Grape Management : दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी घडसंख्या नियोजन

दर्जेदार गोड द्राक्ष उत्पादन घेण्याकरिता घड संख्या नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. द्राक्षाचे उत्पादन सर्वत्र वाढले असून बाजारात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात द्राक्ष येतात.
Grape
Grape Agrowon

दर्जेदार गोड द्राक्ष उत्पादन (Grape Production) घेण्याकरिता घड संख्या नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. द्राक्षाचे उत्पादन सर्वत्र वाढले असून बाजारात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात द्राक्ष येतात. त्यामुळे बाजारभाव (Grape Market Rate) पडतात. ग्राहक चांगल्या द्राक्षांना जादा दराने देखील खरेदी करतात. त्यामुळे हलक्या दर्जाची द्राक्षाची लवकर विक्री होत नाही आणि तुलनेने दरही कमी मिळतात.

अशावेळी द्राक्षाचा दर्जा सुधारणे क्रमप्राप्त ठरते. काढणीनंतर मोकळ्या वातावरणात शीतगृहाशिवाय (कोल्ड स्टोअरेज) ४ ते ६ दिवस चांगली राहणारी टिकाऊ गोड व चवदार द्राक्ष काही काळ चांगली राहतात. अशी द्राक्ष तयार करण्यासाठी घड संख्येचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. तसेच सिंचन व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, कॅनॉपी व्यवस्थापन, संजीवके व्यवस्थापन, कीड-रोग व्यवस्थापन या बाबी महत्त्वाच्या आहेत.

Grape
Grapes Crop : द्राक्षाला बदलत्या वातावरणा धोका

कॅनोपीनुसार घड संख्या नियोजन

 मंडप पद्धतीच्या किंवा वाय पद्धतीच्या मांडवात दुपारचा सूर्यप्रकाश पानांमधून (२५) खाली जमिनीवर पडतो. साधारण ७५ टक्के सूर्यप्रकाश पानांवर पडते. अशा बागेतून दर्जेदार मालाचे एकरी १२ टन उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. मात्र, वेलीवर कमी पाने असतील व ५० टक्के सूर्यप्रकाश जमिनीवर पडत असेल तर एकरी ९ ते १० टन उत्पादन घेणे योग्य राहील एवढीच घड संख्या ठेवणे आवश्यक आहे. तरच दर्जेदार द्राक्ष उत्पादन मिळू शकेल.

  कॅनॉपी जास्त असेल व जमिनीवर २५ टक्के पेक्षा कमी सूर्यप्रकाश पडत असेल तर जादा पाने काढून टाकावीत. कारण प्रमाणापेक्षा जास्त पाने असल्यास सावलीतील पानांचे प्रमाण वाढून पानांची अन्न निर्मिती करण्याची क्षमता कमी होते. त्यासाठी साधारण ७५ टक्के सूर्यप्रकाश पानांवर आणि उर्वरित २५ टक्के जमिनीवर पडेल याप्रमाणे कॅनोपी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

Grape
Grape Season : द्राक्ष हंगामाचे गणित वातावरणावर अवलंबून

 सर्वसाधारणपणे पानांवर दिवसभरात कमीत कमी ४ तास सूर्यप्रकाश पडत असेल तर मध्यम आकाराचे एक पान १८ ग्रॅम वजनाचे दर्जेदार द्राक्ष तयार करते. त्यानुसार घड संख्येचे नियोजन करावे.

घड संख्या नियोजनाचे टप्पे

अ) सुरुवातीला वांझ फुटी काढताना एकाच वेळी घड संख्या नियंत्रित करणे अयोग्य ठरते. कारण सुरुवातीलाच जादा घड कमी केले तर घडांचा दांडा लांबत नाही. त्यामुळे घडात कमी मणी ठेवावे लागतात. असे घड ४०० ते ६०० ग्रॅम वजनाचे होण्याऐवजी १५० ते २०० ग्रॅम वजनाचे होऊन वजनात घट येते. तसेच फुलोऱ्यातून बाग निघताना काही परिस्थितीत मणीगळ होऊन घड संख्या फारच कमी होऊन नुकसान होते.

Grape
Grape Management : ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले

बऱ्याच वेळा डाऊनीसाठी अनुकूल हवामान स्थिती असल्यास प्रादुर्भावामुळे द्राक्ष घड जळून जातात. त्यासाठी वांझ फुटी काढताना सुरुवातीस एका काडीस दोन फुटी व त्यावर दोन घड असले तर ते ठेवावेत. त्यानंतर डाऊनी आणि मणीगळचा धोका कमी झाल्यानंतर व फुलांतून निघेपर्यंत घडाचा दांडा किती लांबतो, त्यानुसार घडाचे आकारमान पाहून त्याच्या वजनाचा अंदाज घ्यावा. त्यानुसार मणी ४ ते ६ मिमी झाल्यावर जादा घड कमी करावेत आणि २५ टक्के घड जादाठेवावे

ब) त्यानंतर फुगवणीचा अंदाज घेऊन फुगवण चांगली होत असल्यास वेलीवर ठेवलेले २५ टक्के जादा घड कमी करावेत. किंवा फुगवण कमी असल्यास जादा घड कमी करू नयेत. जेणेकरून बागेतून एकरी पुरेशा वजनाचे घड मिळतील.

वेलीवरील घडांची निवड करण्याची पद्धत

वेलीवर ठेवायचे घड सर्वत्र पसरून ठेवले पाहिजेत. जादा घड असल्यास प्रथम एप्रिलच्या एका काडीस एक घड ठेवून बाकीचे जादा घड कमी करावेत. त्यानंतरही जादा घड असल्यास फुगवणीत मागे पडलेले घड कमी करावेत.  त्यानंतरही जादा घड असल्यास थेट सूर्यप्रकाशात येणारे घड कमी करावेत. कारण अशा घडांवर तीव्र सूर्यप्रकाशामुळे डाग (सनबर्निंग) पडून त्यांची फुगवण कमी होण्याची शक्यता असते. घड फार मोठे असल्यास ६ ते ७ इंच पाकळीच्या लांबीनुसार ठेवून जादा लांबीचा घडाचा भाग तळातून काढून टाकावा.

द्राक्ष जातींनुसार घडातील मणीसंख्या नियोजन

थॉमसन व सुधाकर सीडलेस

या द्राक्ष जातीच्या मण्यांचा आकार सरासरी १६ ते १८ मिमी इतका मिळतो. मध्यम आकाराच्या घडामध्ये सरासरी ९० मणी असतात (८० ते १२० मण्यांची सरासरी). १७ मिमीचा घड असल्यास त्यात काही मणी १४ ते १८ मिमीचे असतात. म्हणून मण्याचे सरासरी आकारमान १५ मिमी समजावे. सरासरी १५ मिमीचा १ मणी ४ ग्रॅम वजनाचा असतो. साधारण ९ बाय ५ फूट अंतरात एकरी १२ टन उत्पादन व प्रति मणी ४ ग्रॅम याप्रमाणे गृहीत धरल्यास ३६० मिमीचा एक घड होतो. मात्र घड छोटे असल्यास (९० पेक्षा कमी मण्यांचे) घडसंख्या जास्त ठेवावी. घड ९० मण्यांपेक्षा जास्त मण्यांचे असल्यास घड संख्या कमी करणे आवश्यक आहे.

सोनाका व सोनाका उपजाती

या द्राक्ष जातींच्या मण्यांचा आकार साधारणपणे १२ ते १४ मिमी असतो. सरासरी १३ मिमी गृहीत धरल्यास अडीच ग्रॅम वजनाचा एक मणी होतो. एका मध्यम घडात १०० ते १४० मणी असतात. त्याप्रमाणे एक घड साधारण ३२५ ग्रॅम वजनाचा भरतो. एकरी बारा टन म्हणजे प्रतिवेल ९ बाय ५ फुटांचे अंतरात बरोबर ३६ घड ठेवावेत. घड मोठे असल्यास घडसंख्या ३२ च्या दरम्यान ठेवावी.

नानासाहेब पर्पल, जम्बो द्राक्ष जाती

या द्राक्ष जातींचे मणी १८ ते २४ मिमी आकाराचे असतात. सरासरी २० मिमीचा एक मणी गृहीत धरल्यास त्याचे वजन ८ ग्रॅमच्या दरम्यान असते. एका मध्यम आकाराच्या घडात ५० मणी ठेवल्यास साधारण ४०० ग्रॅम वजनाचा घड होतो. नऊ बाय पाच फुटांचे अंतरातील बागेत ४५ चौरस फूट प्रतिवेल अंतर होते. अशा प्रति वेलावर एकरी बारा टन वजन गृहीत धरल्यास प्रतिवेल १२ किलो वजन मिळते. म्हणजेच ३० घड प्रतिवेल होतो. याप्रमाणे घड संख्या आणि मणी संख्येचे नियोजन करावे. वेलात ताकद जास्त असल्यास मण्यांची फुगवण जादा होऊन एकरी वजन वाढू शकते. मात्र यापेक्षा जास्त घड ठेवल्यास मालाचा दर्जा घसरतो. वरीलप्रमाणे मणी संख्या व घडसंख्या ठेवल्याने जास्त दिवस टिकणारे, भरपूर गर असलेले, गोड आकर्षक द्राक्ष तयार होतात. त्यामुळे सर्वसाधारण द्राक्षाच्या तुलनेत दीडपट ते दुप्पट दर मिळू शकतो.

- वासुदेव काठे, ९९२२७१९१७१, (समन्वयक दाभोळकर प्रयोग

परिवार महाराष्ट्र राज्य)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com