Safflower Cultivation : सुधारित पद्धतीने करडई लागवड

कोरडवाहू क्षेत्रामध्ये रब्बी हंगामात पीक उत्पादकता वाढविण्यासाठी करडई पिकाची निवड योग्य ठरते. कारण करडई हे पीक कमी पाण्यात येणारे व अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक आहे.
Safflower Cultivation
Safflower CultivationAgrowon


कोरडवाहू क्षेत्रामध्ये रब्बी हंगामात (Rabbi Season) पीक उत्पादकता वाढविण्यासाठी करडई पिकाची (Safflower Crop) निवड योग्य ठरते. कारण करडई हे पीक कमी पाण्यात येणारे व अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक आहे. करडईची मुळे जमिनीमध्ये खोल जातात. मुळांद्वारे जमिनीतील खालच्या थरातील अन्न व ओलाव्याचा योग्य उपयोग करून घेतला जातो. या पिकाच्या पानावर काटे येत असल्यामुळे पर्णोत्सर्जन कमी होते व प्रतिकूल परिस्थितीत हे पीक तण धरते. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रात लागवडीसाठी करडई पीक वरदान ठरले आहे.

Safflower Cultivation
Safflower Cultivation : करडई लागवडीचे सुधारित तंत्र कोणते?

हवामान ः
करडई पिकास अति थंड किंवा गरम हवामान मानवत नाही. कमी तापमानास रोप अवस्था व कायिक वाढीच्या अवस्था सहनशील असून, फुलोरा व परिपक्वतेचा कालावधी संवेदनशील आहे. कोरड्या हवामानात करडई पीक चांगले येते. जास्त पाऊस किंवा आर्द्रता असल्यास पीक रोगांना बळी पडण्याची शक्यता अधिक असते.

जमीन ः
मध्यम ते भारी, योग्य निचरा होणारी जमीन लागवडीस निवडावी. हलक्या जमिनीमध्ये पुरेसे सिंचन केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. जमिनीत पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे मूळकुजव्या आणि मर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. कमी निचरा होणारी भारी जमीन लागवडीस निवडू नये.

Safflower Cultivation
Safflower Cultivation : ...तंत्र करडई लागवडीचे

वाण निवड ः
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीद्वारे प्रसारित अधिक उत्पादन देणारे वाण.

वाण---कालावधी---हेक्टरी उत्पादन (क्विं./हे.)
००---००--जिरायती---बागायती
१) शारदा---१२५ ते १३०---८ ते १०---१६ ते १८
२) परभणी कुसुम (परभणी-१२)---१३० ते १३५---१० ते १२---२० ते २५
३) परभणी-४० (निम काटेरी)---१२० ते १२८---८ ते ९---१६ ते १८
४) परभणी ८६---१३५ ते १३८---१० ते १२---१८ ते २०

अन्नेगिरी-१, एकेएस-३२७, एसएसएफ-७०८ या सारख्या अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची सुद्धा लागवड केली जाते.

Safflower Cultivation
Safflower : करडईची लागवड करताना काय काळजी घ्याल ? | ॲग्रोवन

पूर्वमशागत ः
खरीप पिकांच्या काढणीनंतर जमिनीची नांगरणी न करता कुळवाच्या २ ते ३ पाळ्या द्याव्यात. शेतातील काडीकचरा वेचून घ्यावा.

पेरणी वेळ ः
- हमखास पावसाच्या भागात सप्टेंबरच्या शेवटचा आठवडा ते १५ ऑक्टोबरपर्यंत.
- बागायती ः १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर.
बागायती करडईसाठी पेरणीपूर्वी जमिनीतील ओलावा कमी असल्यास सिंचन करून वाफसा आल्यानंतर पेरणी करावी. किंवा कोरड्यात पेरणी करून नंतर हलके ओलित करावे.

बियाणे प्रमाण, लागवड अंतर ः
- पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम चोळावे.
- दोन ओळींत ४५ सेंमी व दोन रोपांत २० सेंमी अंतर ठेवून पेरणी करावी.
- हेक्टरी १० ते १२ किलो बियाणे पुरेसे होते.

खत व्यवस्थापन ः
क्षेत्र---खताचे प्रमाण (किलो/हे.)
००---नत्र---स्फुरद---पालाश
जिराईत---४०---२०--००
बागायत---६०---४०--००

नियोजित करडई लागवड क्षेत्रामध्ये खरीप हंगामात कडधान्यवर्गीय
पीक घेतले असल्यास करडई पिकास नत्राची मात्रा शिफारशीपेक्षा ५० टक्के द्यावी. जिरायती भागात रासायनिक खतांच्या संपूर्ण मात्रा द्याव्यात. बागायती क्षेत्रात नत्राची ५० टक्के आणि स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी. उर्वरित नत्र पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी पाण्याच्या पहिल्या पाळीवेळी द्यावे.

पीक पद्धती ः
पावसावर अवलंबून असलेल्या ठिकाणी हरभरा अधिक करडई (६ः२ किंवा ३ः१), गहू अधिक करडई (३ः१ किंवा २ः१) व जवस अधिक करडई (३:१ किंवा ४:२) या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. सिंचनाच्या पुरेशा सुविधा असलेल्या ठिकाणी मूग, उडीद, सोयाबीन नंतर करडईचे पीक घ्यावे.

विरळणी ः
अधिक उत्पादनासाठी करडई पिकात विरळणी करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा पीक सरळ वाढते, फांद्या कमी फुटतात व बोंडाची संख्या कमी होऊन उत्पादनात १५ ते ४० टक्के घट येते. उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी अतिरिक्त रोपे उपटून काढावीत. दोन रोपांत साधारण २० सेंमी अंतर राखावे.

आंतरमशागत ः
- पेरणीनंतर २५ ते ५० दिवसांपर्यंत १ ते २ खुरपण्या व कोळपणी करून शेत तणविरहित करावे.
- पेरणीपूर्वी फल्युक्लोरॅलीन १ किलो किंवा उगवणीपूर्वी ऑक्झोडायझोन १ किलो प्रति हेक्टर प्रमाणे दिल्यास तणांचा प्रादुर्भाव कमी होतो..

पाणी व्यवस्थापन ः
करडई पिकाच्या संवेदनशील अवस्थेत जसे फुलोरा अवस्था, बोंडे पक्व होण्याची अवस्था व दाणे भरण्याची अवस्था यामध्ये संरक्षित पाणी दिल्यास उत्पादनात दीडपट ते दुप्पट वाढ होते.
- कोरडवाहू परिस्थितीत सुरुवातीला वाढीच्या काळात किंवा फुलोऱ्यात एक पाणी दिले तर उत्पादन ४०-६० टक्के वाढ होते. बागायती परिस्थितीत कोरडवाहूपेक्षा साधारणत: दुप्पट उत्पादन मिळू शकते.

- करडई पीक हे अतिरिक्त पाण्यात अत्यंत संवेदनशील आहे. जमीन काळी, भारी, पाण्याचा योग्य निचरा न होणारी असेल तर अयोग्य सिंचनामुळे पाणी साचून मर व मूळकुजव्या रोगास प्रोत्साहन मिळते. त्यासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा. त्यामुळे ४० ते ४५ टक्के पाण्याची बचत होते.
- पेरणीपूर्वीं जमिनीत पुरेशी ओल नसेल तर हलके पाणी द्यावे. पेरणीनंतर ३५ दिवसांनी आंतरमशागत करून नत्राची मात्रा दिल्यानंतर एक पाणी द्यावे. ६५ ते ७० दिवसांनी पीक फुलोऱ्यात असताना सिंचन द्यावे.
----------------
-डॉ. श्‍यामराव घुगे, डॉ. संतोष शिंदे
(अखिल भारतीय संशोधन करडई संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com