Crop Management : पाणी साठून राहिलेल्या बागेत करावयाच्या उपाययोजना

संपूर्ण द्राक्ष विभागामध्ये परतीचा पाऊस जास्त प्रमाणात कोसळून गेला. गेल्या काही दिवसांपासून बऱ्यापैकी उघडीप असल्यामुळे काही भागांत फळछाटण्या सुरू झाल्या आहेत.
Crop Management
Crop ManagementAgrowon

डॉ. एस. डी. रामटेके, डॉ. आर. पी. कुलकर्णी, अप्पासो गवळी

संपूर्ण द्राक्ष विभागामध्ये (Grape Department) परतीचा पाऊस (Rainfall) जास्त प्रमाणात कोसळून गेला. गेल्या काही दिवसांपासून बऱ्यापैकी उघडीप असल्यामुळे काही भागांत फळछाटण्या सुरू झाल्या आहेत. आगाप छाटण्या घेतलेल्या शेतकऱ्यांच्या बागा फुलोरा अथवा बेरी सेटिंग अवस्थेत आहेत. अशा सर्व बागांमध्ये पाणी साठलेले दिसत आहे.

बऱ्याच सखल आणि समतल ठिकाणी अद्यापही द्राक्ष बागा पाण्यातच उभ्या असल्याचेही चित्र आहे. विशेषतः कमी निचरा, कमी सेंद्रिय कर्ब व खोलपर्यंत काळी भारी चिकण माती असलेल्या बागांमध्ये पाणी बराच काळ साठून राहते. सामान्यतः उत्तम निचरा असलेल्या बागा पावसानंतर १ ते २ दिवसांत वाफशावर येतात. अशा बागांवर पावसाचे विशेष विपरीत परिणाम दिसणार नाहीत. मात्र ज्या बागांमधून पाण्याचा लवकर निचरा होत नाही, अशा ठिकाणी द्राक्षवेलीवर ताण येऊन विपरीत परिणाम दिसू शकतात.

Crop Management
Cotton Crop Management : शेतकरी पीक नियोजन : कपाशी

अति पावसामुळे वेलीवर होणारे परिणाम :

१. पाणी साठून राहणाऱ्या बागेतील मातीमधील ऑक्सिजनची पातळी घटते किंवा शून्य होते. मातीच्या कणामध्ये पाणी शिरल्यामुळे तिथे असलेली हवा (ऑक्सिजन) बाहेर पडते. मुळांच्या क्षेत्रात हवा खेळती नसल्यामुळे मुळांद्वारे होणारे अन्न ग्रहणाचे कार्य बंद पडते. मुळाचे कार्य अविरत चालू राहण्याकरिता हवेची अत्यंत गरज असते.

२. सध्याच्या परिस्थितीमध्ये पाणी साठलेल्या किंवा पाणथळ जमिनीमध्ये पांढरी मुळे जास्त काळ राहिल्यास मरून जातात. त्यामुळे अन्नग्रहणाच्या काम थांबते. अशाही स्थितीमध्ये द्राक्षवेल तग धरून राहते. पुढे जमीन वाफशावर येताच वेल पुन्हा लगेच कार्यरत होते. त्यामुळे जास्त घाबरण्याची आवश्यकता नसली तरी बाग लवकरात लवकर वाफशावर आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असते.

Crop Management
Crop Insurance : पीकविम्याबाबत पालकमंत्र्यांचे पूर्वीचेच तुणतुणे

३. साठलेल्या पाण्यामुळे बागेतील वातावरणातही आर्द्रता मोठ्या प्रमाणात असते. ढगाळ वातावरण, कमी सूर्यप्रकाश आणि त्यातच मुळांकडून अन्नग्रहणाचे काम सुरू नसल्यामुळे एकूण प्रकाश संश्लेषणावर विपरीत परिणाम होतो. वेलीचे वायू श्‍वसन कमी अथवा बंद होते. बंद झाल्यानंतर अवायू किण्वनची प्रक्रिया सुरू होते. अन्ननिर्मिती ७० ते ९० टक्क्यांपर्यंत घटते.

४. पाणी साठलेल्या बागेतील वेलीच्या पानावरील रंध्रे मुळाकडून मिळालेल्या संकेतामुळे (विशेषतः ॲबसेसिक ॲसिड व सायटोकायनिन यांच्या प्रभावामुळे) बंद होतात.

५. फळछाटणी झालेल्या बागा न फुटणे अथवा फुटी निघून कापसणे, वाढ खुंटणे किंवा फळकाडी व पाने निस्तेज दिसणे अशी लक्षणे दिसतात.

६. डोळे निस्तेज व मृत झाल्याप्रमाणे दिसतात.

७. फळछाटणी न झालेल्या बागांमध्ये पानगळ होऊ शकते. काही द्राक्ष जातीमध्ये वाफसा येताच फेल फूट (वांझ फूट) जोराने वाढू शकते.

८. फुटून आलेल्या आणि फुलोरा व सेंटीग अवस्थेत असलेल्या बागांमध्ये वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

९. तण जास्त असलेल्या बागेमध्ये पाणी साठून राहिल्यास पाण्यासोबत तणाचे बी सर्वदूर पसरण्याची शक्यता असते.

१०. पावसापूर्वी ज्या खतांचा बेसल डोस दिलेला होता. तेथील खते पाण्यासोबत निचरा होऊन गेली असतील. अशा ठिकाणी विविध अन्नद्रव्यांच्या कमतरता वेलीवर दिसू लागतील.

उपाययोजना ः

१. सर्वप्रथम साठलेले पाणी बाहेर जाण्याचे मार्ग खुले करावेत. बागेतील पाणी बाहेर काढावे.

२. निचरा नसलेल्या, पाणथळ अथवा पाझर लागलेल्या जमिनीमध्ये पावसाची उघडीप मिळताच बोदावरील मल्चिंग (असल्यास) हलवावे. मातीमध्ये हवा खेळती राहील, असे नियोजन करावे.

३. आता बऱ्यापैकी उघडीप मिळालेली आहे. अशा स्थितीमध्ये वेलीची मुळे सक्रिय करण्याकरिता बोदावर सिंगल सुपर फॉस्फेट अथवा गंधक ही खते द्यावीत.

४. पावसाचे पाणी व विहीर अथवा बोअरवेलचे पाणी याच्या तापमानात फरक असतो. जमीन वाफशावर येताच ठिबकद्वारे हलके पाणी द्यावे.

५. जैविक कीटकनाशके व बुरशी नाशकाचा वापर ठिबक व फवारणीच्या माध्यमातून करून पीक संरक्षणाकडे लक्ष द्यावे. अशा आर्द्रतायुक्त वातावरणामध्ये जैविक कीडनाशके चांगल्या प्रकारे काम करतात.

६. अनावश्यक रासायनिक फवारण्या टाळाव्यात.

डॉ. एस. डी. रामटेके, ९४२२३१३१६६

(प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com