Vineyard Management : कमी तापमानामुळे बागेत उद्‍भविणाऱ्या समस्या

सध्याच्या वातावरणाचा विचार करता दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील तफावतीमुळे बागेत विविध समस्या दिसून येतील. अचानक कमी झालेल्या रात्रीच्या तापमानामुळे वेलींच्या शरीरशास्त्रीय हालचालींमध्ये असंतुलन दिसून येते.
Vineyard Management
Vineyard Management Agrowon

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. सुजॉय साहा

सध्या द्राक्ष बागेतील तापमानाचा (Vineyard Temperature) विचार करता, प्रत्येक विभागात दिवसाचे तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअसपर्यंत राहून रात्रीच्या तापमानात बऱ्यापैकी घट (Temperature Decrease) झाल्याचे दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये रात्रीचे तापमान जवळपास ४ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाल्याचे दिसून आले. यासह इतर भागांतही अशीच परिस्थिती दिसून येते. काही भागांमध्ये फळछाटणी (Grape Prunning) लवकर झाली होती.

अशा ठिकाणी मण्यात पाणी उतरण्यापासून ते फळ काढणीपर्यंतची अवस्था दिसून येईल. लवकर छाटणी झालेल्या द्राक्ष बागेमध्ये हिरव्या तसेच रंगीत द्राक्ष जाती आढळून येतील. फळ काढणीपर्यंतच्या बागेत या वेळी किमान तापमानाचा फारसा परिणाम होणार नाही.

परंतु वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींमध्ये असंतुलन निर्माण होऊन वेलीस काही प्रमाणात ताण बसेल. त्याचा परिणाम द्राक्ष घडाच्या तजेलदार पणावर दिसून येईल. त्यामुळे द्राक्ष घड पाहिजे तसा ताजातवाना दिसणार नाही.

Vineyard Management
vineyard Damage : पावसामुळे द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान

किमान तापमानामुळे काळ्या द्राक्ष जातींना रंग बदण्याकरिता अडचण येणार नाही. या बागेत पिंक बेरीची समस्या नसेल. परंतु या बागेतील वेलीवर थोड्याफार प्रमाणात ताण बसलेला दिसेल. अचानक कमी झालेल्या रात्रीच्या तापमानामुळे वेलींमध्ये शरीरशास्रीय हालचालींचे असंतुलन होते.

परिणामी, काही ठिकाणी घडाचे देठ काळे पडलेले दिसून येतील. तर काही ठिकाणी बागेत सुकवा निर्माण झाल्याची स्थिती दिसून येईल. अचानक कमी झालेल्या तापमानामध्ये पाणी गोठण्याची प्रक्रिया होऊन बर्फामध्ये त्याचे रूपांतर होते.

याचा परिणाम वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींवर अचानक दाब निर्माण होऊन काही काळाकरिता वेलीची प्रक्रिया एकतर मंदावली जाते किंवा थांबते. अशा परिस्थितीमध्ये वेलीवरील घड सुकल्यासारखे दिसून येतात.

सध्याच्या वातावरणाचा विचार करता ऑक्टोबर महिन्यात फळछाटणी केलेल्या बागेत बऱ्याच घडामोडी होताना दिसून येतील. या बागेत हिरव्या व रंगीत द्राक्ष जास्तींची समावेश असला, तरी दोन्ही द्राक्ष जातींची पाणी उतरण्याची अवस्था असावी किंवा नुकतेच पाणी उतरून गेलेल्या घडाची अवस्था असेल.

अशा परिस्थितीत किमान तापमानात अचानक झालेली घट ही त्या वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींवर पूर्णपणे दबाव आणून घडाच्या विकासावर विपरीत परिस्थिती निर्माण करते.

दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात झालेली तफावत हिरव्या रंगाच्या द्राक्ष जातींमधील मण्यात हिरव्या रंगाच्या द्रवाचे रूपांतर गुलाबी रंगाच्या द्रव्यात करते. यालाच ‘पिंक बेरी’ असे म्हणतात. ही परिस्थिती विशेषतः नाशिक व पुणे जिल्ह्यात दिसून येईल.

Vineyard Management
Vineyard Management : कमी तापमानामुळे उद्‍भविणाऱ्या समस्यांवरील उपाययोजना

सोलापूर व सांगली जिल्ह्यांत दिवस व रात्रीच्या तापमानातील जास्त तफावत दिसून येत नाही. त्यामुळे या भागात पिंक बेरीची समस्या जास्त प्रमाणात दिसून येत नाही. नाशिक जिल्ह्यातून द्राक्षाची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. या गोष्टींचा विचार करता चांगल्या प्रतीची द्राक्ष तयार करणे हा महत्त्वाचा विषय असतो.

मात्र या वेळी तापमानामुळे बागायतदारांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. पिंक बेरीच्या समस्येवर उपाय करणारा किंवा कोणताही नियंत्रण घटक उपलब्ध झालेला दिसत नाही. परंतु द्राक्ष घड पेपरने झाकून घेतल्यास किमान व कमाल तापमानातील तफावत काही प्रमाणात कमी करण्यास मदत होते आणि पिंक बेरी टाळता येते.

ही बाब खर्चिक असली तरीदेखील दुसरा कोणताही उपाय नसल्यामुळे निर्यातक्षम प्रतीच्या बागेत ही कार्यवाही करणे महत्त्वाचे असेल. बागेत पाणी वाढवून काही अंशी तापमानात वाढ करून घेता येईल.

परंतु त्या बागेत पाणी किती प्रमाणात उपलब्ध आहे यावर ही उपाययोजना अवलंबून राहील. काळ्या द्राक्ष जातींमध्ये जरी रंगाची समस्या नसली तरीदेखील घडाच्या विकासात मात्र अडचणी निर्माण होतील.

Vineyard Management
Vineyard Management : उकड्या : द्राक्षातील शरीरशास्त्रीय विकृती

सध्या कमी झालेले तापमान ४ दिवस जरी टिकून राहिल्यास घडाचा विकास थांबेल, पानांची कार्य करण्याची क्षमता कमी होईल. ज्या बागेत किमान तापमान (२ अंश सेल्सिअसपर्यंत) खूपच कमी झालेले असेल त्या बागेतील वरची कॅनॉपी करपल्यासारखी दिसून येईल. काही प्रमाणात पाने सुकतील.

पानांतील हरितद्रव्य नष्ट झाल्यामुळे पुढील काळात घडाच्या विकासात अडचणी येतील. बऱ्याच बागेत पाने करपल्यानंतर घडांना सावलीकरिता पुरेशी कॅनॉपी नसल्यामुळे मण्यांवर स्कॉर्चिंग दिसून येईल. यामुळे पुढील काळातच सन बर्निंगची समस्या दिसून येईल.

हवामानाचा अंदाज आधीच माहिती झाला असल्यास, पूर्वनियोजित उपाययोजना करणे शक्य होईल. तापमानात अचानक घट झाल्यास बागेमध्ये ठिकठिकाणी शेकोट्या पेटवूनसुद्धा तापमानात वाढ करता येईल.

रोग नियंत्रणावर भर

टिंगनंतर वाढीच्या अवस्थेत पानाची परिपक्वता झालेली दिसून येईल. या वेळी ढगाळी वातावरणसुद्धा दिसून येईल. त्याचसोबत सध्याच्या तापमानामध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव हा प्रामुख्याने दिसून येतो. दाट कॅनॉपी असलेल्या वेलीवर भुरीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसेल. बऱ्याच ठिकाणी पानाच्या मागे दडलेला द्राक्ष घड पूर्णपणे भुरी रोगाने ग्रस्त झालेला दिसून येईल.

या वेळी द्राक्ष बागेत ५० दिवसांनंतर वाढीच्या अवस्थेत आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी करण्याची शिफारस मुळीच नसते. यावर उपाययोजना म्हणून स्पर्शजन्य बुरशीनाशकांची धुरळणी करता येईल. मोकळी कॅनॉपी असलेल्या बागेत ही समस्या कमी प्रमाणात दिसून येते.

कारण या कॅनॉपीमध्ये हवा सतत खेळती राहिल्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण कमी राहते. त्यामुळे फवारणीचे कव्हरेज चांगले होऊन प्रभावी रोग नियंत्रण होते. थोडक्यात या कॅनॉपीमध्ये रोगास पोषक वातावरण तयार होत नाही. या वेळी जैविक नियंत्रणावर जोर देता येईल.

काही भागांमध्ये धुके, पानांवर दवबिंदू जास्त काळ टिकून राहिल्याची समस्या दिसून येईल. अधिक प्रमाणात धुके जास्त कालावधीसाठी राहिल्यामुळे पाने जास्त काळ ओली राहतात. त्यामुळे आर्द्रता सुद्धा वाढते. या काळात डाऊनी मिल्ड्यूसारख्या रोगाचे बीजाणू सतर्क होतात.

पाणी उतरत असलेल्या परिस्थितीसुद्धा याचा प्रादुर्भाव दिसून येईल. अशा वातावरणात भुरी आणि डाऊनी या दोन्ही रोगांचे नियंत्रण गरजेचे असेल. ज्या बागेत पाने जास्त वेळ ओली राहतात तेथे स्पर्शजन्य बुरशीनाशकांची धुरळणी करणे फायद्याचे असेल.

यामुळे ओल्या पानांवर जास्त वेळ बुरशीनाशक चिकटून राहील व रोग नियंत्रण सोपे होईल. कॅनॉपीत वाढलेल्या आर्द्रतेत पाने जास्त काळ ओली नसलेल्या परिस्थितीत जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माच्या ३ ते ४ फवारण्या करून घेतल्यास प्रभावी रोग नियंत्रण होईल.

- डॉ. आर. जी. सोमकुंवर,

९४२२०३२९८८

(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com