सेंद्रिय शेतीतील माझे अनुभव...

जमिनीत अन्नद्रव्यांचा स्थिर साठा, उपलब्ध साठा याचा अर्थ शेतीमधील विविध प्रयोगांतून मला समजू लागला आहे. मी काही वर्षांपूर्वी ३० ते ३५ टक्के क्षेत्रावर सेंद्रिय शेतीचे प्रयोग केले. आजच्या लेखात मला सेंद्रिय शेतीमध्ये आलेले अनुभव अभ्यासासाठी आपणासमोर मांडत आहे.
सेंद्रिय शेतीतील माझे अनुभव...
Organic FarmingAgrowon

सेंद्रिय शेती करा असा नारा सर्वत्र चालू आहे. केंद्र सरकारच्या सर्व योजनांचे बळ सेंद्रिय शेती मागे उभे करण्याचा प्रयत्न चालू आहे. सेंद्रिय शेतीतून शाश्‍वत शेती होत असेल, शेतकरी आत्मनिर्भर, आर्थिक सक्षम होत असेल तर ते कोणाला नकोय? ते व्यवहारात उतरविणे इतके सोपे नाही. मी काही वर्षांपूर्वी ३० ते ३५ टक्के क्षेत्रावर सेंद्रिय शेतीचे प्रयोग केले. मला आलेले अनुभव मी आपणासमोर ठेवणार आहे. १९९०-९२ च्या सुमारास सेंद्रिय शेतीचे वारे वाहू लागले. उत्पादन कमी मिळाले तरी चालेल परंतु खतांवरील खर्च वाचत असेल तर उत्तम. त्या काळात असे भासविले जात होते की एकदाच एकरी २ टन गांडूळ खत मिसळले, की तुमच्या जमिनीत सर्वत्र गांडुळे तयार होतील. त्यानंतर पीक पोषणाचे सर्व काम तीच करतील. तुम्हाला काहीच करावे लागणार नाही. मी दोन टन गांडूळ खत विकत आणून प्रयोगाला सुरुवात केली. पहिल्या वर्षी त्या रानात एकरी ४० टन उत्पादन मिळाले. उत्साह वाढला आणि क्षेत्र आणखी वाढविले. दुसऱ्या वर्षी उत्पादन २० ते २५ टनांवर आल्याने सर्व आर्थिक गणित कोसळले. सेंद्रिय शेतीतील ऊस ज्वारीच्या धाटाप्रमाणे झाला. त्याला गरजेइतके फुटवे आले नाहीत. पाने अरुंद व कमी लांबीची असल्याने दोन ओळींतील मधली जागा झाकली गेली नाही. पावसाळ्यात तेथे प्रचंड तण माजले. ते काढणे जमले नाही. तण अतिशय कमी असणारी माझी जमीन तणांचे कायमचे आगार बनली. पुढील वर्षी उसाची नवीन लावण करण्यासाठी घरचे बेणे जे जाडीला एकदम बारीक होते तेच वापरावे लागले. बाहेरून चांगले बेणे घेणे आर्थिक टंचाईमुळे शक्य नव्हते. त्या लहान बेण्यातून पुढील ऊस लहानच निपजला. त्याने पुढे दोन वर्षे साथ दिली. अशा प्रकारे दोन वर्षे अंशतः शेती करून झालेले नुकसान भरून काढण्यात पुढे अनेक वर्षे गेली. मी एकूण उत्पादन व आर्थिक उलाढाल याचा अंदाज घेऊन दोन वर्षांत हा प्रकार सोडून दिला.

अनुभवाचे बोल...

यातून आणखी एक धडा शिकायला मिळाला तो मुद्दाम वाचकांपुढे आणणे गरजेचे आहे. ज्या रानात सेंद्रिय शेती केली होती तेथे आता परत रासायनिक खतांचा वापर सुरू केला आहे. पहिल्या पिकाला शिफारशी इतका रासायनिक खताचा हप्ता दिला. त्यातून उसाची वाढ नगण्य झाली. नेमके टाकलेले खत कोठे गेले काही कळेना. नंतर लक्षात आले की एक वर्ष खत न टाकता शेती केल्याने पिकाने जमिनीतील शिलकी साठ्याचा वापर करून बऱ्यापैकी उत्पादन दिले. पुढील वर्षी टाकलेले हप्ते या रिकाम्या जागा भरण्यातच गेले. त्याच्या पुढील वर्षी हप्ता ५० ते ६० टक्के वाढवून दिल्यानंतर उत्पादन मूळ पदावर येऊ लागले. स्थिर साठा, उपलब्ध साठा वगैरेचा अर्थ या अपघाताने शिकता आला. केलेल्या प्रयोगाने आर्थिक नुकसानीची साथ अनेक वर्षे दिली. अशा आर्थिक चटक्यातून जे शिक्षण मिळते तेच खरे शिक्षण. शिक्षण फुकट मिळत नसते. त्यासाठी जबर किंमत मोजावी लागले. मागच्यास ठेच पुढचा शहाणा या नियमाप्रमाणे आपल्याला आलेले अपयश काहीही न झाकून ठेवता जनतेपुढे मांडत राहिलो. तरीही प्रतिवर्षी अनेक जण इकडे वळतात आणि अनेक जण अंग काढून घेतात हा प्रकार चालूच राहतो.

आरोग्य नेमके कशामुळे?

सेंद्रिय शेती नेमकी कशासाठी करायची? तर रसायनांचा अजिबात वापर न करता केलेल्या शेतीतून मिळालेले उत्पादन आरोग्यदायी असते. त्याची चव चांगली असते. त्यात सर्व पोषणमूल्ये चांगली असतात वगैरे वगैरे. असे अन्न खाऊन आरोग्य मिळेल का? यावर एकात्मिक चिंतन केल्यास असे दिसते, की आरोग्यावर अनेक घटक काम करीत असतात. अशा अनेक घटकांपैकी तुम्ही काय खाता हा एक महत्त्वाचा विषय आहे. आरोग्य फक्त काय खाता यातून मिळाले असते तर ती बाजारातून विकत आणण्याची गोष्ट झाली असती. आरोग्य बाजारातून विकत आणता येत नाही, अगर मिळतही नाही. आरोग्य ही कष्ट साध्य गोष्ट आहे आणि ती प्रयत्नपूर्वक प्राप्त करावी लागते. आरोग्य बाजारात मिळत असल्यास ज्याच्या जवळ पैसे आहेत तो आरोग्यदायी झाला असता. ज्यांच्या जवळ पैसे नाहीत त्यांना आरोग्य भेटले नसते. वास्तवात काय आहे? जे दिवसभर भरपूर कष्ट करतात त्यांच्याजवळ जास्त आरोग्य आहे आणि टेबल खुर्चीवर दिवसभर बसून काम करणाऱ्यांकडे ते कमी आहे.

आरोग्यावर अनेक गोष्टींचा प्रभाव असतो. त्यामध्ये तुम्ही कोणत्या वातावरणात वावरता, पाणी कोणते पिता, तुमच्या घरातील वातावरण कसे आहे? तुमचे व पत्नीचे, भाऊ, बहीण, आई, वडील यांचे संबंध कसे आहेत, नोकरी- धंद्यात ताणतणाव किती आहे? असे काही वेगळे मुद्दे आहेत. माणसांची बदललेली जीवनशैली तर आरोग्यावर खूप परिणाम करते. यांत्रिकीकरणानंतर माणसाच्या स्नायूंच्या ताकदीवर जी कामे पूर्वी होत होती त्या प्रत्येक कामाला आता यंत्राचा पर्याय उपलब्ध झाला. त्यामुळे स्नायू दुर्बल झाले. स्वयंचलित वाहनांच्या आगमनानंतर शारीरिक कष्ट खूप कमी झाले. याचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो, यावर कोठेही थोडीशी चर्चाही नाही. प्रत्येकाला आता असे वाटते, की आपल्या मुलांनी खूप शिकावे. या जीवघेण्या स्पर्धात्मक शिक्षणाचा आरोग्यावर भीषण परिणाम होत आहे. विद्येचे धन मिळविण्याच्या नादात आरोग्य धनाचा विचार करण्यास कोणाला सवड नाही. प्रत्येक पिढीत मानवाचे सरासरी आकारमान कमी होत चालले आहे. वडिलांच्या काळात शेतात मजूर मंडळी होती, त्या आकाराचे आता पैलवानही नाहीत.

जमिनीतील अन्नद्रव्यांचा विचार करा

जमीन म्हणजे काही द्रौपदीची थाळी नाही. सतत जास्त उत्पादनाची पिके घेऊन त्यातील अन्नद्रव्यांचा साठा कमी कमी होणार. अन्नद्रव्ये बाहेरून न दिल्यास पिकात त्यांची कमतरता येणार. पिकाच्या गरजेचे सर्व अन्नपदार्थ सेंद्रिय रूपात पुरविणे हे सर्वांत महाग आहे, तर रासायनिक स्वरूपात पुरविणे हे सर्वात स्वस्त. सेंद्रिय शेतीची उत्पादकता कमी आहे. त्यामुळे त्याचे दर चढे आहेत. सर्वांना ते घेणे परवडणारे नाही. हा बाजार मर्यादित क्रयशक्तीचा आहे. मोठमोठ्या शहरातून यासाठी ग्राहक मिळतो. बहुतेक ठिकाणी शेतकरी थेट ग्राहकांपर्यंत जाऊ शकत नाही. मग मध्यस्थाचा लाभांश वजा केल्यास शेतकऱ्याच्या वाटणीला निव्वळ उत्पन्न इतके कमी भेटते, की त्यात शेती करणे त्याला परवडत नाही आणि तो सोडून देतो.

केंद्र सरकारने सेंद्रिय शेतीला चालना आणि प्रचार सुरू केला आहे. परंतु या तंत्रामध्ये काही मूलभूत चुका आहेत का, असा क्षणभर विचार करावयास कोणी तयार नाही. रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खते आणि रासायनिक कीडनाशकांऐवजी सेंद्रिय किडनाशके, केवळ या मार्गाने अशी शेती करण्याला खूप मर्यादा पडतात. एखाद्या डॉक्टर, वकील, अभियंता किंवा उद्योजकाने सेंद्रिय शेती करणे वेगळे आणि ज्याची संपूर्ण उपजीविका शेतीवर अवलंबून आहे, त्याने अशी शेती करणे वेगळे आहे. हे लक्षात घेतले पाहिजे.

पानिपतचे तिसरे युद्ध होण्यापूर्वी १० वर्षे अगोदर तमिळनाडूत इंग्रजांनी नोंदविलेले भाताचे उत्पादन हे आताच्या सुधारित भाताच्या शेतीपेक्षा जास्त होते असे आकडे दाखवितात. (इ. स. १७५० च्या दरम्यान) फक्त इतके वाचून उपयोग नाही. त्या वेळी तेथे असणाऱ्या इतर परिस्थितीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. एकूण जंगल क्षेत्र, दरडोई पिकाऊ जमीन, प्रति एकर जनावरांचे प्रमाण, दरवर्षी पेरली जाणारी, एकाआड एक वर्ष पेरली जाणारी, त्या वेळी आपल्याकडे नाहीत त्यापेक्षा जास्त बागायतीच्या सुविधा तेथे होत्या. आज तेथे जाऊन सर्वेक्षण केल्यास यातील काहीच राहिलेले नाही. या सर्वांवर उपाय म्हणून आज ‘रेसिड्यू फ्री’ रसायनमुक्त उत्पादन असा नवीन प्रकार बाजारात चालू झाला आहे. मर्यादित रसायनांचा वापर करा परंतु उत्पादनात त्याचे अंश सापडणार नाहीत अशी काळजी घ्या. शेती किफायतशीर झाली पाहिजे. संवर्धित शेतीची तत्त्वे याच्याशी मिळतीजुळती आहेत.

संपर्क ः

प्र. र. चिपळूणकर, ८२७५४५००८८ (लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.