Climate Change : मराठवाडा जात्यात तर राज्याचा इतर भाग सुपात!

१९७२ चा दुष्काळ हा आपल्याकडचा मैलाचा दगड. या दुष्काळानंतरच हिरवटीची पूजा इतिहासजमा झाली, हे श्रीमती गुळवणी यांचं निरीक्षण.
Climate Change
Climate ChangeAgrowon

Abhijeet Ghorpade Article : त्या काळी श्रावण महिन्यात पावसाचा जोर (Rainy Season) कमी व्हायचा. मग गावातल्या आया, काक्या, मावश्या, आज्ज्या अशा वयस्कर बायका लहान मुलामुलींना घेऊन शेतात पोहोचायच्या. सोबत खीर-दामटीचा नैवेद्य आणि जेवणासाठी भाकरी.

दामटी म्हणजे लहान आकाराची जाडसर भाकरी आणि खीर असायची वळवटाची ! वळवटाची म्हणजे बोटव्यांची किंवा बोटांनी पाडलेल्या लहान, जाडसर शेवयांची. पावसाच्या हलक्या सरी पडत असायच्या, नाहीतर अधूनमधून पडणारं ऊन.

शेतात बी पडल्यामुळे जागोजागी उगवलेली रोपं. तिथं गेल्यावर या बायका ही रोपं दाखवायच्या- हे आंब्याचं, हे चिंचेचं, हे बोराचं, हे बाभळीचं, हे जांभळाचं... मग ती रोपं उपटून मुला-मुलींच्या हातानं बांधावर लावली जायची. मध्ये अंतर सोडून एकेक रोप लावायचं.

त्याला खीर-दामटीचा नैवेद्य दाखवायचा. याला म्हणायचं हिरवटीची पूजा ! पुढं हीच मुलं-मुली बांधावर जायची आणि माझं रोप कोणतं, तुझं कोणतं हे पाहत त्याची काळजी घ्यायची. त्यात अडकून पडायची. कळत नकळत त्यांच्यावर संस्कार व्हायचा, झाडं लावण्याचा अन् जगवण्याचा!

ही आठवण आहे साठीच्या दशकातली, १९६५-६६ च्या आसपासची. मराठाड्यातली. त्यातही आता शुष्क बनलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातली. तुळजापूर तालुक्यात अणदूर नावाचं गाव आहे. प्रसिद्ध नळदूर्ग किल्ल्याच्या अगदी जवळचं गाव.

काही जण सांगतात अणदूर म्हणजे मूळचं अन्नदूर्ग. तिथं जुन्या किल्ल्याच्या खुणा सापडतात, त्यात अन्नाची कोठारं. जवळपासच्या गावांमध्ये पाणी नसलं तरी अणदूरच्या विहिरी पाण्यानं भरलेल्या असायच्या. म्हणून हे अन्नदूर्ग असावं आणि पुढं अणदूर झालं असावं...

ही आठवण आहे याच गावच्या श्रीमती नीता गुळवणी यांची. त्या आता पुण्यात शिक्षिका आहेत. त्यांच्याकडून या प्रथेबाबत ऐकायला मिळालं. मराठवाड्यात गेलो असताना अनेकांनी त्याला दुजोरा दिला, आपापल्या आठवणी सांगितल्या.

Climate Change
Stormy Rain : देवळ्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीने दाणादाण

श्रीमती गुळवणी यांची आठवण ऐकताना बरं वाटलं, त्याचबरोबर त्या भागाचा प्रवास कुठून कुठपर्यंत झाला आहे याबाबत वाईटही वाटलं. वाईट वाटण्याचं कारण आहे- याच मराठवाड्यातील दुसरी आठवण.

उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांमधली. अगदी अलीकडच्या काही वर्षांतली. याच भागातील प्रशांत माने या तरुणाने सांगितलेली. त्याचं कसलं तरी दुकान आहे, पण आपला परिसर, निसर्ग-पर्यावरण याच्याशी त्याचं घट्ट नातं. त्यानं सांगितलं, आधीच मराठवाड्यात झाडांची संख्या कमी.

त्यात आता या दोन जिल्ह्यांमध्ये खवा तयार करण्यासाठी भट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात लाकूड वापरलं जात आहे. त्यासाठी उरली-सुरली झाडंही तोडली जात आहेत. त्यानं थेट हिशेबच मांडला. २५ किलो खव्यासाठी साधारण १०० किलो लाकूड लागतं.

एका किलो खव्यासाठी चार किलो लाकूड. हा तरूण राहतो त्या परिसरात आंबी, पाथरूड या गावांमध्ये वेगवेगळ्या भट्ट्यांमध्ये मिळून रोज ६५०० किलो खवा तयार होतो. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये अशा सुमारे तीनशे भट्ट्या आहेत.

तिथं दररोज एकूण एक लाख वीस हजार किलो लाकूड जाळलं जातं. याशिवाय रोज अंघोळीचं पाणी तापवण्यासाठी, स्वयंपाकासाठी लाकूड जाळलं जातं. आता तर चारा छावण्यांच्या निवाऱ्यासाठीसुद्धा झाडांवरच कुऱ्हाड पडते.

या दोन आठवणी साधारणत: पन्नास वर्षांचा कालखंड व्यापतात. अर्ध्या शतकात झालेला हा बदल अंगावर येणारा आहे, कदाचित कधीही भरून न निघणारा आहे. आता अडचण अशी आहे की खव्याच्या भट्ट्यांवर काही हजार लोकांचा रोजगार अवलंबून आहे.

तोही महत्त्वाचा आहे, पण त्याच्यासाठी इंधन म्हणून जी झाडं तोडली जातात, तो मार्ग शाश्वत नाही, कायमस्वरूपी पुरणारा नाही. शिवाय त्या भागातल्या सर्वांच्याच जीवावर उठणारा आहे...

शाश्वतता संपली आणि संसाधनांची टंचाई निर्माण झाली की परिस्थिती कशी बिघडत जाते, याचं हे ठसठशीत उदाहरण! तोकड्या संसाधनांवर सर्वांचाच बोजा पडला की व्यवस्था या कोलमडणारच. आजचं तर भागवू, पुढचं नंतर बघू... याची सुरूवात होते.

तेच सध्या मराठवाड्यात अनुभवायला मिळत आहे. पाणी, जलस्रोत, जमीन, जंगल... सर्वांवरच इतका मोठा बोजा की या सर्वच व्यवस्था पार कोलमडून पडल्या आहेत. मग माणूस कोलमडून पडला तर आश्चर्य ते काय !

पण हे सारं कधी बदललं आणि का बदललं? हा खरंतर प्रचंड मोठ्या अभ्यासाचा विषय. थोडक्यात मांडणी करायची तर त्यासाठी याच भागातल्या काही नोंदी पुऱ्या पडतात. हिरवटीची पूजा सुरू कधी झाली याची कल्पना श्रीमती गुळवणी यांना नाही, पण ती थांबली कधी हे मात्र त्या सांगतात.

१९७२ चा दुष्काळ हा आपल्याकडचा मैलाचा दगड. या दुष्काळानंतरच हिरवटीची पूजा इतिहासजमा झाली, हे श्रीमती गुळवणी यांचं निरीक्षण. या दुष्काळानंतर म्हणजे १९७० च्या दशकानंतर अनेक व्यवस्थांवरचा बोजा वाढत गेला.

पाणी, पाण्याचे स्रोत, सिंचन, जमीन, जंगल याबाबतच्या जुन्या व्यवस्था होत्या, पण त्या आता कालबाह्य ठरत होत्या (किंवा ठरवल्या जात होत्या.) नंतरच्या काळात हळूहळू नव्या व्यवस्थांचा चंचूप्रवेश सुरू झाला होता. नवं नेमकं काय धरायचं, जुनं काय सोडायचं...

याबाबत सुसूत्रता नव्हती, गोंधळ होता. टिकवून किंवा पुरवून वापरण्याचा विचार मागे पडत गेला. इतकंच नाही तर उद्यासाठी आहे, ते आजच संपविण्याला सुरूवात झाली. स्वाभाविकपणे काय आहे, किती आहे याचा हिशेब संपला, संसाधनं हवी तशी वापरली गेली. शेवटी व्हायचं तेच झालं.

Climate Change
Khandesh Rain : खानदेशात अनेक भागांत पाऊस

हे केवळ मराठाड्यापुरतं नाही, फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, संपूर्ण देशात कमी-अधिक प्रमाणात हेच घडत गेलं.. फारतर एक - दोन दशकं पुढंमागं. हाच काय तो फरक. काही भागात त्याची झळ तीव्र स्वरूपात जाणवू लागली, मराठवाडा त्यातला एक! याचा अर्थ राज्याच्या इतर भागात सारं आलबेल आहे असा नाही.

मराठवाडा आता जात्यात असेल, तर राज्याचा इतर भाग सुपात आहे. इतकंच. आत्तापुरतं बघून आजचा दिवस साजरा करायचा की सर्वकाळ टिकणारी व्यवस्था निर्माण करायची, या द्वंद्वात सध्या तरी शाश्वतता मागे पडली आहे.

पण हा तत्कालिक विचार पुरा पडणारा नाही. या परिस्थितीत शाश्वत उपायच तारून नेणारे आहेत.

सर्वच व्यवस्थांच्या टंचाईमुळे आता लांबचा विचार करण्याची मानसिकता निर्माण करणे हे मोठे आव्हान आहे. 'जगण्यासाठी' जे काही करावं लागतं ते करण्याची लोकांची मानसिकता आहे. त्यामुळे तुमच्या शाश्वततेच्या गप्पा ऐकायला कोणी तयार नसेल, असं वाटेल.

काही प्रमाणात हे आजचं वास्तव आहे. त्यामुळे हे आव्हान निश्चितच मोठं आहे. पण याला दुसरी बाजूसुद्धा आहे. त्या बाजूने विचार केला तर चांगल्या व्यवस्था निर्माण करण्याची ही उत्तम संधीसुद्धा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com