Colorful Grape Verity : रंगीत द्राक्षजातीमध्ये एकसारखा रंग येण्यासाठी उपाययोजना

रंगीत द्राक्षामध्ये एक सारखा रंग येण्यामध्ये अनेक समस्या दिसून येत आहेत. त्यातही एकाच घडातील सर्व मणी एकाच रंगांचे आढळून येत नाहीत.
Grape Crop
Grape CropAgrowon

डॉ. स. द. रामटेके, अप्पासो गवळी, अमृता लंगोटे

Vineyard Management : सध्या आपल्याकडे रंगीत द्राक्षाची लागवड ही हिरव्या जातीच्या तुलनेमध्ये कमी आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ग्राहकांची आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांची मागणी लक्षात घेता राज्यातील सर्व चारही प्रमुख द्राक्षविभागामध्ये रंगीत द्राक्षजातींची लागवड दिवसेंदिवस वाढत आहे.

विशेषतः परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या क्रिमसन सीडलेस या जातीची नाशिकसह अन्य काही द्राक्ष विभागात मोठ्या प्रमाणावर लागवड झालेली दिसून येत आहे. मात्र रंगीत द्राक्षजातीमध्ये एकसारखा रंग न आल्याने निर्यातीसाठी अनेक अडचणींना द्राक्ष बागायतदारांना सामोरे जावे लागत आहे.

सध्या स्थानिक बाजारामध्ये द्राक्षाच्या (Grape Market) रंग आणि एकसारखेपणाकडे तितकेसे लक्ष दिले जात नाही. मात्र दर्जेदार उत्पादनाकडून ज्या काही अपेक्षा असतात, त्या पूर्ण करण्यासाठी द्राक्ष बागायतदारांनी रंग आणि त्याच्या एकसारखेपणाकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे.

द्राक्षामध्ये पक्वतेनंतर आढळणारा रंग हा मुख्यतः अँथोसायनिन या घटकामुळे असतो. घडातील मण्यांच्या आकारातील एकसारखेपणा सोबतच घडातील सर्व मण्याच्या रंगाच्या सारखेपणाही खूप महत्त्व आहे.

आपल्याकडे रंगीत द्राक्षामध्ये एक सारखा रंग येण्यामध्ये अनेक समस्या दिसून येत आहेत. त्यातही एकाच घडातील सर्व मणी एकाच रंगांचे आढळून येत नाहीत. रंग निर्मितीची क्रिया पुढील बाबींवर अवलंबून असते.

Grape Crop
Grape Export : अंतिम टप्प्यात निर्यातक्षम द्राक्षबागांची विक्रमी नोंदणी

१) रंगीत जातीमध्ये रंगातील एकसारखेपणा द्राक्षाच्या जातीवरही अवलंबून असतो.

२) दिवस रात्रीच्या तापमानातील फरक

३) कॅनोपी व्यवस्थापन व पानांचे कार्य इ

४) दैनंदिन तापमानातील बदल विशेषतः मणी पक्वतेच्या कालावधीत असलेले जास्त तापमान इ. यावर असते.

Grape Crop
Exportable Grape production : निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात तयार केला हातखंडा

सध्याच्या परिस्थितीमध्ये बहुतेक सर्व द्राक्ष विभागातील मुख्यतः रात्रीचे तापमान हे दहा अंश से. पेक्षा कमी आहे. तापमान दहा अंश से. पेक्षा कमी असल्यास द्राक्षात अँथोसायनिन या घटकाचे प्रमाण मण्यांत वाढते. त्यामुळे द्राक्षांना रंग येतो.

सध्या अपेक्षेप्रमाणे तापमान कमी झालेले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये रंग येण्यास फारशी अडचण येणार नाही असे वाटते. मात्र द्राक्षाच्या काढणीची अवस्थाही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. काढणी वेळेअगोदर केल्यास रंग न आल्यामुळे द्राक्षाची प्रत खालावू शकते.

उपाययोजना :

क्रॉप लोड :

द्राक्षबागेमध्ये प्रमाणापेक्षा जास्त लोड (उत्पादन) असल्यासही रंग येण्यास विलंब लागतो. एकाच घडामधील मणी एक सारख्या रंगाचे नसतात. त्यासाठी पाने व फळांच्या गुणोत्तराप्रमाणे घडांची संख्या ठेवावी. घडांची संख्या ३०-३५ ठेवावी.

घडांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त ठेवल्यास त्यांचे व्यवस्थित पोषण होत नाही. परिणामी मण्यांत असलेल्या आम्लाचे रूपांतर साखरेत योग्य प्रमाणात होत नाही. तसेच अँथोसायनिनच्या प्रमाणासही बाधा पोचते. घडातील सर्व मण्यांना सारखा रंग प्राप्त होण्यात अडचणी येतात.

वेलींचे व्यवस्थापन (कॅनॉपी) व पानांचे कार्य :

वेलीवरील पानांची संख्या (कॅनॉपी) नियंत्रित असावी. त्यामुळे सुरवातीपासून शेवटपर्यंत प्रकाश संश्लेषण क्रियेत बाधा येणार नाही. द्राक्षाच्या एका काडीवर १५ ते १६ पाने ठेवावी. त्यामुळे पानांचे कार्यक्षमता टिकून राहून, त्याचा फायदा एकसारख्या रंग निर्मितीसाठी मिळतो.

पानांची संख्या व विस्तार यांचा विचार करून घडांची व मण्यांची संख्या ठरवावी. त्यामुळे रंगीत द्राक्ष जातीत (क्रिमसन सीडलेस , फ्लेम सीडलेस, फॅन्टसी सीडलेस, शरद सीडलेस व त्यांचे क्लोन) एकसारखा रंग होईल.

सी. पी. पी. यु. चा वापर : सी. पी. पी. यु. सारख्या संजीवकांच्या अतिवापरामुळे द्राक्ष मण्यांना रंग येत नाही, तसेच द्राक्ष काढणीचा कालावधी देखील लांबतो. कारण हे संजीवक द्राक्ष मण्यांतील हरितद्रव्य जास्त दिवस टिकवून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे

अँथोसायनिनचे प्रमाण योग्य पातळीवर येण्यास जास्त दिवस लागतात. परिणामी मण्यांना रंग येण्यास विलंब होतो. सी. पी. पी. यु. २ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे वापरावे. सी. पी. पी. यु. किंवा इतर संजीवकांचा अति वापर (म्हणजेच मात्रा आणि फवारण्यांची संख्या दोन्ही) टाळावा.

पाणी व अन्नद्रव्ये व्यवस्थापन :

मण्यामध्ये पाणी उतरणे ते द्राक्ष काढणीपर्यंत पाण्याचे नियोजन करावे. बाजारपेठांचा विचार करून द्राक्ष काढणी लवकर करता यावी, यासाठी बरेच द्राक्ष बागायतदार पाण्याचा ताण देतात. त्याचा परिणाम एकसारखा रंग येण्यावर होतो.

त्यामुळे पाण्याचा ताण देऊ नये. यासाठी फळछाटणी शक्यतो रंगीत जातीच्या द्राक्षामध्ये सप्टेंबरमध्ये करावी. म्हणजेच काढणी ही थंडीच्या कालावधीमध्ये घेता येईल. या कालावधीमध्ये रंगावर कोणताही परिणाम होणार नाही.

एकसारखा रंग येण्यास मदत होते. त्याच बरोबर अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये मॅग्नेशिअम, पोटॅश, कॅल्शिअम इ. चा वापर पान-देठ परीक्षणाच्या अहवालानुसार व तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावा.

इथेफॉनचा वापर :

रंगीत जातीच्या द्राक्षामध्ये एकसारख्या रंगासाठी इथेफॉनचा वापर संतुलितपणे (योग्य प्रमाणात व योग्य वेळी) करावा.

द्राक्षाची पक्वता :

द्राक्ष मण्यांच्या रंगात होणाऱ्या बदलावरून द्राक्षाची पक्वता ओळखता येते. पक्व झालेले मणी पारदर्शक दिसतात. द्राक्षाची पक्वता मण्यातील साखर व आम्लता या वरून सुद्धा ठरविता येते. यासाठी साखर व आम्लता यांचे गुणोत्तर ३० पेक्षा जास्त असावे. (साखर १८ ब्रिक्स व ॲसिडिटी ०.६ %)

घड झाकण्याचा फायदा :

शेडनेटचा वापर किंवा पेपरने घड झाकल्यामुळे थंडी किंवा उष्णता यांचा परिणाम टाळण्यासोबतच एकसारखा रंग प्राप्त होण्यास फायदा होऊ शकतो.

डॉ. स. द. रामटेके, ९४२२३१३१६६, (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com