Agri Mobile App : शेतकऱ्यांसाठी उपयुक्त मोबाईल ॲप्स मोफत आहेत का?

शेतकऱ्यांच्या गरजेनुसार त्याच्या हातांच्या बोटावर माहितीची उपलब्धता ही मोबाईलच्या माध्यमातून करणे शक्य आहे. त्यासाठी मोबाईलमधील विविध ॲप्लिकेशन्सची (ॲप्स) माहिती या लेखातून घेऊ.
Useful Agri Mobile App
Useful Agri Mobile App Agrowon

डॉ. प्रणाली नामदेव ठाकरे, अनिल कुमार सिंग, डॉ. विलास जाधव

कृषी विस्ताराच्या कार्यक्रमामध्ये आजवर माहितीपत्रके, घडीपत्रिका, पुस्तके, दूरदर्शन आणि रेडिओ अशा विविध पर्यायाचा वापर केला जात आहे.

मात्र शेतकऱ्यांच्या गरजेनुसार त्याच्या हातांच्या बोटावर माहितीची उपलब्धता ही मोबाईलच्या (Mobile) माध्यमातून करणे शक्य आहे.

त्यासाठी मोबाईलमधील विविध ॲप्लिकेशन्सची (ॲप्स) (Mobile App.) माहिती या लेखातून घेऊ.

आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे आहे. कृषी व कृषिपूरक क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या निर्णय घेत असताना त्यासंबंधित योग्य ती माहिती वेळेवर उपलब्ध होणे अत्यावश्यक असते.

त्यामुळे प्रत्येक निर्णयामध्ये अचूकता येऊ शकते. प्रगतिशील शेतकऱ्यांना सुधारित लागवड तंत्रज्ञान, पिकांचे नवीन व वैशिष्ट्यपूर्ण वाण, शेतीमालाचे बाजारभाव, हवामानाचे अंदाज, पीक संरक्षण यासोबत कृषिपूरक उद्योगामध्ये पशूंच्या जाती,

दर्जेदार कृषी साधने व अन्य माहिती किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता भासते. त्यासाठी त्यांच्या हातात संपर्कासाठी असलेला मोबाईल अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावू शकतो.

आज प्रत्येकाच्या हातातील मोबाईल हा अत्यंत स्मार्ट होत चालला आहे.

Useful Agri Mobile App
Mobile Addiction : किशोरवयीन मुलांना मोबाईल वापराची बंदी

सोबतच इंटरनेटचे जाळेही तुलनेने स्वस्त झाले असून, अगदी ग्रामीण भागापर्यंत पोहोचू लागले आहे. शेतीविषयक सल्ले मोबाईलच्या माध्यमातून देण्यासाठी कृषी क्षेत्राशी संबंधित नवनवीन मोबाईल ॲप्स विकसित करण्यात येत आहेत.

शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाईल आणि इंटरनेट सुविधा असली पाहिजे. याच्या साह्याने शेतकऱ्यांना कोणतेही पीक, भाजीपाला, फळबाग यांच्या लागवडीपासून काढणीपर्यंतची सर्व शास्त्रीय माहिती उपलब्ध होत आहे.

यातील बहुतांश ॲप हे शासनाचे, कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले असल्यामुळे मोफत आहेत. त्यामुळे एक पैसाही खर्च न करता कंपनीनुसार वेगवेगळ्या ॲप स्टोअरमधून डाउनलोड करता येतात.

उदा. अँड्रॉइड मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर. त्यामध्ये स्थानिक, प्रादेशिक भाषेमध्ये माहिती दिलेली असते.

१. किसान सुविधा (Kisan Suvidha)
http://mkisan.gov.in/downloadmobileapps.aspx
२०१६ मध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार याद्वारे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि गावांच्या विकासासाठी हे मोबाईल ॲप विकसित केले आहे.

त्याद्वारे शेतकऱ्यांना सध्याचे आणि पुढील ५ दिवसांचे हवामान अंदाज, जवळच्या शहरातील शेतमाल/पिकांचे बाजारभाव, खते, बियाणे, यंत्रसामग्री, विक्रेते, वनस्पती संरक्षण, एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती, तज्ज्ञ सल्लागार, माती आरोग्यपत्रिका, गोदामे आणि शीतगृह इ.

बद्दल माहिती दिली जाते. ही माहिती इंग्रजी, हिंदी, तमीळ, गुजराती, ओडिशी आणि मराठी भाषेत उपलब्ध आहे.

२. पुसा कृषी (Pusa Krishi)
http://mkisan.gov.in/mApp/Pusa-Krishi.apk
भारतीय कृषी संशोधन संस्थेने (IARI) विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती देण्याच्या उद्देशाने केंद्रीय कृषिमंत्र्यांनी २०१६ मध्ये हे ॲप प्रक्षेपित केले.

त्यात भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) विकसित केलेल्या पिकांचे नवीन वाण, संबंधित माहिती, संसाधन-संवर्धन पद्धती आणि कृषी यंत्रे यांची माहिती उपलब्ध केली आहे.

Useful Agri Mobile App
Agri Tourism : कृषी पर्यटनामुळे मालाच्या विक्रीसह रोजगाराला चालना

३. क्रॉप इन्शूरन्स (Crop insurance)
http://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने पीक विम्यासंदर्भात माहिती उपलब्ध करण्यासाठी हे ॲप प्रसारित केले आहे.

त्याद्वारे क्षेत्र, कव्हरेज रक्कम आणि कर्जाच्या रकमेवर आधारित अधिसूचित पिकांसाठी विम्याचा हप्ता मोजता येतो.

कोणत्याही अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकाची सामान्य विमा रक्कम, विस्तारित विम्याची रक्कम, प्रीमिअम तपशील आणि अनुदानाची माहिती मिळवता येते.

४. शेतकरी मासिक (Shetkari Masik)
https://mkisan.gov.in/downloadmobileapps.aspx
कृषी विभाग, महाराष्ट्र शासनाद्वारे १९६५ पासून शेतकरी मासिक प्रकाशित होत आहे. या अँड्रॉइड ॲपचा इंटरफेस सोपा आहे.

त्यात अंकांची नोंदणी आणि डाउनलोड करण्यासाठी मोबाईल इंटरनेट किंवा वाय-फाय कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे.

एकदा डाउनलोड केल्यानंतर, मासिक इंटरनेट कनेक्टिव्हिटीशिवाय वाचता येते. यात नवीन पीक तंत्रज्ञान, कीड आणि रोग व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, शेती पद्धती, सिंचन पद्धती इत्यादी विविध विषयांचा समावेश आहे.

५. ईनाम (eNAM)
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.enam&hl=en
भारत सरकारने प्रसारित केलेले संपूर्ण भारतातील इलेक्ट्रॉनिक व्यापार पोर्टल आहे.

त्याद्वारे सध्याच्या बाजार समिती किंवा मंडई यांच्या ऐवजी एकीकृत राष्ट्रीय बाजारपेठ तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यावर व्यापारी देशभरातून कोठूनही शेतीमालासाठी बोली लावू शकतो. शेतकरी आणि इतर भागधारकांना त्यांच्या स्मार्ट फोनवर आवक आणि किमती समजू शकतात.

६. ॲग्रीमार्केट (AgriMarket)
http://agmarknet.gov.in/downloadmobileapps.aspx
मोबाईलपासून ५० कि.मी. अंतरातील सर्व बाजारपेठेमध्ये शेतीमालाच्या किमती, बाजारभाव नेमका किती आहे, याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने ॲप विकसित केले आहे. यात जीपीएस यंत्रणा वापरली जाते.

ती वापरायची नसल्यास बाजारपेठेचे नाव व पीक टाकल्यास माहिती उपलब्ध होऊ शकते. हे ॲप हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे.

७. पशू पोषण (Pashu Poshan)
https://play.google.com/store/apps/details?id=coop.nddb.pashu_poshan&hl=en
आनंद (गुजरात) येथील राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (NDDB) यांनी विकसित केलेल्या या ॲपद्वारे जनावरांचे संतुलित पोषण करण्यासंदर्भात माहिती मिळते.

त्यात गाय किंवा म्हैस यांचे वय, दुग्धोत्पादन, दुधातील फॅट आणि आहार व्यवस्था इ. माहिती भरल्यास किमान खर्चामध्ये संतुलित खाद्य व्यवस्थापन करण्यासंदर्भात माहिती उपलब्ध होते. उदा. खाद्य व चारा यांचे योग्य प्रमाण व मिश्रण इ.

८. mKRISHI फिशरीज (mKRISHI Fisheries)
https://play.google.com/store/apps/details?id=com.tcs.fish.mkrishi&hl=en
मुंबई येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) इनोव्हेशन लॅब, सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट आणि हैदराबाद येथील इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस (INCOIS) यांनी एकमेकांच्या सहकार्याने हे ॲप विकसित केले आहे.

मच्छीमार लोक या ॲपद्वारे त्यांच्या मासेमारीसाठी समुद्रातील प्रवासाची योजना आखू शकतात. परिसरातील संभाव्य मासेमारी क्षेत्र (पोटेंशियल फिशिंग झोन) लक्षात आल्यामुळे अनावश्यक फेऱ्या, डिझेल, बर्फ आणि मजुरांचा खर्च कमी होऊ शकतो. ही सेवा फक्त नोंदणीकृत वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

९. दामिनी (Damini:Lightning Alert)
https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini&hl=en_IN&gl=US
भारत सरकारच्या पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाने विकसित केलेले दामिनी हे मोबाईल ॲप पावसाळ्यात विजा कोसळून जीवितहानीच्या घटना टाळण्यासाठी उपयुक्त ठरते.

वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि वीज कोसळण्याचा अंदाज व पूर्वसूचना मि‌ळते. तसेच ४० कि.मी. परिघातील वीज पडण्याचे संभाव्य स्थान ऑडिओ संदेश किंवा एसएमएसद्वारे दिले जाते.

त्यासाठी पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या संस्थेने देशातील एकूण ४८ सेन्सरच्या मदतीने एक लाइटनिंग लोकेशन नेटवर्क तयार केले आहे.

ॲपद्वारे ०-५, ५-१० आणि १० ते १५ मिनिटांत कोठे-कोठे वीज चमकणार आहे याची स्थितीही समजू शकते.

Useful Agri Mobile App
Phule Baliraja App : विद्यापीठाचे फुले बळीराजा ॲप देणार शेतकऱ्यांना सल्ला

१०. किसान सारथी पोर्टल

भारत सरकारने शेतकऱ्यांनी त्यांच्या स्थानिक भाषेमध्ये शेतीविषयक माहिती योग्य वेळी पोहोचवण्यासाठी किसान सारथी पोर्टल सुरू केले आहे.

त्या त्या जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र या पोर्टलद्वारे कृषिविषयक सल्ला देण्याचे काम करते. किसान सारथीचा लाभ घेण्यासाठी संबंधित कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांनी प्राथमिक माहितीसह नोंदणी करावी लागते.

प्राथमिक माहितीमध्ये शेतकऱ्याचे नाव, वय, मोबाईल नंबर, लिंग, पत्ता, शिक्षण, प्रवर्ग, व्यवसाय, भाषा, शेतीची संक्षिप्त माहिती (जमिनीचा तपशील, पीक पद्धत, पशुधन इ.) यांचा समावेश आहे.

एकदा नोंदणी झाल्यानंतर नोंदणीकृत टोल फ्री क्रमांकावर (१८०० १२३ २१७५/१४४२६) संपर्क केल्यास कृषी आणि कृषिपूरक विषयातील तज्ज्ञांकडून सल्ला मिळू शकतो.

डॉ. प्रणाली नामदेव ठाकरे, ९६३७१६७७०७
पीएचडी (कृषी विस्तार), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
अनिल कुमार सिंग, (कार्यक्रम सहायक -संगणक), ८४३७७९०४०३
डॉ. विलास म. जाधव, (प्रमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ), ८५५२८८२७१२
कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हील, पालघर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com