Grape Advisory : पावसामुळे उद्‌भवताहेत खत व्यवस्थापनात समस्या

गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, मुळांच्या कक्षेत पाण्याची पातळी जास्त वाढली आहे. फळछाटणीचा कालावधी जवळ येत असून, बागेतील फळछाटणीपूर्व तयारीची कामे तशीच थांबलेली आहेत.
Grape Farming
Grape Farming Agrowon

डॉ. अजयकुमार उपाध्याय, डॉ. आर. जी. सोमकुंवर

गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर (Rain Intensity) पुन्हा वाढला असून, मुळांच्या (Grape Root) कक्षेत पाण्याची पातळी जास्त वाढली आहे. फळछाटणीचा कालावधी (Pruning Period) जवळ येत असून, बागेतील (Vineyard) फळछाटणीपूर्व तयारीची कामे तशीच थांबलेली आहेत. सततच्या पावसामुळे बागेत बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. यामध्ये काडीची परिपक्वता व अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेची (Nutrients Availability) समस्या प्रामुख्याने दिसून येते.

काडी परिपक्वतेची समस्या ः

सतत होत असलेल्या पावसामुळे शेंडा वाढ जास्त जोमात होताना दिसून येईल. बगलफुटीसुद्धा तितक्याच जोमात वाढत आहेत. यामुळे तळातून काडी पूर्ण पक्व होण्याऐवजी दुधाळ रंगाची दिसून येईल. या काडीवर फळछाटणी घेतल्यास गोळीघड निघण्याची जास्त शक्यता असेल. फळछाटणीपूर्वी काडी परिपक्व झाली की नाही, ते समजून घेणे गरजेचे असेल. आपण फळछाटणी ज्या डोळ्यावर घेणार आहोत, त्या डोळ्याच्या दोन पेरे पुढे काप घेऊन पाहावा. या ठिकाणी जर पीथ चांगल्या प्रकारे तयार (म्हणजेच पूर्ण तपकिरी रंगाचा) झालेला असल्यास काडी परिपक्व झाली असे म्हणता येते. अशा परिस्थितीत फळछाटणीची तयारी करता येईल. मात्र पीथ जर पांढरा असल्यास फळछाटणी घेण्याचे टाळावे. बागेत पुढील प्रकारे काही उपाययोजना कराव्यात.

- या वेळी बागेत पाणी पूर्णपणे बंद करावे.

-पीथचा रंग बघून खतांची मात्रा कमी अधिक करावी. विशेषतः पालाशची उपलब्धता जमिनीतून किंवा फवारणीद्वारे करावी.

-पीथ पांढरा असलेल्या परिस्थितीत फळछाटणी साधारणतः १५ दिवस पुढे ढकलावी.

-शेंडा पिंचिंग करून बगलफुटी काढून घ्याव्यात.

-प्रत्येक फूट ही तारेवर बांधून कॅनॉपी मोकळी राहील आणि काडीवर सूर्यप्रकाश व्यवस्थित पडेल, याचे नियोजन करावे.

Grape Farming
Pomogranate, Grape Farming : फळबाग केंद्रित नियोजित शेतीतून उल्लेखनीय प्रगती

खत व्यवस्थापन ः

फळछाटणीही साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू केली जाते. फळछाटणीपर्यंत वेलीवरील प्रत्येक पान निरोगी व सशक्त असणे गरजेचे असते. अशी परिस्थिती असल्यास काडीमध्ये अन्नद्रव्याचा साठा चांगल्या प्रकारे तयार होतो. पुढील काळात घडाचा विकास होण्यास मदत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कदाचित रोगनियंत्रण शक्य झाले नसेल. तसेच काही ठिकाणी पानगळही दिसून येईल. पानगळीमुळे काडीची परिपक्वता लांबणीवर जाईल, किंवा काही परिस्थितीत काडी पूर्णपणे कच्ची राहील. अशा अवस्थेतील काही बागेमध्ये जमिनीतून नत्र (युरिया) अर्धा किलो प्रति एकर प्रमाणे दोन दिवस द्यावे.

यामुळे नवीन फुटी लवकर निघतील. या फुटी पाच ते सहा पानांच्या होताच चार ते पाच पानावर शेंडा पिंचिग करून घ्यावे. यावर पालाशयुक्त खताची फवारणी उदा. ०-०-५० दोन ग्रॅम किंवा ०-९-४६ दीड ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे दिवसाआड चार ते पाच वेळा करावी. तसेच जमिनीतून ठिबकद्वारे पालाश पाच ते सहा किलो प्रति एकर या प्रमाणे उपलब्धता करावी. या नंतर बागेत एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. यामुळे आलेल्या कोवळ्या पानांवर स्कॉर्चिंग येईल. फुटी जास्त वाढणार नाहीत. पाने खराब झाल्यामुळे काडीतून अन्नद्रव्येही वाया जाणार नाहीत. काडीची परिपक्वता मिळवणे सोपे होईल.

Grape Farming
Grape Farming : सिंचनाच्या भक्कम पायावर मालगावात फुलल्या द्राक्ष बागा

बागेत पाणी आणि माती परीक्षण महत्त्वाचे समजावे. बऱ्याच बागेत चुनखडी कमी अधिक प्रमाणात आढळून येते. त्यामुळे महत्त्वाच्या अन्नद्रव्याचा पुरवठा वेलीला होत नाही. चुनखडीच्या उपलब्धतेमुळे जमिनीचा सामू ७.५ च्या अधिक असल्याचे दिसते. चांगल्या जमिनीचा सामू हा ६.५ ते ७.२ या दरम्यान असतो. चुनखडीमुळे सामू जास्त वाढून, इतर अन्नद्रव्याचा पुरवठा करतेवेळी बरीच बंधने येतात. अशा वेळी काही उपाययोजना महत्त्वाच्या असतात. उपाययोजना करण्यापूर्वी जमीन व पाण्याची सद्यःस्थिती कशी आहे, हे परीक्षणाद्वारे समजून घेणे अत्यावश्यक असते.

१) जमिनीमधील चुनखडीवर मात करण्यासाठी सल्फरचा वापर महत्त्वाचा असतो. ज्या बागेतील जमिनीत चुनखडी आणि पाण्यातही क्षार आहेत अशा स्थितीमध्ये सल्फरचा वापर करता येईल.

२) जर जमिनीत चुनखडी नाही, मात्र पाण्यात अधिक क्षार असल्याची स्थिती असल्यास जिप्सम दीडशे ते दोनशे किलो प्रति एकर जमिनीतून द्यावे.

३) फळछाटणीपूर्वी सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करतेवेळी शेणखतात व्यवस्थित मिसळून करावा. त्याचा अधिक फायदा होतो.

४) माती परीक्षणानुसार जमिनीत किती टक्के चुनखडी आहे, त्यानुसार सल्फरची उपलब्धता करता येईल. मात्र जिथे माती परीक्षणच केलेले नाही आणि जमिनीत चुनखडी असल्याचा अंदाज असेल, पन्नास किलो प्रति एकरी या प्रमाणात सल्फर शेणखतात व्यवस्थित मिसळून बोदामध्ये टाकावे.

५) ज्या जमिनीचा सामू ७.२ पेक्षा जास्त आहे, अशा जमिनीमध्ये आम्लीकरणाची (अॅसिडिफिकेशन) क्षमता जास्त असलेल्या खतांचा वापर करावा. उदा. युरिया ऐवजी अमोनिअम सल्फेटचा वापर करावा.

६) माती परीक्षणाकरिता ठिबक पासून १० ते १५ सेंमी जागा सोडून एक फूट खोल अशा प्रकारे माती गोळा करावी. एक एकरातून पाच ते सहा ठिकाणची माती नमुने गोळा करून एकत्र करावेत. या नमुन्याचे एक सारखे चार भाग त्यातून दोन भाग काढून टाकावेत. शिल्लक राहिलेल्या नमुन्याचे चार भाग करून साधारणतः तीन ते चार वेळी मिसळून शेवटी अर्धा किलोचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा. माती काढतेवेळी आपण यापूर्वी खते दिलेल्या जागा टाळाव्यात. खत असलेली माती परीक्षणासाठी जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.

७) माती परीक्षणाच्या अहवालानुसार जमिनीत अन्नद्रव्ये कमी असल्यास द्राक्ष संशोधन केंद्राच्या खत शिफारशीपेक्षा २५ टक्के मात्रा जास्त वाढवून द्यावी. परीक्षणाच्या अहवालामध्ये जर अन्नद्रव्याची पातळी साधारण असल्यास संशोधन केंद्राच्या शिफारशीच्या फक्त ७५ टक्के इतकाच पुरवठा करावा. तर जमिनीत अन्नद्रव्ये जास्त असल्यास शिफारशीच्या फक्त ५० टक्के इतकी खतमात्रा द्यावी. आपल्या बागेतील वेलीची परिस्थिती पाहूनही हा निर्णयात बदल करता येतील.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८

(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com