शेतकरी नियोजन ः रेशीम शेती

मी २०१६-१७ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत रेशीम शेतीस सुरुवात केली. सुरुवातीला एक एकरावर तुती लागवड करत पुढे टप्प्याटप्प्याने त्यात वाढ केली.
Silk Farming
Silk FarmingAgrowon

शेतकरी ः भाऊसाहेब दत्ता निवदे

गाव ः मच्छिंद्रनाथ चिंचोली, ता. घनसावंगी, जि. जालना

एकूण शेती : ९ एकर

तुती क्षेत्र ः ५ एकर

------------------

मी २०१६-१७ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत रेशीम शेतीस (Silk Farming) सुरुवात केली. सुरुवातीला एक एकरावर तुती लागवड (Tuti Cultivation) करत पुढे टप्प्याटप्प्याने त्यात वाढ केली. सध्या लागवड अंतरामध्ये विविधता राखत ५ एकरांवर तुती लागवड केली आहे. तुती लागवड साधारण ४ बाय ३ फूट, ४ बाय दीड फूट, ४ बाय २ फूट आणि शासनाच्या नियमानुसार जोडओळ पद्धतीने ५ बाय ३ बाय २ फूट या पद्धतीने केली आहे. ५-३-२ या पद्धतीमध्ये दोन सरींतील अंतर ५ फूट, दोन झाडांमध्ये ३ फूट आणि दोन ओळींमध्ये २ फूट अंतर राखले जाते. दोन सरींमध्ये जास्त अंतर ठेवल्यामुळे रिकाम्या जागेत आंतरपीक घेणे शक्य होते.

रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी २२ फूट रुंद आणि ९० फूट लांबीचे शेड उभारले. रेशीम कीटक हा अत्यंत नाजूक असल्यामुळे संगोपनकाळात जास्त काळजी घ्यावी लागते. कीटकांच्या वाढीसाठी शेडमध्ये २४ ते २८ अंश सेल्सिअस तापमान आणि ७० ते ९० टक्‍के आर्द्रता गरजेचे असते. तापमानातील चढउतारानुसार योग्य पद्धतीने नियोजन करणे आवश्यक असते. संगोपनगृह पाहण्यासाठी आलेल्या बाहेरील व्यक्तीने अमली पदार्थांचे सेवन केले असल्यास त्यांना संगोपनगृहात प्रवेश दिला जात नाही.

उन्हाळ्यातील व्यवस्थापन ः

- उन्हाळ्यात शेडमधील तापमान आणि आर्द्रता योग्य राखणे मोठे जिकिरीचे काम असते. रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी शेडमध्ये २४ ते २८ अंश सेल्सिअस तापमान आणि ७० ते ९० टक्‍के आर्द्रता गरजेचे असते.

- उन्हाळ्यात संगोपनगृहात थंडावा राहण्यासाठी शेडभोवती हिरव्या रंगाची नेट लावून त्यावर ठिबकद्वारे पाणी सोडले. सकाळी १० पासून ते ४ वाजेपर्यंत दिवसभर ठिबकने नेट ओले केले जाते.

- तसेच संगोपनगृहाच्या भोवती झाडे लावली आहेत. झाडांची सावली थेट संगोपनगृहावर पडेल या पद्धतीने झाडांची लागवड केली आहे.

- वाढत्या तापमानाचा रेशीम कीटकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यासाठी शेडवर उसाचे पाचट टाकून त्यावर मिनी स्प्रिंकलरच्या साह्याने ओले केले जाते. त्यामुळे शेडवरील पत्रे गरम होत नाहीत. शिवाय शेडमध्ये गारवा तयार होण्यासाठी कुलर बसविले आहेत.

बॅचचे नियोजन ः

- रेशीम कीटकांचे व्यवस्थापन हे काटेकोर पद्धतीने करावे लागते. अन्यथा, विविध प्रकारचे रोग येण्याची शक्यता असते. परिणामी, पूर्ण बॅच बाद होण्याची धोका असतो.

- कोष काढणी आणि चॉकी गेल्यानंतर फॉर्मेलिन, ब्लिचिंग पावडर तसेच अन्य शिफारशीत घटकांद्वारे संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरण केले जाते.

- एका बॅचमध्ये बायव्होल्टाइन जातीच्या ४५० ते ५०० अंडीपुंजांपासून सुमारे ४०० ते ४५० किलो कोष उत्पादन मिळते.

- प्रत्येक बॅच गेल्यानंतर ७ दिवसांचे अंतर ठेवले जाते. याकाळात निर्जंतुकीकरण, चॉकीची उपलब्धता केली जाते.

बागेचे व्यवस्थापन ः

- तुती बागेमध्ये बैलांच्या साह्याने पाळ्या मारून माती मोकळी केली जाते. त्यामुळे खुरपणी करायची आवश्यकता भासत नही. प्रभावी तणनियंत्रण होऊन तुती झाडांची वाढही चांगली होते. तसेच पालादेखील चांगला येतो.

- बॅचच्या नियोजनानुसार मजुरांच्या मदतीने झाडांची छाटणी केली जाते. प्रत्येक झाडाला किमान ८ ते १२ फांद्या फुटतील याकडे लक्ष दिले जाते.

- तुतीचा पाला जाड व हिरवा गडद होण्यासाठी शिफारशीप्रमाणे फवारणी केली जाते.

- तुती लागवडीत ठिबक आणि तुषार सिंचनाद्वारे सिंचन केले जाते. तसेच काही लागवडीमध्ये मोकळे पाणी दिले जाते. मोकळे पाणी दिल्याने दर्जेदार आणि जास्त प्रमाणात पाला मिळतो.

- तुती लागवडीस शिफारशीप्रमाणे शेणखत आणि रासायनिक खतांची मात्रा दिली जाते. त्यानुसार दरवर्षी उन्हाळ्यात एकरी २ ट्रॉली याप्रमाणे शेणखत दिले जाते. तसेच १०ः२६ः२६ आणि युरिया

यांची प्रत्येकी एक बॅग प्रति एकर प्रमाणात दिली जाते.

विक्री व्यवस्थापन ः

- एका बॅच साधारण २१ दिवसांची असते. त्यानुसार चॉकी सेंटरमधून ७ दिवसांचे बाल्य कीटक आणले जातात.

- एका बॅचमध्ये ४५० ते ५०० अंडीपुंजांपासून सुमारे ४०० ते ५०० किलो कोष उत्पादन मिळते.

- उत्पादित सर्व कोषांची जालना येथील स्थानिक मार्केट तसेच बंगलोर जवळील रामनगरम मार्केटमध्ये विक्री येथे केली जाते.

- स्थानिक मार्केटमध्ये सरासरी ५०० ते ८०० रुपये प्रतिकिलो दराने कोषाची विक्री होते.

-----------------------

- भाऊसाहेब निवदे, ९९७००१७६९६

(शब्दांकन ः संतोष मुंढे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com