Crop Protection : फळांतील रस शोषक पतंगाचे व्यवस्थापन

लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये रस शोषक पतंगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. या प्रादुर्भावामुळे फळपिकांचे सुमारे ५० ते ६० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.
Crop Protection
Crop Protection Agrowon

डॉ. योगेश मात्रे, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. अनंत बडगुजर

लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये (Citrus Fruit crop) रस शोषक पतंगाचा प्रादुर्भाव (Sucking Pest Outbreak) मोठ्या प्रमाणात दिसून येतो. या प्रादुर्भावामुळे फळपिकांचे सुमारे ५० ते ६० टक्क्यांपर्यंत नुकसान (Fruit Crop Damage) होऊ शकते. अशा फळांची प्रत कमी होऊन ती विक्रीयोग्य राहत नाहीत. त्यासाठी किडीचा (Pest Control) जीवनक्रम समजून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. रसशोषक पतंग हे मोठ्या आकाराचे व आकर्षक रंगाचे असतात. रसशोषक पतंगाच्या ओथ्रिस मॅटरना, ओथ्रिस फुलोनिका व अकिया जनाटा अशा विविध प्रजाती आढळून येतात.

Crop Protection
Crop Protection : हळद, आले पिकातील कीड नियंत्रण

१) ओथ्रिस मॅटरना ः

पतंगाचे समोरील पंख तपकिरी रंगाचे आणि मागील पंख नारंगी रंगाचे असतात. मागील पंखांवर मध्यभागी एक काळा ठिपका असतो. पंखाच्या कडा काळ्या रंगाच्या असून त्यावर पांढरे ठिपके असतात.

२) ओथ्रिस फुलोनिका ः

पतंगाचे मागील पंख नारंगी रंगाचे असून, त्यावर मध्यभागी इंग्रजी ‘C’ अक्षरासारखा काळा ठिपका असतो.

३) अकिया जनाटा ः

पतंगाचे समोरील पंख तपकिरी व मागील पंख पांढरे असून त्यावर काळे चट्टे असतात. या पतंगाचा प्रादुर्भाव मोसंबी, संत्री या फळा व्यतिरिक्त डाळिंब, आंबा, द्राक्ष इत्यादी फळांवरही प्रादुर्भाव होतो. या पतंगाचा प्रादुर्भाव उशिराचा आंबिया आणि मृग बहरात जास्त दिसून येतो. ऑगस्ट ते ऑक्टोबर या पावसाळी कालावधीत प्रादुर्भाव अधिक वाढतो. जून ते ऑगस्ट या कालावधीत जीवनक्रम पूर्ण होऊन या किडीचे पतंग बाहेर पडतात.

Crop Protection
Crop Protection : पीक संरक्षण आधुनिक; पण महाग होणार

जीवनक्रम ः

- ज्या फळांना हे पतंग उपद्रव करतात, त्या फळझाडांवर पतंगापूर्वीच्या कोणत्याही अवस्था (उदा. अंडी, अळी आणि कोष) दिसून येत नाहीत. अंडी घालण्यापासून ते पतंगाची पूर्ण वाढ होईपर्यंतचा जीवनक्रम हा जंगली वनस्पतींवर होतो (उदा. गुळवेल, वासनवेल, चांदवेल इ. वेलवर्गीय वनस्पती). या वनस्पती नदी नाल्यांच्या किनाऱ्याला किंवा जंगलांमध्ये आढळतात.

- एक मादी पतंग जवळपास ८०० अंडी जंगली वनस्पतींच्या पानांवर घालते. ही अंडी २ ते ३ दिवसांत उबतात. त्यातून लहान पिवळसर रंगाच्या अळ्या बाहेर पडतात. सुरवातीला अळ्या वेलींची पाने खरवडून खातात. नंतरच्या वाढीच्या अवस्थेत पूर्ण पाने कुरतडून खातात. अळीची पूर्ण वाढ होण्यास १२ ते १४ दिवसांचा कालावधी लागतो. पूर्ण वाढ झालेल्या अळीचा रंग तपकिरी होतो.

- पूर्ण वाढ झाल्यानंतर अळी स्वतःभोवती कोष तयार करून कोषावस्थेत जाते. कोषावस्था ही वेलीवरच तयार होते. १० ते १५ दिवसांनी त्यातून पतंग बाहेर पडतो. हा पतंग डाळिंब, मोसंबी, संत्री इ. फळपिकांकडे धाव घेतो.

नुकसान ः

- फक्त प्रौढ पतंग अवस्था फळांचे नुकसान करतात. हे पतंग निशाचर असून, साधारणपणे संध्याकाळपासून ते मध्य रात्रीपर्यंत त्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो.

- पतंग बागेतील पक्व फळांवर छिद्र करून त्यात सोंड खुपसून रस शोषतात. कालांतराने छिद्र पडलेल्या ठिकाणी गोलाकार तपकिरी चट्टा तयार होतो.

- चट्टा पडलेल्या जागी बुरशीचा शिरकाव होऊन फळ सडण्यास सुरवात होते. प्रादुर्भावग्रस्त फळे गळून पडतात.

- पतंगाच्या प्रादुर्भावामुळे फळगळ झालेली फळे हाताने दाबल्यास त्यातून रस निघतो.

व्यवस्थापन ः

- फळबागांच्या आसपास वाढलेल्या गुळवेल, वासनवेल व चांदवेल इ. जंगली वनस्पतींचा वेळीच बंदोबस्त करावा.

- जमिनीवर पडलेली प्रादुर्भावग्रस्त फळे गोळा करून त्वरित नष्ट करावीत.

- पतंगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर सायंकाळी बागेमध्ये धूर करावा. त्यामुळे पतंगाचा फळबागेतील शिरकाव वेळीच रोखता येईल.

- शक्य असल्यास फळांना कागदी किंवा कापडी पिशवीने झाकावे.

- पतंगांना आकर्षित करण्यासाठी पिकलेली केळी बागेमध्ये ठेवावीत. केळीवर आकर्षित झालेले पतंग पकडून नष्ट करावेत.

- बागेमध्ये प्रकाश सापळे लावावेत. पतंग प्रकाशाकडे आकर्षित होऊन सुस्त होतात. असे पतंग पकडून नष्ट करावेत.

- शक्य असल्यास संपूर्ण झाड ०.५ सेंमी मेश पेक्षा कमी असलेल्या नायलॉनच्या जाळीने झाकावे.

- फळांचे हिरव्या रंगामधून पिवळसर रंगामध्ये रूपांतर होत असताना १० ते १५ दिवसांच्या अंतराने फळ तोडणीपर्यंत

निंबोळी तेल १० मिलि प्रतिलिटर पाण्यातून फवारणी करावी.

- मॅलेथिऑन १०० मिलि अधिक गूळ १०० ग्रॅम अधिक फळांचा रस १०० ते १५० मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून विषारी आमिष तयार करावे. हे मिश्रण १०० मिलि प्रमाणात मोठ्या आकाराच्या बाटल्यांमध्ये भरून ८ ते १० झाडांमध्ये एक बाटली या प्रमाणे टांगून ठेवावे. या विषारी आमिषाकडे आकर्षित झालेले पतंग गोळा करून नष्ट करावेत.

(टीप ः लेबलक्लेम आहेत.)

- डॉ. योगेश मात्रे, ७३८७५२१९५७

डॉ. अनंत बडगुजर, ७५८८०८२०२४

(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com