वाढत्या तापमानात कोंबड्यांचे व्यवस्थापन

शरिराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी कोंबड्या तोंडावाटे श्वासोच्छ्वास करून उष्णता बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात. यासाठी अधिक ऊर्जा खर्च होते. याचा परिणाम खाद्य सेवन आणि वाढीवर होतो. हे लक्षात घेऊन उन्हाळ्यात कोंबड्यांच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष द्यावे.
Poultry Management
Poultry ManagementAgrowon

डॉ.एम.आर.वडे

पोल्ट्री व्यवसायामध्ये उष्णतेच्या ताणामुळे कोंबड्यांत सर्वाधिक मरतूक होते. वाढलेल्या तापमानामुळे कोंबड्या खाद्य कमी खातात आणि पाणी जास्त पितात. याचा वाढ, अंडी आणि मांस उत्पादनावर परिणाम होतो. कोंबड्यांमध्ये शरिराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी घाम ग्रंथी नसतात. कोंबड्या त्वचेद्वारे शरिराचे तापमान नियंत्रित ठेवतात. उष्णतेच्या ताणामुळे शरिराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी कोंबड्यांना अतिरिक्त ऊर्जेचा वापर करावा लागतो. उष्णतेच्या ताणामुळे कोंबड्यांमध्ये मरतूक येते.

ब्रॉयलर कोंबड्यांच्या वाढीसाठी १८ ते २२ अंश सेल्सिअस हे तापमान योग्य आहे. या तापमानामध्ये कोंबड्यांची वाढ योग्य प्रमाणात होऊन चांगले उत्पादन मिळते. तापमान २६.७ ते २९.४ अंश सेल्सिअसच्या वर तापमान गेल्यास उष्णतेचा ताण येतो. प्रौढ कोंबड्यांच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान ४० ते ४१.६६ अंश सेल्सिअस असते. हे तापमान ४५.६ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यानंतर मरतुक येण्याचा धोका संभवतो.

उष्णतेच्या ताणाचा परिणाम ः

सभोवतालचे तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते, त्यावेळी कोंबड्यांना वाढलेल्या तापमानाचा त्रास होऊ लागतो. शरिराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी त्या तोंडावाटे श्वासोच्छ्वास करून उष्णता बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात. यासाठी अधिक ऊर्जा खर्च होते. याचा परिणाम खाद्य सेवन आणि वाढीवर होतो.

 • शरीराची प्रतिकारशक्ती कमी होणे. परिणामी ई.कोलाय आणि इतर जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते.

 • त्वचा, पोटाच्या स्नायूंमध्ये रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे आतड्यांतील मार्गात रक्त प्रवाह कमी होतो. परिणामी भूक मंदावते. जास्त पाणी पितात. त्यामुळे आतड्यांसबंधीच्या मार्गाती द्रव सामग्रीची वाढ होते. पुढे अतिसार होतो. यामुळे शरिरातील आम्लाचे संतुलन राखण्यासाठी इलेक्ट्रोलाइट पावडर द्यावी.

ताणाची लक्षणे :

 • - श्‍वासोच्छ्‍वास जलदगतीने होतो.

 • - भरपूर तहान लागून पाणी पिण्याचे प्रमाण वाढते.

 • - भूक मंदावते, दिलेले खाद्य कमी प्रमाणात खातात.

 • - पंख पसरून उभ्या राहतात.

 • - कमी प्रमाणात खाद्य खाल्याने अंडी आणि मांसाची गुणवत्ता खालावते.

 • - ब्रॉयलरमध्ये शरीराचे वजन कमी होते.

 • - खाद्याचे मांसात रूपांतरण कमी होते.

 • - शरीराच्या तापमानात वाढ होऊन मरतूक येते.

उपाययोजना ः

 • - प्रखर सूर्य किरणे परावर्तित करण्यासाठी पोल्ट्री शेड छताच्या वर पांढरा चुना लावावा. शक्य असल्यास सफेद रूफ कुल लावावे.

 • - शेडमधील फॉगर्स, स्प्रिंकलरची वेळोवेळी तपासणी करावी. आवश्यकतेनुसार दुरुस्ती करावी.

 • - छतावर भात पेंढा, पाचट किंवा गवताचे आच्छादन केल्यास शेडमधील तापमान कमी होण्यास मदत होते.

 • - तापमान जास्त वाढल्यास प्रत्येक १० मिनिटांनी फॉगर २ मिनिटांसाठी सुरु करावा. त्यामुळे शेड थंड राहण्यास मदत होते. तसेच आर्द्रता नियंत्रित राहते.

 • - शेडच्या बाजूने बारदाने लावून ती ड्रीपद्वारे सतत भिजवावीत. त्यामुळे थंड हवा शेडमध्ये येईल.

 • - शेडमधून गरम हवा आणि तयार होणार वायू बाहेर काढण्यासाठी छतावर व्हेंटिलेटर लावावेत.

 • - पक्ष्यांना दुपारच्या वेळी पिण्यासाठी ताजे आणि थंड पाणी द्यावे. उष्णतेच्या तणावाची लक्षणे कमी करण्यासाठी थंड पाणी प्रभावी काम करते.

 • - शेडमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या उघड्या पाइप कापड किंवा अन्य गोष्टींनी झाकाव्यात.

 • - पिण्याच्या थंड पाण्यात इलेक्ट्रोलाइट पावडर १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळावी.

 • - उन्हाळ्यात पिंजऱ्यातील कोंबड्यांची गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. संख्या जास्त झाल्यामुळे हवेचा प्रवाह रोखला जातो. यासाठी १० टक्के जास्तीची जागा प्रत्येक कोंबडीला द्यावी.

 • -वाहतूक शक्यतो रात्री किंवा पहाटे करावी.

 • - शेडमधील हवा खेळती राहिल अशी व्यवस्था करावी.

खाद्य व्यवस्थापन ः

 • - उन्हाळ्यात पौष्टिक घटक जसे जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिनांचे प्रमाण १५ ते २० टक्के एवढे वाढवावे.

 • - लाइसीन आणि आर्जेनिनच्या कमतरतेमुळे उष्णतेचा ताण वाढतो. अशावेळी पशुवैद्यकांच्या सल्ल्याने सोयबीन पेंड, सूर्यफुल पेंड यांचा वापर करावा. त्यामुळे आवश्यक आर्जिनिन आणि लाइसिन पातळी प्राप्त करण्यास मदत होते.

 • - आहारातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण १ ते २ टक्क्यांनी कमी करावे. कारण पचनाची क्रिया होताना तंतुमय पदार्थांमुळे जास्त उष्णता निर्माण केली जाते.

 • - उष्णतेच्या ताणामध्ये कोंबड्यांमधील फॉस्फरसची गरज वाढते. अशावेळी आहारात फॉस्फरसच्या प्रमाणात ५ टक्यांर्यंत वाढ करावी.

 • - रक्तवाहिन्या आणि ग्लुकोनोजेनेसिसची अखंडता राखण्यासाठी जीवनसत्व सी २५० मि.ग्रॅ./ कि.ग्रॅ., क्रोमियम पिकोलीनेट २.५ मि.ग्रॅ./कि.ग्रॅ. आणि मॅग्नेशिअम सल्फेट २.५मि.ग्रॅ./कि.ग्रॅ. एकत्रितपणे पुरवठा केल्यास ब्रॉयलर कोंबड्यांना फायदेशीर ठरते.

 • - जीवनसत्व ई जास्त प्रमाणात ऑक्सिडेटिव्ह चयापचय झाल्यामुळे शरीरात तयार होणारे मुक्त रॅडिकल्स पकडते आणि निष्प्रभावी करते. तथापि, जीवनसत्व ई पोल्ट्रीमध्ये संश्लेषित केले जाऊ शकत नाही, जे पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी १०० ते २०० पीपीएम खाद्यामधून पुरवले पाहिजे.

 • जीवनसत्व अ (८,००० आय यू / किलो आहार) आहारातील पूरकता देखील रोगप्रतिकारक आव्हानामुळे प्रेरित अंडी उत्पादनावरील उष्णतेच्या ताणाचा हानिकारक प्रभाव कमी करू शकते.

 • • जीवनसत्व के पुरवण्याची शिफारस विशेषत: उष्णतेच्या तणावात दीर्घकाळापर्यंत रक्त गोठण्यामुळे होणारी कोक्सीडिओसिसच्या धोक्याच्या वेळी केली जाते.

- डॉ.एम आर. वडे, ८६००६ २६४०० (कुक्कुट संशोधन केंद्र, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com