Orange : संत्रा पिकावरील मिलीबगचे व्यवस्थापन

सध्या महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात डवरगाव (ता. मोर्शी) येथे संत्रा फळझाडे आणि बागेच्या परिसरातील काँग्रेस गवत आणि घाणेरी तणावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला (२८ मे २०२२ च्या भेटीमध्ये) दिसून आले होते.
Orange Pest
Orange PestAgrowon

सध्या महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात डवरगाव (ता. मोर्शी) येथे संत्रा फळझाडे आणि बागेच्या परिसरातील काँग्रेस गवत आणि घाणेरी तणावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला (२८ मे २०२२ च्या भेटीमध्ये) दिसून आले होते. तसेच अचलपूर परिसरात बांधावरील घाणेरी आणि काँग्रेस गवतावर मिलीबग (Mealybug Outbreak On Orange) मोठ्या प्रमाणात दिसून आला. या तणांवरून मुख्य पिकांमध्ये या किडींचा (Pest) प्रसार होऊ शकतो. त्यामुळे या किडीच्या एकात्मिक नियंत्रणाच्या (Integrated Pest Management) दृष्टीने त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच घाणेरी या झुडपांवर लक्षणीयरीत्या आढळून येत आहे. म्हणून शेतकऱ्यांनी काँग्रेस गवत व घाणेरी झुडपाचे बारकाईने नजर ठेवून इतर पिकावर प्रसार होण्याआधी नियंत्रणाचे उपाय योजावेत. विशेषतः सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद, तूर या खरीप आणि संत्रा, पपई, सीताफळ, आंबा आणि भाजीपाला पिकावर ही कीड वेगाने वाढू शकते.

Orange Pest
Orange : संत्रा बागायतदार वाय-बहरमुळे जेरीस

किडीचे खाद्य :

ही कीड ३०० पेक्षा जास्त वनस्पती प्रजातींवर उपजीविका करते. वर्षभर सक्रिय राहते.

प्रमुख पिके - ऊस, भात, कपाशी, तूर, सोयाबीन, अंबाडी इ.

फळपिके - पपई, सफरचंद, आंबा,संत्रा, पेरू, सीताफळ, द्राक्ष, केळी,अंजीर, डाळिंब इ.

भाजीपाला पिके - टोमॅटो, भोपळा, काकडी, भेंडी, बटाटा इ.

फुलपिके - जास्वंद, मोगरा, रातराणी, दिनका राजा, झेंडू, शेवंती, गुलाब इ.

तणे ः तरोटा, घाणेरी, गाजर गवत, पेटारी, कोळशी, गोखरू, बाभूळ इ.

एप्रिल मे घेतलेल्या सर्वेक्षणात या किडीचा प्रादुर्भाव अकोला, अमरावती व नागपूर भागातील बऱ्याच ठिकाणी कपाशी पिकासह काकडी व भोपळ्याच्या वेलीवरही आढळला आहे.

किडीचा शेतामध्ये प्रसार :

१) या किडीचा प्रादुर्भाव उन्हाळ्यात तुलनेने (एप्रिल ते जून मध्यापर्यंत) कमी असतो. विशेषतः ओलिताच्या भागात फळे, फुलझाडे. तणे यावरील प्रादुर्भाव पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबरपर्यंत, भाजीपाला, फुले आणि खरीप पिकांमध्ये स्थलांतरित होतो. मुख्य पिकांसोबतच सर्वदूर पसरलेल्या काँग्रेस गवत, घाणेरी, बावची, पेटारी या अशा प्रमुख तणांवरही मिली बग आढळतो.

२) किडीचे वाहक - हवा, पाऊस, छोटे उडणारे कीटक, मुंगळे, पक्षी, पाळीव जनावरे व अन्य प्राणी इ.

स्वतः शेतकऱ्यासोबतही ही कीड शेतामध्ये येऊ शकते.

३) मिलीबग प्रादुर्भावग्रस्त गवत उपटून शेतात, परिसरात टाकणे, वाहत्या पाण्यात फेकणे यामुळेही पिकांमध्ये प्रसार होतो. असे गवत त्वरित जाळून टाकावे.

Orange Pest
Orange : संत्रा फळगळ अभ्यास समिती उरली कागदावरच

किडीचा जीवनक्रम :

- अंडी : पिवळसर, केशरी अथवा गुलाबी रंग. मेणाच्या आच्छादनात झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीत किंवा कोवळ्या पानावर दिलेली आढळतात. एक मादी सुमारे १५० ते ६०० अंडी घालते. एका अंडकोषिकेमध्ये १० ते १५ अंडी असतात. अंड्यातून ६ ते ९ दिवसांत पिले बाहेर पडतात.

- पिले : अंड्यातून निघालेली पिल्ले सुरुवातीला फिरत असल्यामुळे ‘क्रॉउलर’ म्हणतात. याच काळात पक्षी, जनावरे, मजूर यांच्या शरीराला चिकटून प्रसार होतो. या वेळी त्यांच्या शरीरावर चिकट पांढऱ्या रंगाचे आवरण नसल्यामुळे नियंत्रण सोपे होते. क्रॉउलर ही अवस्था १ ते २ दिवसांची असते. पुढे पिले स्थिरावतात. ती अवस्था सुमारे २०-२५ दिवसांची असते.

-प्रौढ : मिलीबग एका जागेवर स्थिरावल्यावर झाडाच्या फांदीतून रसशोषण करू लागतात. आकार अंडाकृती होऊन शरीराभोवती पांढऱ्या रेशमी कापसासारखे आवरण तयार होऊ लागते. या मेणचट पिठूळ आवरणामुळेच याला ‘पिठ्या ढेकूण’ संबोधले जाते. या अवस्थेत कीड १०-१५ दिवस झाडातून अन्नरस शोषते. पुढे फक्त नर कोषावस्थेत जातात.

या किडीची मादी संपूर्ण वाढ झाल्यावर पंख विरहित असते. तिची रस शोषण करण्याची क्षमता अधिक असते. मादीला पाठीमागे दोन आखूड नळ्या असतात. मादी आपली अंडी जमिनीत, झाडांच्या भेगामध्ये किंवा पानाच्या खाली रेशमी कोषिकामध्ये घालते. मादी किडीमध्ये अंडी, पिले व प्रौढ या तीन अवस्था असतात. तर नर

किडीमध्ये अंडी, पिले, कोष व प्रौढ अशा चार अवस्था असतात. नराला पाठीमागे मादीपेक्षा लांब दोन शेपटीसारख्या नळ्या असतात. नर पिठ्या ढेकणामध्ये रस शोषण्यासाठी तोंडातील भाग अकार्यक्षम असतो. मात्र एक पंखाची जोडी असल्यामुळे मादीशी मिलन शक्य होते. पिठ्या ढेकणाच्या एका वर्षात सरासरी १२ ते १५ पिढ्या तयार होतात.

व्यवस्थापन :

१) हंगाम संपल्यानंतर शेतातील पिकाचे अवशेष नष्ट करावेत. पऱ्हाट्या शेतामध्ये रचून ठेऊ नये. प्रादुर्भावग्रस्त शेतातील पऱ्हाट्या इंधनासाठी जास्त दिवस साठवून ठेवू नयेत. एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवू नयेत. त्या एप्रिलपूर्वी संपवावे. प्रादुर्भावग्रस्त शेतातील पऱ्हाट्या लगेचच जाळून नष्ट कराव्यात.

२) उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट केल्यास जमिनीतील पिठ्या ढेकणाच्या अवस्था उन्हात येऊन नष्ट होतील.

३) प्रादुर्भावग्रस्त शेतातील वेचणी झाल्यावर शेतामध्ये क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) २.५ लिटर प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीवर फवारावे. किंवा क्लोरपायरिफॉस (१.५ टक्का) भुकटी २५ किलो प्रति हेक्टरी खोल नांगरटीनंतर जमिनीत मिसळावी.

४) पिठ्या ढेकणाच्या पर्यायी खाद्य वनस्पती उदा. गाजर गवत, पेटारी, बावची, रानखेडी, रुचकी, कोळशी इ.चा वेळीच आणि बिगर मोसमी हंगामातही बंदोबस्त करावा.

५) शेत परिसरातील शोभिवंत झाडावरील (उदा. जास्वंद, क्रोटीन इ.) पिठ्या ढेकणाचा बंदोबस्त करावा. जास्त प्रादुर्भावग्रस्त झाडाचा भाग किंवा संपूर्ण झाड उपटून नष्ट करावे. प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये वेचणी करताना मजुरांकडून अन्य शेतामध्ये प्रसार होणार नाही, याकडे लक्ष विशेष द्यावे.

६) पिठ्या ढेकणाच्या प्रसारामध्ये मुंगळे महत्त्वाची भूमिका निभावतात. शेत आणि परिसरातील मुंगळ्याची वारुळे शोधून नष्ट करावी. त्यासाठी क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) २.५ मि.लि. प्रति लिटर पाणी वापरता येईल. किंवा मिथिल पॅराथिऑन (२ टक्के भुकटी) २५ किलो प्रति हेक्टरी वापरावी. दर काही टप्प्यांनंतर हे काम वर्षभर करावे.

७) पिठ्या ढेकणाचा प्रादुर्भाव सुरुवातीला शेताच्या बाजूच्या झाडांवर व कमी क्षेत्रात होतो. तेव्हा प्रसार रोखण्यासाठी प्रादुर्भावग्रस्त भागावरच कीटकनाशकाचा वापर करावा. संपूर्ण शेतातील पिकावर फवारणी करण्याची गरज नाही.

८) पिठ्या ढेकणाची पिले सुरुवातीला पतंगाच्या अवस्थेमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रांगत जातात. पाने, खोड, शेंड्यावर फवारणी केल्यास काही पिठ्या ढेकूण जमिनीवर पडतात. त्यातील जिवंत राहिलेले पिठ्या ढेकूण परत झाडावर चढू शकतात किंवा जमिनीत खोल राहू शकतात. त्यामुळे कपाशीवर फवारणी केल्यावर झाडाभोवतीच्या जमिनीवरही करावी.

९) पिकांची नियमित फेरपालट करावा. एकाच शेतामध्ये वर्षानुवर्षे कपाशीचे पीक घेऊ नये. अधिक प्रादुर्भाव असलेल्या शेतामध्ये पुढील वर्षी कपाशीचे पीक घेणे टाळावे.

१०) खुरपणी व कोळपणी वेळेवर करावी. शेतातील व बांधावरील तणांचा विशेषतः पिठ्या ढेकणाचे पर्यायी खाद्य वनस्पतीचा बंदोबस्त करावा.

११) पिठ्या ढेकणावर उपजीविका करणारे क्रिप्टोलेमस माँन्ट्रोझायरी, ढालकीटक, क्रायसोपा हे परभक्षी व ॲनागायरस कमाली हे परोपजीवी कीटक निसर्गात आढळून येतात. त्यांचे संवर्धन करावे.

१२) मित्रकीटक अधिक क्रियाशील असलेल्या ठिकाणी रासायनिक कीटकनाशकाचा वापर टाळावा. आवश्यकता वाटल्यास आणि वातावरणामध्ये आर्द्रता असल्यास जैविक कीटकनाशके उदा. व्हर्टिसिलिअम लेकॅनी, मेटाऱ्हायझीम ॲनीसोप्ली (५० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) या प्रमाणे फवारणी करावी. किंवा निंबोळी अर्क (५%) वापरावे. किंवा मित्रकीटकांना कमी हानिकारक असलेले रासायनिक कीटकनाशक ब्युप्रोफेझिन २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

पिठ्या ढेकूण नियंत्रणासाठी पीकनिहाय लेबल क्लेमप्राप्त कीडनाशके ः

अ. क्र.---- कीटकनाशके---- पीक---- प्रमाण प्रति १० लिटर पाणी (हाय व्हॉल्यूम पंपासाठी)

१) निंबोळी अर्क (५ टक्के)---- सर्व पिके---- ५०० मि.लि. (१०.० लि./एकर)

२) व्हर्टिसिलिअम लेकॅनी (१.१५ % डब्ल्यूपी) ---- संत्रा---- ५० ग्रॅम. (१ किलो / एकर)

३) डायमेथोएट (३० ई.सी.)---- अंजीर---- १६.५ मि.लि. (३३० मि.लि. / एकर)

४) ब्युप्रोफेझिन (२० %) अधिक ॲसिफेट (५० % डब्ल्यू.पी.) (संयुक्त कीटकनाशक) --- कपाशी --- २५ ग्रॅम (५०० ग्रॅम / एकर)

५) बायफेनथ्रीन (८%) अधिक क्लोथियानिडीन (१० % एस.सी.) (संयुक्त कीटकनाशक) --- कपाशी --- १० मि.लि. (४०० मि.लि. / एकर)

६) फिप्रोनिल (१५ %) अधिक फ्लोनीकॅमिड (१५ % डब्ल्यू.डी.जी.) (संयुक्त कीटकनाशक) --- कपाशी --- ८ ग्रॅम (१६० ग्रॅम / एकर)

टीप ः कीडनाशकासोबत २० ग्रॅम डिटरजेन्ट किंवा कपडे धुण्याची पावडर प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी संपूर्ण झाडावर आणि झाडाखाली परिघामध्ये जमिनीवरही करावी.

इतिहास ः

भारतात मिलीबग या किडीचा प्रादुर्भाव प्रथम २००५ मध्ये पंजाब राज्यातील फिरोजपूर, भटिंडा जिल्ह्यामध्ये आढळला. किडीच्या व्यवस्थापनासाठी २००६ पासून पंजाब कृषी विभागामध्ये पावले उचलली असली तरी ही कीड वेगाने पसरत चालली आहे. तिचा प्रादुर्भाव आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यांमध्ये हळूहळू कपाशीवरही दिसत आहे. पूर्वी ही कीड अत्यंत कमी प्रमाणात आढळत होती. अलीकडे गेल्या ८ ते १० वर्षांपासून वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या पिकावर या किडीचा प्रादुर्भाव वर्षभर आढळून येतो.

-----------------

- डॉ. अनिल ठाकरे, ९४२०४०९९६०

(सहयोगी प्राध्यापक -कीटकशास्त्र, गटप्रमुख, संत्रा फळगळ व्यवस्थापन मिशन, कृषी संशोधन केंद्र, अचलपूर अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com