मित्रकीटक, सूक्ष्मजीव आधारित कीटकनाशकांचा वापर

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, त्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच अन्न रासायनिक अवशेमुक्त असण्यासाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज झाली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्याद्वारे त्यादृष्टीने मित्रकीटक व मित्रसूक्ष्मजीवांवर आधारित विविध जैविक कीडनाशकांची निर्मिती केली जाते. त्यांचा वापर शिफारसीनुसार करून विविध पिकांतील किडींचे प्रभावी नियंत्रण करणे शक्य आहे.
Crop Protection
Crop Protection Agrowon

डॉ. बाबासाहेब बडे, डॉ. एन.डी. तांबोळी, डॉ. गजानन लोळगे, डॉ. चिदानंद पाटील

भारतामध्ये १९६६ मध्ये हरितक्रांतीचा पाया रोवला गेला. त्यात प्रामुख्याने नवीन संकरित बियाणे, रासायनिक खते, आणि यांत्रिक उपकरणे वापरण्यावर भर देण्यात आला. परिणामी

रासायनिक निविष्ठा व त्यातही कीडनाशकांचा वापर अनियंत्रितपणे वाढला. त्यामुळे पुढील परिणाम झाले.

-हवा, जमीन आणि पाणी हे घटक प्रदूषित झाले.

-किडींमध्ये कीडनाशकाप्रति प्रतिकारशक्ती वाढू लागली.

-परागीभवनाचे कार्य करणाऱ्या मधमाशीसारख्या उपयोगी तसेच परोपजीवी व परभक्षी मित्रकीटक कमी झाले

-कीडनाशकांच्या विषबाधेमुळे जगात दरवर्षी मानवहानी होऊ लागली. कीडनाशक आईच्या दुधातून बाळाच्या शरीरात जाऊ लागले. फळे आणि भाजीपाल्यांमधील विषारी अवशेषांमुळे विविध गंभीर आजार वाढले.

ही सर्व परिस्थिती पाहता पर्यायी कीड नियंत्रण पद्धती वापरण्यास सुरवात झाली. त्यामध्ये जैविक नियंत्रण व्यवस्थापन पध्दतीचा समावेश होतो.

जैविक कीड नियंत्रण पद्धती

हे एकात्मिक कीड व्यवस्थापनामधील महत्त्वाचे अंग आहे. परोपजीवी तसेच परभक्षी मित्र कीटक आणि मित्र सूक्ष्मजीवांचा म्हणजेच या सर्व जैविक घटकांचा शत्रू कीटक नियंत्रणासाठी वापर करणे म्हणजे जैविक कीड नियंत्रण होय. यात तीन प्रकारांचा समावेश होतो.

१-परोपजीवी कीटक: हे किडीपेक्षा लहान, चपळ तसेच असंख्य असून त्यांच्या अंगावर

किंवा अंगात राहून हळूहळू त्यांना खातात आणि किडीस मारतात. यजमान किडी मरायला टेकल्यावर हे परोपजीवी कीटक बाहेर पडून दुसरे यजमान कीटक उपजीविकेसाठी शोधतात. त्यामुळे किडींची संख्या कमी होत जाते. उदाहरणार्थ- पतंग वर्गीय किडींच्या अंड्यावर उपजीविका करून त्यांना मारणारा ट्रायकोग्रामा कीटक.

२-परभक्षी कीटक- हे किडीपेक्षा मोठे आणि सशक्त असतात. ते किडींची सिंहांसारख्या हिंस्र प्राण्याप्रमाणे शिकार करतात आणि त्यावर उपजीविका करतात. एक परभक्षी

कीटक त्यांच्या जीवनात बऱ्याच किडींचा नायनाट करतो. उदा. रस शोषणारा मावा,

तुडतुडे, पांढरी माशी, फूलकिडे आदींना खाणारा क्रायसोपा. तसेच पिवळसर, लाल रंगाचे

अंगावर ठिपके असलेले, डाळीच्या आकाराचे लेडीबर्ड भुंगेरे

३-सूक्ष्मजीव- मानव आणि प्राण्यांप्रमाणे किडीमध्ये भयंकर साथीचे रोग पसरतात. त्यामुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होते. अशा साथीच्या रोगकारक सूक्ष्मजीवांचे प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणात उत्पादन करता येते. त्यांच्याद्वारे जैविक कीडनाशके तयार होतात. यामध्ये फक्त किडीमध्ये रोगाची साथ पसरविणाऱ्या सूक्ष्मजीवांचा वापर होतो आणि त्यामुळे इतरांना कोणताही धोका नसतो. उदा. घाटेअळी, केसाळ अळी आदींमध्ये न्युक्लिअर पॉलिहेड्रोसीस व्हायरस (विषाणू) मुळे होणारे साथीचे रोग.

शाश्वत व सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त कीडनाशके

सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त परोपजीवी कीटक आणि सात हजारांपेक्षा जास्त परभक्षी कीटकांच्या प्रजाती आहेत. तसेच पाचशेपेक्षा जास्त विषाणू, जिवाणू आणि इतर रोगांच्या प्रजाती किडींचे शत्रू म्हणून कीटक विश्वात कार्यरत आहेत. त्यापैकी जैविक कीडनाशके म्हणून विकसित झालेल्या घटकांची निर्मिती व पुरवठा कृषी विद्यापीठे आणि खासगी कंपन्यांद्वारे केला जात आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्याद्वारे विकसित केलेली उपयुक्त जैविक कीडनाशके पुढीलप्रमाणे.

१) फुले ट्रायकोकार्ड :

यात पोस्टकार्ड सारख्या जाडसर (११ x १७ सेंमी) कागदावर धान्यामध्ये जाळी करणाऱ्या पतंगाची सुमारे १८ हजार ते दोन लाख अंडी चिटकवलेली असतात. त्यामध्ये ट्रायकोग्रामा नावाचा अति चिमुकला म्हणजे मुंगीच्या एक चतुर्थांश इतका लहान परोपजीवी कीटक असतो. या कार्डचे २० तुकडे होतात. एक गुंठा क्षेत्रात एक तुकडा वा पट्ट्या म्हणजे १० मीटरच्या आडव्या उभ्या अंतरावर स्टेपलरच्या साह्याने पानाखाली टाचतात. यांचा भात, मका, उसावरील खोड किडी, कपाशीवरील बोंड अळ्या, भेंडी, टोमॅटो तसेच वांगीवरील फळे पोखरणाऱ्या किडींच्या अंड्यांचा नाश करण्यासाठी उपयोग होतो. म्हणजे कार्डच्या एका तुकड्यातून सुमारे एक हजार परोपजीवी कीटक बाहेर पडून ते किडीच्या अंड्यातच त्यांची अंडी घालून त्यात वाढतात. अशा प्रकारे किडींच्या अंड्याचा नाश होतो. हेक्टरी साधारण कपाशीसाठी १० तर अन्य पिकांसाठी ३.५ कार्डस प्रति प्रसारणासाठी वापरतात. अशी ४ ते ६ प्रसारणे एका आठवड्याच्या अंतराने करावयाची असतात. या काळात रासायनिक कीडनाशकांचा वापर करू नये. प्रति कार्डची किंमत ५० ते ७० रुपये असते. कार्ड घेताना परोपजीवी निघण्याची तारीख तपासून पाहावी.

Crop Protection
Crop Protection : उष्णतेत पिकाची सहनशिलता वाढवण्यासाठी होत आहेत प्रयत्न

२) क्रायसोपर्ला (मावा भक्षी कीटक) :

हा परभक्षी कीटक आहे. पतंग हिरव्या रंगाचे एक सेंमी लांबीचे व पारदर्शक जाळीदार हिरवे पंख असलेले आढळतात. त्यास मावा खाणारा सिंह असेही म्हणतात. हे कीटक कपाशी, भाजीपाला, गहू, ज्वारी आदी पिकांच्या पानांवर दोन मिलिमीटर उंच चिमुकल्या दांडीच्या फुग्यासारखी अंडी घालतात. या अंड्यांतून पाण्यातील मगरीसारखी पण चिमुकली १ मिमी. लांबीची अळी बाहेर पडते. ती मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, पतंगवर्गीय किडींची अंडी खाऊन उपजीविका करते आणि किडींची संख्या कमी करते. हे कीटक अंडी स्वरूपात उपलब्ध होतात. त्यांची अंडी लाकडी भुश्‍शात मिसळलेली अगर कार्डवर लावलेली असतात. ती अलगद पानांवर भुश्‍शासोबत टाकतात किंवा कार्डचे तुकडे करून पानाखाली टाचतात. एक ते दीड महिन्यांच्या पिकावर हेक्टरी ५००० अंडी सोडावीत. म्हणजे पीकवाढीबरोबर त्यांची संख्या वाढत जाऊन रस शोषणाऱ्या किडींची संख्या कमी होत राहते.

३) क्रिप्टोलिमस (ऑस्ट्रेलियन लेडीबर्ड भुंगेरे)

फळझाडांवरील पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी या कीटकांचा वापर होतो. त्याचे डोके लालसर असते. पंख तपकिरी काळसर असून, मसुराच्या डाळीएवढा भुंगेरा असतो. फळबागेत पिठ्या ढेकणाचा उपद्रव सुरू झाल्यावर १५०० भुंगेरे प्रसारित करावेत. पिठ्या ढेकणाच्या द्राक्षवेली, पेरू, संत्रा, मोसंबी, डाळिंब, सीताफळ या फळझाडांवरील वसाहती शोधून हे भुंगेरे त्यात त्यांची अंडी घालतात. या अंड्यांतून पांढऱ्या मऊ केसाळ लंबगोल अळ्या निघून त्या पिठ्या ढेकणांची वसाहत खाऊन स्वच्छ करतात. त्या अळ्यांच्या अंगावरील केस पांढऱ्या टर्किश टॉवेलच्या धाग्यासारख्या दिसतात. भुंगेऱ्याऐवजी अळ्या प्रसारित करावयाच्या असल्यास फळझाडांवरील पिठ्या ढेकणाच्या वसाहतीमध्ये त्या सोडाव्यात. या काळात रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये.

Crop Protection
Crop Protection : ‘फेरोमोन ट्रॅप’साठी पूर्ण अनुदान देणार

४) हेलिओकिल (एचएनपीव्ही)

हरभऱ्यावरील घाटे अळी बहुभक्षी आहे. तिची अमेरिकन बोंड अळी, टोमॅटोवरील फळे पोखरणारी अळी, तुरीच्या शेंगा खाणारी अळी, ज्वारीच्या कणसातील अळी, फुले खाणारी अळी, मिरची पोखरणारी अळी अशी विविध नावे आहेत. एकूण वापरल्या जाणाऱ्या रासायनिक कीडनाशकापैकी २० टक्क्यांपेक्षा जास्त कीडनाशके शेतकरी या अळीसाठी वापरतात. तरीही या किडीचे समाधानकारक नियंत्रण होत नसल्याने सध्या जैविक कीडनाशक हा सर्वांत चांगला पर्याय आहे. घाटे अळीस न्यूक्लिअर पॉलिहेड्रोसिस व्हायरस या विषाणूंमुळे रक्तपेशीनाशक नावाचा भयंकर साथीचा रोग होतो. याच विषाणूवर आधारित हेलिओकिल हे कीटकनाशक आहे. अळ्या एक सेंमीपेक्षा लहान असताना प्रादुर्भावित पिकांवर १ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे विषाणू रोगाची साथ पसरून अळीचे प्रभावी व दीर्घकाळ नियंत्रण होते. एका पिकावर एक ते दोन फवारण्या पुरेशा असतात. हेक्टरी अर्धा लिटर हेलिओकिल फवारणीसाठी लागते. या विषाणूमुळे घाटे अळी व्यतिरिक्त अन्य कोणत्या सजीवास धोका नाही.

५) मॅजिक (एसएलएनपीव्ही)

पाने खाणाऱ्या बहुपीक भक्षी स्पोडोप्टेरा लिट्युरा या पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी याच विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर करता येतो. मॅजिक असे त्याचे नाव आहे. एरंडी, सोयाबीन, कोबी, आणि अन्य भाजीपाला पिकांत त्याचा वापर करता येतो. प्रति पिकात एक ते दोन फवारण्या केल्याने दीर्घकाळ संरक्षण होते. नॅपसॅक किंवा एचटीपी पंपासाठी १० मिलि मॅजिक आणि एक ग्रॅम नीळ प्रति १० लिटर पाण्यात मिसळून हेक्टरी ५०० ते १००० लिटर द्रावण तयार करावे. ‘पॉवर स्प्रेअर’साठी ३० मिलि आणि ३ ग्रॅम नीळ प्रति १० लिटर पाण्यात मिसळून हेक्टरी २०० ते ३५० लिटर द्रावण तयार करावे. पिकावर स्पोडोप्टेरा अळी दिसल्यावर ते फवारावे. मॅजिक मिसळण्यापूर्वी बाटली हलवावी. अळ्या लहान असताना किंवा शक्यतो तिसऱ्या प्रहरी फवारणी करावी.

६- फुले ट्रायकोडर्मा प्लस

कपाशी, तूर, हरभरा, भोपळा, काकडी, कारली, कलिंगड, डाळिंब, संत्रा, मोसंबी, द्राक्षे, ऊस, आले, भेंडी, टोमॅटो, वांगी, मिरची, मेथी, पालक, लसूण या पिकांत बुरशी व सूत्रकृमींचा उपद्रव होतो. त्यामुळे झाडांची मुळे खराब होतात. झाडास अन्नपाणी मिळत नाही. झाड टोकाकडून मुळाकडे हळूहळू सुकते. यास मर रोग असे म्हणतात. झाड बहरात असताना रोग वेगाने पसरून अतोनात नुकसान होते. त्याच्या नियंत्रणासाठी मूळकुज बुरशीनाशक तसेच सुत्रकृमी नाशक ट्रायकोडर्मा प्लस हे मित्रबुरशीयुक्त जैविक रोगनाशक उपयोगी आहे. पाच ग्रॅम प्रति बियाण्यास चोळून लगेच लागवड करावी. त्यानंतर पाण्याची पाळी द्यावी. पीक एक महिन्याचे झाल्यानंतर तसेच फळबागांमध्ये बहर धरताना वापर करतेवेळी हेक्टरी ५ किलो पावडर प्रति एक हजार लिटर पाणी असे द्रावण तयार करावे. पेरणीयुक्त पिकात हे द्रावण प्रति झाड १५ ते २५ मिलि तर फळपिकांत प्रति झाड एक लिटर असे वापरावे. त्वरित पाण्याची पाळी द्यावी. त्यामुळे मर रोगाचे नियंत्रण होते.

७) फुले मेटाऱ्हायझीयम

सूर्यफूल, बाजरी, ऊस या पिकांत खरिपात येणाऱ्या हुमणी अळीच्या बंदोबस्तासाठी या घटकाचा प्रभावी वापर करता येतो. खरिपातील भाजीपाला व फळपिकांवरील पिठ्या ढेकूण, पांढरी माशी, मावा, फूलकिडे, तुडतुडे आदींचे नियंत्रणही या घटकाद्वारे होते. मेटाऱ्हायझीयम मित्रबुरशी हुमणी अळीच्या शरीरात शिरून त्यावर उपजीविका करते. या बुरशीच्या संपर्कात आलेली अळीची भूक मंदावते व १० ते १५ दिवसांत ती मरण पावते.

वापरण्याची पद्धत :

१) प्रति एकरी ऊस पिकासाठी ८ किलो फुले मेटाऱ्हायझीयम शेणखतात मिसळून ८ ते १०

आंबवून उसाच्या सऱ्यांत वापरावे.

२) पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून वापसा अवस्थेत उसाच्या खोडात आळवणी करावी.

८) फुले बगीसाइड (व्हर्टिसिलीयम लेकॅनी):

हे जैविक कीडनाशक मावा, पांढरी माशी, फूलकिडे, पिठ्या ढेकूण, खवले कीड आणि कोळीच्या

नियंत्रणासाठी उपयोगी आहे. ५० ते ६० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून त्यात ५० मिलि. दूध मिसळावे व प्रादुर्भावग्रस्त पिकावर फवारावे. तीन दिवसांनंतर यातील व्हर्टिसिलीयम बुरशीचे बीजकण किडीच्या अंगात आणि अंगावर वाढतात. ही बुरशी विषारी द्रव्य सोडून किडीस मारते. सीताफळ आणि द्राक्षावरील पिठ्या ढेकूण व अन्य पिकांवरील रस शोषणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी १ ते २ किलो प्रमाणात पुरेशी ओल असताना वापरावे.

९) बीटी जिवाणू (बॅसिलस थुरिंजेन्सिस)

पतंगवर्गीय किडी म्हणजे बोंड अळ्या, शेंगा पोखरणाऱ्या अळ्या यांचे नियंत्रण बीटी जिवाणू पावडरीद्वारे करता येते. हेक्टरी १ किलो प्रति ५०० लिटर पाणी याप्रमाणे त्याचा वापर करावा. अमेरिकेत ८० टक्के जैविक कीडनाशके वापरली जातात. त्यापैकी बहुतांश वापर बीटी जिवाणूजन्य कीटकनाशकांचा होतो.

डॉ. बडे, डॉ. तांबोळी व डॉ. लोळगे हे कृषी महाविद्यालय पुणे येथे कार्यरत आहेत. तर डॉ. चिदानंद पाटील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कीटकशास्त्र विभागप्रमुख आहेत.

संपर्क ः डॉ. बाबासाहेब बडे, ९४२३०५०४५८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com