खरीप भाजीपाला लागवडीची पूर्वतयारी

रोपवाटिका तयार करताना योग्य जागेची निवड खूप महत्त्वाची बाब आहे. रोपवाटिकेची जागा पृष्ठभागापासून उंचावर, पाण्याचा योग्य निचरा होणारी, उन्हाच्या झळांपासून संरक्षणासाठी अंशतः सावली देणारी अशी असावी. निवडलेली जागा सिंचन स्रोतापासून जवळ असावी.
खरीप भाजीपाला लागवडीची पूर्वतयारी
Vegetable FarmingAgrowon

डॉ. प्रशांत सोनवणे, डॉ. अनिकेत चंदनशिवे, डॉ. श्रीमंत रणपिसे

--------------------

खरीप हंगामात भाजीपाला लागवडीचे योग्य नियोजन करून पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. भाजीपाला लागवडीमध्ये पूर्वमशागत, सेंद्रिय खतांचा वापर, पीक निवड, सिंचन व्यवस्थापन, कीड व रोगनियंत्रण आदी बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तसेच लागवडीपूर्वी माती परीक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांची माहिती मिळून आवश्यकतेनुसार खतांचा पुरवठा करता येतो. भाजीपाला पिकांच्या शाश्‍वत उत्पादनासाठी खत व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा.

जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य भाजीपाला पिकाची निवड करावी. वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची पाण्याची गरज ही कमी जास्त असते. पर्जन्यमान आणि उपलब्ध सिंचन व्यवस्थापन आदी बाबी विचारात घ्याव्यात.

पूर्वमशागतीचे नियोजन ः

खरीप हंगामात भाजीपाला लागवडीसाठी पूर्वमशागतींच्या कामांचे योग्य नियोजन आवश्यक आहे.

- जमिनीची खोल नांगरणी करून उभी आडवी वखरणी करावी.

- नांगरटीनंतर जमीन दोन ते तीन दिवस उन्हात चांगली तापू द्यावी. जेणेकरून मातीतील कीड-रोगांच्या अवस्था नष्ट होतील.

- जमिनीचा उतार लक्षात घेऊन उताराला आडवी मशागत करावी. यामुळे जमिनीची धूप कमी होते. आणि सिंचनाचे योग्य नियोजन करणे शक्य होते.

- शेवटच्या वखरणीपूर्वी हेक्टरी २० ते २५ बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खत शेतामध्ये पसरून घ्यावे.

लागवड पद्धती ः

१) सपाट किंवा बंदिस्त वाफे ः

- रिजरच्या साह्याने उभे व आडवे वाफे तयार करावेत. वरंब्याची उंची २५ ते ३० सेंमी ठेवावी.

- सपाट किंवा बंदिस्त वाफ्यांमुळे पावसाचे पाणी जागेवरच जमिनीत मुरले जाते. तसेच जमिनीत ५० टक्के जास्त ओलावा धरून ठेवण्यास मदत होते.

२) सरी वरंबा ः

- मध्यम ते भारी जमिनीत लोखंडी नांगराने उतारास आडवे तास मारावेत.

- भाजीपाला पिकांच्या लागवड पद्धतीचा विचार करून ट्रॅक्टरच्या साह्याने सऱ्या पाडून घ्याव्यात.

- ट्रॅक्टरच्या साह्याने जमिनीत सऱ्या पाडून घ्याव्यात. भाजीपाला पिकाच्या निवडीनुसार लागवड अंतर विचारात घेऊन सऱ्या पाडाव्यात.

- या पद्धतीमुळे लागवडीच्या कमी जास्त अंतरानुसार भाजीपाला पिकात ३० ते ३५ टक्के उत्पादनात वाढ होते.

- कोरडवाहू व चोपण जमिनीत पाणी मुरविण्यासाठी व जमिनीत विद्राव्य क्षाराचे प्रमाण कमी करण्यासाठी बंदिस्त सरी वरंबा पद्धत फायद्याची ठरते.

३) समपातळीत मशागत ः

खरीप हंगामात अधिक पाऊस असलेल्या क्षेत्रात समपातळीत मशागत केल्याने जमिनीत पाणी मुरण्यास मदत होते. त्यासाठी जमिनीची सपाटीकरण, नांगरणी, कुळवणी यासारख्या मशागती समपातळीत करून घ्याव्यात.

रोपवाटिका तयारी ः

- रोपवाटिका तयार करताना जागेची निवड खूप महत्त्वाची बाब आहे. रोपवाटिकेकरीता हराळी, लव्हाळा किंवा इतर तण असलेली जमीन निवडू नये.

- रोपवाटिकेची जागा पृष्ठभागापासून उंचावर, पाण्याचा योग्य निचरा होणारी, उन्हाच्या झळांपासून संरक्षणासाठी अंशतः सावली देणारी अशी असावी.

- निवडलेली जागा सिंचन स्रोतापासून जवळ असावी.

- भाजीपाला पिकांची रोपे लागवडीसाठी ३० ते ३५ दिवसांत तयार होतात. चांगल्या उत्पादनासाठी रोपवाटिकेत रोपांचे संगोपन ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

- योग्य जमिनीची निवड केल्यानंतर प्रति गुंठा १ बैलगाडी चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून घ्यावे.

- जमिनीची २० ते २५ सेंमी खोल नांगरट करून कुळवाच्या २ ते ३ पाळ्या द्याव्यात.

- जमीन चांगली भुसभुशीत झाल्यानंतर ३ मीटर लांब, मी रुंद, आणि १० सेंमी उंचीचे गादीवाफे तयार करावेत.

- रोपवाटिकेत २ चौ.मीटर जागेला २० ग्रॅम नत्र, १०० ग्रॅम स्फुरद व १० ग्रॅम पालाश द्यावे. त्यापैकी संपूर्ण स्फुरद आणि पालाश आणि अर्धे नत्र बी पेरणीवेळी द्यावे. उर्वरित नत्र २०-२५ दिवसांनी द्यावे.

- वाफा सपाट करून चार बोटांच्या अंतरावर वाफ्यांच्या रुंदीशी समांतर रेषा पाडाव्यात. रेषा जास्त खोल नसाव्यात.

- बी पातळ पेरून हलक्या हाताने लगेच मातीआड करावे.

- बियाण्यांची उगवण होईपर्यंत रोज सकाळी-संध्याकाळी झारीने पाणी द्यावे.

- पेरणी झाल्यानंतर गादीवाफ्यांवर ६० ते १०० मेश नॉयलॉन नेट किंवा मच्छर दाणीसारखे पांढरे कापड २ मीटर उंचीपर्यंत लावावे. त्यामुळे विषाणूजन्य रोगांचा प्रसार करणाऱ्या किडींचा बंदोबस्त होईल.

बियाणे खरेदी करताना घ्या काळजी ः

- बियाण्यांची खरेदी शक्यतो, खात्रीशीर ठिकाणाहूनच करावी.

- बियाणे पाकिटावरील लॉट क्रमांक, टॅग क्रमांक आणि इतर मजकूर बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर खरेदी करावी.

- खरेदी केलेली बियाणे पाकिटे पीक उगवण होईपर्यंत जपून ठेवावीत.

-------------------------

- डॉ. अनिकेत चंदनशिवे, ७०६५७९१११५ (भाजीपाला संशोधन संकुल, उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com