
जोमदार वाढीसाठी हरभरा पीक (Chana Crop) सुरुवातीपासूनच तण विरहीत ठेवणे आवश्यक आहे. पीक २० ते २५ दिवसाचे असताना पहिली कोळपणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थानासाठी ५ % (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस (२५ % इसी) २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट (५ %) ४.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
करडई पिकात उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी विरळणी करावी व दोन रोपातील अंतर २० सेंमी ठेवावे. वेळेवर लागवड केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी डायमिथोएट (३० %) १३ मिली किंवा अॅसिफेट (७५ %) १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात तणांच्या प्रादूर्भावानूसार पेरणीनंतर २५ ते ५० दिवसापर्यंत एक ते दोन कोळपण्या व खूरपण्या घ्याव्यात.
हळदीवरील पानावरील ठिपके आणि करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन (१८.२%) + डायफेनकोनॅझोल (११.४% एससी) १० मिली किंवा बायोमिक्स १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाच्या स्टिकरसह फवारणी करावी.
हळदीमधील कंदकुज रोगाच्या व्यवस्थापनासाठी बायोमिक्स १५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. हळदीवरील कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी १५ दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस (२५ %) २० मिली किंवा डायमिथोएट (३० %) १५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाच्या स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी.
उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. लक्षात ठेवा हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत.
पूर्व हंगामी ऊसाची लागवड लवकरात लवकर संपवावी. ऊस लागवड करतांना ३० किलो नत्र, ८५ किलो स्फुरद व ८५ किलो पालाश (३२७ किलो १०:२६:२६ किंवा १८५ किलो डायअमोनियम फॉस्फेट + १४२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश किंवा ६५ किलो युरिया + ५३१ किलो सिंगल सुपर फॉस्फेट + १४२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.