
डॉ. योगेश मात्रे, डॉ. अनंत लाड
सध्याच्या वातावरणामध्ये करडई पिकावर (Safflower Crop) मावा किडीचा प्रादुर्भाव (Mava Pest Outbreak) दिसून येत आहे. या किडीमुळे उत्पादनात (Safflower Production) ५५ ते ८० टक्के घट येऊ शकते. किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरुवातीच्या व शेवटच्या अवस्थेत अधिक असते. या किडीची सुरुवात शेतातील बाजूच्या झाडांपासून होते. त्यासाठी वेळीच नियंत्रणाचे उपाय योजावेत.
ओळख
मावा ही कीड अर्धगोलाकार, काळी आणि मृदू शरीराची असते. शरीरावर पाठीमागच्या बाजूस दोन शिंगे असतात.
पूर्ण वाढलेल्या मावा किडीस दोन पंख असतात.
नुकसानीचा प्रकार
झाडाच्या शेंड्यावर, बोंडाच्या देठावर, कोवळ्या पानांच्या शिरांवर, पानाच्या मागील बाजूस खोडावर आणि फांदीवर प्रादुर्भाव आढळतो.
ही कीड सोंडेद्वारे झाडातील अन्नरस शोषतो. अधिक प्रादुर्भावामध्ये झाडे वाळतात. परिणामी, झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट येते.
अन्नरस शोषण करताना कीड साखरेसारखा चिकट द्रव स्रवते. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे झाडाच्या अन्ननिर्मिती प्रक्रियेत बाधा येते.
चिकट पदार्थ फुलांवर पडल्यामुळे परागीकरणाच्या प्रक्रियेवरही परिणाम होतो. परिणामी, दाणे कमी प्रमाणात भरतात.
किडीने झाडाचा बराचसा भाग व्यापून टाकल्याने ती काळसर दिसतात.
फुलोरावस्थेत जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे फुले व बोंडे कमी लागतात.
तीव्र प्रादुर्भावामध्ये झाडे फुले लागण्याआधीच वाळून जातात.
एकात्मिक व्यवस्थापन
शेताभोवती उगवलेली ग्लिरिसिडीया, गवते, तांदुळजा, दुधी, पाथरी व काचांडा, हॉलीओक, चंदन बटवा इत्यादी वनस्पती या किडीसाठी यजमान म्हणून कार्य करतात. त्यासाठी या वनस्पतींचा नाश करावा.
पेरणीपासून ४० दिवसांपर्यंत एक कोळपणी आणि एक खुरपणी करून पीक तणविरहित ठेवावे.
ढालकीटक (लेडीबर्ड भुंगेरे) आणि क्रायसोपा दोन्ही मित्रकीटक माव्यावर उपजीविका करतात. त्यामुळे या मित्रकीटकांचे संरक्षण करावे.
आर्थिक नुकसानीची पातळी ः २७ मावा प्रति ५ सेंमी खोड
नियंत्रण उपाय ः (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)
ॲझाडीरेक्टिन (१० हजार पीपीएम) २ ते ३ मिलि किंवा
ॲसीफेट (७५ टक्के डब्ल्यूपी) किंवा
डायमिथोएट (३० टक्के ईसी) १.३ मिलि
-डॉ. योगेश मात्रे, (संशोधन सहयोगी), ७३८७५२१९५७, डॉ. अनंत लाड, (सहायक प्राध्यापक), ७५८८०८२०२४
(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.