मॉन्सून केरळात दाखल

केरळचा बहुतांशी भाग, तमिळनाडूच्या दक्षिण भाग मॉन्सूनने व्यापला
मॉन्सून केरळात दाखल
Monsoon In KeralaAgrowon

पुणे : संपूर्ण देशासाठी वरदान ठरलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) यंदा तीन दिवस आधीच देवभूमी केरळमध्ये आगमन झाले आहे. रविवारी (ता. २९) केरळचा बहुतांशी भाग, तमिळनाडूच्या दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता साधारणत: मॉन्सून १ जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचतो. यंदा मॉन्सून २७ मेपर्यंत केरळमध्ये येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. यात चार दिवसांची तफावत गृहीत धरण्यात आली होती. त्यानुसार तीन दिवस आधीच मॉन्सून दाखल झाला असून, गतवर्षी मॉन्सूनचे आगमन दोन दिवस उशिराने (३ जून) झाले होते.

समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत पश्‍चिमेकडून वाहणारे वारे, अग्नेय अरबी समुद्रात वाढलेले पश्‍चिमी वाऱ्यांचे प्रवाह, अरबी समुद्र आणि केरळमधील ढगांचे अच्छादन, समुद्र आणि भूभागावरून परावर्तित होणारा किरणोत्सर्ग, गेल्या २४ तासांमध्ये १४ पैकी १० केंद्रांवर २.५ मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने केरळात मॉन्सून दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

रविवारी (ता. २९) दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, लक्षद्वीप बेटे, केरळचा बहुतांशी भाग, तमिळनाडूचा दक्षिण भाग, मन्नारचे आखात आणि नैऋत्य बंगालच्या उपसागाच्या आणखी काही भागात मॉन्सूनचे प्रगती केली आहे. कर्नुल, पलक्कडपर्यंतच्या भागात मॉन्सून दाखल झाला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत संपूर्ण केरळ व्यापून, मध्य अरबी समुद्र, कर्नाटकच्या काही भागांसह, तमिळनाडूनचा आणखी काही भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागासह ईशान्येकडील राज्यात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) १४ एप्रिल रोजी जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. मॉन्सून हंगामात ला-निना स्थिती राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. लवकरच हवामान विभागाकडून मॉन्सून हंगामाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज व विभागनिहाय पावसाचे वितरण स्पष्ट करण्यात येईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com