Soybean Production : सोयाबीनच्या कमी उत्पादकतेची काय आहेत मुख्य कारणे?

गेल्या भागामध्ये आपण सोयाबीन पिकाचा जगभरामध्ये कसा प्रसार होत गेला त्याची माहिती घेतली. या भागामध्ये भारतातील वातावरण आणि त्यामध्ये सोयाबीनचा प्रसार कसा झाला, याची माहिती घेऊ. अमेरिकेच्या तुलनेमध्ये भारतीय उत्पादनात का फरक राहतो, याची कारणे जाणून घेऊ.
Soybean Production
Soybean ProductionAgrowon

डॉ. विवेक चिमोटे, डॉ. मिलिंद देशमुख

Soybean Market Rate Update : भारतीय उपखंडात सोयाबीनचा (Soybean) प्रवेश रेशीम मार्गाने झाला. ईशान्य भारत आणि हिमालय पर्वतांमधून शतकानुशतके होणारा व्यापार व बौद्धधर्माच्या प्रसारादरम्यान सोयाबीनचाही प्रसार होत गेला. आग्नेय आशियातील व्यापाऱ्यांनी समुद्रमार्गेही सोयाबीन आणले.

त्यामुळे भारत हे सोयाबीनचे दुय्यम उगमस्थान असल्याचेही मानले जाते. काळ्या बियांचे सोयाबीन पारंपरिकपणे भारताच्या विविध भागांमध्ये पसरले. भारतासाठी योग्य अशा सोयाबीन जातींचे मूल्यमापन करण्याचा पहिला पद्धतशीर प्रयत्न किंवा प्रयोग हे विशेषत: १९१७ ते २४ कालखंडात बिहारमधील पुसा कृषी संशोधन क्षेत्रामध्ये करण्यात आले.

पुढे कानपूर (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या संशोधनातून १९४३ मध्ये T- १ आणि T-४९ वाण प्रसारित झाले. भारताच्या मध्य आणि दक्षिणेकडील भागात सोयाबीनची सुधारणा विसाव्या शतकाच्या दरम्यान (इ.स. १९५०) सुरू झाली.

जबलपूर, सिहोर, इंदूर, पावरखेडा (मध्य प्रदेश), नागपूर, यवतमाळ, (महाराष्ट्र) आणि चेन्नई (तमिळनाडू) येथे वाण संग्रहाचे मूल्यमापन केले. त्यातून सामान्य लागवडीसाठी काही निवडक वाणांची शिफारस केली गेली. सुरुवातीच्या काळात केवळ देशी जात कालीतूरचे प्राबल्य होते.

बऱ्याच प्रयत्नांनंतरही इ.स. १९६९ पर्यंत भारताच्या मैदानी भागात सोयाबीनचे क्षेत्र फार मर्यादित होते. भारतात कुमाऊ (उत्तराखंड), नागपूर आणि पुणे जिल्हा (महाराष्ट्र) पंजाबचा काही भाग, गुजरातमधील खेडा जिल्हा आणि नागालँड, मणिपूर असे सहा लहान मोठे सोयाबीन लागवडीचे प्रदेश होते.

सोयाबीनचा सुरुवातीला वेगाने प्रसार न होण्यामागे खाद्यतेल उत्पादक कंपन्यांची अनुपलब्धता, वाण प्रक्रिया आणि विपणन सुविधांचा अभाव, अयोग्य लागवड पद्धती आणि सॉल्वंट आधारित तेलप्रक्रिया उद्योगांचा अभाव अशा कारणे सांगता येतात.

Soybean Production
Soybean Rate Maharashtra: सोयाबीन १५० ते २०० रूपयांनी वाढणार?

भारतात सोयाबीन संशोधनाचा इतिहास

गोविंद वल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, पंतनगर आणि जवाहरलाल नेहरू कृषी विश्‍व विद्यालय, जबलपूर यांनी १९६३-६४ दरम्यान सोयाबीन समन्वय संशोधन प्रकल्प सुरू केले.

भारतीय सोयाबीनच्या देशी विदेशी जातींमधून निवड पद्धतीने ‘चक्र-१’ ही जात १९७५-९० या काळात मिळवली. इ.स. १९७० च्या दशकात भारतात आणलेल्या बॅग (इ.स. १९६८), ली (इ.स. १९७५), डेव्हिस क्लार्क - ६३ (इ.स. १९७३) इ. सोयाबीन वाणांवर भारतीय सोयाबीन प्रजनन कार्यक्रम आधारलेला आहे.

भारतीय प्रजनन कार्यक्रमातून सुरुवातीला ‘अंकुर’ हा वाण इ.स. १९७६ मध्ये प्रसारित झाला. त्यानंतर ‘पंत सोयाबीन -१’, ‘टाइप ४९’ आणि अलंकार (इ.स. १९७८ मध्ये प्रसारित) या जाती विकसित झाल्या.

१९७० च्या दशकातील भारतात विकसित झालेल्या या बहुतांश जाती (१६५ वाणांपैकी १४८ वाण- सुमारे ९० टक्के) प्रकाश कालावधीसाठी संवेदनशील आहेत. त्यात भारतात सोयाबीन हे प्रामुख्याने मॉन्सूनवर अवलंबून असलेले पीक आहे. येथे मॉन्सूनच्या आगमनापासून पेरणी सुरू होते. मॉन्सून परतीनंतर १५ ते २० दिवसांनी काढणी होते.

सोयाबीनच्या बहुतेक जाती अक्षांशाद्वारे निर्दिष्ट केलेल्या विशिष्ट भौगोलिक विभागासाठी मर्यादित असतात. सोयाबीनचे हे वैशिष्ट्य पिकाचा कालावधी व फोटोपीरियडसाठीचे जनुकाद्वारे नियंत्रित झाले आहे.

सोयाबीन या पिकाची संवेदनशीलता पेरणीच्या कालावधीची मर्यादा ठरवते. विस्तृत भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेण्यावर मर्यादा येते. म्हणून सोयाबीन वाण हे त्या त्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रापुरते शिफारशीत केले जातात.

इ.स. १९९० मध्ये विकसित झालेल्या वाणांची निवड ‘चक्र-२’ या गटात केली आहे. या चक्रासाठीच्या संकरीकरण आणि उत्परिवर्तन कार्यक्रमात स्वदेशी विकसित वाणांचा वापर केला गेला. JS ३३५ हा JNKVV जबलपूरद्वारे विकसित झालेला वाण इ.स. १९९४ मध्ये प्रसारित झाला होता.

ते भारतातील विविध भौगोलिक प्रदेशामध्ये व्यापकपणे पसरल्यामुळे हे पहिले महत्त्वाचे सोयाबीन वाण मानले जाते. तेव्हापासून JNKVV ने लवकर परिपक्व होणाऱ्या JS ९३०५ (इ.स. २००२), JS ९५ ६० ( इ.स. २००७) आणि JS इ.स. २०३४ (इ.स. २०१४ ) आणि IS २०१८ (इ.स. २०१८) या सारखे काही मोलाचे वाणही प्रसारित केले.

सुरुवातीला ‘मोनेटा’ हा वाण विदेशी संकलनातून (EC २५८७) विकसित केले गेले. इ.स. १९८५ मध्ये ते महाराष्ट्रासह दक्षिण आणि मध्य झोनमध्ये लागवडीसाठी प्रसारित केले गेले.

महाराष्ट्रात सोयाबीन वाण विकास संशोधन कार्यात परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत सोयाबीन संशोधन योजना, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज आणि पुणे येथील आघारकर संशोधन संस्था यांचे भरीव योगदान आहे.

१) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी : फुले कल्याणी (डीएस २२८), फुले संगम (केडीएस ७२६), फुले किमया (केडीएस ७५३), फुले दूर्वा (केडीएस ९९२)

२) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला : पीडीकेव्ही अंबा (एएमएस १००-३९), सुवर्णा सोया (एएमएस - एमबी ५- १८), पीडीकेव्ही एलओ गोल्ड (एएमएस १००१)

३) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी : एमएयूएस ७१ (एएमयुएस ६१२), एमएयूएस ६१२, एमएयूएस १५८, एमएयूएस १६२.

४) आघारकर संशोधन संस्था, पुणे : एमएसीएस ११८८, एमएसीएस १२८१, एमएसीएस १४६०, एमएसीएस १५२०

सोयाबीनच्या उत्पादकतेवर हवामानातील घटकांचा होणारा परिणाम

महाराष्ट्रातील पोषक वातावरणामुळे ऊस व द्राक्ष पिकाची उत्पादकता जागतिक पातळीवर जास्त आहे. त्या विरुद्ध सोयाबीन पिकाची उत्पादकताही त्या नैसर्गिक हवामानातील घटकांमुळे कमी राहते. भारतीय सोयाबीनची उत्पादकता (१०५१ किलो/हेक्टर) ही जागतिक सरासरीपेक्षा (२६७० किलो/हेक्टर) खूपच कमी आहे.

भारतातील सोयाबीनचे बहुतांश क्षेत्र मध्य भारतात (मध्य प्रदेश- ४४.२४%, महाराष्ट्र- ३७.९९% -राजस्थान- ९.०४%, गुजरात - १.९४%) आहे. उत्तर आणि दक्षिण भारतात तुलनेने सोयाबीन क्षेत्र कमी आहे.

प्रकाश संवेदनशीलता

सोयाबीन पिकाची वाढ आणि उत्पादन हे सूर्य प्रकाशाची उपलब्धता आणि कालावधीवर अवलंबून असते. प्रति एकरी योग्य रोपसंख्या ठेवल्यास सूर्यप्रकाश दीर्घकाळ भरपूर मिळू शकतो. तणांच्या वाढीवर नियंत्रण राहते. फुलोऱ्यापूर्वी ३० सें. पेक्षा कमी तापमान वनस्पतींच्या वाढीस चालना देते. फुलोऱ्यानंतर रात्रीची लांबी फुलांच्या व शेगांच्या वाढीस चालना देते.

सोयाबीन हे दिवसाच्या लांबीसाठी (फोटोपीरियड) संवेदनशील पीक आहे. जेव्हा दिवसाचा कालावधी ठरावीक तासांपेक्षा कमी होतो, तेव्हा सोयाबीन पीक कळी अवस्थेत येते. दिवसांची लांबी अक्षांश आणि ऋतूनुसार बदलते.

सोयाबीनच्या वाढीच्या हंगामात विषुववृत्ताजवळ दिवसांची लांबी संपूर्ण वर्षभर जवळ जवळ समान राहते. उन्हाळ्यात विषुववृत्तापासून अक्षांशाचे अंतर जसेजसे वाढत जाते, तशीतशी दिवसाची लांबी वाढत जाते.

उन्हाळ्यात जिथे दिवस लांब असतात, अशा समशीतोष्ण वातावरणात उच्च- अक्षांशांशी जुळवून घेतलेले वाण फोटोपीरियड असंवेदनशील असतात, त्यामुळे वाणांना फुले येणे आणि थंडगार हवामान होण्यापूर्वी परिपक्वता येणे हे घडू शकते.

Soybean Production
Soybean Market : परभणीत सोयाबीनचे दर वाढून पोचले पाच हजारांवर

सोयाबीनवर पेरणीच्या तारखेपेक्षा दिवसाच्या लांबीचा प्रभाव फुलोरा येण्याच्या कालावधीवर जास्त पडतो. लवकर पेरलेल्या सोयाबीन पिकामध्ये शाखीय वाढ अधिक होते. लहान दिवसाच्या कालावधीत, तसेच उशिरा लागवड केल्यामुळे पूर्ण वाढ होण्यापूर्वीच ते लवकर फुलते.

लवकर पुनरुत्पादन अवस्थेत पोहोचल्यामुळे पिकाची वाढ थांबते आणि उत्पादनात घट होते. म्हणून सोयाबीनची परिपक्वता कालावधी कमी केला तर उत्पादकता कमी होण्याचा धोका आहे.

सोयाबीनचे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी त्या वाणांची परिपक्वता कालावधी राखणे आवश्यक आहे. म्हणजेच प्रत्येक वाणांचा परिपक्वतेचा कालावधी हा ठरावीक आहे. हिवाळ्यात दिवस लहान असल्याने या हंगामात सोयाबीनची लागवड केली जात नाही. उन्हाळ्यात लागवड केली असता शाखीय वाढ जास्त होते.

अमेरिकेच्या तुलनेत भारतात सोयाबीनचे पीक

(१) अमेरिकेत सोयाबीन हे पीक मुख्य हंगामात, म्हणजे १५ एप्रिल ते १५ मे दरम्यान पेरतात. या कालावधीत तेथील तापमान हे सौम्य व पिकास अनुकूल असते. भारतात सोयाबीनची पेरणी मॉन्सूनच्या आगमनानंतर १५ जून ते १५ जुलै या कालावधीत केली जाते. या कालावधीत पाऊस पडल्यानंतरच तापमानात होणारी घट ही सोयाबीन पिकास अनुकूल असते.

२) अमेरिकेत मुख्य हंगामातील पेरणी काळात उन्हाळ्यात दिवसांची लांबी जास्त असल्याने पिकाची शाखीय वाढ चांगली होते. शाखीय वाढ पूर्ण झाल्यानंतर फुलोरा चांगल्या प्रकारे येऊन उत्पादन वाढते. या उलट भारतात पावसाळा सुरू झाल्यावर पेरणी केली जाते. या काळात दिवसाचा कालावधी दीड ते दोन तासांनी कमी असल्याने पिकाची शाखीय वाढ अपेक्षेप्रमाणे होत नाही. शाखीय वाढ पूर्ण होण्याआधीच फुलोरा येण्यास सुरुवात होते.

३) फुलोरा आल्यानंतर पीक परिपक्व होईपर्यंत अमेरिकेतील तापमान सौम्य (म्हणजे साधारणत: २५-३० अंश सेल्सिअस दरम्यान) व अनुकूल असते. याउलट भारतातील तापमान हे पिकांच्या फुलोरा व शेंगा भरण्यापर्यंत बरेचदा दीर्घकाळ ३०- ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते. त्यामुळे सोयाबीन पिकाच्या दाण्यांची प्रतवारी घटते. उत्पादनात घट होते.

४) अमेरिकेत लवकर पेरलेल्या हंगामी सोयाबीन पिकात १ ते १४ जूनपासून फुले येण्यास सुरुवात होते. ती अवस्था पुढील ६-७ आठवडे सुरू राहून १० ऑगस्ट दरम्यान संपते. अमेरिकेतील मुख्य हंगामी पिकाची उशिरा हंगामी पिकापेक्षा अधिक शाखीय वाढ होते. या तुलनेत भारतात फुले येण्याचा कालावधी हा दोन आठवड्यांपर्यंत असतो.

५) अमेरिकेत जेव्हा भारतीय सोयाबीन पीक पद्धतीप्रमाणे उशिरा लागवड केली असता २१ जूनच्या सुमारास फुले येऊ लागतात. सौम्य हवामानात परिपक्वता जलद होऊन तिथेही मुख्य हंगामातील पिकाच्या तुलनेत कमी उत्पादन मिळते. याचा अर्थ असा की अमेरिकेतसुद्धा उशिरा पेरणी केली असता त्या काळातील वातावरण भारतीय वातावरणासारखे असते. पर्यायाने तिथेही सोयाबीनचे उत्पादन कमी येते.

६) भारतीय उपोष्णकटिबंधीय परिस्थितीत लवकर परिपक्व होणाऱ्या जाती विकसित करण्याचा प्रयत्न झाला. या जातींमध्ये नकळतपणे फोटोपीरियड संवेदनशीलताही अंतर्भूत झाली. लागवडीच्या हंगामादरम्यानची भारतातील परिस्थिती ही अमेरिकन समशीतोष्ण हवामानापेक्षा भिन्न आहे.

अमेरिकेत सोयाबीनच्या अस्तित्वासाठी फोटोपीरियड असंवेदनशीलता आवश्यक आहे. फोटोपीरियड असंवेदनशीलतेमुळे तेथील येऊ घातलेल्या थंडगार हवामानापूर्वी पीक परिपक्व होण्यासाठी मदत करते.

सारांश :

सोयाबीन हे पीक मुख्यत: खरीप हंगामात घेतले जाते. भारतातील सोयाबीनचे बहुतांश वाण प्रकाशकाल संवेदनशील व मॉन्सूनच्या पावसावर आधारित असल्याकारणाने उत्पादन वाढीवर मर्यादा येतात. त्यात हवामानातील बदलामुळे पिकाच्या उत्पादनावरही परिणाम दिसून येत आहे.

जर पावसामुळे उशीर पेरणी झाली तर त्याचा अनिष्ट परिणाम उत्पादनावर होतो. त्यासाठी भविष्यात सूर्यप्रकाश कालावधी व तापमान असंवेदनशील असलेले आणि फुलोरापूर्व दीर्घ अवस्था असलेले वाण लागवडीसाठी आणावे लागतील. हे वाण हवामान बदलाशी जुळवून घेऊन शकतील आणि उत्पादनात वाढ शक्य होईल.

डॉ. विवेक चिमोटे, ९४२३४६७५०५

(सहयोगी प्राध्यापक, राज्यस्तरीय जैवतंत्रज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

डॉ. मिलिंद देशमुख, ३४२३१८५६०३

(सोयाबीन पैदासकार, कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com