Organic Fertilizer : अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय, जिवाणू खते महत्त्वाची...

सेंद्रिय खतामुळे नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात. सेंद्रिय खतांमुळे आयन विनिमय क्षमता २० ते ३० टक्क्यांनी वाढते. जिवाणू खतामुळे सेंद्रिय पदार्थ कुजण्यास मदत होते.
Organic Fertilizer
Organic Fertilizer Agrowon

सुधा घोडके, स्नेहल गायकवाड

सेंद्रिय खतामध्ये (Organic Fertilizer) महत्त्वाची खते म्हणजे कंपोस्ट (Compost Fertilizer), शेणखत, गांडूळ खत (Wormy Compost), हिरवळीची खत (Green Manure), जैविक खत, माशांचे खत, खाटीकखान्यातील खत, हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादी.

नत्र पुरवठा

सेंद्रिय खतामुळे जमिनीत नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात. शेणखताव्यतिरिक्त कोंबडी खत, रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा पुरवठा करतात.

स्फुरद, पालाश

सेंद्रिय खतांमुळे विविध अवस्थेत स्फुरद, पालाश उपलब्ध होऊन झाडांमध्ये मुळांद्वारे शोषले जातात.

जमिनीचा सामू

सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल, विम्ल व क्षारयुक्त होत नाही.

कर्बाचा पुरवठा

कर्ब किंवा कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जिवाणूंना वाढीसाठी उपयोग होतो. हे जिवाणू झाडांना जमिनीतून अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात.

आयन विनिमय क्षमता

आयन विनिमय क्षमता म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती. सेंद्रिय खतांमुळे आयन विनिमय क्षमता २० ते ३० टक्क्यांनी वाढते. त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येते. झाडांना संतुलित पोषकद्रव्ये मिळतात.

पाणी धारण क्षमतेत वाढ

जमिनीला ०.५ टक्का ते १ टक्का सेंद्रिय पदार्थ मिसळल्यास पाणी धरून ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते. जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत जातात. वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरविल्यास जमिनीची उत्पादन क्षमता, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

सेंद्रिय खताचे फायदे

मातीतील कणांची रचना दाणेदार बनते, शिवाय रचना स्थिर राहण्यास मदत होते. जलधारणा शक्ती वाढते. भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारून सुपीकता वाढते.

मातीचे तापमान नियंत्रित ठेवणे शक्य होते. पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. हवा खेळती राहते, त्यामुळे मातीच्या कणांतील मूलद्रव्यांची अदलाबदल सहजरीत्या होते.

जमिनीतील असंख्य जिवाणूंची वाढ होते.हे जिवाणू विविध अन्नद्रव्ये, वनस्पतींना विद्राव्य व शोषून घेता येतील अशा स्थितीमध्ये उपलब्ध करून देतात.

Organic Fertilizer
Nutrient : चुनखडीयुक्त जमिनीत अन्नद्रव्य व्यवस्थापन

जमीन सुधारणा, उत्पादनवाढीसाठी जिवाणू खते

नत्र स्थिर करणारी जिवाणू खते

अ) सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जैविक खते

रायझोबियम

रायझोबियम जिवाणू द्विदल पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतात. या गाठींमध्ये हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर केले जाते.

रायझोबियम जिवाणू प्रति हेक्टरी ५० ते १५० किलो नत्र स्थिर करतात. या खतांच्या वापराने उत्पादनात १९ ते ६२ टक्के वाढ आढळून आली आहे.

रायझोबियम जिवाणूंचे पीकनिहाय गट आहेत. एका गटातील पिकासाठी उपयुक्त जिवाणू दुसऱ्या गटातील पिकासाठी फायदेशीर ठरत नाहीत. रायझोबियम जिवाणूंचा वापर करण्यापूर्वी ते कोणत्या पिकास शिफारस केले आहेत हे पाहावे. रायझोबियम जैविक खत तूर, मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, भुईमूग इ. द्विदल पिकांसाठी वापरले जाते. त्याचा पीकनिहाय तपशील पुढील तक्त्यात दिला आहे.

गट जिवाणू पिके

चवळी गट रायझोबियम सायसरी चवळी, भुईमूग, तूर, मटकी, उडीद, मूग, गवार, ताग, धैंचा इ.

सोयाबीन गट रायझोबिअम/ब्रॅडीरायझोबिअम जपोनिकम सोयाबीन

हरभरा गट रायझोबियम सायसरी हरभरा

वाटाणा गट रायझोबियम लेगुमिनोसेरम वाटाणा

घेवडा गट रायझोबियम फॅसीओली सर्व प्रकारचा घेवडा

अल्फा-अल्फा गट रायझोबियम मेलिलोटस लसूणघास, मेथी

बरसीम गट रायझोबियम ट्रायफोली बरसीम

Organic Fertilizer
Nutrient Management : पान, देठ परीक्षणाचे तंत्र जाणून करा अन्नद्रव्यांचे नियोजन

ब) असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जिवाणू खते

अॅझेटोबॅक्टर

हे जिवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. जिवाणू हवेतील नत्र घेऊन तो जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात.

एकदल तृणधान्य जसे ज्वारी, बाजरी, गहू, मका, कापूस, फळे व भाजीपाला पिकांसाठी अॅझेटोबॅक्टर जिवाणूंची शिफारस केली जाते.

अॅझेटोबॅक्टर जिवाणू सेंद्रिय पदार्थाच्या विकरणातून तयार होणाऱ्या ऊर्जेवर जगत असल्यामुळे या जिवाणूंच्या योग्य वाढीसाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असावे लागते.

अझोस्पिरिलम

अझोस्पिरिलम जिवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. हे जिवाणू हवेतील नत्र घेऊन तो जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात.

एकदल तृणधान्य जसे मका, बाजरी, गहू, भात, ज्वारी, फळे व भाजीपाला पिकांसाठी अझोस्पिरिलम जिवाणूंची शिफारस केली जाते. सर्वसाधारणपणे अझोस्पिरिलम जिवाणू प्रति हेक्टरी २० ते ४० किलो नत्र स्थिर करतात.

अझोस्पिरिलम जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ आढळून आली आहे.

अॅसिटोबॅक्टर

हे आंतरप्रवाही जिवाणू आहेत. अॅसिटोबॅक्टर जिवाणू शर्करायुक्त पिकांच्या मुळे आणि पिकामध्येही वाढतात. पिकामध्ये राहून ते हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात.

शर्करायुक्त पिकामध्ये अॅसिटोबॅक्टर जिवाणू प्रति हेक्टरी ३० ते ३०० किलो नत्र स्थिर करतात.

अॅसिटोबॅक्टर जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १० ते २० टक्के वाढ आढळून आली आहे. शर्करायुक्त पिके जसे की ऊस, रताळी, बटाटा, इत्यादीमध्ये वापरासाठी अॅसिटोबॅक्टर जिवाणूंची शिफारस केली जाते.

स्फुरद विरघळविणारी जैविक खते

महाराष्ट्रातील जमिनीमध्ये स्फुरदाची उपलब्धता कमी आहे.त्यामुळे रासायनिक खतांद्वारे स्फुरद दिले जाते. परंतु त्यापैकी फक्त २० ते २५ टक्के स्फुरद पिकांना उपलब्ध होते. उर्वरित ८० ते ७५ टक्के स्फुरद जमिनीत स्थिर होते, जे पिके घेऊ शकत नाहीत.

जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विरघळविण्याचे काम बॅसिलस मेगाटेरीएम सारखे स्फुरद विरघळविणारे जिवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध होते. हे जिवाणू प्रति हेक्टरी १५ ते २० किलो स्फुरद विरघळवतात.

स्फुरद विरघळविणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १० ते २५ टक्के वाढ होते.

पालाश उपलब्ध करणारी जैविक खते

महाराष्ट्रातील जमिनींमध्ये पालाश भरपूर प्रमाणात आहे. परंतु त्यापैकी बहुतांश पालाश हे पिकांना उपलब्ध होत नाही. जमिनीत स्थिर झालेले पालाश उपलब्ध करण्याचे काम बॅसिलस म्युसिलाजिनस सारखे पालाश उपलब्ध करणारे जिवाणू करतात. त्यामुळे स्थिर पालाश पिकांना उपलब्ध होते.

पालाश उपलब्ध करणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १० ते २५ टक्के वाढ आढळून आली आहे.

झिंक विरघळविणारी जैविक खते

महाराष्ट्रातील जमिनीमध्ये झिंक उपलब्धता कमी आहे.त्यामुळे पिकाच्या उत्पादनात घट दिसून येते.

जमिनीत स्थिर झालेले झिंक विरघळविण्याचे काम बॅसिलस स्ट्रिआटा सारखे झिंक विरघळविणारे जिवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर झिंक विरघळून पिकांना उपलब्ध होते.

झिंक विरघळविणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १० ते २५ टक्के वाढ होते.

मायकोरायझा

मायकोरायझा ही एक उपयुक्त बुरशी आहे. मायकोरायझा पिकाच्या मुळावर व मुळांमध्ये वाढते. ती झाडांच्या विस्तारित पांढऱ्या मुळांसारखे काम करते. त्यामुळे पिकांस अधिक क्षेत्रातून पाणी व अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.

स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शिअम, सोडिअम, जस्त व तांबे यांसारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यास मायकोरायझा पिकांना मदत करतात.

मायकोरायझा जैविक खतांच्या वापराने उत्पादनात २२ ते २५ टक्के वाढ होते.

जिवाणू गट

अ) घनरूप जिवाणू गट : (नत्र, स्फुरद व पालाश उपलब्ध करणारे जिवाणू)

ब) द्रवरूप जिवाणू गट : (नत्र, स्फुरद व पालाश उपलब्ध करणारे जिवाणू)

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी नत्र, स्फुरद व पालाश उपलब्ध करणाऱ्या जिवाणूंचा वापर करणे आवश्यक आहे. जिवाणू संघात उपरोक्त नत्र स्थिर करणारे जिवाणू, स्फुरद विरघळवणारे जिवाणू व पालाश उपलब्ध करणाऱ्या जिवाणूंचा समावेश असतो.

या जिवाणूंचे निर्जंतुक वाहकामध्ये मिश्रण करून जिवाणू संघ तयार केला जातो. जिवाणू संघ हा पीकनिहाय तयार करता येतो.

- सुधा घोडके, ९६२३२५५३०५

(कृषी सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com