October Rain : ऑक्टोबरचा पाऊस

ऑक्टोबर महिना उन्हाळी आणि हिवाळी मॉन्सूनमधील स्थित्यंतराचा काळ म्हणता येईल. काही वर्षी तो कोरडा आणि उष्ण असतो तर काही वर्षी त्यात भरपूर पाऊस पडतो, जसे आता आपण पाहत आहोत.
October Rain
October RainAgrowon

डॉ. रंजन केळकर

पृथ्वी (Earth) सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असताना ती स्वतःच्या अक्षाभोवतीही फिरत असते. त्यामुळे एक वर्ष ३६५ दिवसांचे आणि चार वर्षांत एकदा ३६६ दिवसांचे असते. पृथ्वीचा अक्ष कललेला असल्यामुळे ऋतू बनतात. दर वर्षीचे नवीन कॅलेंडर किंवा पंचांग खगोलशास्त्राच्या अशा मूलभूत नियमांवर आधारलेले असते. दिवस (Day), ऋतू (Season) आणि वर्ष (Year) यांच्या भौतिक व्याख्या आहेत. पण आठवडे आणि महिने यांचे तसे नाही.

October Rain
Gokul Milk Rate : गोकुळ’च्या म्हैस, गाय दूध खरेदीदरात वाढ

चांद्रमास २८ दिवसांचा असतो. पण सौर कॅलेंडरमध्ये एक आठवडा सात दिवसांचा असावा आणि एक महिना २८ ते ३१ दिवसांचा असावा हे आपण केवळ आपल्या सोयीसाठी ठरवलेले आहे. म्हणून मॉन्सूनचा पाऊस महिने, आठवडे किंवा तारखा मानायला किंवा त्यानुसार वागायला बांधलेला नाही.

October Rain
Pune APMC : आले खरेदी व्यवहार बंद पाडले

ऑक्टोबरचा पाऊस हा दोन वेगळ्या मॉन्सूनच्या मधला पाऊस असतो. महाराष्ट्रापुरते म्हणायचे झाले, तर मॉन्सून म्हणजे नैर्ऋत्य मॉन्सून हे आपण गृहीत धरतो. पण नैऋत्य मॉन्सून देशभरात चार महिने राहिल्यावर त्याच्या वाऱ्यांची दिशा बदलते. मग वारे ज्या दिशेने आले त्याच्या विरुद्ध दिशेने वाहू लागतात. महाराष्ट्रात याला परतीचा मॉन्सून म्हटले जाते. पण ईशान्य मॉन्सून हे त्याचे खरे नाव आहे. नैर्ऋत्य मॉन्सून हा उन्हाळी मॉन्सून असतो तर ईशान्य मॉन्सून हा हिवाळी मॉन्सून असतो.

October Rain
Wheat MSP : गव्हाच्या एमएसपीत किती रुपयांनी वाढ झाली ?

ईशान्य मॉन्सूनचा पाऊस मुख्यतः दक्षिण भारतावर म्हणजे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ राज्यात पडतो. वर्षाच्या अखेरीस तो संपतो. महाराष्ट्रात मात्र ईशान्य मॉन्सूनचा प्रभाव नसतो कारण त्याचे वारे आपल्याकडे जमिनीवरून वाहत येत असल्यामुळे ते कोरडे असतात. तरीही ऑक्टोबरचा पाऊस आपल्यासाठी उपयोगी आणि महत्त्वाचा असतो. एक तर धरणातील पाण्याचा साठा वाढतो. दुसरे म्हणजे तो जमिनीत ओलावा ठेवून जातो ज्यावर शेतकऱ्यांना रबी पिके काढता येतात. हिवाळ्यात जर पावसाच्या काही सरी पडल्या तर त्याही ओलाव्यात भर घालतात. सिंचनाचे पाणी उपलब्ध असल्यास तेही वापरता येते. बाजरीसारखी जाडीभरडी पिके रब्बी हंगामात लावली जाणारी पारंपरिक पिके आहेत.

सध्याची परिस्थिती

ऑक्टोबर महिना उन्हाळी आणि हिवाळी मॉन्सूनमधील स्थित्यंतराचा काळ म्हणता येईल. काही वर्षी तो कोरडा आणि उष्ण असतो तर काही वर्षी त्यात भरपूर पाऊस पडतो, जसे आता आपण पाहत आहोत. ऑक्टोबर २०२२ च्या पहिल्या पंधरवड्यात देशभरात सरासरीपेक्षा सुमारे ८० टक्के अधिक पाऊस पडला आहे. पण त्यापूर्वी यंदाचा मॉन्सून एकंदर देशभरात सरासरीपेक्षा ७ टक्के अधिक राहिला होता. अनेक धरणे पूर्णपणे भरली आहेत ही एक जमेची बाजू आहे. पण जूनपासून पडत राहिलेला पाऊस आता अनेकांना नकोसा वाटू लागला आहे. यंदाची दिवाळी पावसात साजरी करावी लागेल का, अशी शंका काहींच्या मनात आहे. हा हवामान बदल आहे, पूर्वी असे होत नसे, असेही बोलले जात आहे.

पण खरे तर मॉन्सूनच्या वार्षिक परिवर्तनाचा हा एक भाग आहे, की मॉन्सूनचा पाऊस कधी ऑक्टोबरपर्यंत रेंगाळतो तर कधी तो त्याची माघार लवकर आटोपतो. हवामान बदलाच्या संदर्भात शास्त्रज्ञांचे भाकीत हे आहे, की भविष्यातील पावसाळ्यात हलका पाऊस बरेच दिवस पडत राहण्याऐवजी तो थोडे दिवस पण अधिक तीव्रतेने पडेल. म्हणून हल्ली कुठेही मुसळधार पाऊस पडला, की तो इतका का पडला, ती ढगफुटी होती का, किती वर्षांचा कोणता उच्चांक मोडला गेला, असे नाना प्रश्‍न लगेच विचारले जातात. पण त्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे हवामान बदलात शोधणे किंवा सगळ्या घटनांमागे हवामान बदल असल्याचे मानणे तितके बरोबर नाही.

शहरी पूर

नदीच्या पाणलोट क्षेत्रात जर मॉन्सूनचा भरपूर पाऊस पडला, तर नदीला पूर येणे एक स्वाभाविक गोष्ट आहे. वातावरणातील काही कमी दाबाच्या क्षेत्रांना ‘मॉन्सून डिप्रेशन’ म्हणतात. त्यांच्या प्रभावाखाली नद्यांना पूर किंवा महापूर येतात. नदीकाठच्या लोकांना अतिशय त्रास सोसावा लागतो आणि त्यांच्या पिकांचे खूप नुकसान होते. आसाममधून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीला, बिहारमधून वाहणाऱ्या कोसी नदीला दरवर्षी पूर येत असतो.

पण अलीकडच्या काळात शहरी पूर ही नव्याने निर्माण झालेली एक समस्या आहे. पूर्वीसुद्धा मुंबईसारख्या महानगरात किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांत अतिवृष्टीच्या घटना कितीदा तरी घडलेल्या आहेत. पण हल्ली आपण पाहतो, की एकदोन तासांत सात-आठ सेंटिमीटर पाऊस जरी पडला तरी शहर जलमय होते, रस्ते पाण्याने भरतात, वाहतूक विस्कळीत होते, जनजीवन ठप्प होते. नुकताच, १७ ऑक्टोबरच्या रात्री, पुण्यात असा जोरदार पाऊस पडून गेला आणि लोकांची त्रेधा उडाली.

अशा प्रकारच्या अतिवृष्टीच्या घटनांमागे हवामान बदलाशिवाय इतर अनेक कारणेही आहेत. एक तर शहरांतील लोकसंख्या सातत्याने वाढत गेली आहे आणि ती अजूनही वाढत आहे. त्या मानाने पाणी वाहून नेण्याच्या प्रणालीत म्हणजे ड्रेनेज सिस्टिमचे आधुनिकीकरण व्हावे तेवढे झालेले नाही. दुसरे म्हणजे शहरातील वाढत्या लोकसंख्येसाठी घरे बांधण्याचे मोठे प्रकल्प राबवले जात आहे. पंचवीस तीस मजल्यांच्या टोलेजंग इमारती, काही समुद्रकिनाऱ्यावर, काही नदीच्या किनाऱ्यालगत, तर काही उंच डोंगरांवर बांधल्या जात आहेत. वाहनांना जलद गतीने जाता यावे म्हणून नवनवीन रस्ते बनवले जात आहेत.

काही जागी रस्ते उंचीवर आहेत आणि घरे व दुकाने खालच्या स्तरावर आहेत. शहरांतील मोकळ्या जागा नाहीशा होत आहेत आणि त्यांचे रूपांतर कॉंक्रीट जंगलात होत आहे. अशा परिस्थितीत पावसाचे पाणी जमिनीत जिरणार कसे? ते वाहून जाणार कुठे? मग थोडासाही पाऊस पडला, की शहरी जनजीवन अस्तव्यस्त होणे अपरिहार्य आहे.

अशा एकंदर परिस्थितीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे की, ऑक्टोबर महिना हा एक हवामानाच्या स्थित्यंतराचा काळ आहे. त्यात कोणत्या न कोणत्या कारणाने पाऊस पडतो. तो बहुधा वादळी स्वरूपाचा असतो. म्हणजे गडगडाट, विजेचा लखलखाट, जोरदार वारा, हे सगळे त्यात अपेक्षित असते.

गरजेपेक्षा जास्त पाऊस झाला तर शेतातून पाणी वाहून जाऊ देण्यासाठी काही तरी वाट असावी. महाराष्ट्रात तरी मागील काही वर्षांपासून ऑक्टोबर महिना सहसा कोरडा जात नाही, हे लक्षात घ्यावे. खरीप पिकांच्या कापणीची वेळ ठरवण्यासाठी किंवा रब्बी पिकांच्या निवडीसाठी या गोष्टी महत्त्वाच्या मानाव्यात आणि त्या दृष्टीने नियोजन करावे.

(लेखक ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com