
रब्बी हंगामात कांद्याची (Rabbi Onion) लागवड केल्यास हवामानामुळे कांद्याची प्रत चांगली मिळते याशिवाय उत्पादन अधिक मिळतं.
ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात बियाणे पेरून रोपाची पुनर्लागवड डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करावी.
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी लागवड केली तर एप्रिलमध्ये काढणी होते. पाती आणि कांद्याची सुकवण चांगली होते सुकवलेला कांदा साठवणीत चांगला टिकतो.
कांदा लागवडीला शिफारशीत कालावधी पेक्षा उशिरा झाला तर उत्पादनात घट येते. त्यामुळं कांद्याची वेळेवर रोपं तयार करणं आणि रोपांची वेळेवर पुनर्लागवड करणं हे चांगल्या उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे.
ज्या शेतकऱ्यांनी ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात कांद्याचे बी पेरुन रोपे तयार केली आहेत त्यांनी कांदा रोपांची पुनर्लागवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ. अनिकेत चंदनशिवे यांनी दिलेली माहिती पाहुया.
कांदा लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. शेताची उभी आडवी नांगरणी करून ढेकळे फोडावीत. त्यानंतर वखरणी करून जमीन भुसभुशीत करावी.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात रोपांची पुनर्लावड करावी. लागवडीपूर्वी सपाट वाफ्यात हलके पाणी देऊन नंतरच लागवड करावी.
चांगलं कुजलेलं शेणखत हेक्टरी १५ ते २० टन प्रमाणे जमिनीत मिसळावं. त्यानंतर पुन्हा वखराची एक पाळी द्यावी. लागवडीसाठी २ मीटर रुंद व ३ ते ४ मीटर लांब वाफे तयार करावेत.
ठिबक सिंचनाची सोय असल्यास १.२० मीटर रुंदीचे बीबीएफ पद्धतीने वाफे तयार करावेत. लागवडीसाठी ६ ते ८ आठवडे वयाच्या कांदा रोपांची निवड करावी.
रोपांच्या पुनर्लागवडीनंतर रोपांवर माना टाकणाऱ्या रोगाचा म्हणजेच डॅंपिंग ऑफ रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गांडूळ खत किंवा कुजलेल्या शेणखतात मिसळून प्रति गादीवाफा २५ ते ३० ग्रॅम ट्रायकोडर्माचा वापर करावा.
सपाट व बीबीएफ वाफ्यावर १५ बाय १० सें.मी. अंतरावर रोपांची लागवड करावी.
कांदा रोपांना जास्त प्रमाणात खतमात्रा लागते. त्यासाठी हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश याप्रमाणे खतमात्रा द्यावी.
लागवडीवेळी संपूर्ण स्फुरद आणि पालाश व ५० किलो नत्र द्यावं. नत्राची उर्वरित मात्रा लागवडीनंतर ३० व ४५ दिवसांनी द्यावी. खते दिल्यानंतर पिकाला हलकं पाणी द्यावं.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.