Nutrient : चुनखडीयुक्त जमिनीतील अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन

ज्या जमिनीमध्ये मुक्त चुन्याचे प्रमाण जास्त असते त्या जमिनीस चुनखडीयुक्त जमीन म्हणतात. जमिनीमध्ये चुनखडी ही खडे आणि पावडर या स्वरूपात आढळते. जमिनी जेव्हा चुनखडीयुक्त होतात, तेव्हा नत्र, स्फुरद व पालाशचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
Crop Nutrient Management
Crop Nutrient ManagementAgrowon

डॉ. अर्चना पवार, धीरज साठे

भाग ः १

पिकांना अन्नद्रव्यांचा योग्य, वेळेनुसार आणि वाढीनुसार पुरवठा करून पिकांची उत्पादनक्षमता वाढविणे सहज शक्य आहे. त्यासाठी पिकांना आवश्यक असणाऱ्या १७ अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यामध्ये जमिनीची भौतिक स्थिती योग्य असली पाहिजे. सेंद्रिय कर्ब, सामू, क्षारता आणि चुनखडीचे प्रमाण योग्य असेल, तर पिकाची योग्य वाढ होऊ शकते; परंतु चुनखडीचे प्रमाण जमिनीमध्ये जास्त असेल तर पिकांना अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होऊन उत्पादनात लक्षणीय घट येते.

जमिनीत चुन्याचे प्रमाण आवशक्तपेक्षा (५ टक्क्यांपेक्षा) जास्त झाल्यास अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेचे प्रश्‍न निर्माण होतात. तसेच अन्नद्रव्यांचा असमतोलता येऊ लागते. पिकांच्या योग्य पोषणासाठी नत्र, स्फुरद व पालाश यांच्या वापराचे प्रमाण १.००: ०.५० :०.२५ असायला हवे. जमिनी जेव्हा चुनखडीयुक्त होतात, तेव्हा नत्र, स्फुरद व पालाशचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे असते. अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन त्या दृष्टिकोनातून करावे लागते.

Crop Nutrient Management
गंधक : उत्पादनवाढीसाठी महत्त्वाचे अन्नद्रव्य

चुनखडीयुक्त जमीन ः

१) ज्या जमिनीमध्ये मुक्त चुन्याचे प्रमाण जास्त असते त्या जमिनीस चुनखडीयुक्त जमीन म्हणतात. सरासरी मुक्त चुन्याचे प्रमाण जर पाच टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर अशी जमीन चुनखडीयुक्त समजावी. या जमिनी ओळखण्याची दुसरी सोपी पद्धत म्हणजे जमिनीचा उभा छेद घेऊन त्यावर सौम्य हायड्रोक्लोरिक आम्ल शिंपडावे. जर आम्ल शिंपडल्यानंतर जमिनीवर बुडबुड्यासारखा फेस दिसला, तर जमीन चुनखडीयुक्त आहे असे समजावे.

२) या जमिनीचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा जास्त असून, मुक्त चुन्याचे प्रमाण जास्तीत जास्त ९५ टक्क्यांपर्यंत आढळले आहे. ज्या जमिनीमध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमचे प्रमाण, जमिनीच्या विनिमय क्षमतेपेक्षा जास्त असते, अशा जमिनी चुनखडीयुक्त वर्गामध्ये समाविष्ट होतात.

३) जमिनीची विनिमयक्षमता: धन आयन धारण करण्याच्या क्षमतेस जमिनीची विनिमयक्षमता म्हणतात. यामध्ये Ca++, Mg++, Na+, K+, Al+++, H+, Fe++ अशा धन आयनांचा समावेश होतो. चिकण आणि पोयट्याच्या जमिनीची विनिमयक्षमता इतर जमिनीपेक्षा जास्त असते. याउलट वालुकामय जमिनीची विनिमयक्षमता अत्यंत कमी असते.

Crop Nutrient Management
Orange : संत्रा उत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे

चुनखडीयुक्त जमिनी तयार होण्याची कारणे ः

१) चुनखडीयुक्त जमिनी नैसर्गिकरित्या उष्ण आणि समशितोष्ण कटिबंधात आणि वाळवंटी भागात आढळतात. महाराष्ट्रामध्ये कोकण पट्टी, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर येथील काही जमिनींचे क्षेत्र वगळता चुनखडीयुक्त जमिनी सर्वदूर आहेत. मराठवाडा आणि विदर्भामध्ये अशा जमिनीचे प्रमाण अत्यंत जास्त आहे.

२) या जमिनी तयार होण्याचे प्रमुख कारण म्हणजे जमिनीतील क्षारांचा निचरा होण्यासाठी लागणारा पाऊस अपुरा पडतो. मुक्त चुन्याचा निचरा जमिनीतून न होता तापमान वाढल्यानंतर खालच्या थरातील चुनाही वरच्या थरात येतो.

३) महाराष्ट्रातील जमिनी काळ्या बेसॉल्ट खडकापासून तयार झालेल्या आहेत. या खडकांमध्ये लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅश आणि सोडिअमयुक्त खनिजांचे प्रमाण अधिक असते. या (खनिजांचे विदारण होऊन मुक्त चुन्याचे प्रमाण वाढते. अशा जमिनीमध्ये वरच्या थरापासून खालच्या थरापर्यंत मुक्त चुन्याचे प्रमाण वाढत जाते. मशागतीमुळे (खोल नांगरणी) खालच्या थरातील चुना वरच्या थरात येतो.

जमिनीमध्ये आढळणारी चुनखडी ः

१) जमिनीमध्ये चुनखडी ही खडे आणि पावडर या स्वरूपात आढळते. चुनखडी पावडर ही चुनखडी खडीपेक्षा जास्त क्रियाशील असल्यामुळे जास्त दाहक असते. बऱ्याच वेळा चुन्याचे प्रमाण खालच्या थरात वाढत जाऊन, तेथे अत्यंत कठीण चुन्याचा पातळ थर तयार होतो. अशा थरामुळे पाण्याचा निचरा होत नाही आणि पाणी साठून राहते.

२) पाण्यामध्ये जर विद्राव्य चुन्याचे प्रमाण जास्त असेल आणि ओलितासाठी या पाण्याचा उपयोग केला तर जमिनी चुनखडी युक्त होतात. चुनखडीयुक्त जमिनी या कमी पावसाच्या प्रदेशात आणि वाळवंटी भागात जास्त तयार होताना दिसतात. या जमिनी लाइमस्टोन आणि डोलोमाइटसारख्या खडकापासून तयार झालेल्या असतात, म्हणून त्यामध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त असते. भारतामध्ये अशा जमिनी राजस्थानच्या पश्‍चिम भागात, तसेच गुजरातच्या काही भागांत आढळतात.

३) जमिनीमध्ये चुन्याचे प्रमाण जर तीन ते पाच टक्क्यांपर्यंत असेल, तर अशा जमिनी उत्पादनक्षम असतात. या जमिनीमध्ये अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेचे प्रश्न निर्माण होत नाहीत. जमिनीतील चुन्याचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यानंतर अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते.

पिकांच्या अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये मुक्त चुन्याचा सहभाग :

१) चुनखडीयुक्त जमिनीचा सामू अल्कलीधर्मी असतो. यामध्ये विद्राव्य स्वरूपातील कार्बोनेट आणि बायकार्बोनेटचे प्रमाण जास्त असते. यामुळे सामू सर्वसाधारणपणे ७.५ ते ८.५ असतो. सामू ८.५ च्या वर शक्यतो जात नाही. जर सोडियमचे प्रमाण जास्त झाले, तरच सामू ८.५ च्या वर जाण्याची शक्यता असते. २) या जमिनी १०० टक्के अल्कलीधर्म संयुगाने युक्त असतात. कॅल्शिअम मातीमध्ये विद्राव्य स्वरूपात आणि पोयट्यावर विनिमयक्षम स्वरूपात आढळतो.

३) चुनखडीयुक्त जमिनीमध्ये अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते, त्यामुळे पिकातील हरितद्रव्याचे प्रमाण अत्यंत कमी होऊन वाढ खुंटते. काही वेळा बायकार्बोनेटचे प्रमाण मातीच्या द्रावणात वाढल्याने पिकांना अपाय होऊ शकतो. या सर्व बाबींचा विचार करून चुनखडीयुक्त जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करावे लागते. कारण चुनखडीयुक्त जमिनीचा सामू वाढल्यामुळे काही अन्नद्रव्यांचा जमिनीतून हास होतो; तर काही अन्नद्रव्ये इतर संयुगांना बांधले जाऊन पिकांना उपलब्ध होत नाहीत.

४) चुन्यामुळे प्रत्यक्ष, तसेच अप्रत्यक्षरीत्या नत्र, स्फुरद, मॅग्नेशिअम, पालाश, मँगॅनीज, जस्त, तांबे आणि लोह यांच्या उपलब्धतेवर विपरीत परिणाम होतो.

५) नत्रयुक्त खते जमिनीमध्ये ताबडतोब मिसळली जातील, याची खात्री करून घेतली जाणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, नत्राचे स्वरूप बदलून त्याचा अमोनिया वायू तयार होऊन हवेत निघून जातो. कार्बोनेटचे प्रमाण चुनखडीयुक्त जमिनीत जास्त असल्याने स्फुरद आणि मॉलिब्डेनमची उपलब्धता कमी होते.

६) चुनखडीयुक्त जमिनीमध्ये लोह, बोरॉन, जस्त, आणि मँगेनीजची कमतरता ठळकपणे जाणवते, कारण जास्त चुन्यामुळे सामू वाढतो.

७) सामू वाढल्यामुळे वरील अन्नद्रव्ये अविद्राव्य स्वरूपात जातात. मृदुकणांच्या चुनखडी जमिनीत चुना क्रियाशील घटक असल्याने चुन्याच्या पृष्ठभागावर साका तयार होऊन अशा क्रिया घडतात; तसेच कार्बोनेटमुळे नत्राचे वायूमध्ये रूपांतर होण्याच्या क्रियेची गती वाढते.

८) सर्वसाधारणपणे पिकांच्या मुळाच्या भोवती आम्लधर्मी वातावरण असते; तसेच द्विदल धान्य मुळाद्वारे हायड्रोजन सोडून मुळाभोवती वातावरण आम्लधर्मी ठेवतात. चुनखडीयुक्त जमिनीत या क्रियेत बदल होऊन पिकांच्या मुळांची वाढ योग्य प्रकारे होत नाही, यामुळे लोहासारख्या अन्नद्रव्यांची कमतरता प्रकर्षाने जाणवायला लागते. कारण लोह आम्लधर्मी वातावरणात जास्त उपलब्ध असते आणि अल्कलीधर्मी वातावरणात उपलब्धता कमी होते. या क्रियेमध्ये कार्बोनेटचा सहभाग जास्त होऊन लोह पिकास उपलब्ध होत नाही.

चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्म

१) जमिनीचा सामू विम्लधर्मीय ८.० पेक्षा जास्त असतो.

२) जमिनीमध्ये विद्राव्य क्षाराचे प्रमाण १ डेसी.सा./ मी पेक्षा कमी असते.

३) जमिनीची घनता वाढते म्हणजेच जमीन घट्ट बनते.

४) मुक्त चुन्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त असते.

५) नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशिअम, गंधक या अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते.

६) सूक्ष्म अन्नद्रव्ये लोह, जस्त व बोरॉन यांची उपलब्धता कमी होते.

७) हवा व पाणी खेळण्याचे प्रमाण व्यस्त राहते, त्यामुळे पिकांची वाढ खुंटते.

८) बियाण्याची उगवणक्षमता कमी होते.

९) लोहाच्या कमतरतेमुळे पिकांची पाने पिवळी पडून शिरा हिरव्या राहतात, जास्त मुक्त चुनखडीचे प्रमाण असल्यास पाने पिवळी पडतात आणि चुनखडीचे प्रमाण अति असल्यास पिवळी पाने पांढरी पडून करपून जातात. याला चुनखडीमुळे येणारा केवडा असे म्हणतात. विशेषतः गावालगत असणाऱ्या पांढऱ्या जमिनीमध्ये असा प्रकार प्रकर्षाने दिसून येतो.

जमिनीतील मुक्त चुनखडीची प्रमाणावरून वर्गवारी

अ. क्र.---वर्गवारी---मुक्त चुनखडी प्रमाण (टक्के)

१.---कमी---१ ते ५

२.---मध्यम---५ ते१०

३.---जास्त---१० ते १५

४.---हानिकारक---१५ पेक्षा जास्त

-------------------------------------------------------------

संपर्क ः डॉ. अर्चना पवार, ७५८८०४७८५९

(विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com