Poultry : अंडी कवचाची गुणवत्ता टिकविण्यासाठी उपाययोजना

कोंबड्यांचा आहार व्यवस्थित नसणे, आरोग्य समस्या, व्यवस्थापन, पर्यावरण परिस्थिती आणि प्रजनन इत्यादी घटक अंड्याच्या कवच गुणवत्तेसाठी जबाबदार आहेत. कॅल्शिअमचा पुरवठा दरावर अंड्याच्या कवचाची जाडी अवलंबून असते. हे लक्षात घेऊन लेअर कोंबड्यांचे व्यवस्थापन ठेवावे.
Poultry
Poultry Agrowon

डॉ. विजयसिंह लोणकर, डॉ. अविनाश कदम

संकरित कोंबडीच्या अंडी (Chicken Egg Shell) कवचामध्ये साधारणतः २.२ ग्रॅम कॅल्शिअम (Calcium) असते. हे कॅल्शिअम कार्बोनेटच्या स्वरूपात असते. अंड्याचे कवच (Egg Shell) हे ५ ते ७ ग्रॅम वजनाचे असते. अंड्याचे कवच हे अंड्याच्या एकूण वजनाच्या ११ टक्के असते. सरासरी अंड्याच्या कवचामध्ये ९४ ते ९७ टक्के कॅल्शिअम कार्बोनेट, ०.३ टक्का फॉस्फरस आणि ०.३ टक्का मॅग्नेशिअम आणि अगदी कमी प्रमाणात सोडिअम, पोटॅशिअम, झिंक, मॅग्नेशिअम, लोह आणि तांबे समाविष्ट असते. मोठ्या आकाराची अंडी सहसा लहान अंड्यापेक्षा जास्त सहजपणे फुटतात. याचे मुख्य कारण म्हणजे जनुकीयदृष्ट्या लेअर कोंबडी केवळ मर्यादित प्रमाणात खाद्यातील कॅल्शिअम पचनादरम्यान शरीरामध्ये शोषून घेते. त्यातील काही प्रमाणात अंड्याचे कवच बनवण्यासाठी वापरले जाते.

कवचाचे कार्ये :

१. आतील घटकांचे संरक्षण करणे.

२. आतील भागांमध्ये सूक्ष्म रोग, जिवाणू आणि विषाणू यांचा शिरकाव रोखणे.

३. कवचाला असलेल्या सूक्ष्म छिद्रामधून अंड्यामध्ये निर्माण होणाऱ्या भ्रूणासाठी ऑक्सिजनचा पुरवठा आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकण्याचे कार्य.

Poultry
Poultry Management : ब्रॉयलर कोंबड्यांच्या पिलांची निवड कशी करावी ?

कवच समस्या :

१) अंडी कवचाच्या सामान्य कार्यक्षम गुणवत्तेवर असंख्य घटक परिणाम करतात. हे घटक कोंबडीने अंडी घालण्यापूर्वी कवचाच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये अंडी कवचाची गुणवत्ता म्हणजे जाड कवच आणि अधिक ताकदीचे कवच होय.

२) अंड्याचे कवच हे गर्भाशयामध्ये १८ तासांत तयार होते. त्यासोबतच रक्तातून गर्भाशयात कॅल्शिअम पुरवठा सतत होणे गरजेचे असते. म्हणून कोंबडीच्या दैनंदिन आहारात कॅल्शिअमची मात्रा योग्य प्रमाणात (३.५ ते ४.२ टक्के) ठेवणे गरजेचे असते.

३) अंडे तयार होत असताना ते गर्भाशयात (युटेरस) किती वेळ खर्च करते. कवचाच्या निर्मिती दरम्यान कॅल्शिअमचा पुरवठा करण्याचा दर यावर अंड्याच्या कवचाची जाडी अवलंबून असते. गर्भाशयात अंडे कमी कालावधीसाठी राहत असेल तर कवचाची जाडी कमी असू शकते.

४) अंडी घालण्याच्या वेळेवर कवचाची जाडी अवलंबून असते. सर्वसाधारणपणे दिवसाच्या सुरुवातीच्या कालावधी दरम्यान कवच जाड असते. कॅल्शिअमचे प्रमाण किंवा कवचावर कॅल्शिअम जाण्याचा दर देखील कवचाच्या जाडीवर परिणाम करते.

Poultry
Poultry : लेअर पोल्ट्रीला साथ देशी गोसंगोपनाची

कवच गुणवत्ता घसरण्याची कारणे ः

व्यवस्थापनातील त्रुटी ः

१) कवचावरील सूक्ष्म क्रॅक ही गर्भाशयात अंडे तयार होण्याच्या प्रक्रियेदरम्यान येणारा व्यत्यय हा कोंबडीवर आलेल्या ताणतणावांमुळे होतो. अंडी कवच तयार होण्याची प्रक्रिया रात्रीच्या कालावधीत चालू असते त्यामुळे कोंबडीवर रात्रीच्या वेळी कोणताही ताणतणाव (कोंबडी अचानक घाबरणे) येणार नाही याची खबरदारी घ्यावी. स्टार क्रॅक हे उघड्या डोळ्यांनी दिसतात. त्यामुळे असा क्रॅक निर्माण होतो सदर अंडी बाजारामध्ये विकली जाऊ शकत नाहीत किंवा ते कमीत कमी किमतीला विकले जाते.

२) अंडी फुटू नये यासाठी पिंजऱ्याला असणाऱ्या अंडी गोळा करण्यासाठीचा उतारानजीक नायलॉनची दोरी किंवा रबर मॅट यांचा वापर केल्यास अंडी फुटण्याचे प्रमाण कमी करता येऊ शकते.

३) अंड्यावरील छोटे किंवा मोठे छिद्र हे त्यांनी स्वतःची चोच मारून किंवा पायाची नखे मारल्यामुळे होते. अशी अंडीसुद्धा बाजारामध्ये विकली जात नाहीत.

४) कोंबडीच्या विष्ठेमुळे किंवा शेडमधील माश्यांच्या प्रादुर्भावामुळे (माश्यांनी अंड्याच्या कवच्यावर अंडी घातल्यामुळे डाग दिसतात) किंवा अंडे तयार होत असताना कवचाला काही कारणास्तव लागलेल्या रक्तामुळे अंड्याचे कवच घाण होते. त्यामुळे देखील अशा अंड्याची विक्री होत नाही.

निकृष्ट पोषण ः

१) अंड्याच्या कवचाची गुणवत्ता राखण्यात कोंबडीचे पोषण मोठी भूमिका बजावते. केवळ पोषणच नव्हे तर अंड्याच्या वयोमानानुसार होणारे बदल, पिण्याच्या पाण्यातील क्षारांचे प्रमाण, कोंबड्यांचे विविध आजार उदाहरणार्थ संसर्गजन्य ब्रोंकाइटिस, मानमोडी रोग तसेच पर्यावरणीय तापमान इत्यादी अंड्याच्या कवचाच्या गुणवत्तेमध्ये प्रमुख भूमिका बजावतात. या सर्व घटकांचा विचार करूनच आहारतज्ञ खाद्य तयार करत असतात.

२) अंड्याच्या कवच गुणवत्तेत अखंडता राखण्यात जीवनसत्त्व-ड, कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅंगेनिज, तांबे आणि झिंक यांचा मोठा वाटा आहे. यापैकी कोणत्याही एका पोषक तत्त्वाच्या असमतोलामुळे कवच गुणवत्तेशी संबंधित समस्या उद्‌भवू शकते. उदाहरणार्थ, फॉस्फरस, क्लोरिन कमतरतेमुळे किंवा मायकोटॉक्सिन दूषिततेमुळे जास्त किंवा कमी कॅल्शिअम आणि जीवनसत्त्व-डच्या उपलब्धतेवर परिणाम होतो.

पर्यावरण ः

१) अंडी कवच गुणवत्ता उन्हाळ्यामध्ये जितकी समस्या आहे तितकी थंड वातावरणात नाही. उन्हाळ्यामध्ये अंड्याच्या कवचाच्या गुणवत्तेवर परिणाम करणारा घटक म्हणजे या काळात कोंबड्या पुरेसा आहार सेवन करत नाहीत. जेव्हा पर्यावरणीय तापमान अवाजवी वाढते तेव्हा आहाराचे सेवन कमी होते आणि ऊर्जा हा कोंबडीसाठी पहिला मर्यादित घटक बनते. परिणामी अमिनो आम्ल, कॅल्शिअम, फॉस्फरस आणि इतर तत्त्वांचे अपुरे सेवन सहसा आहारातील पोषक तत्त्वांची घनता समायोजित करून दुरुस्त करता येते.

२) अंड्यावरील कोंबड्यांमध्ये उष्णतेच्या तणावाचे मुख्य परिणाम म्हणजे आहार सेवन कमी होणे, आतड्यातील रक्तप्रवाह कमी होणे, रक्तातील आयोनाइज्ड कॅल्शिअमची पातळी कमी होणे, कार्बन डायऑक्साइडचा दाब अंशतः कमी होणे, गोण्याडोट्रॉपिन संप्रेरकांच्या (हायपोथेल्यामिक संप्रेरके) कार्यामध्ये हस्तक्षेप होणे हे होय. हायपोथेल्यामिक संप्रेरके लुटीनाइझिंग संप्रेरकाचे निअमन करते आणि हेच लुटीनाइझिंग संप्रेरक अंडी निर्मितीसाठी महत्त्वाचे कार्य बजावते.

३) उष्णतेच्या तणावात अंडी कवचाची जाडी लक्षणीयरीत्या कमी होते. ॲसिडबेस असमतोलामुळे कॅल्शिअम, फॉस्फरसची कमतरता कमी होते.

४) जास्त तापमानाच्या वातावरणीय उष्णतेमुळे कोंबड्या धापा टाकतात. धाप लागल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण जास्त प्रमाणात कमी होते. (श्‍वसन क्षारता) परिणामी, ॲसिडबेस असमतोल होतो. रक्ताचा अल्कलोसिस होतो. या ॲसिडबेस असमतोलामुळे शरीरातील कॅल्शिअम, फॉस्फरस वाया जाते किंवा कमी पडते.

५) ज्या वेळेस वातावरणातील तापमान २० ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते, त्या वेळेस अंड्याचे वजन प्रति १ अंश सेल्सिअससाठी सुमारे ०.४ टक्का कमी होते. वातावरणीय तापमान २७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर अंड्याच्या वजनामध्ये प्रति १ अंश सेल्सिअस तापमान वाढीसाठी ०.८ टक्क्याने कमी होते. सामान्यत: वातावरणीय तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गेल्यावर अंडी उत्पादन दरावर परिणाम होतो.

कोंबडीचे वाढते वय ः

१) लवकर अंडी उत्पादनास सुरवात किंवा वृद्ध वय (६० आठवड्यांपेक्षा जास्त वय) याचा कॅल्शिअमच्या कमतरतेशी संबंधित आहे. साधारणतः वयाच्या ४० ते ४५ आठवड्यांनंतर कोंबडीची खनिज शोषण क्षमतेत ४० ते ५० टक्के घट होते. त्यामुळे अंडी कवच समस्या निर्माण होते.

२) वाढत्या वयाबरोबरच अंड्याचा आकारसुद्धा वाढतो. परिणामी, कवच जाडी कमी होऊन गुणवत्तेवर परिणाम होतो. हे लक्षात घेता वाढत्या वयामध्ये कॅल्शिअम, झिंक आणि जीवनसत्त्व-ड खाद्यातून देणे अतिशय गरजेचे असते.

पिण्याच्या पाण्यातील सोडिअम क्लोराइड :

१) कवच निर्मितीत पिण्याच्या पाणी गुणवत्तेची मोठी भूमिका आहे. अंड्यावरील कोंबडीला लागणाऱ्या पिण्याच्या पाण्यातील सोडिअम क्लोराइडची पातळी २५० पीपीएम दरम्यान असायला पाहिजे.

२) पाण्यामधून मीठ सेवन किंवा एखाद्यामधून मीठ सेवन वाढल्याने अंड्याच्या कवचाची जाडी परिणामी कॅल्शिअम पोषण कमी झाल्यामुळे होऊ शकते.

३) खाद्यातून दिल्या जाणाऱ्या सोडिअम क्लोराइडपेक्षा पाण्यातून सोडिअम क्लोराइड दिल्यामुळे अंडी कवच गुणवत्ता गतीने कमी होते. रक्तातील कॅल्शिअम, फॉस्फरस वाढवते.

कवच प्रतीवर परिणाम करणारे आजार ः

१) कोंबड्यांवर परिणाम करणाऱ्या सर्व आजारांमुळे अंड्याच्या कवच प्रतीमध्ये घट होऊ शकत नाही. मात्र अंडी उत्पादनात घट होते. उदाहरणार्थ शोषणाचा आजार.

२) संसर्गजन्य लारेनजिओ ट्रॅकायटीस (आयएलटी) आजारामुळे अंड्याच्या गुणवत्तेत घट न होता उत्पादनात घट होते. इतर सामान्य विषाणूजन्य आजार जसे की एक ड्रॉप सिन्ड्रोम, एव्हीयन इन्फ्लुएंझा, मानमोडी आणि संसर्गजन्य ब्रोंकाइटिस (आयबी) हे अंड्याच्या बाह्य आणि अंतर्गत गुणवत्तेवर गंभीर परिणाम करतात.

खाद्यातून कॅल्शिअमचा पुरवठा ः

१) कोंबड्यांच्या दैनंदिन आहारात कॅल्शिअमची मात्रा योग्य प्रमाणात (३.५ ते ४.२ टक्के) ठेवावी. वाढत्या वयांमध्ये कोंबड्यांना कॅल्शिअम, झिंक आणि जीवनसत्त्व ड खाद्यातून द्यावे.

२) कोंबडी खाद्यामध्ये वापरले जाणारे कॅल्शिअम हे शिंपल्यांचा चुरा, मार्बल चिप्स, डाय कॅल्शिअम फॉस्फेट, लाइम स्टोन पावडर या माध्अमातून दिले जाते. यातील शिंपल्यांचा चुरा, मार्बल चिप्स हे दोन कॅल्शिअम स्रोत जाड्या भरड्या स्वरूपात दिले जातात. इतर स्रोत पावडर स्वरूपात दिले जातात.

३) खाद्यामधून कॅल्शिअम देताना ते जाड्याभरड्या स्वरूपात आणि पावडर स्वरूपात देणे गरजेचे असते. कारण ज्या वेळेस आपण पूर्णपणे कॅल्शिअम स्रोत पावडर स्वरूपात वापरतो अशावेळेस अंडी कवच तयार होत असताना कॅल्शिअमची कमतरता भासू शकते परंतु आपण कॅल्शिअम जाड्याभरड्या स्वरूपात दिल्यास ती कॅल्शिअमची कमतरता भरून निघू शकते.

४) ज्या वेळेस आपण जाड्याभरड्या स्वरूपात कॅल्शिअम पुरवठा करतो त्या वेळेस असे कॅल्शिअमचे जाडेभरडे कण पचन संस्थेतील मांजा (gizzard) या भागामध्ये जास्त काळ राहतात आणि त्यामधून हळूहळू कॅल्शिअम उपलब्ध होऊन त्याचा पुरवठा रात्रीच्या वेळी खाद्य उपलब्ध नसताना अंड्याच्या कवच्यावर ते जमा करण्यास मदत होते. पावडर स्वरूपातील कॅल्शिअम कोंबड्यांना त्वरित उपलब्ध होते. खाद्यामध्ये कॅल्शिअमचा स्रोत वापरताना साधारणपणे ६० टक्के जाड्याभरड्या स्वरूपाचा स्रोत वापरावा. ४० टक्के पावडर स्वरूपाचा कॅल्शिअम स्रोत वापरल्यास अंड्याच्या कवचाची प्रत ही उत्तम राहाते.

५) कोंबडीच्या गर्भाशयामध्ये अंड्याचे कवच हे रात्रीच्या कालावधीमध्ये निर्माण होते. परंतु अंड्याच्या कवचाची प्रत सुधारण्यासाठी खाद्यातून दिले जाणारे कॅल्शिअम कोंबड्यांना उपलब्ध होत नाही कारण रात्री खाद्य दिले जात नाही. म्हणून अंड्याच्या कवचाची प्रत सुधारणे किंवा अंड्याचे कवच मजबूत करण्यासाठी गर्भाशयामध्ये रात्रीच्या वेळी कॅल्शिअमची उपलब्धता वाढविण्यासाठी कोंबड्यांना साधारणपणे सायंकाळी चार ते पाच यादरम्यान प्रति कोंबडी तीन ते चार ग्रॅम याप्रमाणे खाद्यावर शिंपल्यांचा चुरा किंवा मार्बल चिप्स देणे गरजेचे असते.

६) नवीन संशोधनानुसार असे दिसून आले आहे, की लेअर कोंबडीस दोन ते तीन आठवडे अंडी घालण्याच्या कालावधीपूर्वी म्हणजेच सोळा ते अठरा आठवडे वयामध्ये त्यांच्या खाद्यामध्ये साधारणपणे २ ते २.५ टक्के कॅल्शिअम मात्रा दिल्यास सुरुवातीच्या कालावधीत उत्पादित होणाऱ्या अंड्याची कवच गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

-------------------------------------------------

संपर्क ः डॉ. विजयसिंह लोणकर, ७८७५५७०३९२

(सहायक प्राध्यापक, कुक्कुटपालनशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com