उसानंतर भात शेतीचे नियोजन

विना मशागत करता भात पीक करण्याचे तंत्र विकसित झाले आणि विविध प्रश्‍न सुटण्यास मदत झाली. हा प्रत्यक्ष शेतात काम करीत असता शिकायला मिळणारा अभ्यास शेतकरी मेळावा किंवा कृषी पदवीधर अभ्यासक्रमात शिकविला जात नाही. यासाठी शेतीमधील प्रयोगातून संवर्धित शेतीची दिशा स्पष्ट होते.
उसानंतर भात शेतीचे नियोजन

सह्याद्रीचा कोणताही घाट चढून वर आले, की घाटाकडील तालुक्‍यात आता बागायतीची सोय झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊस शेती केली जाते. मात्र अजूनही या भागात उसानंतरचे दुसरे मुख्य पीक भातच आहे. २ ते ३ वर्षे उसाचे पीक घेतल्यानंतर भात हेच दुसरे प्रमुख पीक घेतले जाते. ऊस तुटल्यानंतर मशागत करून राब, रोप, चिखलणी आणि लावणी पद्धतीनेच भात शेती केली जाते. घाटापासून थोडे पूर्वेकडे आल्यानंतर तेथे उसानंतर मशागत करून पेरभात शेती केली जाते.

- उसानंतर फेरपालटावर भात शेती करीत असताना मशागत करून सगुणा भात तंत्राप्रमाणे वाफे पाडून भात टोकण्याची गरज नाही. उसाची तोड झाल्यावर पाचट पेटवावे, त्यानंतर पावसाळ्यापर्यंत शेताला विश्रांती द्यावी. या काळात शक्‍य असल्यास खोडव्यात मेंढरे चारावीत. भात पेरणीपूर्वी १ ते १.५ महिना मेंढरे चारणे बंद करून उसाला चार पाने फुटू द्यावीत. भात पेरणीपूर्वी जमीन ओलावा पाहून ग्लायफोसेट तणनाशकाने उसाचे खोडवे मारावे.

- उसाच्या सरी वरंब्यावर दोन बाजूंच्या वरंब्याच्या उतारावर मिळून चार ओळींत भात टोकण करावी. उगवणीपूर्व व पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी तण २ ते ४ पानांवर असता शिफारशीत तणनाशक फवारून तणनियंत्रण करणे शक्‍य आहे.

- कोकण अगर घाटमाथ्यावरील लावणीच्या भातापेक्षा पूर्वेकडील पेरभात शेतीचे प्रश्‍न वेगळे आहेत. लावणीच्या क्षेत्रात पोयटा मातीचे प्रमाण कमी, तर लहान-मोठी वाळू जास्त असल्याने अशी राने जलद बसतात व कठीण होतात. थोडे पूर्वेला आले, की लाल माती जाऊन काळी माती चालू होते. या मातीत लहान-मोठी वाळू अत्यंत कमी, तर पोयटा व चिकण मातीचे प्रमाण जास्त असते. अशी माती मशागत करून भात पेरले तर कोरड्या मातीत कितीही जड मेलपट (दिंड) फिरविले तरी आवळली जात नाही. पोकळच राहते. भाताची कठीण जमीन असणे ही एक महत्त्वाची गरज आहे. भात पोकळ जमिनीत उगविले तर वाढत नाही. या काळात पाऊस जास्त झाला तर भात पिवळे पडते. त्याची वाढ खुंटते. काही वेळा पिवळसर पाने म्हणजे लोहाची कमतरता असा चुकीचा अर्थ धरून फेरस सल्फेटचा हप्ता अगर फवारणी केली जाते. याचा काही उपयोग होत नाही. इथे जमीन दडपली जाऊन कडक होणे हेच महत्त्वाचे असते.

- पूर्वी बाजारात तणनाशके नव्हती. तण नियंत्रणासाठी प्रथम कोळपणी केली जायची. त्यानंतर भाताच्या ओळीतील तणे काढण्यासाठी निंदणी अगर भांगलणीचा पहिला पेर केला जायचा. हे काम योग्य वाफशावर झाले तर जमीन दडपली जायची व पुढे भाताची वाढ व्यवस्थित होत असे. पेरणीपासून २५ ते ३० दिवस भात पिकाला इतर पिकांप्रमाणे वापसा मिळाल्यास त्याची वाढ व्यवस्थित होते, अन्यथा या काळात (मृग व आर्द्रा नक्षत्र) पाऊस सतत जास्त झाल्यास भाताची वाढ खुंटते. जास्त काळ असा ओलावा राहिल्यास भात मरूनही जाऊ शकतो. भात जमिनीमध्ये चालले तर पायाचे वळ उठत गेले पाहिजेत; पण पाय चिखलात रुतला नाही पाहिजे. साधारण पहिल्या दोन नक्षत्रांत हलक्‍या स्वरूपाचाच पाऊस लागत असतो. चुकूनच ५-७ वर्षांत एखाद्या वर्षी जास्त पाऊस लागून भाताच्या प्राथमिक वाढीची नुकसानी होते.

- आता पेरणीनंतर भात आणि तण उगवणीपूर्वी आणि पीक व तण उगवल्यानंतर (२५ ते ३० दिवसांनंतर) फवारण्याची तणनाशके बाजारात उपलब्ध आहेत. शेतकरी या तणनाशकांचा वापर करतो. कारण भात पिकातील सततच्या ओलीमुळे निंदणीचे काम अतिशय कष्टदायक असते.

- ज्या शेतकऱ्यांनी मशागत करून पेरणी केली आहे, त्यांनी तणनाशकाचा वापर अजिबात करू नये. तणनाशक मारल्यास तणे येणार नाहीत. तणे नाही म्हणून कोळपणी व भांगलणी नाही. ही कामे टाळली गेल्यास यावर होणारा मोठा खर्च वाचेल; परंतु भातासाठी या कामातून जमीन आवळणीचे काम न झाल्याने भाताची वाढ योग्य पद्धतीने होत नाही, उत्पादन कमी येते. यावर एक उपाय आहे.

रान पोकळी जाऊ नये म्हणून माणसाचे पाय फिरवून जमीन दाबणे. पावसाने उघडीप दिली व मातीचा वरील एक-दोन बोटे थर वाळला, परंतु खाली ओल आहे, अशा वेळी पूर्वी भातातून मेंढरे फिरविली जात. आता रोटाव्हेटर बंद करून पॉवर टिलर फिरवून रान दाबता येते. उसानंतर जर खोल मशागत केली असेल, तर हा प्रश्‍न जास्त कठीण होतो. अगोदर पैसे खर्च करून मशागत करून जमीन पोकळ करावयाची व पुढे भाताला कठीण जमीन लागते म्हणून वेगवेगळ्या मार्गांनी ती कठीण करण्यात पैसे खर्च करावयाचे हा द्राविडी प्राणायाम मी अनेक वर्षे केला. या काळात मशागतीशिवाय भात पिकविता येतो या विद्येचा स्पर्शही झाला नव्हता. पुढे विना मशागत करता भात पीक करण्याचे तंत्र विकसित झाले आणि वरील सर्व प्रश्‍न आपोआप संपुष्टात आले. हा प्रत्यक्ष शेतात काम करीत असता शिकायला मिळणारा अभ्यास शेतकरी मेळावा किंवा कृषी पदवीधर अभ्यासक्रमात शिकविला जात नाही.

स्थळ-काळ सापेक्ष फरक

- कोकणातील भात शेती व देशावरील काळ्या जड जमिनीतील भात शेतीचे प्रश्‍न खूप वेगळे आहेत. कोकणात गादीवाफे करून विना नांगरणी उत्तम विकसित झाली. आता याचा प्रसार देशावरील उसानंतर भात करीत असता प्रथम उसाचे खोडवे नांगरून गादीवाफे तयार करा आणि भात कापणीनंतर परत गादीवाफे मोडून सरी सोडून उसाची लागण करा, असे सांगणे म्हणजे आपण संवर्धित शेतीऐवजी मशागतीची शेतीच परत शिकवितो. कोणतेही नवीन तंत्र विकसित करीत असता एकच नियम सर्व ठिकाणी लागू होत नाही. काही स्थळ-काळ सापेक्ष फरक करावे लागतात.

- कोकणातील पाच जिल्हे आणि घाटावरील सह्याद्रीकडेच्या जिल्ह्यातील घाटाकडील तालुके हा भाताचा भाग आपण समजतो; परंतु या संपूर्ण भागातील भातशेतीच्या तिप्पट भात शेती पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत केली जाते. कोकणात लहान-लहान खाचरांतून भातशेती केली जाते. त्या तुलनेत पूर्व विदर्भात सपाट जमीन वर प्रतिमाणसी मोठी जमीनधारणा आहे. जमिनीचे तुकडे मोठ्या आकारमानाचे व माती जड आहे. तिकडेही विना नांगरणीचा चंचुप्रवेश झाला आहे. आज तिकडे रोप करणे, चिखलणी व लावणी याच पद्धतीने भातशेती केली जाते. तिकडील मोठ्या क्षेत्रासाठी विना नांगरता पेरणी करणारी यंत्रे व कापणी करणारे यंत्रे विकसित होणे गरजेचे आहे. ब्राझीलप्रमाणे आपल्याकडेही मोठ्या शेतकऱ्यासाठी मोठी अवजारे, लहान शेतकऱ्यांसाठी लहान अवजारे असे यांत्रिकीकरण विकसित होणे गरजेचे वाटते. मला तिकडील भातशेतीचा प्रत्यक्ष त्या भागात जाऊन अभ्यास करणे शक्‍य झाले नाही, यापुढे होईल असे वाटत नाही. यामुळे हा विषय येथेच थांबवितो.

- मला या लेखातून भाताच्या जाती, खताचे हप्ते, कीड, रोग अशी इतरत्र सहज भेटणारी माहिती देण्याचा उद्देश नाही. भात निसविण्यापूर्वी काही खास सूचना द्यावयाच्या आहेत. त्या ऑगस्ट महिन्यात देईन. वाढता उत्पादनखर्च, घटत जाणारे उत्पादन, मजूरटंचाई यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भातपीक करणे सोडून दिले आहे. भात खाणे मात्र सोडणे शक्‍य नाही. भात पिकविणे किफायतशीर झाले पाहिजे. ऊस पट्ट्यात नवीन पिढीला चिखलात राबण्याची इच्छा नाही. २० ते २५ टन ऊस मिळाल्यास ६० ते ७० हजार रुपये मिळतात. मग ऊस काढून परत ऊस लागवडीचे प्रमाण वाढले आहे. हे गणित अत्यंत चुकीचे आहे. भात पिकातून काय मिळणार? फेरपालट होऊन उन्हाळ्यात जमिनीला विश्रांती मिळाल्याने पुढील लावण व खोडव्याच्या पिकातून एक वर्ष फेरपालट सालचे पैसे वसूल होतात. त्यामुळे फक्त भाताच्या पिकाच्या अर्थशास्त्राचा अभ्यास न करता तीन वर्षांचा एकत्रित अर्थशास्त्राचा अभ्यास केल्यास भातशेती फायदेशीर ठरते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com