ दिवस टिकतात. मात्र त्या काळात जनावरांना पाणी पिण्यासाठी तळ्यावर जाऊ देऊ नये. विषारी गुण नष्ट झाल्याची खात्री करण्यासाठी तळ्यात हापा लावून त्यात थोडी बोटुकली सोडावीत. ती जर ४८ तास जगली तर पाणी निर्विष झाले आहे असे समजावे. मगच बोटुकली तळ्यात सोडावीत.

अधिक उत्पादन मिळण्यासाठी मातीच्या तळ्यात खतांचा वापरः

- तळ्याच्या नैसर्गिक सुपीक करण्यास जोड म्हणून खते वापरून तळ्याची उत्पादकता वाढवणे फायदेशीर असते. मत्स्यबीज सोडण्याच्या अगोदर पावसाळ्याच्या आरंभापूर्वी तळ्यात दर हेक्‍टरी २०० ते ५०० किलो चुना एकाच मात्रेत द्यावा. तो पाण्यात मिसळून तळ्यात सर्वत्र शिंपडावा. सेंद्रिय व रासायनिक खतांच्या मात्रा सामान्यतः खालीलप्रमाणे असाव्यात.

खताची मात्रा---- दर हेक्‍टरी खत (किलो)

--------------- शेण---युरिया---सुपर फॉस्फेट

पहिली मात्रा---२०००---५०---२०

दुसरी ते अकराव्या महिन्या करिता मात्रा (दर महिन्यात आवश्यकतेनुसार कमी जास्त प्रमाणात मात्रा करावी)--- ८०००---१५०---१३०

एकूण वार्षिक मात्रा---१००००---२००---१५०

टीपः

१) तळे हिरव्या किंवा निळसर हिरव्या रंगाच्या प्लवंगाने भरू लागल्यास खताचा वापर थांबवावा.

२) प्रामुख्याने युरियाचा वापर बंद करावा. एका मात्रेच्या वेळची सर्व खते एकत्र मिसळून त्यांचे ढीग तळ्याच्या काठाकाठाने पाण्यात बुडतील असे ठेवावेत. म्हणजे ते खत हळूहळू पाण्यात विरघळून जाईल. ३) बोटुकली सोडण्याच्या सुमारे १५ दिवस आधी खताची पहिली मात्रा द्यावी. मोहाची पेंड वापरली असेल तर पहिल्या मात्रेत शेण आवश्यकता नाही. कारण पेंड हेच एक उत्कृष्ट खत आहे.

तळ्यात सोडण्यासाठी मत्स्य पिलांचा आकारः

- निवडक जातीची मत्स्य बोटुकली दर एकरी जलविस्तारास ५००० नग सोडावीत.

- योग्य खाद्य, पाणी इत्यादी व्यवस्थापन असल्यास एकरी १० ते १५ हजार मत्स्य बोटुकली सोडू शकतो.

- बोटुकल्यांची लांबी ५० ते १०० मि.मी. असावी. तळ्यात मत्स्यभक्षक मासे नसतील, तर ३०-५० मि.मी. लांबीची बोटुकलीही चालतील.

- कटला, रोहू, मृगळ जातीचे बीज साधारणतः जुलै ते ऑगस्ट अखेरपर्यंत व सायप्रिनसचे बीज जानेवारी ते मार्चपर्यंत शासनाच्या मत्स्यबीज केंद्रावर विकत मिळते. हे बीज १५-२० मि.मी. लांबीचे असते. वाहतुकीच्या दृष्टीने बीजावस्थेत ते विकत घेऊन तळ्यावर नेणे फायदेशीर असते. तळ्याजवळ या बीजाचे बोटुकल्यापर्यंत संगोपन करावे. त्याकरिता तळ्याजवळ एक लहानसे संगोपन तळे बांधावे किंवा एखाद्या (ऑक्टोबरपर्यंत पाणी राहू शकणाऱ्या) डबक्यात बीजाचे संगोपन करावे.

- मत्स्य शेतीसाठी मुद्दाम तळे बांधावयाचे असेल तर त्यात सुमारे १०० ते २०० चौ.मी. आकाराचे संगोपन तळे बांधावे. त्यासाठी पाणी घेण्याची स्वतंत्र व्यवस्था ठेवावी. तळ्यात सोडावयाच्या बोटुकलीमध्ये कटला, रोहू, मृगळ व सायप्रिनस यांचे प्रमाण अनुक्रमे ३०:३०; २०:२० एवढे असावे.

तळ्यातील माशांचे नैसर्गिक खाद्यः

- कटला मासा तळ्यात पृष्ठभागाजवळ चरतो. पाण्यातील सूक्ष्म जीवजंतू (प्राणी व वनस्पती) म्हणजे प्लवंग हे त्याचे खाद्य असते.

- रोहू तळ्याच्या मधल्या थरात चरतो. प्राणी प्लवंग, सडणारी वनस्पती व तीरावरील जीवजंतू यावर उपजीविका करतो.

- मृगळ तळ्याच्या तळाजवळ चरतो. तळाजवळील कुजणारे वनस्पतिजन्य अन्न, शेवाळ, प्राणी प्लवंग हे अन्न घेतो.

- सायप्रिनस हा मासा तळावरील गाळ खातो. त्यातील कृमी कीटक, शंखवर्गातील लहान प्राणी, कुजणाऱ्या पाणवनस्पती यावर उपजीविका करतो. या नैसर्गिक अन्नाच्या जोडीला शेंगदाण्याची पेंड व भाताचा कणी कोंडा यांचे समभाग मिश्रण पूरक खाद्याच्या या स्वरूपात माशांना खाऊ घालतात. या मिश्रणात पशुखाद्यात वापरले जाणारे विविध खनिजांचे मिश्रण (मिनरल मिक्‍स्चर) मिसळून वापरल्यास त्यापासून इतर दुर्मीळ पोषकद्रव्येही मिळू शकतात. माशांची वाढ चांगली होते.

- बाजारात विविध तयार सूत्रताबद्ध (योग्य प्रमाणात आवश्यक घटक उदा. प्रथिने, मेद, कर्बोदके, जीवनसत्त्व इ.) घटकांचे योग्य मिश्रणाचे मासळीची प्रजातीनुरूप व मासळीच्या तोंडाच्या आकारानुसार तरंगणारे खाद्याचे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. ठरावीक बीजांचे वाढीनुसार त्यांना द्यावयाचे खाद्याच्या प्रमाणाचे तक्ता (चार्ट) सुद्धा संबंधित खाद्य उत्पादकां कडून देण्यात येतात.

वाढत असलेल्या माशांची काळजीः

- दर आठवड्यात तळ्यात जाळे फिरवून माशांना व्यायाम द्यावा. म्हणजे त्यांची वाढ व्यवस्थित होते. प्रत्येक वेळी जाळ्यात येणाऱ्या माशांची संख्या आणि आकार यांच्यावर लक्ष ठेवता येते. सुमारे १० ते १२ महिन्यांनी माशांचे सरासरी वजन प्रत्येकी एक किलो होईल, त्या वेळी हे मासे पकडून त्यांची विक्री करावी.

- खत आणि पूरक अन्नाचा वापरामुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते. तळाशीही गाळ साचत जातो. हा गाळ कुजल्यामुळेही प्राणवायूचे प्रमाण कमी होते. पॅडल व्हील किंवा एरीएटर्स या उपकरणांचा वापर केल्यास पाणी सतत ढवळले जाईल व प्राणवायू अधिकाधिक विरघळला गेल्यामुळे त्याची कमतरता भासणार नाही. हे उपकरण महाग असून, त्याचा वापरासाठी वीज किंवा डिझेल पंपाचा वापर करावा लागतो. दर एकरी जलक्षेत्रात दोन पॅडल व्हील वापरावी लागतात. परंतु त्यायोगे मत्स्योत्यादनात वाढ होत असल्यामुळे याचा खर्च अतिशय उपयोगी पडतो.

तलावामधून एकरी मत्स्य उत्पादनः

- मुद्दाम बांधलेल्या लहान बारमाही तलावामधून दर एकरी मत्स्योत्पादन वार्षिक कमीत कमी ५००० बोटुकली सोडल्यास ३ ते ४ हजार किलोपर्यंत मत्स्य उत्पादन मिळते.

- योग्य ती काळजी घेतल्यास लहान तलावामधूनही १०००० मत्स्य बोटुकलीपासून एकरी ५००० ते ८००० किलो किंवा त्यापेक्षा अधिक मत्स्योत्पादन घेता येऊ शकते.

स्वत: किरकोळ विक्रीद्वारे ताजे किंवा जिवंत मासळी विक्री केल्यास सदर मासळी दर हा २०० ते २५० रुपये प्रति किलो प्रमाणे मिळू शकतो.(८००० × २००= १६,००,०००) सर्व खर्च वजा जाता ११,६५,५०० रुपये नफा मिळविणे शक्य आहे. बाजारपेठेतील दरानुसार खर्च आणि नफा गुणोत्तर बदलते. वरील अर्थशास्त्र खर्चाच्या माहितीसाठी देण्यात आले आहे.

मत्स्य शेतीकरिता तांत्रिक मार्गदर्शनः

१) तलाव बांधण्याकरिता जागेची उपयुक्तता, जमिनीची प्रतवारी, पाण्याची उपलब्धता याबाबत मार्गदर्शन पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याकडून मिळू शकते.

२) मत्स्यशेतीच्या विविध योजना संबंधी मार्गदर्शन व सल्ला संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्‍त मत्स्य व्यवसाय व संबंधित मत्स्य व्यवसाय अधिकारी यांच्याकडून किंवा विभागाच्या संकेत स्थळावरून मिळू शकेल.

संपर्कः किरण वाघमारे, ९८८१६००९५१

(किरण वाघमारे हे पुणे येथे सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आहेत. बालाजी पवार हे अमरावती सहा मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com