Mushroom Farming : धिंगरी अळिंबी उत्पादन तंत्रज्ञान

निसर्ग आश्‍चर्यकारक आहे, हेच खरे. पावसाळ्यात निसर्गतः लाकडावर, उकिरड्यावर किंवा खताच्या खड्ड्यावर आणि शेतातही छत्रीसारख्या उगवणाऱ्या विविध रंगांच्या आणि वेगवेगळ्या आकाराच्या बुरशी आपल्याला दिसतात.
Oyestor Mushroom
Oyestor MushroomAgrowon

कु. नम्रता राजस, डॉ. नंदकिशोर हिरवे

निसर्ग आश्‍चर्यकारक आहे, हेच खरे. पावसाळ्यात निसर्गतः लाकडावर, उकिरड्यावर किंवा खताच्या (Fertilizer) खड्ड्यावर आणि शेतातही छत्रीसारख्या उगवणाऱ्या विविध रंगांच्या आणि वेगवेगळ्या आकाराच्या बुरशी (Fungal) आपल्याला दिसतात. त्यांना ग्रामीण भागात ‘टेकोडे’ ‘कुत्र्याची छत्री’, ‘सात्या’ अशा विविध नावांनी ओळखले जात असले, तरी प्रामुख्याने ती अळिंबी (Mushroom) (किंवा इंग्रजीमध्ये अळिंबी) म्हणतात.

जगामध्ये अळिंबीच्या १२ हजारांपेक्षा अधिक जाती आहेत. त्यात विषारी आणि बिन विषारी असे प्रकार आढळून येतात. अळिंबी ही सामान्यतः कुजणाऱ्या, टाकाऊ अशा सेंद्रिय पदार्थावर उगवते. तिला मातीची गरज लागत नाही. सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसल्यामुळे एका खोलीमध्ये अळिंबीचे उत्पादन घेता येते.

अळिंबीचे गुणधर्म ः

१) अळिंबी हे एक उच्च प्रथिनयुक्त अन्न असून, त्यात जीवनसत्त्व ब-१, ब -२ आणि ब-१२ भरपूर प्रमाणात आढळते. अमिनो आम्ल, कर्बोदके, तंतुमय पदार्थ इ. भरपूर प्रमाणात असल्यामुळे पोषक अन्न मानले जाते.

२) रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करणारे घटक असल्याने मधुमेही व्यक्तीसाठी उपयुक्त.

३) अळिंबीमध्ये क जीवनसत्त्व असल्यामुळे नियमित सेवनाने स्कर्व्ही रोगापासून बचाव होतो.

४) तंतुमय पदार्थ, फोलिक ॲसिड हे दोन्ही घटक पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात.

५) शरीराच्या वाढीसाठी व सुरक्षिततेसाठी आवश्यक अशी १० अमिनो आम्ले अळिंबीमध्ये नैसर्गिकरीत्या उपलब्ध आहेत.

अळिंबीचे प्रकार

१) बटण अळिंबी

-ॲग्रीकस जातीच्या अळिंबीस गोलाकार आकारामुळे ‘बटण अळिंबी’ असेही म्हणतात.

-ही अळिंबी दिसायला पांढरीशुभ्र आणि आकर्षक दिसते.

-अळिंबीच्या उत्पादनासाठी वातानुकूलित जागेची आवश्यकता असते. त्यासाठी वातावरण नियंत्रित करावे लागते.

-पॉलिथिन पिशवीचे ५ ते २० सें.मी. रुंदीचे कप्पे तयार केले जातात. दोन कप्प्यांतील अंतर ३० ते ४० सें.मी. ठेवत एका बंदिस्त खोलीत रचना केली जाते.

२) मिल्की अळिंबी (दुधी)

- ‘केलोसायबा इंडिका’ या जातीची अळिंबी दुधाप्रमाणे पांढरीशुभ्र दिसत असल्याने ‘दुधी अळिंबी’ असे म्हणतात.

-या अळिंबीची लागवड धिंगरी अळंबी प्रमाणे केली जाते.

-या अळिंबीचे देठ लांब आणि घुमट छत्रीप्रमाणे असते.

३) धिंगरी किंवा शिंपला अळिंबी

-ही अळिंबी ‘फ्ल्यूरोट्‌स’ कुळातील असून, शिंपल्याप्रमाणे दिसते.

- धिंगरी अळिंबीच्या वाढीसाठी अनुकूल तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअस आणि आर्द्रता ८० ते ९० टक्के आवश्यक असते.

- असे वातावरण असलेल्या ठिकाणी वर्षातील ८ ते १० महिने या अळिंबीचे उत्पादन घेता येते.

Oyestor Mushroom
पदवीधर महिलेची मशरूम निर्मिती ठरतेय मार्गदर्शक

या अळिंबीचे विविध रंग आढळून येतात.

३ अ) फ्ल्यूरोटस साजोरकाजू (Pleurotus Sajorkaju)

- या जातीचा रंग करडा असतो

- यासाठी लागणारे आवश्यक तापमान २० अंश सेल्सिअस ते ३० अंश सेल्सिअस असते.

- साजोरकाजू या जातीसाठी आर्द्रता ८० टक्के ते ९० टक्के असावी.

- याचा आकार शिंपल्यासारखा असून, दिसण्यास आकर्षक आणि खाण्यास चविष्ट असते.

३ ब) फ्ल्यूरोटस डाजमोर (Pleurotus Djamor)

- या जातीच्या अळिंबीचा रंग गुलाबी असतो.

- यासाठी लागणारे आवश्यक तापमान २१ अंश सेल्सिअस ते ३५ अंश सेल्सिअस.

- या जातीसाठी लागणारी आर्द्रता ६५ टक्के ते ९० टक्के असावी.

- या मशिनची उगवण गुच्छ पद्धतीने होते.

५) खाताना किंचित रबरी पोत असल्याने वेगळीच चव मिळते.

३ क) फ्ल्यूरोटस फ्लोरिडा (Pleurotus Florida)

- या जातीचे अळिंबी पांढऱ्या रंगाचे असतात.

Oyestor Mushroom
स्पेंट मशरूम कंपोस्टपासून खत निर्मिती

- फळे काढणीस वेळ झाला तर फळे मऊ पडून काळे पडतात.

- या जातीचे फळे आकाराने मोठे असतात.

- यासाठी लागणाऱ्या आवश्यक तापमान २५ अंश सेल्सिअस ते ३० अंश सेल्सिअस आणि आर्द्रता ८० ते ९० टक्के इतकी लागते.

३ ड) फ्ल्यूरोटस ओस्ट्रीटस (Pleurotus Ostreatus)

- या जातीचे अळिंबी अंकुर अवस्थेत निळ्या रंगाची व नंतर फिकट दुधी रंगाची होतात.

- गुच्छ पद्धतीने उगवतात.

- खाण्यास चविष्ट असते.

- या जातीसाठी तापमान २० अंश सेल्सिअस ते ३० अंश सेल्सिअस आणि आर्द्रता ८० टक्के ते ९० टक्के आवश्यक असते.

अळिंबीचे उत्पादन तंत्र

१) जागेची निवड ः

यासाठी ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होईल अशा निवाऱ्याची गरज असते. त्यासाठी कच्चे किंवा पक्क्या बांधकामाची खोली किंवा झोपडी आवश्यक असते. अशा खोलीमध्ये तीव्र सूर्यप्रकाश येऊ नये. तसेच हवा उत्तम प्रकारे खेळती राहील, असे पाहावे.

Oyestor Mushroom
Mushroom Farming : उत्तराखंडची मशरूमची शेती पाहिलीय का?

२) माध्यम ः

धिंगरी अळिंबीच्या वाढीसाठी सेंद्रिय आणि पिष्टमय पदार्थ अधिक असलेल्या घटकांची आवश्यकता असते. त्यात शेतातील पिकाचे अवशेष उदा. सोयाबीन कुटार, गव्हाचा भुस्सा, गवताचा पेंढा, काढलेले गवत, कडबा कुटार, इ. घटकांचा वापर करता येतो.

३) वातावरण ः

लागवडीसाठी नैसर्गिक तापमान २० ते ३० अंश सेल्सिअस आणि हवेतील आर्द्रता ६५ टक्के ते ९० टक्के असणे गरजेचे असते. प्रकारानुसार असलेल्या थोडाफार फरक लक्षात घ्यावा. यासाठी जमिनीवर आणि शेडच्या चारही बाजूंनी गोणपाट लावून, ते सतत ओले राहण्यासाठी स्प्रे पंप किंवा पाणी फवारणीची व्यवस्था करावी. त्यामुळे तापमान व आर्द्रता नियंत्रित करण्यास मदत होते.

४) काड तयार करणे ः

निवड केलेल्या माध्यमाचे २ ते ३ सें.मी. लांबीचे बारीक तुकडे पोत्यामध्ये भरावे. स्वच्छ थंड पाण्यात आठ ते दहा तास भिजत घालावेत. काडाचे पोते थंड पाण्यातून काढून त्यातील पाण्याचा निचरा होईल, अशा उंच जागेवर ठेवा.

५) काड निर्जंतुकीकरण ः

अ) वाफेने निर्जंतुकीकरण ः भिजवलेल्या काडाचे पोते ८० अंश सेल्सिअस तापमानाच्या गरम पाण्यात एक तास बुडवून ठेवावे किंवा भिजवलेले काडाचे पोते ८० अंश सेल्सिअस तापमानाच्या वाफेवर १ तास ठेवून निर्जंतुक करावे. काड थंड होण्यासाठी पोत्यासह सावलीत ठेवावे.

ब) रासायनिक निर्जंतुकीकरण ः यामध्ये कार्बेन्डाझीम ७.५ ग्रॅम आणि फॉरमॅलीन १२५ मिलि प्रति १०० लिटर पाणी या द्रावणामध्ये काडाचे पोते १६ ते १८ तास भिजत ठेवावे. त्यानंतर पोत्यासह त्या काडातून द्रावणाचा निचरा होण्यासाठी ४ ते ५ तास उंचावर ठेवावे.

६) पिशव्या भरणे.

- काड भरताना प्रथम पिशवीच्या तळाला अळिंबीचे बियाणे टाकावे.

- नंतर ४ ते ५ सेंटिमीटर जाडीचा काडाचा थर द्यावा. त्यावर अळिंबीचे बियाणे बांगडी पद्धतीने कडेने पसरावे.

- प्रत्येक थराला पंधरा ते वीस ग्रॅम बिया टाकाव्यात.

- काड आणि बियाण्यांचे ४ ते ५ थर भरावे. पिशवी भरल्यानंतर दोऱ्याने पिशवीचे तोंड घट्ट बांधावे.

- पिशवीच्या पृष्ठभागावर सुई किंवा टाचणीच्या साह्याने ३० ते ४० बारीक छिद्रे पाडावीत.

- अशा प्रकारे व्यवस्थित भरलेल्या पिशव्या अंधाऱ्या खोलीत हँगिंग पद्धतीने किंवा रॅकमध्ये १५ ते १८ दिवस ठेवाव्यात.

- शेड किंवा खोलीतील तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअस ठेवल्यास बुरशीची पांढऱ्या रंगाची वाढ सर्व काडावर होताना दिसून येते. ती दिसल्यानंतर प्लॅस्टिक पिशवी काढून टाकावी

- हायग्रोमीटरच्या साह्याने खोलीतील आर्द्रता सातत्याने तपासत राहावे. आर्द्रता ८५ टक्क्यांपेक्षा कमी आढळल्यास बाजूचे गोणपाट ओले करणे, खोलीमध्ये २ ते ३ वेळा स्प्रे पंपाच्या साह्याने पाण्याची फवारणी करावी. मातीने सारवलेली जमीन असल्यास जमिनीवर आणि भिंतीवर पाणी शिंपडावे.

- २१ दिवसांनंतर बेडवर पिनहेड दिसू लागतात. २ ते ३ दिवस फळे पूर्ण वाढून अळिंबी काढणीस येते.

अळिंबीवरील रोग

अळिंबी हे अतिशय नाशीवंत व अल्पमुदतीचे पीक आहे. एकाच काडाचा वारंवार वापर करणे, काडाचे व्यवस्थित निर्जंतुकीकरण न झाल्यामुळे त्यावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसेच तापमान व आर्द्रता यामध्ये मोठा फरक पडल्यास नैसर्गिकरीत्याही त्यावर रोग व किडींचा प्रादुर्भाव होतो.

ग्रीन मोल्ड - हा रोग ट्रायकोडर्मामुळे होणारा रोग असून, काडावर हिरवट रंगाचे डाग पडून ते कुजते.

उपाय :

१) काम करतेवेळी हात आणि काडाचे निर्जंतुकीकरण योग्य प्रकारे करणे आवश्यक असते.

२) बुरशीयुक्त पिशव्या त्वरित नष्ट कराव्यात.

३) बेडवर १ मिलि प्रति लिटर फॉर्मलीनची फवारणी करावी.

विषारी काळ्या छत्र्या - हा रोग कृपिन्समुळे होतो. काळ्या छत्र्या दिसताच हाताने मुळांसह काढून नष्ट कराव्यात.

उपाय ः

१) काडाचे निर्जंतुकीकरण व्यवस्थित करावे.

२) बेडवर जास्त पाणी मारू नये.

३) काड्या छत्र्या दिसतात हाताने मुळासह काढून नष्ट कराव्यात.

काढणी

१) पहिली काढणी पिशवी भरल्यापासून २० ते २५ दिवसांत करावी.

२) काढणीपूर्वी एक दिवस आधी पाणी फवारू नये. त्यामुळे अळिंबी कोरडी व तजेलदार राहते.

३) अळिंबीच्या कडा आत वळण्यापूर्वी काढणी करावी. अळिंबीच्या देठाला धरून हलक्या हाताने किंचित पिरगळल्यास निघून येते.

४) दुसरे पीक घेण्यापूर्वी त्याच बेडवर हलका हात फिरवावा. कुजलेल्या, मोकळे झालेल्या काडाचा पातळसा थर अलगद काढावा.

कु. नम्रता राजस, ९११९४२३७९०

(विषय तज्ज्ञ -गृहविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, सांगवी -रेल्वे, यवतमाळ-२.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com