Crop Management : आंतरपीक, मिश्र व बहुविध पीकपद्धतीतून समृद्धी

कोकणातील हवामान, माती आणि बाजारपेठांतील मागणी या गोष्टींचा पुरेपूर विचार खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील गुणे कुटुंबाने केला. त्यातूनच बहुविध पीक पद्धती जपण्याबरोबर मिश्र, आंतरपीक पद्धतीचा वापर करून फळबाग व्यावसायिक केली.
Crop Management
Crop ManagementAgrowon

राजेश कळंबटे

कोकणातील हवामान, माती आणि बाजारपेठांतील मागणी या गोष्टींचा पुरेपूर विचार खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील गुणे कुटुंबाने केला. त्यातूनच बहुविध पीक पद्धती (Multiple Cropping Technique) जपण्याबरोबर मिश्र, आंतरपीक पद्धतीचा (Inter-crop Technique) वापर करून फळबाग व्यावसायिक केली. आंबा, नारळ, काजू, चिकू, सोनकळी, काळी मिरी, बांबू, अननस अशी विविधता ठेवतानाच गोसंगोपन व छोटेखानी दुग्ध व्यवसायातून शेतीला पूरक जोड देत कुटुंबाने समृद्धी व समाधान मिळवले आहे.

कोकणाला निसर्गसंपन्नतेचा वारसाच मिळाला आहे. दऱ्या- घाट- डोंगरांमधून वसलेला विविध फळबागांचा हा समृद्ध वारसा जपण्याचे काम येथील शेतकरी करीत आहेत. खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील शशिकांत गुणे हे त्यापैकीच एक आहेत. बीएस्सी (फिजिक्स) पदवी घेतलेला त्यांचा मुलगा श्रीनिवास २००१ पासून शेतीची जबाबदारी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली समर्थपणे सांभाळतो आहे.

Crop Management
Indian Agriculture : आपल्याला तारणारी शेती पद्धती

शेतीचा विकास

कोकणातील हवामान, जमीन व कोकणी शेतीमालाला असलेली बाजारपेठेतील मागणी

लक्षात घेऊन गुणे यांनी शेती विकसित केली आहे. मिश्र व आंतरपीक पद्धतीचा सुरेख मेळ घातला आहे. गुंठ्याला दोन झाडे या पद्धतीने २००६ मध्ये दहा एकरांत तर पाच वर्षांपूर्वी वीस फुटांवर एक झाड या प्रमाणे काजूची ५५० अशी एकूण एक हजारांपर्यंत झाडे त्यांच्याकडे आहेत. दरवर्षी एकूण तीन टनांपर्यंत काजू बी मिळते. १२५ रुपये प्रति किलो दर मिळतो. बाजारात मागणी असलेल्या वेंगुर्ला ४, वेंगुर्ला ७ या वाणांच्या लागवडीवर भर दिला आहे.

हापूस, केसर आंबा लागवड

हापूस आंब्याची सुमारे १०० झाडे असून, ती तीस वर्षांची तर केशर आंब्याची १२५ झाडे पंधरा वर्षांची आहेत. खानू परिसरात आंबा हा मे महिन्यातच सर्वाधिक असतो. एकूण मिळून १०० पेटीपर्यंत आंबा वर्षाला मिळतो. हापूसला १५०० ते २००० रुपये प्रति पाच डझन पेटी दर मिळतो. विक्रीसाठी बाजारपेठ शोधण्याची गरज पडत नाही. सर्व आंबा घरूनच विकला जातो. केसरचा दर्जा व स्वादही

अत्यंत चांगला असल्याने त्यालाही दर मिळतो असे श्रीनिवास सांगतात. भविष्यात त्याच्या लागवडीवर अधिक भर आहे.

चिकूत केळी

दहा वर्षांपूर्वी कालीपत्ती जातीच्या १२५ चिकू वाणाची लागवड केली आहे. झाडांना वर्षातून तीन वेळा शेणखत दिले जाते. प्रति झाड हंगामात दोन किलो उत्पादन मिळते. रमझान व अन्य सणांना चिकूला मोठी मागणी असते. तीस ते ३५ रुपये प्रति किलो दराने रत्नागिरी बाजारपेठेत चांगली विक्री होते. दोन झाडांमध्ये वीस फूट अंतर ठेवले आहे. त्याचा फायदा घेऊन प्रत्येकी दहा फूट अंतरावर सोनकेळीचे आंतरपीक घेतले आहे. त्यातून मुख्य पिकाचा खर्च कमी केला आहे. सोनकेळी हे देशी वाण असल्याने सात वर्षे तरी उत्पादन देत राहते. ४० ते ५० रुपये प्रति डझन या दराने त्याची विक्री होते.

फणसात अननस

आंतरपिकांमधून जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न असतो.

फणसाची सुमारे २०० झाडे आहेत. त्यात अननसाची रोपे लावली असून फणसाच्या प्रत्येक झाडावर काळी मिरीचे वेल सोडले आहेत. खानूपासून रत्नागिरी शहर २५ किलोमीटरवर आहे. येथील बाजारपेठेत अननसाला मोठी मागणी असते. बागेतील ताज्या अननसांना प्रति नग ३० ते ३५ रुपये दर मिळतो. काळी मिरीच्या एकूण वेलींमधून दरवर्षी २५ किलोपर्यंत उत्पादन मिळते. ती दोनशे रुपये प्रति किलो दराने विकली जाते.

गोव्यातील व्यापाऱ्यांनी यंदा ३८० रुपये दराने ती खरेदी केली. लवकरच सिमेंटच्या खांबावर लागवडीचा प्रयोग करणार आहे. घराजवळील जागेत नारळाची ५० झाडे आहेत. वर्षाला एक हजारांपर्यंत नारळ मिळतात. बाजारात मागणी असलेल्या श्रीवर्धन रोठा या सुपारीची ५० झाडे आहेत. अजून सुपारी विक्रीयोग्य झालेली नाही. मात्र ३०० ते ४०० रुपये प्रति किलो त्यास दर मिळेल.

बाजारपेठ

मालाची गुणवत्ता चांगली असेल त्याला आपसूकच ग्राहक मिळतात या तत्त्वावरच शेतीचे व्यवस्थापन होत असल्याचे गुणे सांगतात. सत्तर टक्के सेंद्रिय व ३० टक्के रासायनिक पद्धतीचा वापर होतो. दरवर्षी वडिलोपार्जित शेतीत थोडी-थोडी करीत वाढ केली आहे. घर मुंबई-गोवा महामार्गाशेजारी असल्याने फलक लावून शेतीमालाची जाहिरात केली आहे. त्यामुळे येणारा-जाणारा ग्राहक वर्ग घराजवळ थांबून थेट खरेदी करतो. अधिक मालाची व्यापाऱ्यांनाही विक्री होते.

गोपालनाचा आधार

शशिकांत हे ‘डेअरी डेव्हलपमेंट’ विभागात नोकरीला होते. त्यांना गावोगावी फिरती असे. त्यातूनच शेतीत काहीतरी करण्याची अधिक आवड निर्माण झाली. सध्या त्यांच्याकडे दोन गायी व चार वासरे आहेत. दररोज १० ते १२ लिटर दूध मिळते. आठ ते दहा वर्षांमध्ये गायींचे संकरीकरण करून

दुग्धोत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठीच्या सर्व नोंदी ठेवल्या आहेत. गोपालनातून शेणखतही उपलब्ध केले असून, त्याचा शेतीत वापर होतो. शशिकांत यांचा शेतीतील उत्साह उतारवयातही टिकून आहे. पहाटे साडेपाच वाजता ते उठतात. त्यानंतर गोठ्याची स्वच्छता, दूध काढणे या बाबी करून ते बागेत फेरी मारतात. विकसित केलेल्या शेतीच्या जोरावरच घरी समृद्धी व समाधान आणण्यामध्ये गुणे कुटुंब यशस्वी झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com