खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना

खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी माती परीक्षण अहवालानुसार नत्र, स्फुरद, पालाशची मात्रा द्यावी. नत्र खत देण्याची योग्य वेळ आणि एकूण मात्रेची विभागणी अधिक महत्त्वाची आहे.
Fertilizer
FertilizerAgrowon

खतांचा (Fertilizer) कार्यक्षम वापर होण्यासाठी माती परीक्षण (Soil Testing) अहवालानुसार नत्र, स्फुरद, पालाशची मात्रा द्यावी. नत्र खत देण्याची योग्य वेळ आणि एकूण मात्रेची विभागणी अधिक महत्त्वाची आहे. द्विदल धान्य, कडधान्यासाठी (Pulses) नत्र कार्यक्षमता महत्त्वाची आहे. सेंद्रिय खतांचा (Organic Fertilizer) पूरक वापर हा नत्र, स्फुरद, पालाश आणि जस्ताची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हळूवार उपलब्ध होणारी नत्रयुक्त खते, वेष्टणयुक्त नत्र खते आणि नायट्रीफिकेशन प्रक्रिया मंदविण्यासाठी निंबोळीयुक्त युरिया, गंधक वेष्टन युरिया आणि युरिया सुपर ग्रॅन्युल्ससारख्या गोळीदार खतांचा वापर करावा. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते.

१) जेव्हा खत वापरले जाते तेव्हा त्यातील सर्व पोषक तत्त्वे पिकाद्वारे शोषली जात नाहीत. पिकाद्वारे पोषक तत्त्वांचा फक्त एक अंश वापरला जातो.

२) माती परीक्षण मूल्यांनुसार निर्धारित केलेल्या मातीच्या पोषक पुरवठा शक्तीच्या आधारावर, खतांच्या शिफारसी केल्या जातात.

३) सेंद्रिय खतांचा नियमित वापर करून जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान आणावा. विविध जिवाणू खतांचा (रायझोबियम, पी.एस.बी., ॲझोटोबॅक्टर २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे) वापर करावा.

४) समस्यायुक्त, क्षारयुक्त व चोपण जमिनीत भूसुधारक खतांचा (जिप्सम, सेंद्रिय खते, पेंडीची खते, प्रेसमड, उसाची मळी प्रति हेक्टर ३ टन) वापर करावा.

Fertilizer
वाघिणी नसल्यामुळे बंदरांमध्ये खते पडून
Fertilizer
खते, बियाणे कृत्रिम टंचाई करून लूट ः संभाजी ब्रिगेड

खताची कार्यक्षमता ः

१. लीचिंग आणि वायू स्वरूपातील नुकसान.

२. रासायनिक अवक्षेपणामुळे स्थिरीकरण आणि सूक्ष्मजीव पेशींवर शोषण.

३. मातीत मिळण्यापूर्वी खतांमधील विविध घटकांमधील रासायनिक अभिक्रिया.

४. मातीचे भौतिक गुणधर्म.

५. मातीचे रासायनिक गुणधर्म.

६. खताची वैशिष्ट्ये.

नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता

१) सर्व प्रकारच्या जमिनीत नत्राची कमतरता कमी अधिक प्रमाणात दिसून येते. त्यामुळे पिकांना लागणारी मात्रादेखील जास्त असते. जमिनीमध्ये दिलेले नत्र वेगवेगळ्या मार्गाने वाया जाते. एकूण दिलेल्या नत्रापैकी ३५ ते ५५ टक्के नत्र पिकांना लागू होते. पाण्यात विरघळणे आणि वायुरूपात जाणारा अमोनिअम कमी करून नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यात येते.

२) जिरायती शेतीमध्ये नत्रयुक्त खते पेरून द्यावीत.

३) अधिक पाऊस पडणाऱ्या प्रदेशात आणि दीर्घकालीन पिकांसाठी नत्राची एकूण मात्रा २ ते ३ हप्त्यात विभागून द्यावी.

४) भात पिकामध्ये युरिया सुपर ग्रॅन्युल्सचा वापर करावा.

५) नॉयट्रेटयुक्त खते वाहून जाऊन नयेत म्हणून नियंत्रित आणि हलकी पाण्याची पाळी द्यावी.

६) युरियामधील नत्र हळुवार उपलब्ध होण्यासाठी युरियासोबत २० टक्के निंबोळी पेंडीचा वापर करावा.

७) नत्रयुक्त खताबरोबर कमतरता असलेल्या अन्नद्रव्यांची मात्रा संयुक्त खताद्वारे द्यावी किंवा समतोल वापर करावा.

स्फुरदाची कार्यक्षमता:

१) चुनखडीयुक्त किंवा चोपण, चिकणमातीयुक्त जमिनी, आम्लधर्मीय जमिनीमध्ये दिलेल्या स्फुरदयुक्त खतापैकी सुमारे ८० टक्के जमिनीत स्थिर होऊन उभ्या पिकांना लागू होत नाही, म्हणून स्थिर होणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण कमी करून कार्यक्षमता वाढविता येते.

२) स्फुरदयुक्त खते क्रियाशील मुळांच्या परिसरात योग्य खोलीवर पेरून द्यावीत.

३) रॉक फॉस्फेटसारखी खते मातीबरोबर मिसळून दिली तर कार्यक्षमता वाढते. मात्र रॉक फॉस्फेटच्या कणांचा आकार अति लहान असावा. ही खते ३ ते ४ आठवडे पेरणीपूर्वी द्यावी लागतात.

४) दाणेदार स्फुरद खते अधिक परिणामकारक ठरतात. स्फुरदयुक्त खते शेणखत किंवा कंपोस्टबरोबर १:२ गुणोत्तराच्या प्रमाणात वापरल्यास कार्यक्षम ठरतात.

५) रॉक फॉस्फेट शेणखत, प्रेसमड, कंपोस्टबरोबर दिल्यास चुनखडीयुक्त जमिनीतदेखील परिणामकारक ठरतात.

६) सुपर फॉस्फेट बायोगॅस स्लरी किंवा कोंबडीच्या खताच्या कंपोस्टबरोबर दिल्यास परिणामकारक ठरते.

७) स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक शेणस्लरी किंवा बीज प्रक्रिया करून द्यावे. त्यामुळे मूळ स्वरुपातील स्फुरदाची उपलब्धता वाढून कार्यक्षमतेत वाढ होते.

८) दरवर्षी शेतीमध्ये नियंत्रित प्रमाणात शेणखत, कंपोस्ट खताची मात्रा द्यावी. म्हणजे दिलेल्या स्फुरदयुक्त खतांचे स्थिरीकरण न होता पिकास उपयोगी ठरते.

९) स्फुरदयुक्त खतांच्या पाण्याच्या द्रावणात रोपांची मुळे बुडवून लागवड केल्यास स्फुरदाचा कार्यक्षम वापर होतो.

१०) तांबड्या लाल आम्लयुक्त जमिनीत रॉक फॉस्फेटचा प्रत्यक्ष खत म्हणून वापर करता येतो.

पालाशयुक्त खतांची कार्यक्षमता ः

१) माती परीक्षणानुसार पालाशची मात्रा इतर अन्नद्रव्यांसमवेत समतोल प्रमाणात वापरल्यास कार्यक्षमता वाढते.

२) केळी, ऊस, कंदवर्गीय भाज्या, भात पिकाची पालाशची गरज अधिक असते. केळी, उसासारख्या दीर्घकालीन पिकांना पालाशयुक्त खताचा मात्रा दोन हप्त्यात विभागून दिल्यास परिणामकारक ठरते.

सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्यांची कार्यक्षमता ः

१) सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता माती परीक्षणानुसार ठरवावी.

२) सेंद्रिय खतांचा नियमित वापर केल्यास सूक्ष्म अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढते.

३) जस्तयुक्त खताच्या द्रावणात भात, भाजीपाल्याची रोपे बुडवून लागवड केल्यास जस्ताची कार्यक्षमता वाढते.

४) शिफारशीनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी.

५) फळझाडांना सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा बहार आल्यानंतर फवारणीतून द्यावी.

६) गंधकाची कमतरता वाढते आहे. त्यामुळे माती परीक्षानुसार शिफारशीत मात्रा पेरणीपूर्वी ३ ते ४ आठवडे अगोदर जमिनीतून द्यावी.

(मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग,डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय,जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com