
रश्मी भोगे, डॉ. सी. एस. पाटील, डॉ. व्ही. आर. शेलार
कडधान्य (Pulses) हे दैनंदिन आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. कडधान्ये प्रथिने, ऊर्जा व खनिजे यांचा महत्त्वाचा स्रोत आहेत. कडधान्यांच्या उत्पादनात (Pulses Production) होणारी वाढ ही तृणधान्ये व गळीत धान्यांच्या (Oil Seed) तुलनेने फार कमी आहे. कडधान्यावर आतापर्यंत १५० निरनिराळ्या किडींचा कडधान्यांवर प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यात प्रामुख्याने भुंगेरा किडीचा समावेश होतो. तूर, मूग, हरभरा, चवळी इत्यादी कडधान्यांवर भुंगेऱ्यांचा (Stored Pulses Pest) प्रादुर्भाव अधिक कडधान्य साठवणुकीतील ही प्रमुख कीड आहे. वेळीच योग्य उपाययोजना न केल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यासाठी भुंगेरा किडीची ओळख, जीवनक्रम, नुकसानीचा प्रकार आणि व्यवस्थापन याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.
ओळख
कडधान्यावर उपजीविका करणाऱ्या भुंगेऱ्यांच्या ८ प्रजाती आहेत. त्यापैकी कॅलोसोब्रूचस चायनेनसीस, कॅलोसोब्रूचस मॅक्युलेटस आणि ब्रूकस ॲनालीस या प्रजातींचा प्रामुख्याने प्रादुर्भाव आढळतो. कॅलोसोब्रूचस चायनेनसीस ही प्रजाती शेतात आणि साठवणुकीतील कडधान्यात जास्त प्रादुर्भाव व नुकसान करते.
प्रादुर्भाव प्रामुख्याने शेतामधून साठवणुकीतील धान्यात येतो. वाटाणा, हरभरा, तूर, उडीद, हुलगा, चवळी इ. कडधान्यावर ही कीड उपजीविका करते.
प्रौढ कीड बियाणे खात नाही. अंड्यातून बाहेर पडलेली अळी दाण्याच्या कवचामधून आत जाते व आतील भाग खाते.
जीवनक्रम
अंडी, अळी, कोष व प्रौढ या ४ अवस्थांमध्ये भुंगेऱ्याचा जीवनक्रम पूर्ण होतो. त्यास साधारण ३० ते ३५ दिवसांचा कालावधी लागतो.
प्रौढ मादी पीक शेतात असताना हिरव्या शेंगाच्या पृष्ठभागावर अंडी घालते. नुकतीच घातलेली अंडी मऊ व चमकदार असतात. नंतर ती पिवळसर होतात. मादी पहिल्या २४ तासांत जास्तीत जास्त अंडी घालते. नंतर अंडी घालण्याचे प्रमाण हळूहळू कमी होते.
अंडी घालण्यासाठी मादी संपूर्ण धान्याला पसंती देते. एक मादी जवळपास ९५ अंडी घालू शकते. अंड्याची अवस्था ही ४ ते ५ दिवस राहते.
अंड्यातून बाहेर पडलेली अळी दाण्यात शिरून आतील भाग पोखरून खाते.
कोषात रूपांतर होताना अळीला चार बाल्यावस्थेतून जावे लागते. अळीचा कोष दाण्यातच तयार होतो. अळी अवस्था २ ते ३ आठवड्याची तर कोषावस्था ४ दिवसाची असते.
पूर्ण वाढलेली अळी ही ६ मिमी लांब व सुरकुतलेल्या शरीराची असते. अळीला पाय नसतात. तोंडाचा भाग गर्द तपकिरी असतो.
प्रौढ भुंगेरा दाण्यास गोल छिद्र पाडून आतून बाहेर येतो. पूर्ण वाढलेला भुंगेरा गडद चॉकलेटी रंगाचा ४ ते ५ मिमी लांब असून आकाराने फुगीर व लांबट गोल असतो. पाठीवर दोन पांढऱ्या रंगाचे ठिपके असतात. पोट फुगीर व पंख आखूड असल्यामुळे पोटाचे मागील टोक पंखातून चांगले दिसते.
प्रौढ भुंगेरे पंखाचा उपयोग करून उडू शकतात. प्रौढ नर हे मादीपेक्षा जास्त चपळ असतात.
प्रौढ मादी ७ ते १० दिवस तर प्रौढ नर ५ ते १० दिवस जगतो.
व्यवस्थापन
गोदाम स्वच्छता
साठवणुकीची जागा किंवा गोडाऊन व्यवस्थित स्वच्छ करावे. धान्य वाहतुकीदरम्यान प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तो टाळण्यासाठी धान्य वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे साधने उदा. ट्रक, ट्रॉली, बैलगाडी इ. व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावे.
गोदामाच्या भिंती, छत, जमीन झाडून स्वच्छ करावे. भिंतीना भेगा असल्यास त्या बुजवून घ्याव्यात. दाराजवळील सर्व भेगा बुजवून टाकाव्यात.
अंधार व कोंदट वातावरण किडींच्या वाढीसाठी पोषक ठरते. त्यामुळे गोदामात हवा व प्रकाश कायम खेळती राहणे आवश्यक आहे.
बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण
साठवलेल्या बियाण्यात निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त आर्द्रता असल्यास किडींसाठी पोषक ठरते. परिणामी नुकसानीचे प्रमाण वाढते.
साठवणुकीपूर्वी बियाणे सूर्यप्रकाशामध्ये चांगले वाळवून त्यातील आर्द्रता कमी करावी.
बियाणे वाळविल्यावर त्यातील आर्द्रतेचे प्रमाण ८ ते १० टक्क्यांपर्यंत कमी होणे आवश्यक आहे. आठ टक्क्यांपेक्षा कमी आर्द्रता असलेल्या बियाणांत किडीची वाढ व्यवस्थित होत नाही.
थप्पी लावण्याची योग्य पद्धत
धान्य भरण्यासाठी शक्यतो नवीन गोण्या किंवा पोत्यांचा वापर करावा.
गोणी किंवा पोत्यात भरलेल्या धान्याची थप्पी लावताना प्रत्येक भिंतीच्या बाजूने अर्धा मीटर जागा सोडून थप्पी लावावी. थप्पी जमिनीवर न लावता कीड विरहित लाकडी स्टेकवर लावावी.
थप्पी लावताना छतापासून एक पंचमांश (१/५) भाग रिकामा राहील याप्रकारे लावावी. थप्पीच्या दोन रांगामध्ये अर्धा मीटर जागा सोडावी.
थप्पी लावल्यानंतर गोदामाच्या भिंती व मोकळी जागा रोज झाडून स्वच्छ करावी. लावलेल्या थप्पी झाडून दर आठवड्याला स्वच्छ करावी. संपूर्ण गोदाम महिन्यातून एकदा स्वच्छ करावे.
गोदामामध्ये उंदीर तसेच पक्ष्यांना प्रतिबंध करण्यासाठी खिडक्यांना लोखंडी तारेच्या जाळ्या बसवाव्यात.
गुणात्मक उपाय
यामध्ये रसायनविरहित व रसायनांच्या साहाय्याने किडींचा बंदोबस्त करता येतो.
रसायन विरहित उपाय
थंड तापमान पद्धत
बऱ्याचशा साठवणुकीतील किडींच्या अपूर्ण अवस्था (बाल्यावस्था) या १४ अंश सेल्सिअस तापमानाखाली मरतात. गोठणबिंदूच्या खाली (वजा १० ते वजा २० अंश सेल्सिअस) तापमान गेल्यास लगेच या किडींचा नाश होतो. साठवलेल्या धान्यामध्ये नैसर्गिक थंड हवा खेळवून त्यात थंडावा आणता येतो. तसेच शीतपद्धतीचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात अन्नधान्य थंड करता येतो.
उष्ण तापमान पद्धत
साठवणुकीतील बऱ्याच किडी ५० ते ६० अंश सेल्सिअस तापमानामध्ये १० ते २० मिनिटांत मरण पावतात. किडीच्या वाढीसाठी आवश्यक अनुकूल तापमानापेक्षा ५ अंश सेल्सिअसने तापमान वाढल्यास त्यांची वाढ थांबते.
नियंत्रित वातावरण पद्धत
साधारणत: वातावरणातील ९ ते ९.५
टक्के कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण सर्व किडींना प्राणघातक असते. तसेच ऑक्सिजनची मात्रा १ टक्क्यांपेक्षा कमी केल्यास किडी नाश
पावतात.
अन्य घटक
अ) अविषारी पदार्थ
उदा. माती, राख इत्यादींचा वापर करावा. अन्नधान्य वापरण्यापूर्वी स्वच्छ करावे लागते.
ब) तेल
मोहरी किंवा शेंगदाण्याचे तेल ७.५ मिलि प्रति किलो या प्रमाणात कडधान्यास चोळावे. त्यामुळे ९ महिन्यांपर्यंत कडधान्यांचा भुंगेऱ्यांपासून बचाव होतो.
क) वनस्पतीचा उपयोग
कडूलिंब या वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा (पाने व बियांची पावडर, तेल इ) उपयोग कीड नियंत्रणासाठी फायदेशीर ठरतो.
भुंगेराच्या नियंत्रणासाठी निंबोळी पावडर ५ टक्के, निमतेल किंवा महुआ तेल १ टक्के प्रमाणे वापरावे.
सोंडे किडीच्या नियंत्रणासाठी, हळद पावडर ३.२५ टक्के किंवा रिठा/ वेखंड पावडर १० ग्रॅम प्रति किलो बियाणास प्रक्रिया करावी.
ड) सुधारित साठवणूक पद्धत ः
धान्य किंवा बियाण्याची खुली साठवणूक - पुसाबीन, ॲल्युमिनिअम घुमटाकार कणगी व सुधारित पेव कोठ्या, काटकोनाकृती पोलादी कणगी, अनाज कोठी इ. वापर करावा.
(टीप ः रासायनिक उपाय उद्याच्या अंकात)
- रश्मी भोगे,९९२१३७२७९३ (सहाय्यक बियाणे संशोधन अधिकारी)
(डॉ. पाटील हे कृषी कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख तर डॉ. शेलार हे बियाणे संशोधन अधिकारी म्हणून बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
जि.नगर येथे कार्यरत आहेत.)
नुकसानीचा प्रकार
पीक शेतात असताना भुंगेरे शेंगावर अंडी घालतात व पीक काढणीपूर्वी दाण्यात प्रवेश करतात. ही कीड वाटाणा, हरभरा, तूर, उडीद, हुलगा, चवळी या सारख्या कडधान्यांवर साठवणुकीत जास्त प्रादुर्भाव व नुकसान करते.
प्रौढ भुंगेरा बियाणे खात नाहीत. मात्र, अंड्यातून बाहेर पडलेली अळी दाण्यात शिरून आतील भाग पोखरून टाकते.
अळीचा कोष दाण्यातच तयार होतो व प्रौढ भुंगेरा दाण्याला गोल छिद्रे पाडून आतून बाहेर पडतो. कीडग्रस्त बियाणांवर गोल छिद्रे व पांढरट पिवळट रंगाचे ठिपके दिसतात.
किडलेले बियाणे पेरणीयोग्य राहत नाही. तसेच बियाण्यांची उगवणक्षमता कमी होते. कीडग्रस्त धान्य खाण्यायोग्य राहत नाही.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.