Rabi Onion : रब्बी कांद्याच्या रोपवाटिकेचे व्यवस्थापन

सध्या सप्टेंबर - ऑक्टोबर दरम्यान रांगडा कांद्याच्या पुनर्लागवडीचा कालावधी आहे. त्याच प्रमाणे नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये पुनर्लागवड करावयाच्या रब्बी कांद्याची रोपवाटिका या काळात केली जाते.
Rabi Onion
Rabi OnionAgrowon

सध्या सप्टेंबर - ऑक्टोबर दरम्यान रांगडा कांद्याच्या (Rabi Onion Transplanting) पुनर्लागवडीचा कालावधी आहे. त्याच प्रमाणे नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये पुनर्लागवड करावयाच्या रब्बी कांद्याची रोपवाटिका (Rabi Onion Nursery) या काळात केली जाते. त्याचे रब्बी कांद्याच्या रोपवाटिकेच्या व्यवस्थापनाची (Onion Nursery Management) माहिती घेऊ.

जाती ः

-रांगडा कांद्यासाठी, बसवंत ७८०, फुले समर्थ

-रब्बी कांद्यासाठी, भीमा किरण, भीमा शक्ती, ॲग्रीफाउंड लाइट रेड, एन.एच.आर.डी.एफ. लाल-३, एन.एच.आर.डी.एफ. लाल-४ या पैकी योग्य त्या जातीची निवड करावी.

रोपवाटिका व्यवस्थापन

हंगाम आणि मातीच्या प्रकारानुसार रोपवाटिकेसाठी वाफे बनवणे आवश्यक असते.

-आपल्याकडे सामान्यतः सपाट वाफ्यामध्ये रोपवाटिका केली जाते. मात्र अशा वाफ्यात पाणी देतेवेळी पाण्यासोबत एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे बियाणेही वाहून जाण्याची शक्यता असते.

-चिकणमातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची अधिक क्षमता असते. येथे गादीवाफे फायद्याचे ठरतात. रोपवाटिका गादी वाफे २-३ मीटर लांब, १-१.५ मीटर रुंद आणि १५ ते २० सेंमी उंच असावेत. गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूंच्या भुईदांडामधून वाफ्याला पुरेसे पाणी मिळाले नाही तर उगवण क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, म्हणून स्प्रिंकलर किंवा ठिबक किंवा रेनगेज पाइपद्वारे पाणी देणे आवश्यक असते.

-जमीन योग्य उतार, उत्तम निचऱ्याची असल्यास रब्बी रोपवाटिकेसाठी सपाट वाफा पद्धतीचा अवलंब करता येतो.

Rabi Onion
Onion Rate : कांदा, लसूण उत्पादक तोट्यात

- वाफे तयार करताना ०.५ (अर्धा) टन चांगले कुजलेले शेणखत, २:१:१ किलो नत्र : स्फुरद : पालाश प्रति ५ गुंठे द्यावे.

-पेरणीनंतर २० दिवसांनी १ किलो नत्र द्यावे.

-एक हेक्टर कांदा लागवडीसाठी साधारणतः ५ गुंठ्यांची रोपवाटिका पुरेशी असते. एक हेक्टर क्षेत्रावर कांदा पुनर्लागवड करण्यासाठी ५-७ किलो बी पुरेसे होते. परंतु काही शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार हेक्टरी ३.७५ ते ४.३७५ किलो (१.५ ते १.७५ किलो प्रति एकर) बियाणे पुरेसे ठरते.

बीजप्रक्रिया व रोपांचे संरक्षण ः

-पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २-३ ग्रॅम कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करणे अति गरजेचे असते. पॅकेटबंद उपचार केलेल्या बियाण्यास पुन्हा उपचार करण्याची आवश्यक नसते. त्यासाठी विकत आणलेल्या बियाण्याच्या पाकिटावर कोणत्या रासायनिक घटकांची प्रक्रिया केलेली आहे, ते तपासून घ्यावे.

-पुढेही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बियाणे टाकल्यानंतर साधारणतः आठवड्याने ट्रायकोडर्मा व्हिरीडी* ०.५ ते १ किलो आणि स्युडोमोनास फ्लुरोसन्स* १ किलो प्रति एकर ५० किलो शेणखतात किंवा गांडूळ खतात एक आठवडा मुरवून, जमिनीत पुरेसा ओलावा असताना द्यावे.

Rabi Onion
Onion Rate : चाळीत साठवलेल्या कांद्याची ४० टक्क्यांवर सड

तणनियंत्रण ः

रोपवाटिकेत गरजेनुसार वेळीच गवत काढणे महत्त्वाचे असते. रोपवाटिकेत तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २ ते ३ खुरपण्या प्रभावी ठरतात. तणनाशकांचा वापर करायचा असल्यास, पेरणी केल्यानंतर रोपे उगवण्यापूर्वी वाफ्यावर पेंडीमिथॅलीन २ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. बियाणे टाकल्यानंतर २०-२५ दिवसांच्या अंतराने गरजेनुसार १ ते २ खुरपण्या कराव्यात.

रोपवाटिकेमधील पीक संरक्षण ः

१) फुलकीड ः कांद्यातील प्रमुख कीड असलेल्या फुलकिडीचा (थ्रीप्स) प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रोपवाटिकेत बियाणे पेरण्यापूर्वी व पुनर्लागवडीआधी १५ दिवस शेतीच्या बाजूने मका पिकाच्या दोन ओळी लावाव्यात.

फुलकीड नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी

फिप्रोनिल (५ एससी) १ मिलि किंवा कार्बोसल्फान (२५ % ई.सी.) २ मिलि.

सातत्याने एकाच कीडनाशकाचा वापर करणे टाळावे. शिफारशीत कीडनाशके आलटून पालटून वापरावीत.

२) करपा ः या रोगाच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी

मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल १ मिलि.

३) थ्रीप्स आणि करपाचा प्रादुर्भाव एकाच वेळी दिसून येत असल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी

अ) मॅन्कोझेब २.५ ग्रॅम अधिक फिप्रोनील १ मिलि.

ब) वरील फवारणीनंतर १५ दिवसांनी दुसरी फवारणी, प्रोपीकोनॅझोल १ ग्रॅम अधिक कार्बोसल्फान २ मिलि.

फवारणीवेळी चिकट द्रव्याचा (स्टिकर) वापर जरूर करावा.

३) मर रोग ः मर रोगाचा प्रादुर्भाव, आळवणी (रोपांच्या ओळीत द्रावण ओतणे) प्रति लिटर पाणी कॅप्टन २ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम.

तीव्र प्रादुर्भावामध्ये, मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम (आळवणी)

अन्नद्रव्य व्यवस्थापन ः

निचऱ्यामुळे पोषक अन्नद्रव्यांचा ऱ्हास होऊन कांद्याची रोपे पिवळी पडून, त्याला पीळ पडण्याची शक्यता असते. त्यामुळे बियाणे पेरल्यानंतर २० दिवसांनी १९:१९:१९ (२ ते २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी) आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्रण-४ (लोह ४ %, जस्त ६ %, मँगेनीज १ %, तांबे ०.५ %, बोरॉन ०.५ %) १ ते २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या फवारणी करावी. फवारणीवेळी सिलिकॉन आधारित स्प्रेडरचा वापर करावा.

- डॉ. पी. ए. साबळे, ८४०८०३५७७२

(सहायक प्राध्यापक -उद्यानविद्या विभाग, के.व्ही.के., सरदार कृषिनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, साबरकांठा, गुजरात)

(* कांदा व लसूण संशोधन केंद्राची शिफारस.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com