फळबाग लागवडीची पूर्वतयारी

फळबाग लागवड दीर्घ मुदतीची, जास्त गुंतवणुकीची गोष्ट असल्यामुळे सुरुवातीला झालेली चूक नंतर भरून काढता येत नाही. म्हणून लागवडीच्या नियोजनात जमिनीची निवड, मातीची तपासणी, फळ पिकाची निवड, लागवडीचा आराखडा, जातिवंत कलमे, रोपांची निवड, पाण्याची उपलब्धता, बाजारपेठ या सर्व गोष्टींचा विचार आधीच करावा.
Orchard Plantation
Orchard PlantationAgrowon

मयूर इंगोले, डॉ. नंदकिशोर हिरवे

फळबागेसाठी जमिनीची निवड हा महत्त्वाचा भाग असून, त्यावरच तिचे आयुष्य अवलंबून असते.

-जमीन उत्तम निचऱ्याची असावी.

-सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान आवश्यक.

-जमिनीच्या खोलीनुसार फळपिकांची निवड करावी. उदा. खोली ३० ते ४५ सें. मी. असलेल्या जमिनीत बोर, सीताफळ, काजू या पिकांची, तर ४५ ते ९० सें. मी. मध्यम खोल जमिनीत पेरू, डाळिंब, अंजीर, पपई ही फळझाडे लावावीत. आंबा, चिकू, चिंच, जांभूळ, लिंबूवर्गीय फळझाडांना १ मीटरपेक्षा जास्त खोलीच्या जमिनी लागतात.

-जमीन शक्‍यतो सपाट असावी. जमीन उताराची असल्यास कंटूर पद्धत करून ठिबक सिंचन वापरून फळपिकांची लागवड करावी.

-जमीन निवडल्यानंतर मातीचा प्रातिनिधिक नमुना घेऊन तपासणी करावी.

फळबाग लागवडीच्या पद्धती

फळझाडांची लागवड करताना योग्य लागवड पद्धत निवडावी. त्यावर फळांचे उत्पादन, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव अवलंबून असतो. लागवड अधिक दाट (जास्त जवळ) झाल्यास आर्द्रता वाढते. हवा खेळती न राहिल्यामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो. लागवडीच्या पद्धत निवडताना प्रत्येक फळझाड वाढीसाठी समान क्षेत्रफळ मिळावे. फळबागेतील आंतरमशागत, झाडावर फवारणी करणे आणि झाडांना पाणी देणे ही कामे सहज करता यावीत. बागेचे व्यवस्थापन सहज करता यावे.

१) चौरस मांडणी पद्धत

-बागेची जमीन चौरसामध्ये विभागण्यात येते.

-चौरसाच्या चारही कोपऱ्यांवर फळझाडे लावतात. त्यामुळे दोन ओळींतील आणि झाडांतील अंतर समान राहते. फळझाडांच्या दोन ओळी परस्परांना काटकोनात छेदतात. या पद्धतीमध्ये बागेची उभी-आडवी मशागत करणे सोपे जाते.

-दोन्ही दिशांनी झाडांना पाणी देता येते.

-या पद्धतीनुसार आंबा, पेरू, चिकू या फळपिकांची लागवड करणे सोपे जाते.

२) आयत मांडणी पद्धत

यात दोन झाडांमधील अंतरापेक्षा दोन ओळींतील अंतर काही फळझाडांच्या बाबतीत जास्त ठेवावे लागते. या पद्धतीत चौरस पद्धतीचे सर्व फायदे मिळतात. मात्र बागेमध्ये मशागत करणे जरा अवघड जाते.

३) समभुज त्रिकोणी मांडणी पद्धत

ही चौरस पद्धतीप्रमाणेच असून, फक्त पाचवे झाड चौरसाच्या मध्यभागी लावतात. त्या झाडाचे आयुष्य कमी कालावधीचे असते. चौरसातील झाडे मोठी झाल्यानंतर हे पाचवे झाड काढून टाकतात. आंबा, चिकू, लिची अशा सावकाश वाढणाऱ्या झाडांमध्ये हे वेगळ्या प्रकारचे पाचवे झाड लावतात. या पद्धतीत झाडांची संख्या जवळ जवळ दुप्पट वाढते. त्यामुळे झाडांची गर्दी वाढते आणि बागेच्या मशागतीला अडथळा येतो. म्हणून काही वर्षांनी मधले झाड काढून टाकावे लागते.

४) षट्‍कोन पद्धत

षट्‍कोन पद्धतीमध्ये समभुज त्रिकोणाच्या कोपऱ्यावर झाडे लावतात. त्यामुळे षट्‍कोनाच्या सहा कोपऱ्यांवर सहा झाडे आणि मध्यभागी एक झाड बसते. या पद्धतीत सर्व झाडांमध्ये समान अंतर असते. मशागत कर्ण रेषेवर उभी-आडवी करता येते. या पद्धतीत सुमारे १५ टक्के अधिक झाडे बसतात. मात्र झाडांची दाटी होते. मशागतीचे काम अवघड होते. सामान्यपणे ही पद्धत फारशी वापरली जात नाही.

५) समपातळी रेषा मांडणी पद्धत (कंटूर पद्धत)

डोंगराळ भागामध्ये जमीन सपाट नसलेल्या ठिकाणी फळबाग लागवडीसाठी ही पद्धत वापरली जाते. जमिनीचा उतार जास्त असला, की मशागत करणे आणि पाणी देणे अवघड असते. मातीची धूप होते. अशा परिस्थितीमध्ये फळझाडांची लागवड सरळ रेषेत न करता समतल रेषेवर (समपातळीवर) करावी लागते. बागेत समतल रेषेप्रमाणे मशागत करावी लागते, पाण्याचे पाट ठेवावे लागतात किंवा ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. या पद्धतीमध्ये झाडांतील अंतर समान नसते. दर एकरी झाडांची संख्या इतर पद्धतींपेक्षा कमी असते.

६) सघन लागवड पद्धत

अलीकडे आंबा व पेरू लागवडीसाठी ही पद्धती वापरली जात आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये आंबा कलमांची १० मी. × १० मी. अंतरावर, तर पेरू ६ × ६ मी. अंतरावर लावतात. सघन लागवडीमध्ये हे अंतर दोन्ही पिकामध्ये ३ मी. × २ मी. ठेवले जाते. त्यामुळे एकरी झाडांची संख्या वाढते. मात्र झाडांची वेळोवेळी छाटणी व वळण देणे ही कामे शास्त्रीय पद्धतीने करावी लागतात. म्हणजे झाडाची फळधारणा लवकर आणि भरपूर होते, अन्यथा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

लागवडीसाठी खड्डे

फळबाग लागवडीसाठी योग्य पद्धत ठरून, त्यानुसार खड्डे खोदून घ्यावेत. शिफारशीप्रमाणे दोन झाडांतील अंतर आणि दोन ओळींतल्या अंतराप्रमाणे योग्य लांबी, रुंदीचे व खोलीचे खड्डे काढावेत. पूर्वमशागतीनंतर एप्रिल ते मेमध्ये घेतलेल्या या खड्ड्यामध्ये पोयटा माती, पालापाचोळा, शेणखत, जैविक खते, ट्रायकोडर्मा, सिंगल सुपर फॉस्फेट, शिफारशीत कीडनाशक पावडर यांच्या मिश्रण भरावे.

फळझाड लागवडीचे अंतर व त्यानुसार बसणारी झाडे

फळझाडाचे नाव --- लागवडीचे अंतर --- हेक्टरी झाडे --- एकरी झाडे

आंबा --- १० × १० मीटर --- १०० --- ४०

चिकू --- १० × १० मीटर --- १०० --- ४०

सीताफळ --- ५ × ५ मीटर --- ४०० --- १६०

पेरू --- ६ × ६ मीटर --- २७७ --- १११

मोसंबी --- ६ × ६ मीटर --- २७७ --- १११

कागदी लिंबू --- ६ × ६ मीटर --- २७७ --- १११

संत्रा --- ६ × ६ मीटर --- २७७ --- १११

आवळा --- ७ × ७ मीटर --- २०४ --- ८२

अंजीर --- ४.५ × ३.० मीटर --- ७४० --- २९६

चिंच --- १० × १० मीटर --- १०० --- ४०

जांभूळ --- १० × १० मीटर --- १०० --- ४०

कलमांची निवड

-फळझाडांची कलमे, रोपांच्या निवडीवर फळांची गुणवत्ता आणि फळबागेचे एकूण यश अवलंबून असते. उत्कृष्ट गुणवत्तेची दर्जेदार आणि खात्रीशीर कलमे, रोपे आणावी.

-कलमांची निवड करताना ती किती उंच आहेत, यापेक्षा ती योग्य त्या जातीच्या मातृवृक्षापासून केलेली आहेत की नाहीत, याकडे अधिक लक्ष द्यावे.

-वाढीला जोमदार, निरोगी आणि आपण निवडलेल्या जातीचीच असल्याची खात्री करून घ्यावी.

-कलमे/रोपे एक वर्ष वयाची मध्यम वाढीची आणि ६० ते ७५ सें.मी. उंच असावीत.

-कलम केलेल्या रोपांमध्ये खुंट व कलमकाडीची जाडी सारखी असावी. व जोड एकजीव झालेला असावा. फळझाडांचे कलम किंवा भरलेले डोळे जमिनीपासून २० सें.मी. पेक्षा उंच नसावेत.

-लागवडीसाठी आवश्यक असणाऱ्या रोपांच्या संख्येपेक्षा १५ टक्के जास्त रोपे खरेदी करावीत. अशी रोपे नांगे भरणे किंवा रोपे मर झालेल्या ठिकाणी परत लावता येतात.

नवीन लागवड करताना...

-लागवड करण्यापूर्वी कलमाच्या पिशवीच्या दोन्ही बाजूंवर उभा काप द्यावा. मुळाभोवती असलेला मातीचा गोळा न फुटता पॉलिथिन बॅग काढावी. मोकळा झालेला गोळा दोन्ही हातांत धरून खड्ड्याच्या मधोमध ठेवून हलकेच दाबावा. मोकळ्या हाताने माती भरून गोळ्याभोवती माती टाकावी. अगोदर हाताने व नंतर पायांनी दाबावी, हे करताना मातीच्या गोळ्यावर पाय पडणार नाही याची काळजी घ्यावी. आवश्यकता वाटल्यास हलकेसे पाणी द्यावे. आधारासाठी पश्‍चिम बाजूस ६ इंच अंतरावर ४ ते ५ फूट बांबूची काठी रोवून त्याला कलम बांधावी.

फळबाग लावताना वाणांची निवड

फळझाडाचे नाव --- महत्त्वाच्या जाती

आंबा --- केसर, पायरी, लंगडा, तोतापुरी, हापूस, रत्ना, सिंधू, वनराज, फुले अभिरुची

चिकू --- कालीपत्ती, क्रिकेट बॉल

सीताफळ --- बाळानगर, फुले पुरंदर, फुले जानकी, अर्का सहान

पेरू --- सरदार (एल-४९), ललित, अलाहाबाद सफेदा

मोसंबी --- न्युसेलार, फुले मोसंबी, काटोल गोल्ड

कागदी लिंबू --- साई सरबती, फुले शरबती, विक्रम, प्रमालिनी

संत्रा --- नागपूर संत्रा

आवळा --- कृष्णा, कांचन, चकय्या, हातीझूल, बनारसी, एन. ए.-७, एन.ए.-९

अंजीर --- पूना फिग, दिनकर,

चिंच --- प्रतिष्ठान, योगेश्‍वरी, अकोला स्मृती

जांभूळ --- कोकण बहाडोली, स्थानिक

नवीन फळबागेचे संरक्षण

लागवडीनंतर फळझाडांची नवीन वाढ जनावरे खातात. तसेच रोप व कलमे तुडवतात. नवीन लावलेल्या झाडांचे भटक्या गुरांपासून संरक्षण करणे फारच गरजेचे आहे. त्यासाठी निवडलेल्या जागेभोवती चिलार, शिकेकाई, करवंद यांसारख्या काटेरी झुडपांचे कुंपण करावे. बागेचे उष्ण वारे, थंडीपासून व वादळापासून संरक्षण करण्यासाठी निलगिरी, शेवरीसारख्या उंच वाढणाऱ्या झाडांची पश्‍चिम व दक्षिण बाजूने २ ते ३ फुटांवर लागवड करावी. काही वेळा वाऱ्याच्या अडथळ्यासाठी लावलेली झाडे बागेतील मुख्य फळझाडांबरोबर पाणी आणि अन्नद्रव्ये घेण्यासाठी स्पर्धा करतात. हे टाळण्यासाठी अडथळ्यांच्या झाडांपासून १० फूट अंतरावर ३ फूट खोल व २ फूट रुंद खणून त्यामध्ये येणारी या झाडांची सर्व मुळे छाटून टाकावीत. अशा प्रकारे मुळ्या छाटण्याचे काम प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी करावे.

पाण्याची उपलब्धतेनुसारच करावे नियोजन

-बागायती फळझाडांना नियमित पाणी द्यावे लागते, अशा बागायती फळझाडांची लागवड करताना आपल्याकडे असलेली पाण्याची उपलब्धता जरूर पाहावी. त्यानुसार आपले क्षेत्र ठरवावे.

-कोरडवाहू फळपिकांना लागवडीच्या सुरुवातीस पहिली तीन ते चार वर्षे चांगल्या व समाधानकारक वाढीसाठी पाण्याची आवश्यकता असते.

-नारळ, सुपारी, केळी, पपई, चिकू, मसाला पिके यांना अन्य फळझाडांपेक्षा जास्त पाणी लागते. म्हणून पाण्याच्या उपलब्धतेनुसार फळझाडांची निवड करावी.

-आपल्याकडे १२ महिने पाण्याची सोय असेल तर ज्या फळझाडांना बाराही महिने पाणी लागते अशा फळझाडांची निवड करावी. आपल्याला पाणी आठ महिने पुरत असेल तर पेरू सारखी फळझाडे लावावीत. आपले पाणी फक्त सहा महिने पुरत असेल तर सीताफळ, रामफळ, आवळा, बोर यांसारखी कोरडवाहू फळझाडांची लागवड करावी.

मयूर इंगोले (विषय विशेषज्ञ -उद्यानविद्या), ९४०४३७६४२२

डॉ. नंदकिशोर हिरवे (वरिष्ठ शास्त्रज्ञ, प्रमुख), ९४२११४९३२३

(कृषी विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे), ता. दारव्हा, जि. यवतमाळ)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com