Orange Management : शेतकरी नियोजन - संत्रा

विपुल चौधरी हे उच्चशिक्षित असून, गेल्या पाच वर्षांपासून संत्रा शेतीत तंत्रशुद्ध व्यवस्थापनावर भर देत आहेत. सध्या वातावरणातील बदलांचे मोठे आव्हान सर्वच संत्रा बागायतदारांना भेडसावत आहे.
Orange Management
Orange ManagementAgrowon

शेतकरी नाव : विपुल चौधरी

गाव : बोदड, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती

एकूण क्षेत्र : चार एकर (संपूर्ण संत्रा लागवड)

विपुल चौधरी हे उच्चशिक्षित असून, गेल्या पाच वर्षांपासून संत्रा शेतीत (Orange Farming) तंत्रशुद्ध व्यवस्थापनावर (Orange Management) भर देत आहेत. सध्या वातावरणातील बदलांचे (Climate Change) मोठे आव्हान सर्वच संत्रा बागायतदारांना भेडसावत आहे. अशा स्थितीमध्ये पिकाची ताकद वाढवण्यावर भर देत असल्याचे विपुलने सांगितले. त्यासाठी जमिनीला शेणखत आणि रासायनिक खत (Fertilizer) यांचे संतुलित व्यवस्थापन केले जाते.

त्याच प्रमाणे बागेत कीड रोगांचा प्रादुर्भाव तसेच फळगळती प्रभावीपणे रोखण्यासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब करतो. काही जमिनीचा प्रकार मध्यम असून, तिथे १६ बाय १६ फूट तर भारी जमिनीमध्ये अठरा बाय अठरा फूट असे लागवड अंतर ठेवले आहे. विपुल यांच्या शेतात सध्या नऊ वर्षाची ५५० झाडे आहेत.

सिंचन व्यवस्थापन

संत्रा बागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव सर्वाधिक होतो. त्या पार्श्‍वभूमीवर पाणी देण्याच्या पद्धतीत बदलाची शिफारस तज्ज्ञांद्वारे केली जाते. झाडांच्या मुळाशी किंवा बागांमध्ये पाणी साचल्यास अनेक बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. हे लक्षात घेऊन विपुल यांनी पाट पाणी पद्धतीमध्ये काही बदल केले आहेत.

प्रत्येक दहा झाडानंतर पाणी देण्यासाठी दांड (नाली) टाकला आहे. सामान्यतः शेतकरी बागेला पाट पाणी देताना अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यास शेवटच्या झाडापर्यंत पाणी पोहोचतच नाही. त्याऐवजी पहिल्याच रांगेतील झाडांपर्यंत ते राहते. पहिल्या रांगेत पाणी जास्त झाल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.

हे टाळण्यासाठी प्रत्येक दहा झाडांनंतर पाणी देण्याची पद्धती त्यांनी अंगीकारली आहे. एकच पाट न काढता वीस झाडे एकाच रांगेत असल्यास तीन टप्प्यांत त्यांना पाणी मिळते. संत्रा बागेत पाणी व्यवस्थापन हाच महत्त्वाचा घटक ठरतो. पाणी व्यवस्थापन प्रभावीपणे झाले तरच बाग कीड-रोगमुक्त राहते असे विपुल सांगतात.

आंबिया बहर ताण व्यवस्थापन

झाडांनी नैसर्गिक ताण देणे गरजेचे आहे. झाडांना ताण देण्यासाठी कोणत्याही संजीवकांचा वापर केला जात नाही. पाण्याच्या व्यवस्थापनातूनच सर्वाधिक पानगळ साधली जाते.

झाडावर पानांची संख्या जेवढी जास्त तेवढी फुलधारणा अधिक होते. पाने निरोगी आणि कार्यक्षम आहेत की नाहीत, याचे सातत्याने परीक्षण केले पाहिजे. त्यासाठी झाडाच्या पानांवर विशिष्ट नाली पडणे आणि पान नरम असणे अशा बाबींचे निरीक्षण उपयोगी ठरते.

फॉस्फरस झाडांमध्ये योग्य प्रमाणात साठवले गेल्यास फुटीलाही समस्या येत नाहीत. त्यासाठी नॅनो डीएपीचा वापर केल्यास त्याचा फायदा होतो.

खत व्यवस्थापन

संतुलित खत व्यवस्थापनासाठी रासायनिक खते महत्त्वाची ठरतात. मात्र टप्प्याटप्प्याने सेंद्रिय खतांचा वापर वाढवत नेणार आहे. त्यानुसार २० किलो कुजलेले शेणखत, एक किलो कार्बनयुक्त खत, एक किलो निंबोळी पेंड, २०० ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्य वापर करत आहे. जमिनीतील उपयुक्त जिवाणू कार्यरत करण्यासाठी त्यांना खाद्य म्हणून शेणखत, सेंद्रिय खते महत्त्वाची असतात.

झाडाला जमिनीमधून वर्षाला दोन वेळा सूक्ष्म अन्नद्रव्ये देतो. त्यामुळे पानांवर कमतरता दिसल्यानंतर फवारणीची गरज भासत नाही.

गेल्या दहा दिवसांमध्ये प्रत्येक झाडाला एक किलो कार्बनयुक्त खत आणि वीस किलो कुजलेले शेणखत दिले. त्यानंतर बागेला एक पाणी दिले.

असे आहे नियोजन

बागेमध्ये चांगल्या फुलधारणेसाठी वेळच्या वेळी कीडनाशकांच्या फवारण्याचे नियोजन असते. आवश्यकतेनुसार विद्राव्य खते, झिंक, १२:६१:० देणार आहे.

काही ठिकाणी हलकी जमीन असल्याने पाणी व्यवस्थापनावर सातत्याने भर द्यावा लागतो. त्या पार्श्‍वभूमीवर येत्या काळात दोन पाणी देण्याची नियोजन आहे.

सध्या झाड फुलोरा अवस्थेत आहे. या काळात फुलकिडे आणि कोळी यांचा प्रादुर्भावाची शक्यता असते. त्यासाठी निंबोळी अर्क व आवश्यकतेनुसार रासायनिक कीडनाशकाची फवारणी करणार आहे.

त्यापुढील काळात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रति झाड एक किलो सिलिकॉनयुक्‍त खत (५० टक्के) देण्याचे नियोजन आहे. यामुळे नत्र किंवा पालाश यांचा वापर न करताही फळगळ बऱ्यापैकी नियंत्रणात राहते.

गेल्या काही वर्षांपासून जून महिन्यात फळ तडकण्याची समस्या व तक्रारी वाढल्या आहेत. त्यासाठी बहुतांश शेतकरी कॅल्शिअम नायट्रेट, बोरॉन यांची फवारणी करतात. मात्र त्याऐवजी भारी जमीन असल्यास दहा मे पासून बाग ताणावर सोडावी. हलकी- मध्यम जमीन असल्यास पंधरा मे पासून ताण द्यावा. फळ तडकण्याच्या समस्येचे निराकरण होत असल्याचा विपूल यांचा अनुभव आहे. अगदी व्यवस्थित ताण दिलेल्या झाडाचे फळ तोडतानाही लवकर तुटत नसल्याचे दिसून येते.

बागेला पाणी देण्यापासून कीटकनाशकांच्या फवारणीचे एक नियोजन करतो. वर्षाला तीन फवारण्या घ्याव्या लागतात.

जून ते ऑगस्ट या पावसाळ्याच्या कालावधीत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढचो. त्या काळात बुरशीनाशकाची फवारणी (वर्षाला दोन) करतो.

वर्षाला सिलिकॉनची एक फवारणी करतो.

- विपुल चौधरी,

९५८८४६२२७२

(शब्दांकन : विनोद इंगोले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com