Sugarcane : ऊस शेतीमधील माझे अनुभव...

उसाचे शरीरशास्र सांगते की अन्नद्रव्ये तयार करण्याचे कामकाज प्रामुख्याने २ ते ६ पानांत चालते. तेथून पुढे कमी होत जाते. एकदा १० ते १२ हिरव्या पानांचा गुच्छ तयार झाला, की पुढे खालचे एक पान वाळते आणि वर एक नवीन पान तयार होते. याच बरोबरीने उसाच्या मुळांचा तसेच पीक वाढीचा अभ्यास संवर्धित शेतीच्या दृष्टीने करणे गरजेचे आहे.
Sugarcane
SugarcaneAgrowon

उसाची उगवण (Sugarcane Germination) अवस्था लावण झाल्यापासून २० ते २५ दिवसांपर्यंत असते. या काळात पाण्याची गरज वाफशाची असते. या काळात सरीत जादा पाणी झाले, तर उगवणीवर परिणाम (Effect On Germination) होतो. जमीन नांगरलेली (Land Cultivation) असल्यास ती गरजेपेक्षा जास्त पोकळ होते. सरीत सोडलेले पाणी दोनही बाजूंच्या वरंब्यात मुरायला लागते, रानाला जर उतार असेल तर थोडे कमी मुरेल. सपाट रान असेल तर वरंब्यात जास्त पाणी मुरते आणि वापसा लवकर येत नाही. त्यामुळे उगवणीस उशीर होतो. नांगे पडतात. हे लक्षात घेऊन जमीन जर नांगरून तयार केलेली असेल तर ३५ अश्‍वशक्ती ट्रॅक्‍टरने पल्टी फाळाने सरी सोडावी. अशी सरी सोडत असता ट्रॅक्‍टरचा टायर एकदा वरंब्याखाली व एकदा सरीतून गेल्याने संपूर्ण रान दडपले जाते. अशा रानातील सरीत सोडलेले पाणी बाजूने वरंब्यात कमी मुरते. यामुळे जलद पुढे सरकते आणि लवकर वापसा येतो. हेच जर रिजरने सरी सोडली तर वरंब्याखालील रान दडपले न गेल्याने पाणी जास्त घेते. (Sugarcane Farming)

शेतीतील अनुभव ः

१) आम्ही शेतीकामासाठी नवीन पॉवर टिलर घेतला. आता दुसऱ्याला ट्रॅक्‍टरभाडे देणे नको म्हणून भात कापणी नंतर पॉवर टिलरने जमीन नांगरली आणि स्वतःच्या बैलाने सरी सोडली. भाडे वाचविले परंतु रान दडपले न गेल्याने पाणी प्रचंड घेऊ लागले. यामुळे लावण थांबवून रान दडपून परत सरी सोडावी लागली. यावर उपाय म्हणून त्यानंतर जमिनीचा ४५ सें.मी पट्टा नांगरायचा आणि ४५ सें.मी. पट्टा नांगरणी बंद करायची. नांगरलेल्या पट्ट्यातून बैलाचा रिजर लावून सरी सोडायची आणि बीन नांगरलेल्या पट्ट्यावर माती चढवायची. या युक्तिमुळे योग्य प्रमाणात ओल होऊन लावण चांगली उगवू लागली. अशी १० ते १५ वर्षे गेली.

२) पुढे बीना नांगरणीची लावण सुरू झाली. सरीच्या जुन्या तळात फक्त एक नांगराचे तास मारले, की मशागत संपली. अशा रानात वरंबे नांगरलेले नसल्याने बाजूला पाणी मुरत नाही व अत्यंत कमी पाण्यात लावण झाल्याने जलद वापसा येऊन उगवण चांगली होते. पाणी बचत हा फायदा वेगळा. भरणीपर्यंत कमीत कमी पाण्यात पाण्याचा फेर झाल्याने ऊस वाढ उत्तम झाली. अशा प्रकारे संवर्धित शेतीचा ऊस शेतीला वरील प्रमाणे चांगला फायदा होतो.

३) मी ऊस शेतीच्या सुरवातीला दिडकी कांडीची लावण करीत असे. पुढे कांडीची संख्या कमी करण्याचे प्रयोग केले. काही दिवस कांडीला कांडी लावून लावण करणे सुरू केले. बेण्याचा वापर ३० ते ३५ टक्के कमी झाला. पुढे मनुष्य बळ टंचाई व जास्त फुटवे नकोत म्हणून आणखी पातळ लावण सुरू केली दोन डोळ्या ऐवजी एक डोळा, दोन डोळ्यांमध्ये ६० ते ९० सें.मी. अंतर ठेवून लावण करायचो. अशा प्रयोगात ऊस संख्या गरजेइतकी मिळत असल्याने आपले प्रयोग योग्य मार्गाने चालू आहेत असे वाटे. कमी बेण्यात ऊस येतोय, परंतू उत्पादन म्हणावे तसे मिळत नाही. बेणे वापर आणि लावणीसाठी मजुरांची बचत होत असली तरी उत्पादनात म्हणावी तशी वाढ होत नाही. म्हणजे कोठेतरी चुकत आहे, हे माझ्या लक्षात आले.

Sugarcane
Sugarcane : नवीन ऊस लावणीला वेग

४) ऊस वाढीच्या अवस्था सांगायच्या झाल्या तर उगवण, फुटीची अवस्था, उभार वाढीची अवस्था आणि पक्वतावस्था अशा आहेत. उगवण अवस्था तापमान, ओलावा, बेण्याची प्रत यावर थोडी फार पुढे मागे होईल. परंतु फुटीच्या अवस्थेचा आणखी खोलात जाऊन अभ्यास करण्याची गरज आहे असे वाटले.

५) बेणे जितके कमी तितके एक डोळ्यापासून जास्त फुटवे येतात. बेणे कमी लावूनही गरजेइतकी फुटव्यांची संख्या घेता येते. परंतु येथे फुटव्याच्या अवस्थेतील दिवस वाढतात. फुटव्यांच्या अवस्थेसाठी जितके दिवस वाढतील तितके वाढीच्या अवस्थेला कमी मिळतात. असे झाल्यास उत्पादनात घट येऊ शकते. यामुळे फार दूर कांडी लावून बेणे बचत करण्याचे प्रयोग बंद करावे लागले.

Sugarcane
दत्त कारखान्याचा एकरी २०० टन ऊस उत्पादन कार्यक्रम

६) मी आता १२० ते १५० सें.मी. रुंदीच्या सरीत ४५ सें.मी.वर एक डोळ्याची एक कांडी असे अंतर निश्‍चित केले आहे. ऊस खांदणी अगर भरणी १०० ते १५० दिवसांपर्यंत केली जाते. खांदणी वेळी २ ते २.५ लाख फुटव्यांची संख्या असते. तोडणीच्या वेळेपर्यंत ती ३५ ते ४०,००० पर्यंत खाली येते. जवळपास खादणीनंतर २ लाख फुटवे वाढीच्या स्पर्धेत मरून जातात. अनेक शेतकऱ्यांची अशी समजूत असते की, हे जमिनीतील अन्नद्रव्ये खाऊन तोडणीपर्यंत जाणाऱ्या उसाबरोबर अन्नद्रव्ये आणि पाण्याबाबत स्पर्धा करून मुख्य पिकाचे अन्नद्रव्य खाऊन मरतात. त्यामुळे ते भरणीच्या वेळीच काढून टाकले तर पुढे उसाची वाढ चांगली होईल. वास्तवात हे जादा फुटवे काढून टाकण्याचा खर्च करणे चुकीचे आहे. वनस्पती शास्र सांगते, की हे मरणारे फुटवे मरण्यापूर्वी आपल्या अंगातील जास्तीत जास्त अन्नद्रव्ये त्याच बेटातील वाढणाऱ्या उसाला देऊन मरतात. यामुळे निसर्ग नियमाप्रमाणे मरणाऱ्यांना मरू द्यावे. वाढीच्या पुढील अवस्थेत या मरणाऱ्या फुटीकडून पोषण मिळाल्याने वाढ चांगलीच होत असावी. हा व्यर्थ खर्च वाचविणे गरजेचे आहे. फुटीचा काळ लवकर समाप्त होऊन ऊस उभारवाढीच्या काळात जात असल्यामुळे बेण्याचा खर्च वाढत असला तरी अंतिम हे फायद्याचेच ठरते.

Sugarcane
Sugarcane : एकरी १०० टन ऊस उत्पादन मोहिमेत सहभागी व्हावे

ऊस मुळांचा अभ्यास ः

१) आपण नेहमी जमिनीवर वाढलेला ऊस पहात असतो. त्यावरून पिकाची परीक्षा केली जाते. जमिनीखालील भाग म्हणजे मुळीच्या पसाऱ्याचा अभ्यास करीत नाही. तसे ते शक्‍यही नाही. परंतु शास्रज्ञांनी जमिनीखाली मुळांच्या पसाऱ्याचा अभ्यास केला आहे.

२) पूर्ण वाढलेल्या बेटाचा मुळांचा पसारा बेटासभोवती २७० सें.मी. त्रिज्येने वाढत असतो, असे पुस्तकात संदर्भ मिळतात. इतक्‍या घेरामध्ये अनेक बेटातील मुळांचे जाळे एकमेकांत मिसळून त्याचे एक जाळे विणल्याप्रमाणे तयार होते. या जाळ्यामुळे ऊस मोठा उंच वाढूनसुद्धा एकमेकांचा आधार एकमेकांना मिळत असल्यामुळे ऊस बेट उभे राहू शकते. लांब अंतरावर बेटे असल्यास अशी मुळे एकमेकात विणली जात नाहीत. एखाद्या वावटळीत संपूर्ण बेट जमीनदोस्त होत असता त्यांच्या मुळांचा पसारा जमिनीबाहेर येऊन पडतो. ओलावा कमी होताच असे बेट पूर्णपणे वाळून जाते. हे लक्षात घेता जवळ अंतराची लावण अंतिमतः फायदेशीर ठरते.

ऊस पानांचा अभ्यास ः

१) उसाला साधारण १० ते १२ पाने हिरवी असतात. त्यानंतर खालचे एक पान वाळते. परंतु पुढे नवीन नवीन पान तयार होत असते. उसाची पाने वरून मोजायला सुरुवात केल्यास १ आणि २ ही बाल पाने, ३, ४, ५, ६ ही चार तरुण कार्यक्षम पाने आणि त्यापुढील ६ ते १० पाने ही वृद्धत्वाकडे झुकत चाललेली पाने असतात.

२) प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया तरुण पानांमध्ये चालू असते. मला नेहमी प्रश्‍न पडत असे, की उसाची दाट संख्या असता खालचे पानावर भरपूर सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही. मग तेथे प्रकाश संश्लेषणाचे काम कसे चालत असावे? उसाचे शरीरशास्र सांगते की,अन्नद्रव्ये तयार करण्याचे कामकाज प्रामुख्याने २ ते ६ पानात चालते. तेथून पुढे कमी होत जाते. एकदा १० ते १२ हिरव्या पानांचा गुच्छ तयार झाला, की पुढे खालचे एक पान वाळते आणि वर एक नवीन पान तयार होते. शास्र सांगते नवीन पान तयार होत असता खालच्या वाळून जाणाऱ्या पानातील शक्‍य तितका अन्न निर्मितीचा कारखाना ते नव्या तयार होणाऱ्या पानाला देऊन मगच मरते. हा संदर्भ अत्यंत महत्त्वाचा आहे.

३) एक महिन्याला २.५ पाने तयार होतात. या हिशेबाने १० ते १२ पाने ४ ते ५ महिन्यात तयार होतात. या वेळी ऊस खांदणीला येतो. खांदणीला खताचा शेवटचा हप्ता द्या. त्यानंतर परत टाकू नका असे शास्र सांगते. याला कारण त्यानंतर चक्रीय पद्धतीने नवीन पानाला जुन्या पानाकडून बरेच अन्नद्रव्य उपलब्ध होते. मुळाकडून मर्यादित गरजेइतकेच पोषण मिळते. इथे आपण खांदणीनंतरही अगदी जून, जुलैपर्यंत खत हप्ते देतो हा व्यर्थ खर्च आहे. अर्थात, जमिनीची सुपीकता पातळी योग्य अवस्थेत असेल तरच हे शक्‍य आहे.

४) आपल्याकडे जनावरांचे वैरणीसाठी हिरवी जून पाने काढण्याची प्रथा अनेक भागात आहे. अशी पाने जर काढली गेली तर चक्रीय पोषण बंद होते. मुळांकडून जास्त अन्नद्रव्ये ओढावी लागतात. यातून उसाचे शरीरशास्र बिघडते. आज आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी असे शास्रविरोधी काम चालते यामुळे उत्पादन खर्च वाढत चालला आहे.

-----------------

संपर्क ः प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८

(लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com