Poultry Farming : शेतकरी नियोजनः कुक्कुटपालन

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ब्रॉयलर कुक्कुटपालन करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी परिसरातील काही कुक्कुटपालन करणाऱ्या पोल्ट्री शेडला भेटी देऊन त्यातील बारकावे, अर्थशास्त्र समजून घेतले.
Poultry Farming
Poultry Farming Agrowon

सातारा जिल्ह्यातील कालगाव (ता.कऱ्हाड) येथील अभिजित जयसिंग चव्हाण यांची ५ एकर शेती आहे. शिक्षण झाल्यावर नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेती (Farming) करण्याचा निर्णय घेतला.

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ब्रॉयलर कुक्कुटपालन (Broiler Poultry ) करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी परिसरातील काही कुक्कुटपालन (Poultry Farming) करणाऱ्या पोल्ट्री शेडला (Poultry shed) भेटी देऊन त्यातील बारकावे, अर्थशास्त्र समजून घेतले.

बाजारात दरांमध्ये सतत चढउतार होत असते. त्यामुळे खासगी कंपनीसोबत करार पद्धतीने व्यवसाय करण्याचे ठरविले.

शेतकरी ः अभिजित जयसिंग चव्हाण

गाव ः कालगाव, ता. कऱ्हाड, जि. सातारा.

एकूण पक्षी ः ५०००

शेड संख्या ः २ (आकार ः ३० बाय १२० फूट आणि ३० बाय १०० फूट)

स्वतःकडील काही रक्कम आणि बँकेकडून कर्ज घेत २०१४ मध्ये व्यवसायाचा श्रीगणेशा केला. पक्ष्यांसाठी ३० बाय १२० फूट आणि ३० बाय १०० फूट अशा दोन आकाराची ५ हजार पक्षी क्षमतेची दोन शेड उभारली.

कंपनीसोबत केलेल्या करारानुसार बॅच घेण्यास सुरुवात केली. प्रत्यक्ष काम सुरु केल्यानंतर व्यवसायात येणाऱ्या अडचणी समजत गेल्या. त्यातून सकारात्मक मार्ग काढत व्यवसाय सुरु ठेवला.

वर्षाकाठी साधारण ५ ते ६ लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळते. शेडमधून प्रत्येक बॅच गेल्यानंतर साधारण ३ ते ४ ट्रॉली कोंबडीखत उपलब्ध होते.

त्याचा शेतामध्ये वापर केला जातो. त्यामुळे उत्पादनातही भरीव वाढ झाली असून जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली आहे.

व्यवस्थापनातील बाबी -

१) दररोज सकाळी नियमित शेडची स्वच्छता केली जाते.

२) रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना चुन्याच्या साह्याने शेडचे निर्जंतुकीकरण केले जाते. शेडमध्ये स्वच्छतेवर विशेष भर दिला जातो. त्यामुळे पक्षी आजारास बळी पडण्याचे प्रमाण तुलनेने कमी होते.

३) बेडवर चुना मारून भाताचे तूस पसरविण्यात येते. पिलांची बैठक तुसाच्या गादीवर असल्याने ते कोरडे राहील याकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे नवीन पिलांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव होत नाही.

Poultry Farming
Poultry Business : पोल्ट्री शेड करमुक्‍त करण्याच्या हालचालींना वेग

४) पक्ष्यांसाठी शुद्ध पाण्याची सोय केली आहे. पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्यातील सामू आणि क्षारांची नियमित तपासणी केली जाते.

५) पक्ष्यांच्या वयानुसार खाद्य पुरवठा केला जातो. ४० दिवसांच्या बॅचच्या नियोजनानुसार खाद्याची विभागणी प्रत्येकी १० दिवसांच्या अंतराने केली जाते. त्यानुसार खाद्य वाढीच्या अवस्थेनुसार खाद्य दिले जाते.

६) शेडच्या चारही बाजूला २०० मायक्रॉन जाडीचा तर सिलिंगसाठी ३०० मायक्रॉन जाडीचा कागद लावला आहे.

७) वातावरण बदलाचा पक्ष्यांवर ताण येण्याची शक्यता असते. त्यासाठी शेडमध्ये आवश्यकतेनुसार योग्य बदल केले जातात.

८) पक्ष्यांची वाढ पूर्ण झाल्यानंतर कंपनीशी केलेल्या कराराप्रमाणे पक्ष्यांचे वजन करून विक्री होते.

बॅच नियोजन ः

१) वर्षाला साधारण ५ ते ६ बॅच घेतल्या जातात. एक बॅच साधारण ४० ते ४२ दिवसांची असते.

२) प्रत्येक बॅचच्या नियोजनानुसार कंपनीकडे पक्ष्यांची आगाऊ मागणी नोंदणी केली जाते.

३) शेडचे निर्जंतुकीकरण केल्यानंतर भाताचे तूस पसरवून नवीन बॅचसाठी पक्षिगृह तयार केले जाते.

४) साधारण १ दिवसाची पिल्ले शेडवर आणली जातात.

५) सुरुवातीच्या काळात योग्य पद्धतीने पिल्लांचे ब्रुडिंग व्यवस्थापन करणे आवश्यक असते. त्यानुसार ५०० पिल्लांचे एक जाळे तयार करून त्यात पिल्ले ठेवली जातात.

६) पिलांच्या संख्येनुसार खाद्य आणि पाण्याची भांडी ठेवण्यात येतात.

७) पक्षी शेडवर आणल्यानंतर त्यांना प्रथम गूळ पाणी दिले जाते.

Poultry Farming
Poultry : पोल्ट्री व्यवसायावर मंदीचे सावट

८) अँटी बायोटिकच्या मात्रा तीन दिवस सायंकाळच्या वेळी दिल्या जातात.

९) योग्य खाद्य नियोजन करून पक्ष्यांचा आकार वाढ जातील तसे त्यांना जागा उपलब्ध करून दिली जाते.

१०) बॅच गेल्यानंतर शेडमध्ये गोळा झालेल्या खत बाहेर काढून शेड स्वच्छ केले जाते. शेडमध्ये खत शिल्लक राहणार नाही याची काळजी घेतली जाते.

११) रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पूर्ण शेडचे निर्जंतुकीकरण केले जाते.

१२) त्यानंतर शेडमध्ये चुन्याचा वापर केला जातो. आणि भाताचा तूस पसरला जातो.

१३) खाद्याची, पाण्याची भांडी आणि इतर साहित्याचे निर्जंतुकीकरण केले जाते.

आरोग्य व्यवस्थापन ः

१) स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त पक्षिगृह यावरच कुक्कुटपालन व्यवसायाचे यश अवलंबून असते. स्वच्छतेच्या निकषांचे काटेकोर पालन केल्यास पक्ष्यांची वाढ आणि आरोग्य उत्तम राहते.

२) शेडमधील वातावरण स्वच्छ व प्रसन्न ठेवण्यावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन पक्ष्यांची मरतुक टाळण्यास मदत होते.

३) पक्षिगृहात टाकलेले तूस ओले झाल्यामुळे शेडमधील वातावरण दूषित होते. शेडमध्ये कुबट वास येतो. त्यामुळे रोगराई झपाट्याने पसरून कोंबड्या विविध आजारास बळी पडण्याची शक्यता असते. त्यासाठी शेडमधील भाताचे तूस दररोज हलविले जाते. आवश्यकतेनुसार वेळोवेळी तूस बदलले जाते.

४) पिल्ले शेडमध्ये आणल्या नंतर सहाव्या दिवशी त्यांना पहिले लसीकरण केले जाते. त्यानंतर ९ व्या दिवशी दुसरे आणि २६ व्या दिवशी पाण्यातून तिसरी लस दिली जाते. जेणेकरून पक्ष्यांना गंबोरो, लासोटा, राणीखेत इत्यादी आजारांची बाधा होणार नाही.

५) लसीकरणामुळे पक्ष्यांवर ताण येण्याची शक्यता असते. त्यासाठी लसीकरणावेळी योग्य काळजी घेतली जाते.

६) लसीकरणापूर्वी ६ तास आणि लसीकरणाच्या ६ तासानंतर पक्ष्यांचे साधे पाणी पिण्यास दिले जाते. लसीकरण सकाळी लवकर किंवा संध्याकाळी केले जाते.

७) कंपनीचे अधिकारी ४ दिवसांतून एक वेळ शेडवर येऊन पक्ष्यांची तपासणी करतात.

अभिजित चव्हाण, ९७६४३०३२३५ (शब्दांकन ः विकास जाधव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com