शेतीमाल विक्री व्यवस्थेतील उपाययोजना

पर्यायी पणन व्यवस्था निर्माण करताना अनेक बाबीचे सूक्ष्मनियोजन करणे आवश्यक असते. याचाच एक भाग म्हणजे पणन व्यवस्था (Marketing System) निर्माण झाल्यावर त्यात होणारी आर्थिक उलाढाल व उलाढालीतील वाढ.
Agriculture Produce
Agriculture ProduceAgrowon

मिलिंद आकरे, हेमंत जगताप

शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतीमालाला (Agriculture Produce) योग्य बाजारभाव मिळण्याच्या अनुषंगाने शेतकरी कंपन्यांनी पर्यायी बाजारव्यवस्था निर्माण करण्यासाठी पीकनिहाय पुरवठा साखळ्या बाबत अभ्यास करणे आवश्यक आहे. याकरिता कृषी पणनविषयक माहिती प्रत्येक कंपनीने घेणे आवश्यक आहे. शासनामार्फत कृषी पणन व्यवस्थेबद्दल विविध उपाययोजना करण्यात येतात. या उपाययोजना काय आहेत, याची प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे.

शासनाच्या दृष्टिकोनातून कृषी विपणनाचे (Agriculture Marketing) कार्य म्हणजे, शेतीमालाच्या उत्पादनाला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर अशा शाश्‍वत पुरवठा आणि व्यापाराची जोड देणे. शासकीय स्तरावर शासन शेतकरी वर्गाला मार्केटिंग इंटेलिजन्स म्हणजेच शेतीमालाचे बाजारभाव व लागवडी संदर्भातील आडाखे बांधणारी यंत्रणा उभारून सेवा पुरवू शकते. शासन पुरवठा साखळीबाबत विविध पर्याय निर्माण करण्यासाठी धोरण तयार करून शेतकरी वर्गाला प्रोत्साहन देऊ शकते.

ही धोरणे ठरविताना बदलत्या काळानुरूप कृषी विपणन व्यवस्थेला अनुसरून बदलांचा समावेश करणे शक्य होऊ शकते.खासगी क्षेत्रातील यंत्रणेचा समावेश करून पुरवठा साखळी बळकट करण्याच्या अनुषंगाने शासनामार्फत यापूर्वीपासूनच प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु या प्रयत्नांची तीव्रता वाढवून त्याकरिता वातावरण निर्मितीची अत्यंत आवश्यकता आहे.

परिणामकारक विपणन व्यवस्थेची उभारणी :
भारतामध्ये कृषिविषयक वातावरणातील बदल हा विपणनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पूर्वी उत्तम कृषी विपणन म्हणजे शेतीमालाला जवळच्या अंतरावर मार्केट यार्डची उभारणी करून विक्रीची सोय उपलब्ध करून देणे, असे होते. परंतु आजच्या काळात ग्राहकाची गरज ओळखून त्याला आवश्यकतेनुसार शेतीमाल उपलब्ध करून देणे, तसेच बाजारपेठांची एकमेकांना खऱ्या अर्थाने जोडणी करून पुरवठा साखळीतील गतिमानता वाढविणे. हे अपेक्षित आहे.

१) मागणीनुसार पुरवठ्याचे नियोजन :
उत्तम पणन व्यवस्थेत नेहमी ग्राहक ते शेत व शेतीमाल उत्पादनाची मागणीनुसार तयारी याबाबी पुरवठा साखळीत अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मार्केटिंग इंटेलिजन्स यंत्रणेच्या साह्याने मागील काही वर्षांतील पिकांचा अभ्यास करून पुढील तयारीच्या दृष्टीने माहितीचे वितरण आवश्यक आहे. यामुळे सभासद अथवा भागधारकांना तांत्रिकतेच्या आधारे उत्तम पीक लागवडीचा सल्ला व विक्री व्यवस्थेबाबत सेवा पुरवता येऊ शकतील.

२) आर्थिक उलाढालीतील वाढ :
पर्यायी पणन व्यवस्था निर्माण करताना अनेक बाबीचे सूक्ष्मनियोजन करणे आवश्यक असते. याचाच एक भाग म्हणजे पणन व्यवस्था निर्माण झाल्यावर त्यात होणारी आर्थिक उलाढाल व उलाढालीतील वाढ. ही वाढ होण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीला मार्केटिंग इंटेलिजन्स पुरवणाऱ्या यंत्रणेची आवश्यकता आणि निव्वळ नफ्याचे भागधारकांमध्ये वेळेवर वितरण या बाबी सांभाळणे आवश्यक आहे.

३) बाजारपेठ वाढीचा दर ः
सामुदायिक बाजाराकरीता नेहमी पुरवठा साखळ्यांचा आधार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पर्यायी बाजाराची निर्मिती केल्यानंतर किंवा करताना शाश्वत पुरवठा साखळ्यांची निर्मिती व त्यांची बाजाराशी जोडणी किंवा उपलब्ध पुरवठा साखळ्यांमध्ये सहभागी होणे व ती साखळी व्यवस्थित सांभाळणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

जेवढ्या जास्त पुरवठा साखळयांची शेतकरी कंपनीने निर्माण केलेल्या पुरवठा साखळीची जोडणी झालेली असेल, तितक्या त्या बाजारपेठेत उलाढालीमधील वाढीचा दर जास्त असेल. नुसत्या पुरवठा साखळ्या वाढवूनही उपयोग होणार नाही तर या पुरवठा साखळ्या टिकविणे व त्यांच्या माध्यमातून बाजारपेठेची व पर्यायाने उलाढालीच्या दरात वाढ होण्यास मदत होऊ शकते.

४) शेतकरी कंपन्यांसाठी शेतीमालाचे विक्री व्यवस्थापन :
भारतीय शेतीचा प्रवास उदरनिर्वाहाच्या शेतीतून आता व्यावसायिक शेतीकडे होत आहे. व्यावसायिक शेतीसोबतच शेतीमाल विक्री व्यवस्थेतील विविध पर्याय निर्मितीकडे शेती व्यवस्थेची वाटचाल होत आहे. उदरनिर्वाहाच्या शेतीत शेतकरी स्वत:पुरता शेतीमाल पिकवून उर्वरित शेतीमाल विक्री करून गरजेच्या वस्तूंची प्राप्त करत असत.

शेतकरी स्वत: अथवा स्वत:कडील शेतमजूर यांच्या सेवांची सुध्दा पैशांच्या बदल्यात अदला बदल करीत होते. शेतकऱ्यांकडील उदरनिर्वाहाव्यतिरिक्त शिल्लक शेतीमाल अत्यंत अल्प स्वरूपात असल्याने उदरनिर्वाहाच्या शेतीत शेतीमाल विक्री अथवा वस्तू विनिमय यांची प्रगती होऊ शकली नाही. यामुळे १९६० पूर्वी आर्थिक उत्पन्न किंवा बचत नसल्याने कृषी क्षेत्राचा अमुद्रित क्षेत्र किंवा नॉन-मोनेटाइज सेक्टरमध्ये समावेश करण्यात आला होता.

हरितक्रांतीनंतरच्या काळात पणन विषयक पायाभूत सुविधांमधील कृषी शेतीमाल बाजारपेठा, धोरणे आणि संस्था की ज्या शेतीमाल विक्री करिता तयार झालेल्या होत्या त्या मुद्रित क्षेत्रातील पहिला टप्पा होता. कृषी क्षेत्राला व्यावसायिक रूप देण्याच्या अनुषंगाने शेतीमाल विक्री करिता तयार झालेल्या बाजारपेठांमुळे चालना मिळाली.

कृषी मूल्य साखळीवर झालेल्या संशोधनानुसार विविध प्रकारच्या १४९ विक्री व्यवस्थेतील कार्यरत संस्था या ५१ प्रकारची विविध कार्य करतात. त्यात खरेदी विक्री, वाहतूक, पॅकिंग, प्रक्रिया व प्रतवारी अशा विविध मूल्य साखळीशी संबंधित विविध उपक्रमांचा समावेश होतो.

५) एकत्रित बाजार संकल्पना :
एक सुव्यवस्थित देशांतर्गत विपणन प्रणालीद्वारे मागणी केंद्र व पुरवठा क्षेत्र (शेतकरी कंपन्या शेतकरी गट, शेतकरी इ.) यांच्या साखळीमध्ये व्यापक संबंध विकसित करून बाजारक्षेत्रात एकसमानता निर्माण करणे आवश्यक आहे. यामुळे बाजार मूल्यातील चढ-उतार कमी होऊन त्याचा शेतकरी व ग्राहक या दोघांचाही फायदा होऊ शकतो. देशाला एक बाजारपेठ मानणे आवश्यक आहे. याकरिता एकत्रित बाजार संकल्पना विकसित होत आहे.

६) वाढलेली स्पर्धात्मकता :
शेतीमाल विक्रीकरिता विविध पर्याय उपलब्ध होत आहेत. जितके जास्त पर्याय उपलब्ध होत आहेत तेवढी या क्षेत्रात स्पर्धा निर्माण होत आहे. या स्पर्धेमुळे ग्राहक व शेतकरी वर्गाचा फायदा होऊ शकेल. याकरिता शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) व सहकारी संस्था यांना स्पर्धात्मक बाजारपेठेच्या युगामध्ये सक्षम बनवणे आवश्यक आहे.

७) सुलभ विक्री साखळीची निर्मिती :-
एक प्रभावी विक्री व्यवस्थेची प्रणाली पर्यायी बाजारपेठेची निर्मिती करू शकते. सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती हा एकच पर्याय शेतीमाल विक्री मध्ये उपलब्ध आहे. शेतकऱ्यांसोबत या ठिकाणी थेट आर्थिक व्यवहार केले जातात. याच बाजार समितीमधून शेतकरी वर्गाला इतर बाजारपेठांशी संपर्क करण्यासाठी कोणतेही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे विपणन व्यवस्था अशी हवी की, ज्यामध्ये शेतीमाल विक्री करिता विविध पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील. अशा व्यवस्थेला भावी विक्री व्यवस्थापन प्रणाली संबोधले जाऊ शकते.

बाजारपेठेची परिणामकारकता :
बाजारपेठ हे असे ठिकाण आहे जेथे सर्व प्रकारच्या उत्पादकांकडून उत्पादनाची आवक होते व विकेत्यांकडून त्याची जावक होते. म्हणजे शेतीमाल आवक जावक व हालचालीचे बाजारपेठ हे एक केंद्र असते. या ठिकाणी वैयक्तिक किंवा संस्थात्मक व्यवहार अयशस्वीपणे किंवा यशस्वीपणे होतात. बाजारपेठेची परिणामकारकता खालील तीन घटकावर अवलंबून असते.
१) बाजारपेठेतील उपलब्ध सुविधा
२) बाजारपेठेतील कामकाजासाठी येणाऱ्या सुविधांचा खर्च
३) बाजारपेठेतील सुविधा व सुविधांचा खर्च याचा बाजारपेठेच्या कामकाजावरील परिणाम.

शेतकरी कंपन्यांनी पर्यायी बाजार व्यवस्था निर्माण केल्यानंतर या बाजारामधील सेवा व खर्च याचा तुलनात्मकदृष्ट्या ताळमेळ घालणे आवश्यक आहे. पर्यायी बाजार व्यवस्थेची परिणामकारकता वाढविण्यासाठी खालील बाबींवर लक्ष देणे गरजेचे आहे.

I. बाजारपेठेतील उपलब्ध सुविधा.
II. बाजारपेठेतील सुविधांकरिता येणार खर्च.
III. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला मिळणारा बाजारभाव.
IV. ग्राहकाला शेतीमाल खरेदी करताना मिळणारा दर.
V. बाजारपेठेचे ठिकाण.
VI. बाजारपेठेशी जोडणी झालेल्या विविध पुरवठा साखळ्या इत्यादी.

संपर्क ः प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०.
(राज्य कृषी व्यवसाय व पणन तज्ज्ञ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com