Mango Orchard: शेतकरी नियोजन - पीक : आंबा

अजय तेंडुलकर हे मुंबई येथे केटरिंगचा व्यवसाय करत असत. मात्र शेतीची आवड असल्यामुळे डोर्ले (ता. रत्नागिरी) येथील स्वतःच्या गावी परत आले. त्या वेळी त्यांची केवळ पाच एकर शेती लागवडीखाली होती.
Mango Orchard
Mango OrchardAgrowon

शेतकरी ः अजय रवींद्रनाथ तेंडुलकर

गाव ः डोर्ले, रत्नागिरी

आंबा लागवड ः २१ एकर.

एकूण कलमे ः २२०० कलमे.

अजय तेंडुलकर हे मुंबई येथे केटरिंगचा व्यवसाय (Catering Business) करत असत. मात्र शेतीची आवड असल्यामुळे डोर्ले (ता. रत्नागिरी) येथील स्वतःच्या गावी परत आले. त्या वेळी त्यांची केवळ पाच एकर शेती लागवडीखाली होती.

कष्ट आणि जिद्द या बळावर हळूहळू तीस एकर जमीन लागवडीखाली आणली आहे. त्यापैकी २१ एकर क्षेत्रामध्ये हापूसची सुमारे बावीसशेहून अधिक कलमे आहेत.

तीन एकर क्षेत्रामध्ये ३५० काजू (Cashew) कलमे, सहा एकरांवर ७०० नारळ आणि २७५ सुपारी अशी मोठी फळबाग (Fruit Crop) फुलवलेली आहे.

Mango Orchard
Mango Cashew : सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीचा आंबा, काजूला फायदा

अशी केली लागवड

२००५ मध्ये गावातील ओसाड व कातळाची जागा विकसित करण्याचा निर्णय अजय तेंडुलकर यांनी घेतला. कातळाच्या जमिनीमध्ये कलमांच्या रोपांच्या वाढीसाठी वाव मिळावा म्हणून पाच फुटाइतके खोल खड्डे घेतले.

दोन झाडांमधील अंतर २० फूट ठेवले. विद्यापीठाच्या निकषानुसार मातीमध्ये एक गुंठ्याला एक कलम असा निकष आहे. मात्र इथे गुंठ्याला दोन कलमे लावली आहेत. कातळावरील झाडे फेब्रुवारी, मार्चला फळे देतात.

पाऊस काळातील नियोजन

डोर्ले येथे एक हजार कलमे आहेत. हंगाम संपला की मे महिन्याच्या शेवटी सेंद्रिय खते (म्हणजेच लेंडीखत, शेणखत) प्रति कलम पाच ते सहा किलो असे दिले जाते. पाऊस सुरू झाला १०-२६-२६ मिश्रखताचा डोस दिला.

आता झाडे दहा वर्षांची झालेली असल्यामुळे रासायनिक खत दोन किलो दिले. पाऊस थांबल्यानंतर साधारणतः गणेशोत्सवाच्या काळात पाने कुरतडणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. त्यासाठी कीटकनाशकाची एक फवारणी केली जाते.

Mango Orchard
Mango Cashew : सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीचा आंबा, काजूला फायदा

पाऊस गेल्यानंतर पुढील नियोजन

पाऊस पूर्णपणे गेल्यानंतर आंबा बागांची सफाई केली जाते. त्यावेळी कलमांना पालवी फुटायला सुरू होते. या कोवळ्या पालवीवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ते लक्षात घेता १५ ते २० दिवसांच्या अंतराने कीटकनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी केली जाते.

कलमे मोहरायला सुरुवात झाल्यानंतर त्यावर तुडतुडे, फुलकिड्यांचा प्रादुर्भाव सुरू होतो. विशेषतः ढगाळ वातावरण असल्यास त्यांचा प्रादुर्भाव वाढतो. या दोन्ही रसशोषक किडींसाठी फवारणी केली जाते.

वातावरण निरभ्र असल्यास फारसा प्रादुर्भाव येत नाही, तरीही सातत्याने लक्ष ठेवले जाते. मोहराच्या काळामध्ये पाण्याचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते. त्यानुसार सध्या पाणी देण्यास सुरुवात केली आहे. प्रति दिन ३० ते ५० लिटर पाणी दिले जात आहे.

एप्रिल, मेमधील नियोजन

आंबा काढणी झाल्यानंतर झाडांना पाणी दिले तर लवकर उत्पादन मिळते. एप्रिल, मे या कालावधीत कातळावरील आंबा काढणी पूर्ण होते. त्यासाठी दिवसाला ५० ते ६० लिटर पाणी दिले जाते.

दर वर्षी २००० पेटी आंबा वाशी, मुंबई, पुणे येथील बाजारात विक्रीला जातो.

या व्यतिरिक्त नारळाची शहाळी ते विकतात. एक शहाळे वीस रुपयांना विक्रीला जाते.

पुढील तीन महिन्यांचे नियोजन

कलमांना आलेला मोहोर हळूहळू सुकण्यास सुरू होते. या काळात कलमे हलवून घ्यावी लागतात. त्यामुळे सुकलेला मोहोर झडला जाऊन फांदीला असलेली कैरी तिथेच राहते.

फांदी बऱ्यापैकी स्वच्छ होते. या कालावधीत दव पडला तर चिकटा होतो, आणि फळ डागाळण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी कलमे हलवून घेणे आवश्यक असते.

कैरी लागायला सुरुवात झाल्यामुळे फांद्यांना काठी लावण्यात येत आहेत.

कैऱ्या सुपारीएवढ्या झाल्यानंतरही तुडतुड्यासारख्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो. त्यातच यंदा ढगाळ वातावरण डिसेंबरपर्यंत सतत होते. आतापर्यंत रसशोषक किडींसाठी पाच फवारण्या झाल्या आहेत.

कैरी लागलेली असल्याने आंबा काढणीपर्यंत नियमित लक्ष ठेवावे लागते. उष्णता वाढली तर आंबा लासा होतो. तसेच पुन्हा फूट झाली तर पहिली कैरी गळून जाते. पुनर्मोहर असेल तर एक ते दोन इंच मागे मोहोराची फांदी कट करायची असते. त्यामुळे कैरी टिकते आणि अधिक उत्पादन मिळते.

काढणीपूर्वी महिनाभर आधी झाडांचे पाणी बंद केले जाते. कारण पाणी सुरूच ठेवल्यास आंबा लवकर तयार होत नाही. आंब्याची पूर्ण तयार होण्याआधीच करावी लागते. यंदा १५ मार्चपर्यंत आंबा तयार होण्याची अपेक्षा आहे.

त्यानुसार काढणीचे नियोजन करायचे आहे. काढणी करताना देठ चुकून मोडला गेला तर फळाची चकाकी कमी होते. त्यामुळे घळातील एक किंवा दोन आंबेच काढले जातात.

- अजय तेंडुलकर,

९७६७५६८६९३

(शब्दांकन ः राजेश कळंबटे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com